वाडवळ समाज कोण आहे? वैशिष्ट्यपूर्ण पदार्थांमधून उलगडलेली वाडवळी संस्कृती...

वाडवळी पदार्थ
    • Author, अमृता कदम
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

आपल्याकडे भाषा, प्रांताची जेवढी विविधता तितकीच खाद्यपदार्थांचीही... जसं बारा मैलांवर भाषा बदलते, तसंच एका घरात शिजणारे पदार्थही दुसऱ्या घरातल्या पदार्थांपेक्षा वेगळा असतो. हा परीघ वाढवत नेला तर मग जाती-पोटजाती, धर्म, भौगोलिक प्रदेश यांनुसार खाणं बदलत जातं.

कोणत्याही पदार्थाला केवळ चव, रंग-गंध नसतो; तर इतिहास, संस्कृती, परंपराही असते. या परंपरा शोधायला कधी फार लांबही जावं लागत नाही...अगदी उदाहरणच घ्यायचं झालं तर मुंबईच्या अगदी जवळच एक वैशिष्ट्यपूर्ण खाद्यसंस्कृती पाहायला मिळते. जेव्हा आम्ही या खाद्यपरंपरेबद्दल जाणून घ्यायला गेलो, तेव्हा एका समाजाचा इतिहासही कळला...त्यांची जीवनशैली जाणून घेता आली.

मुंबईचं ट्राफिक सोडून बोईसर-तारापूरच्या पुढे जायला लागलो की, शांत-हिरवागार भाग सुरू होतो...इथल्या पालघर-डहाणू भागातल्या चिंचणी, केळवे गावांत मोठ्या प्रमाणावर वाडवळ समाज राहतो. या समाजाबद्दल पहिल्यांदा कळलं तेच मुळी त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थांमुळे...

सोशल मीडियावर वाडवळी पदार्थांचे फोटो पाहिले होते. ओल्या बोंबलाच्या वड्या, भानवलं, सान्नं, केळफुलं-वालाची भाजी, पोतेंडी, पानोळी, ताडीच्या वड्या... यादी बरीच मोठी आहे. नावं वाचूनच जीभेला पाणी सुटेल अशा या चवीच्या शोधात आम्ही थेट वाडवळांच्या गावातच जाऊन पोहोचलो...

ओल्या बोंबलाच्या वड्या

डहाणूमधलं समुद्रकिनाऱ्याला लागून असलेलं चिंचणी...गो नी दांडेकरांच्या कथांमधल्या माडा-पोफळ्यांनी झाकलेल्या हिरव्यागार गावांसारखं. इथे पोहोचलो तेव्हा आमची वाट पाहत काहीजण आणि काहीजणीही थांबले होते...त्यांच्याशी आधी फोनवर बोलणं झालं होतं.

आम्हाला वाडवळांच्या खाद्यपदार्थांबद्दल जाणून घ्यायचं आहे, असं त्यांना सांगितलं होतं. आम्ही येण्याच्या आधीच त्यांनी काही पदार्थ बनवून ठेवले होते. बोंबलांचा रस्सा, आंबोळी तसंच इतर पदार्थ खाण्याचाही आग्रह झाला...

त्यांच्या पारंपरिक पदार्थांबद्दल माहिती द्यायला सुरूवात केली. हे सगळं ऐकताना आता यातलं नेमकं किती आणि कसं दाखवायचं हा प्रश्न पडायला लागला. इतके सारे पदार्थ होते...महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेल्या खाद्यसंस्कृती कोशातही वाडवळ समाजाच्या खाण्यापिण्याबद्दल माहिती आहे. ती पण वाचली होती.

मग इथे उपस्थित असलेल्या महिलांनाच विचारलं की, तुम्हीच तुमच्या काही पारंपरिक रेसिपी करून दाखवू शकता का? तेव्हा त्यांनी त्यांच्या तीन पारंपरिक रेसिपी करून दाखवल्या. दोन शाकाहारी आणि एक मांसाहारी.

