Women’s Day: दाऊदी बोहरा किचन, जे महिलांना स्वयंपाकघरातून मुक्त करतं
- Author, ओंकार करंबेळकर
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
रांधा...वाढा... मग उष्टी काढा! या चक्रात भारतातीलच नाही तर जगातल्या बहुतांश देशातल्या स्त्रिया अडकलेल्या आहेत.
घरातली मुलगी थोडी मोठी व्हायला लागली की तिला हळूहळू स्वयंपाकघराकडे ओढायला सुरुवात होते. 'पुढे जाऊन तुला हेच करायचंय!' त्यामुळे आतापासून स्वयंपाकाची सवय हवी, हा संस्कार जाणीवपूर्वक ठसवला जातो.
फारसा स्वयंपाक न येणाऱ्या मुलीच्या आईला तर लग्नानंतर तिचं कसं होणार, याचीच काळजी लागलेली असते. जणू स्वयंपाक हे तिचं आद्य आणि एकमेव कर्तव्य आहे, असं सर्वांनी गृहित धरलेलं असतं.
पण एका समाजानं मात्र आपल्या समुदायातील महिलांचा भाकरीला चिकटलेला हात मोकळा करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. हा आहे 'दाऊदी बोहरा मुस्लीम समाज'.

दाऊदी बोहरा समाजाचे 52वे धर्मगुरू डॉ. सय्यदना मोहम्मद बुऱ्हाणुद्दीन यांनी 'फैज अल- मवायद अल- बुऱ्हाणीयाह' या नावानं सामूहिक स्वयंपाकघरांची म्हणजेच कम्युनिटी स्मार्ट किचनची योजना प्रत्यक्षात आणली.
या योजनेत बोहरा कुटुंबं दरमहा काही पैसे देतात. अर्थात तेही ऐच्छि्क आहे. त्यासाठी अमूक इतकी निश्चित रक्कम करण्यात आलेली नाही.
त्यानंतर त्यांना दररोज प्रशिक्षित स्वयंपाक्यांनी केलेलं अन्न डब्यांमधून घरपोच मिळतं. हे डबे बोहरा समाजातील काही स्वयंसेवक किंवा डबेवाले पोहोचवतात.
एकाच गुणवत्तेचं हे अन्न सर्वांना एकसारखंच मिळतं. त्यामध्ये श्रीमंत-गरीब असा भेदभाव केला जात नाही. 'फैज अल-मवायद अल-बुऱ्हाणीयाह' योजनेचं मुख्य केंद्र मुंबईत बदरी महल इथं आहे. इथून जगभरातल्या बोहरा समाजाच्या अन्नाचं नियोजन केलं जातं.
'लोक मेन्यूमध्ये बदल सुचवू शकतात'
दाऊदी बोहरा समजामधील सर्व कामकाजाचं व्यवस्थापन अंजुमन-ए-शियातली ही संस्था पाहाते.
या संस्थेचे सहसरचिटणीस शेख मुस्तफा कांचवाला यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "या अन्नाचं वाटप होताना कोणताही भेदभाव केला जात नाही. सर्वांना एकप्रकारचं अन्न मिळतं. आमच्याकडे आहारतज्ज्ञांची नेमणूक करम्यात आली आहे. ते सर्व प्रथिनं, कर्बोदकं याचां विचार करून महिन्याचा मेनू तयार करतात. हा मेनू आम्ही लोकांना पाठवतो. त्यात लोक बदल सुचवू शकता."

