दिवाळी 2022 : पणत्या बनवणाऱ्या कुंभारवाड्यात कारागीर आजारी का आहेत?

कुंभारवाडा
    • Author, दीपाली जगताप
    • Role, बीबीसी मराठी

दिवाळी साजरी करायची म्हटलं की पणत्या हव्याच. पणत्यांशिवाय दिवाळी पूर्ण होऊ शकत नाही हे कोणीही सांगेल. पण या पणत्या कशा बनतात? आणि घरोघरी दिव्यांचा हा प्रकाश पोहोचवणारे कारागीर मात्र कसे 'अंधारात' जगतात...यावरील हा विशेष रिपोर्ट.

मातीच्या अस्सल पणत्या कशा बनवल्या जातात हे पाहण्यासाठी आम्ही पोहोचलो धारावीतील कुंभारवाड्यात.

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळख असलेल्या धारावीत कुंभारवाडा साडेबारा एकरवर वसलेला आहे.

धारावी म्हटलं की शेकडोंच्या संख्येने झोपड्या, चिंचोळ्या गल्ल्या आणि जवळपास 6 ते 7 लाख लोकांची वस्ती. इथेच कुंभारवाड्यात मातीला पणतीचा आकार दिला जातो.

एकावेळी एकाच बाजूने एका रांगेत चालता येईल अशी वाट काढत आम्ही या कुंभारवाड्यात पोहोचलो. इथली सगळी घरं पक्की असून किमान दोन मजली आहेत.

दिव्याखाली 'अंधार'

कुंभारवाड्यात मातीच्या पणत्या, मटके आणि आणि मातीची इतर भांडी बनवली जातात. कुंभारवाड्यातील रहिवाशांचा हा परंपरागत व्यवसाय आहे. ही कला जोपासणारी त्यांची तिसरी पिढी सध्या इथे राहत आहे.

इथल्या जवळपास प्रत्येक घरात मातीने माखलेले हात दिसतात तर घराबाहेर अशा शेकडो पणत्या सुकण्यासाठी ठेवलेल्या दिसतात.

आम्ही पोहोचलो तेव्हा मीनाक्षी सवनीया सुकलेल्या मातीच्या पणत्या भट्टीत ठेवत होत्या. त्यांचा चेहरा काळवंडलेला होता आणि हात काळेकुट्ट झाले होते.

मिनाक्षी सवनीया
फोटो कॅप्शन, मिनाक्षी सवनीया

कुंभारवाड्यात प्रत्येक चार ते पाच घरासमोर एक भट्टी आहे. भट्टी म्हणजे मातीच्या पणत्या तापवण्याची अंतिम प्रक्रिया. लाकूड, कापसाच्या काड्या किंवा चिंध्यांचा कचरा वापरून भट्टी पेटवली जाते.

या भट्ट्या साधारण 10*8 आकाराच्या असतात. भट्टीत लाकूड किंवा चिंधी टाकल्यावर हळूहळू भट्टी पेटत जाते आणि भट्टीतून धूराचे लोट बाहेर येतात. मातीच्या पणत्या कशा बनतात हे पहायचं आहे असं आम्ही त्यांना सांगितलं.

त्या म्हणाल्या, "हे तुम्हाला दोन तासांत नाही कळणार. किमान तीन दिवस इथे थांबावं लागेल तेव्हा मातीच्या पणत्या कशा बनतात ते कळेल."

आत्ता तुम्ही हे काय करत आहात? या प्रश्नाचं उत्तर देताना त्या म्हणाल्या, "ही मातीची भट्टी आहे. यात सुमारे 500 पणत्या ठेऊ शकतो. ओल्या मातीने बनवलेली पणती सुकल्यानंतरही ती कच्ची असते. तुमच्या घरापर्यंत पक्की पणती त्याला तडा न जाता पोहोचवायची असेल तर मातीच्या भट्टीत ती पत्की करावी लागते. या भट्टीची क्षमता 500 पणत्यांची आहे. इथे सर्व पणत्या ठेऊन झाल्या की आम्ही भट्टी पेटवणार .जवळपास सहा तास भट्टीत तापमानात ठेवल्यानंतर पणती तयार होणार."

पणत्या

आमचा हा संवाद सुरू असतान दुपारचे साधारण वाजले होते. भट्टी पेटवताना पहायचं असेल तर चार वाजता या असं मीनाक्षी म्हणाल्या.

त्या पुढे सांगतात, "हल्लीच्या पिढीला मातीच्या पणत्या आवडत नसतील पण आम्ही खूप मेहनतीने बनवतो. आता खरी मेहनत तर भट्टी सुरू केल्यावर करावी लागते. पण मातीच्या वस्तूंना किंमत नाही असं लोक आम्हाला बोलतात."

मीनाक्षी सवनीया यांचं वय साधारण 45 आहे. त्या इथेच कुंभारवाड्यात राहतात. गेल्या जवळपास 25-30 वर्षांपासून त्या मातीच्या वस्तू बनवतात.

कशी असते प्रक्रिया?

दिवाळी येण्यापूर्वी तीन चार महिन्यांपासूनच कुंभारवाड्यात पूर्वतयारी सुरू होते. सगळ्यात आधी माती विकत आणून ती तयार केली जाते.

ही माती आवश्यक तेवढी घट्ट झाली की फिरत्या चाकावरती मातीला आकार दिला जातो. ही माती बऱ्यापैकी ओली असते त्यामुळे मातीला पणतीचा आकार दिला की या पणत्या सुकवण्यासाठी पाच ते सहा तास बाहेर ठेवल्या जातात.