रवळी

त्यांपैकी एक होती रवळीची. रवळी म्हणजे काय असं विचारल्यावर उत्तर मिळालं- अगदी सोप्या शब्दांत सांगायचं म्हणजे हा आमचा जुन्या काळातला केक.

यासाठी लागणारं सामानही अगदी थोडकं आणि घरातच असलेलं. तांदळाचा रवा, नारळाचं दूध, तूप आणि गूळ

आम्हाला ही रेसिपी बनवून दाखविणाऱ्या मंदा सावे यांनी सांगितलं की, "दिवाळी आणि बारशाच्या वेळेस आमच्याकडे हमखास रवळी बनवली जायची. दिवाळीच्या वेळेस घरी धान्य आलेलं असायचं. तेव्हा बाकी काही परवडत नसल्यानं घरातल्याच गोष्टी वापरून कुटुंबातल्या लोकांना आणि शेतात काम करणाऱ्या मजुरांना खाता येईल अशी गोडधोड रवळीची रेसिपी केली जायची. वाढदिवसालाही आम्ही हे केक करून कापायचो".

रवळी

एकत्र कुटुंब, शेतातले मजूर अशी भरपूर माणसं असल्याने पूर्वी दिवाळीच्या वेळेस रवळीची तयारी अगदी आदल्या दिवशी रात्रीपासूनच सुरू व्हायची, असं मंदा सावे यांनी सांगितलं. मोठ्या प्रमाणावर आणि चुलीवर बनत असल्याने कदाचित तेव्हा रवळीला एवढा वेळ लागत असेल. पण सध्याच्या आधुनिक साधनांच्या वापराने आता रवळी बनवायला फार वेळ लागत नाही.

म्हणजे तांदूळ तुपावर भाजून घ्यायचा. नंतर नारळाचं दूध गरम करायला घ्यायचं, त्याच्यात गूळ घालायचा. चवीसाठी वेलची-जायफळ पूड घालायची. नंतर भाजलेला तांदूळ त्यात घातला की, हे मिश्रण छान शिजू द्यायचं. पूर्वी वरूनही केळीच्या पानावर विस्तव ठेवून छान वाफ द्यायचे. आता कुकरच आले आहेत.

थंड झाल्यावर छान फुललेला हा घरगुती केक तयार...बेकिंग सोडा वगैरे काहीही न घालता.

याच्या वड्या पाडल्या आणि मग एक वडी खाऊन पाहिली. तांदळाचा रवा असल्याने छान दाणेदारपणा होता आणि नारळाचं दूध-तूप यांमुळे आलेला ओलावा, मऊसूतपणा.

भौगोलिकदृष्ट्या विचार केला तर या भागात भातशेती होते. त्यामुळे सणासुदीला तांदळाचे पदार्थ असणं स्वाभाविकच. पण काळानुसार आणि गरजेनुसार इथली पीकपद्धती बदलली. पूर्वी रवळीसाठी गिरणीतून तांदूळ दळून केलेला रवा वापरला जायचा. त्यासाठी डांगी जातीचा तांदूळ वापरला जायचा. आता हा तांदूळ होत नाही. पण इतर पर्याय वापरून रवळी मात्र आवर्जून केली जातेच, मंदा सावे सांगत होत्या.

पानोळी

जशी रवळी सणाला किंवा काही आनंदाच्या प्रसंगांना बनते, तसाच अजून एक पदार्थ आहे, जो दिवाळीच्या सुमारास तसंच थंडीच्या काळात बनवला जातो. तो म्हणजे पानोळी.

व्हीडिओ कॅप्शन, रवळी, पानोळी, आंबा-कोलंबी... एका वेगळ्या खाद्यसंस्कृतीची ओळख

नव्या तांदळाचं पीठ, चवळी, काकडी, डांगर म्हणजेच लाल भोपळा, हिरव्या सालीचं केळ, नारळ, गूळ हे पदार्थ वापरले जातात...हे सगळे पदार्थ एकत्र करून मळून घ्यायचे आणि मग हळदीच्या पानात थापून वाफवायचे. वाफ आली की मग पान बाजूला करून ती पानोळी खायची.