आज मुंबईत 70 ते 75 हजार लोकांना या डब्याचा आधार आहे. कुणीही उपाशी राहू नये, असं आमच्या धर्मगुरूंना वाटतं. त्यानुसारच आम्ही स्मार्ट किचन्स तयार केली आहेत."
हजारो लोकांचं जेवण तयार करण्याच्या ठिकाणी स्वच्छता कशी ठेवली जाते, याबाबत शेख मुस्तफा कांचवाला सांगतात,
"आम्ही मांसाहारी, शाकाहारी विभाग वेगवेगळे ठेवले आहेत. सर्वोत्कृष्ठ दर्जाचं साहित्य वापरून आम्ही जेवण तयार करत असतो. तसंच यासाठी पाणीही अत्यंत स्वच्छ शुद्ध वापरलं जातं. यामुळं स्वयंपाक चांगला होतो. तो खाऊन जगभरातून आशीर्वाद आम्हाला मिळतात.
"जपान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, चीन, न्यूझीलंड असा सर्व देशांमध्ये स्मार्ट किचनचा उपक्रम सुरू आहे," ते सांगतात. जगभरातील 40 देशांमध्ये 961 शहरं आणि खेड्यांमधील 5 लाख 50 हजार लोकांना हे अन्न मिळतं. जवळपास 1 लाख कुटुंबं या योजनेचा लाभ घेतात.
'अब थाली घरपर आती है!'
मुंबईमध्ये दाऊदी बोहरा समुदायाचे लोक साधारणतः एकमेकांच्या शेजारीच राहातात. भेंडी बझार, माझगाव अशा परिसरात त्यांच्या सोसायट्या आहेत. यातल्याच एका सोसायटीमध्ये अरवा मलकाजी राहातात.
दाऊदी बोहरा समुदायाच्या महिला विशेष प्रकारचे रंगीत पोशाख वापरतात. या पोशाखांचं डिझाइन करण्याचं काम अरवा करतात.

बीबीसी मराठीशी बोलताना त्या म्हणाल्या, "पूर्वी या स्वयंपाकामध्ये माझा फार वेळ जायचा. अब थाली घरपर आती है,त्यामुळे मला काम करणं सोपं जातं. माझ्या घरी सासूबाई आणि वृद्ध आजेसासूबाई आहेत, त्यांच्यावर कामाचा भार पडत नाही. तयार जेवण येत असल्यामुळे त्यांची आणि मुलांची काळजी घ्यायलाही वेळ मिळतो.
"माझ्या कपडे डिझायनिंगच्या व्यवसायाला आता वेळ मिळतो. मुलांनाही या डब्यातलं जेवण भरपूर आवडतं. कधीकधी ते म्हणतात, माझ्या हातच्या जेवणापेक्षा त्यांना तेच जेवण जास्त रुचकर वाटतं."
परदेशात मुलं असणाऱ्या वृद्धांसाठी...
अरवा मलकाजी मुंबईत ज्या सोसायटीमध्ये राहातात त्या सोसायटीत बहुतांश बिऱ्हाडं दाऊदी बोहरा समुदायातील लोकांची आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
अरवा सांगतात, "आमच्या सोसायटीमध्ये बहुतांश लोक ही थाळी घेतात. या डब्यांच्या योजनेसाठी कोणतीही ठराविक अशी रक्कम आम्हाला द्यावी लागत नाही. स्वेच्छेनं आणि स्वखुशीनं काहीही द्यायचं असेल तर देता येतं. मोबदला दिला नाही म्हणून डबा मिळत नाही, असं होत नाही.
"आमच्या ओळखीचे कुणी पैसे देऊ शकत नसतील त्यांच्यावतीने पैसे देता येतात. वयोवृद्ध जोडपी तसंच ज्यांची मुलं परदेशात राहात आहेत, आजारी लोकांना घरपोच थाळी मिळाल्यामुळे त्यांना मोठी मदत होते."
मुंबईमध्ये अध्यापनाचं काम करणाऱ्या राशिदा महुआवाला यांच्या घरातले सदस्यही या डब्यामुळे अत्यंत आनंदी आहेत.
राशिदा सांगतात, "मला सकाळी नोकरीमुळे आजिबात वेळ मिळायचा नाही. स्वयंपाक पूर्ण करून जायचं टेन्शन असायचं. पण आता अत्यंत स्वच्छ आणि चांगलं जेवण घरपोच मिळतं. दुपारी घरी येईपर्यंत जेवण आलेलं असतं. स्वयंपाकाचा वेळ वाचल्यामुळं मुलांसाठी वेळ मिळतो."
हेही वाचलंत का?
हेही नक्की पाहा
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