पणत्या सुकल्या की त्यांना एका विशिष्ट तापमानात भट्टीत पक्कं करण्यासाठी ठेवलं जातं. पणत्या किंवा मातीच्या वस्तू बनवण्याची ही सर्वात आव्हानात्मक प्रक्रिया मानली जाते.

भट्टीच्या क्षमतेनुसार 500 ते 1000 पणत्या भट्टीत तापवण्यासाठी ठेवल्या जातात. यानंतरच या पणत्या विक्रीसाठी तयार होतात.

मीनाक्षी सवनीया सांगतात, "पणती भट्टीत तापवली नाही तर पणतीला लगेच तडे जाणार. भट्टीत न तापवलेली पणती कच्ची असते. कच्ची पणती तुमच्या घरापर्यंत पोहोचेपर्यंत ब्रेक होणार."

'...पण खूप दम लागतो'

याच कुंभारवाड्यातच 56 वर्षीय मंगूबेन सवनीया काम करतात. गेल्या काही महिन्यांपासून त्यांना दम्याचा त्रास होतोय.

भट्टीतून सततच्या येणाऱ्या धुरामुळे आम्हाला श्वसनाचे विकार होऊ लागलेत असंही इथल्या कारागिरांचं म्हणणं आहे.

लग्न झाल्यापासून त्या इथेच काम करतायत. त्यांना आणि त्यांच्या पतीला दम्याचा त्रास आहे. त्यांना नीट श्वासही घेता येत नाही. त्या इथेच राहून उपचार घेतायत.

"आता वयानुसार काम होत नाही. मला भट्टीजवळ उभंही राहता येत नाहीय. दोन महिन्यांपासून श्वास घ्यायला खूप त्रास होतोय." असं म्हणत मंगूबेन नाकाजवळ पदर घेऊन निघून गेल्या.

कुंभारवाड्यात श्वसनाचा किंवा अॅलर्जीचा असा त्रास होणारे सवनीया दांपत्य एकमेव नाही. त्यांना भेटल्यानंतर पुढे आमची भेट 35 वर्षीय विजय टांक यांच्याशी झाली.

मंगूबेन
फोटो कॅप्शन, मंगूबेन

विजय टांक गेल्या 15 वर्षांपासून मातीच्या वस्तू बनवत आहेत. दिवाळी आली की ते शेकडो पणत्या बनवतात आणि त्याची विक्री करतात.

आम्ही त्यांच्या घरी पोहोचलो तेव्हा ते दारातच मातीला आकार देत होते आणि त्यांच्या समोरच दोन पावलांच्या अंतरावर भट्टी सुरू होती.

ते म्हणाले, "आधी सर्व स्वस्त होते. आता चिंधी, लाकडाचे भाव वाढले आहेत. यामुळे धूर जास्त होतो. आतापर्यंत आम्ही अनेकदा लोकप्रतिनिधींना यासाठी आधुनिक भट्ट्यांची मागणी केली आहे. पण काही झालं नाही. गॅस किंवा इलेक्ट्रिकची भट्टी आणावी असं आम्हाला वाटतं. धुरामुळे खूप त्रास होतो. खोकला खूप येतो, दम लागतो. घराजवळ भट्टी असल्याने लहान मुलांनाही त्रास होतोय. धूर कमी झाला तर आम्हीही 5 वर्षं जास्त काम करू शकू."

एकावेळची भट्टी पेटवण्यासाठी किमान 300 ते 600 किलो चिंधी वापरावी लागते.

मीनाक्षी सवनीया यांनीही हीच माहिती दिली.

" चिंधी वापरल्यामुळे धुरात केमिकल अधिक असतं. त्यामुळे इन्फेक्शन जास्त होतं. पण म्हणून आम्ही भट्टी बंद करू शकत नाही. आमचा हा वडिलोपार्जित व्यवसाय आहे. ही एक कला आहे. त्यावर तोडगा काढावा ही आमची मागणी आहे. " असं त्या सांगतात.

कुंभारवाडा

दरवर्षी दिवाळीत 80 लाखांहून अधिक पणत्या या एका कुंभारवाड्यात तयार होतात. पण एका कुटुंबाची या काळातली कमाई साधारण 30 ते 40 हजारांच्या घरात आहे.

या कमाईवरच इथे राहणाऱ्या हजारो लोकांचं पोट भरतं.

मातीच्या वस्तू बनवणं ही आपली पारंपरिक कला आहे आणि ती जोपासली पाहिजे असं मीनाक्षी यांना वाटतं.

त्या म्हणाल्या, "सरकारने सर्व क्षेत्रात शिक्षण देतं. इलेक्ट्रॉनिक्स, मरीन, इंजिनीअर, डॉक्टर, पण मग आमचं कुठे आहे? आमच्या कलेचं शिक्षण, प्रोजेक्ट आहे का? आम्ही हाताने काम करतो त्याची काही किंमत आहे का? इंजिनिअरींग शिकवण्यासाठी शिक्षक आहे. आपण मंगळावर जाण्यासाठी तयार आहोत पण तुम्हाला मातीच्या वस्तू बनवता येतात का? मग तेवढीच आमची व्हॅल्यू आहे."

या कुंभारवाड्यात स्थलांतर करून आलेली दोनशेहून अधिक कुटुंब आहेत. दिवाळीत घरोघरी प्रकाश पोहोचवण्याचं काम करतायत. पण आरोग्य सुधारण्यासाठी कमी धूर असलेली आधुनिक यंत्रणा उभारण्याची या कारागिरांची मागणी आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)