खरं सांगायचं तर आता हे सगळे पदार्थ एकत्र केल्यावर नेमकं काय मिश्रण बनणार आणि त्याची चव काय असेल, असा प्रश्न पडला होता. पण जेव्हा वाफवून तयार झालेली पानोळी टेस्ट केली तेव्हा यामध्ये इतके वेगवेगळे पदार्थ एकत्र नांदत असतील असं वाटलंही नाही. सगळ्यांची चव एकमेकांसोबत छान एकरूप झाली होती. आपण जशा भोपळ्याच्या घाऱ्या वगैरे खातो, तशीच ही पानोळी खायची.

याच गोष्टी वापरून दिवाळीच्या आगेमागे हा पदार्थ का बनवतात याचेही एक इंटरेस्टिंग कारण आहे.

पानोळी

विपुला सावे यांनी आम्हाला पानोळी बनवून दाखवली. त्यांनी सांगितलं, "शेतकरी जेव्हा शेतीची कामं सुरू करतात, तेव्हा हे सगळं खाल्लं जात नाही. जोपर्यंत 'नव्याचं' पिकून येत नाही, तोपर्यंत हे शेतकरी खात नाहीत. जेव्हा हे धान्य पिकतं, तेव्हा शेतकरी सगळं एकत्र करतात. देवासमोर त्याचा नैवेद्य दाखवला जातो आणि मग सगळे मिळून हे खातात."

त्या हे सांगत असताना 'नव्याचं' म्हणजे काय हा प्रश्न पडला. त्याचं उत्तर देताना विपुला यांनी सांगितलं, "नव्याचं म्हणजे पावसाळ्यानंतर आलेली नवीन पीकं."

विपुला यांनी हे सांगितल्यानंतर लक्षात आलं की, दसरा-दिवाळीच्या दरम्यान सुगीचा हंगाम सुरू होतो. नवीन पीकं आलेली असतात. याच सगळ्या गोष्टींपासून पानोळी बनवतात.

आंबा-कोलंबी

चिंचणी हे गाव समुद्रकिनाऱ्याला लागूनच. त्यामुळे माशांची डिश तर हवीच ना... एरव्ही माशांचं कालवण म्हटलं की त्यात आपण कोकम, ओला नारळ, नारळाचं दूध या गोष्टी वापरतो. पण मासे आणि आंबे हे कॉम्बिनेशन इथं पहिल्यांदाच पाहायला मिळालं.

तसंही आंबटपणासाठी वाडवळांमध्ये कोकम फार वापरत नाहीत. एरव्हीही चिंचेचा वापर होतो.

'आंबा-कोलंबी ही आमच्या वाडवळांची एकदम खास आवडती डिश,' मंजुषा चुरी सांगत होत्या.

"जेव्हा इतर कोणतेही मासे नसतात, तेव्हाही कोळंबी हमखास मिळतेच. आणि आंबा तर आमच्याकडे असतोच. पटकन हा पदार्थ बनवतो आणि खूप आवडीनं खाल्लाही जातो."

कोलंबी

आंबा अगदी ठराविक महिन्यांसाठी उपलब्ध असलेलं फळ. मग आंबा-कोलंबीसाठी वर्षभर तो कसा मिळतो, हे विचारल्यावर मंजुषा सांगतात की, आम्ही आंबे विशिष्ट पद्धतीनं साठवून ठेवतो. अगदी कच्ची कैरी पण नाही आणि पिकलेला आंबा पण नाही अशा अवस्थेतलं फळ जेव्हा उतरवलं जातं, तेव्हा ते मीठाच्या पाण्यात बुडवून ठेवतात. त्यात थोडीशी हळदही घालतात. अशा रीतीने साठवलेलं हे फळ वर्षभर पुरतं.

आंबा-कोलंबी हा पदार्थ ऐकल्यावर काहीतरी खूप वाटूनघाटून बनवायचा पदार्थ असेल असं वाटलं होतं. पण आंब्याच्या फोडी, कोलंबी, बारीक चिरलेला कांदा, आलं लसणाची पेस्ट आणि लाल तिखट एवढ्या सामुग्रीवर हा पदार्थ तयार होतो.

मिठाच्या पाण्यातला आंबा

गरमागरम आंबा कोलंबी आणि सोबत तांदळाची भाकरी...वाह! आंबा कोलंबीमध्ये जो आंबा असतो, तो पिकलेलाही नसतो आणि कच्चाही. त्यामुळे त्याची आंबटगोड चव कालवणात उतरते. वर जसं म्हटलं त्याप्रमाणे यामध्ये फारसं वाटणघाटण नसल्याने कोलंबी आणि आंब्याची चव मसाल्याने मारलीही जात नाही.

एकूणच वाडवळ समाजाच्या आहारात ताज्या भाज्या तसंच माशांचं प्रमाण अधिक असल्याचं जाणवलं.

भाज्यांमध्ये तुमच्या-आमच्या स्वयंपाकघरात एरव्ही शिजणाऱ्या भाज्या असतातच, पण त्याबरोबरच अळू, केळपुलं, कडवे वाल, आंब्याची बाठवणी, उळपातीचा कांदा अशा भाज्याही वेगवेगळ्या कॉम्बिनेशनमध्ये केल्या जातात.

इथे व्हेज-नॉनव्हेजच्याही मस्त जोड्या आहेत. जशी आपण आंबा-कोलंबी पाहिली. तसंच बटाट्यासोबतही लहान कोलंबी खपून जाते. चिकनमध्येही बटाटा पडतो.

वाडवळी पदार्थ
फोटो कॅप्शन, वाडवळी पदार्थ

या सगळ्या पदार्थांसाठी खास वाडवळी मसाला वापरला जातो. लाल मिरची आणि वेगवेगळे मसाल्याचे पदार्थ वापरून हा वाडवळी मसाला घरीच बनवला जातो.

वाडी करणारे ते वाडवळ

वाडवळ समाजाच्या या रेसिपींबद्दल जाणून घेताना या समाजाच्या खाद्यपरंपरेचा एक धागा तिथल्या कृषीसंस्कृतीशी जोडला असल्याचं जाणवलं.

पालघर

वाडवळांचा पारंपरिक व्यवसाय हा शेतीच आहे. आम्ही डहाणू तालुक्यातलं चिंचणी आणि पालघरमधलं केळवे या भागात गेलो होतो. या दोन्ही गावांमध्ये फिरताना पानवेलींचे मळे, आंबा, चिकू, केळी, नारळीच्या बागा दिसत होत्या. इथल्या भाषेत त्याला 'वाडी' म्हणतात.

वाडी करणारे ते वाडवळ अशी या शब्दाची व्युत्पत्ती असावी, असं मत वाडवळी संस्कृतीच्या अभ्यासक स्मिता पाटील यांनी व्यक्त केलं.

चिंचणीमध्ये काशिनाथ पाटील यांच्याशी भेट झाली. वयाच्या पंचाहत्तरीतही शेतीचा कारभार पाहणाऱ्या काशिनाथ पाटील यांचीही चिंचणीमध्ये आंबे, नारळ-केळीची बाग, चिकूची वाडी आहे. त्यांनी मोठ्या उत्साहानं आम्हाला या भागातील शेती फिरून दाखवली.

वाडवळ समाजाच्या शेतीबद्दल काशिनाथ पाटील यांनी सांगितलं, "समुद्र किनाऱ्यावर असलेली शेतीच खरी बागायत. त्यामुळे संपूर्ण बागायत करणारा वाडवळ समाज हा डहाणू आणि बोर्डीपासून घोलवड देहरीपर्यंत आणि वसईपर्यंत पसरला. वाडवळ समाजाची बहुतांशी गावं ही समुद्रकिनाऱ्याला लागून आहेत. कारण समुद्र किनाऱ्यावरची जमीन ही वाळूमिश्रित आहे. या वाळूमिश्रित जमिनीमध्ये पाण्याचा निचरा चांगला होतो. त्यामुळे परंपरागत याच जमिनीमध्ये हा समाज वसला आणि त्याने या केळी-नारळी, पानवेलीच्या बागा केल्या."

काशिनाथ पाटील
फोटो कॅप्शन, काशिनाथ पाटील

पारंपरिक पीकांसोबतच हा समाज आता इतर पीकांकडेही वळला आहे. त्यातलं एक महत्त्वाचं पीक म्हणजे ढोबळी मिरची. शेडनेटमध्ये आधुनिक पद्धतीने ढोबळी मिरचीचं पीक घेणारे शेतकरीही आहेत आणि मातीविरहित शेतीचा प्रयोग करत ऑर्किडचीही शेती करणारे.

पावसाच्या बदललेल्या वेळापत्रकामुळे चिकूचे बहर बदलत आहेत. आंब्याच्या उत्पादनावर परिणाम होतोय. अशावेळी अधिक उत्पन्न देणारे हे वेगळे प्रयोग केले जात आहेत.

वाडवळ समाज कोण?

आपली खाद्यसंस्कृती जपणारा, मुख्यतः शेतीवर अवलंबून असलेला हा समाज नेमका कोण आहे? ही एखादी विशिष्ट जात आहे का? त्यांचा इतिहास काय आहे, असे प्रश्न मनात येत होते. या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आम्ही वाडवळी संस्कृतीच्या अभ्यासक प्रा. स्मिता पाटील यांना भेटलो.

त्यांनी वाडवळ समाजाचा रंजक इतिहास सांगितला.

वाडवळ समाज कोण आहे? वैशिष्ट्यपूर्ण पदार्थांमधून उलगडलेली वाडवळी संस्कृती...

वाडवळ समाज हा मूळचा सोमवंशीय क्षत्रिय समाज असल्याचं त्या सांगतात. त्यांना वाडवळ कधीपासून म्हटलं जातं याचा लिखित पुरावा उपलब्ध नाहीये.

देवगिरी सम्राट रामदेवराय यादव याचा मुलगा बिंबदेव यादव हा जेव्हा उत्तर कोकणामध्ये आला, तेव्हा त्याने आपल्यासोबत सोमवंशीय क्षत्रियांची 27 कुळं आणली होती. पालघर जिल्हा, ठाणे जिल्हा या पट्ट्यात सोमवंशी क्षत्रियांचे वंशज आढळतात. परंतु या सर्व सोमवंशी क्षत्रियांना वाडवळ म्हणत नाहीत.

वाडवळ ही संज्ञा केव्हा प्राप्त झाली, कशी प्राप्त झाली याबद्दल लिखित पुरावा काहीही नाही. साधारपणे जे व्यवसाय केले जातात त्यावरून समाजाला जी संबोधनं दिली जातात, तशापद्धतीनेच वाडी करणारे ते वाडवळ अशी संज्ञा वाडवळांना मिळाली असेल, असा अंदाज स्मिता पाटील व्यक्त करतात.

भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण या पुस्तकातही वाडवळांबद्दल माहिती देताना त्यांना व्यवसायावरूनच हे नाव पडलं असावं असं म्हटलं आहे.

चिकूची वाडी

पालघर, डहाणू, वसई, तालुक्यात वाडवळांची वस्ती आहे. उत्तरेकडे गुजरात सीमेवरही देहरी म्हणून एक गाव आहे. तिथे वाडवळ समाज आहे. दक्षिणेकडे वालुकेश्वरपर्यंत वाडवळ समाज आहे.

वसई तालुक्यात वाडवळांना 'पानमाळी' म्हटलं जातं असंही भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षणमध्ये म्हटलं आहे. 'पानमाळी' म्हणजे पानवेलीची लागवड करणारा. या भागात विड्याच्या पानासाठी लावली जाणारी नागवेल प्रसिद्ध आहे.

ऐतिहासिक संदर्भ

'महिकावतीची बखर' ही मराठीतली सर्वांत प्राचीन बखर. त्यामध्ये बिंब राजाचा इतिहास आहे. सोमवंशी क्षत्रियांचाही इतिहास आहे.

त्याशिवाय रघुनाथ राणे यांचं बिंबाख्यान, अर्ली हिस्ट्री ऑफ बॉम्बे, उत्तर कोकणचा इतिहास, ओरिजिन ऑफ बॉम्बे या पुस्तकांमध्येही सोमवंशीय क्षत्रियांचा इतिहास आहे.

या ग्रंथांमधून सोमवंशीय क्षत्रियांचा सुमारे हजार ते बाराशे वर्षांपूर्वीचा इतिहास समजतो.

ज्या बिंबराजाने आजची मुंबई वसवली, तो सोमवंशी क्षत्रिय होता. पण हा बिंबराजा म्हणजे गुजरातमधील चालुक्यवंशांतील सोळंकी राजघराण्यातील 'भीमदेव' की देवगिरीच्या यादव घराण्यातील 'बिंब' राजा होता याबाबत अजून मतैक्य झालं नाही, असं भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षणमध्ये म्हटलं आहे.

पण 'महिकावतीच्या बखरीत' बिंब राजाच्या उत्तर कोकणात येण्याचा काळ इसवीसन 1288 आहे. 'साष्टीच्या बखरीत' हा काळ इसवीसन 807 दिला आहे.

एकूण विचार करता सोमवंशीय क्षत्रियांचा उत्तर कोकणात येण्याचा काळ हा साधारण एक हजार वर्षांपूर्वीचा आहे हे नक्की.

पानाची वाडी
फोटो कॅप्शन, पानाची वाडी

बखरीमध्ये सोमवंशीय क्षत्रियांची सावे, चुरी, वर्तक, म्हात्रे, राऊत अशी उपनामं दिली आहेत. या भागात फिरताना याच आडनावाची वाडवळ कुटुंबही आढळली.

वाडवळ समाजाची बोलीभाषा

या समाजाची स्वतःची बोलीभाषा आहे. या बोलीला अर्थातच 'वाडवळी' म्हटलं जातं.

वाडवळी ही लिखित भाषा नाही, त्यात स्वतःचं लिखित साहित्य नाहीये. पण वाडवळांची बोली गावागावांतून वापरली जाते.

वाडवळी बोलीभाषेचा अभ्यास करताना या भाषेत असलेल्या पारंपरिक गीतांचा उपयोग झाल्याचं प्रा. स्मिता पाटील यांनी सांगितलं.

वाडवळ समाजात अगदी जन्मापासून सटी, बारसं ते लग्नापर्यंत अनेक गाणी आहेत.

केवळ्यामधील नूतन पाटील यांनी वाडवळी बोलीभाषेतील काही गाणी संकलित केली आहेत.

नूतन पाटील (मध्यभागी) यांनी काही वाडवळी गीतांचे संकलन केले आहे.
फोटो कॅप्शन, नूतन पाटील (मध्यभागी) यांनी काही वाडवळी गीतांचे संकलन केले आहे.

ही गाणी संकलित करताना त्यांना भाषेच्या काही अडचणी आल्या. कारण ही सगळी गाणी मौखिक परंपरेनं चालत आलेली...मग त्यातले अनेक शब्द कळायचे नाहीत. ते मूळ शब्द आहेत की अपभ्रंश हेही लक्षात यायचं नाही. मग शब्दकोश चाळून, जुन्या लोकांशी बोलून त्यांनी या गाण्यांचे अर्थ लावले.

तुम्ही काही गाणी आम्हाला म्हणून दाखवू शकता का, असं म्हटल्यावर नूतन पाटील आणि त्यांच्या मैत्रिणींने आम्हाला केवळ ही गाणी म्हणूनच दाखवली नाहीत, तर छान तयार होऊन त्याचं सादरीकरणही करून दाखवलं.

त्याचे बोल असे होते-

हळदी सापेकळी, राय रखुमाय नवरी

भिवंकासे कुळी, हळदी जन्म जाला

ऐसे हो भिवंका, सृष्टिसे सुरेख

लाविले विरेख, गोऱ्या हळदिसे

बावी पोखरण, दंडी वाहे पाणी

सभोती लावणी, गोऱ्या हळदिशी

यातला सापेकळी हा शब्द म्हणजे चाफेकळी...वाडवळांच्या बोलीभाषेत 'च' ला 'स' म्हटलं जातं. काही शब्दांमध्ये 'स' ला 'ह' म्हटलं जातं. त्यामुळे मग 'सासू' ही 'हावू' होते. वाडवळी बोलीभाषांच्या इतरही अशाच गमतीजमती आहेत. शिवाय भागानुसारही इथल्या भाषेत फरक पडतो. म्हणजे वसईकडची वाडवळी बोली ही पालघर, डहाणू भागातल्या बोलीभाषेपेक्षा वेगळी आहे.

लग्नासंबंधीच्या प्रथा

वाडवळ समाजात केवळ लग्नातल्या प्रत्येक विधीसाठी गाणीच नाहीयेत, तर त्यांच्या काही रंजक प्रथाही आहेत.

त्यातली एक म्हणजे लग्नप्रसंगी जेव्हा नवरा मुलगा नवरीच्या घरी वरात घेऊन जातो, तेव्हा त्याला चंदनी सिंहासनावर बसवून मिरवत नेण्याचा मान बिंबदेव राजाने सोमवंशी क्षत्रियांना दिला होता. परत जाताना वधूलाही याच सिंहासनावरून नेलं जायचं. पण ऋतूमती झालेल्या म्हणजेच मासिक पाळी आलेल्या वधूला सिंहासनावर बसता यायचं नाही.

आता हा मान ज्या सोमवंशीय क्षत्रियांना मिळाला त्यांपैकी ज्यांना सिंहासनाला पाच कळस जोडण्याचा मान ते झाले पाचकळशी. ज्यांना चार कळस जोडण्याचा मान ते झाले चारकळशी. वाडवळांमधे असं काही पोटभेदही आहेत.

वाडवळ समाजात लग्नाच्या प्रत्येक विधीसाठी गाणी आहेत
फोटो कॅप्शन, वाडवळ समाजात लग्नाच्या प्रत्येक विधीसाठी गाणी आहेत

आपल्या समाजातील लग्नाबद्दलच्या गोष्टी सांगताना वाडवळ लोक दोन गोष्टी आवर्जून सांगतात- ते म्हणजे आमच्याकडे हुंडा पद्धत कधीच अस्तित्वात नव्हती. आजही वाडवळांमध्ये हुंडा घेतला जात नाही. दुसरं म्हणजे विधवा विवाहाला असलेली मान्यता. एखाद्या विधवा महिलेला मूल असेल, तर त्याचाही स्वीकार केला जायचा.

स्वतःला सोमवंशी क्षत्रिय म्हणवणाऱ्या वाडवळ समाजातले काही लोक धर्मांतरित ख्रिस्तीही आहेत. विशेषतः वसई परिसरात हे लोक आहेत.

दोन दिवस आम्ही चिंचणी, केळवे परिसरात होतो. एखादा समाज, त्यांची संस्कृती समजून घ्यायची म्हटली तर एवढे दिवस पुरेसे नसतात. त्यातही वाडवळ समाजाच्या वैशिष्ट्यपूर्ण पदार्थांबद्दल कळल्यानंतर त्यांची खाद्यसंस्कृती जाणून घेण्याच्या उद्देशाने आम्ही या गावांमध्ये पोहोचलो होतो. पण खाण्यापिण्याबद्दल जाणून घेतानाच त्यांची जीवनशैली, प्रथा-परंपराही उलगडत गेल्या. इतिहासाचे धागेदोरे समोर आले.

बदलता काळ, जीवनशैलीमध्ये जेव्हा वेगवेगळ्या समाजांमधली वैशिष्ट्यं धूसर होत असताना वाडवळांसारखे काही समाज आहेत जे आपली सांस्कृतिक वैशिष्ट्यं टिकवून ठेवत आहेत...शिक्षण, आधुनिकतेची कास धरत असतानाच आपल्या परंपरा जपत आहेत आणि पुढच्या पिढीकडे तो वारसा देण्याचाही प्रयत्न करताहेत.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)