इन्स्टाग्राम हे एखाद्याच्या हत्येचं कारण बनू शकतं का? दिल्लीतल्या घटनेनं खळबळ

Arun Nair / EyeEm

फोटो स्रोत, Arun Nair / EyeEm

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र
    • Author, सुशीला सिंह
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

इन्स्टाग्रामवर कुणाचे किती फॉलोअर्स आहेत किंवा त्यावर केलेली पोस्ट एखाद्याच्या हत्येचं कारण बनू शकते का? राजधानी दिल्लीत दोन तरुणांची चाकू भोसकून हत्या करण्यात आलीय.

या प्रकरणात चार तरुणांना पकडण्यात आलंय. यात दोन तरुणींचाही समावेश आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, परिसरात कुणाचं जास्त महत्त्व आणि इन्स्टाग्रामवर कुणाचे जास्त फॉलोअर्स, या दोन कारणांनी हत्या झाल्याचे समोर आले आहे.

मुकुंदपूर परिसर उत्तर दिल्लीत आहे आणि इथ अधिकाधिक मध्यमवर्गीय आणि निम्म-मध्यमवर्गीय वस्ती आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, मुकुंदपूरची ही घटना 5 ऑक्टोबरला घडली.

पोलीस उपायुक्त देवेश कुमार महला यांनी बीबीसीला सांगितलं की, घटनास्थळी पोलीस पोहोचल्यानंतर कळलं की, दोन अल्पवयीन तरुणांवर चाकूनं हल्ला करण्यात आला आहे आणि त्यांना जखमी अवस्थेतच हॉस्पिटलला नेण्यात आलंय.

या प्रकरणात आयपीसी कलम 302 (हत्या) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

पोलिसांच्या माहितीनुसार, या घटनेच्या चार तरुणांना पकडण्यात आलं. पकडण्यात आलेल्यांमध्ये दोन तरुणी आहेत.

हत्येचं कारण काय?

पण हत्येचं कारण काय? याचं उत्तर देताना देवेश कुमार महला म्हणतात की, या तरुणांनी त्यांच्या परिसरात कुणाचं महत्त्वं अधिक आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर एकमेकांपेक्षा कोण अधिक प्रभावशाली, यावरून स्पर्धा होती.

त्यांच्या माहितीनुसार, "या प्रकरणात चौकशी आणि तपासानंतर समोर आलं की, कुणाचं महत्त्वं अधिक आणि इन्स्टाग्रामवर कुणाचे फॉलोअर्स अधिक, कुणाला लाईक्स अधिक, यावरूनही यांच्यात वाद होता."

BBC
फोटो कॅप्शन, देवेश कुमार महला, पोलीस उपायुक्त (बाह्य दिल्ली)

पोलिसांच्या माहितीनुसार, "हे सर्व तरुण एकमेकांना ओळखत होते आणि हे सर्व नियोजनबद्ध करण्यात आलं. कारण कुणीही आपल्यासोबत चाकू घेऊन फिरत नाही."

"चौकशीदरम्यान आरोपी असलेल्या मुलीने आरोप केला की, तिच्यासोबत छेडछाड झाली होती आणि त्यामुळे फोन करून दोन मुलांना परिसरातील गल्ली नंबर 14 मध्ये बोलावलं होतं."

हे सर्व तरुण-तरुणी एकाच भागात राहतात आणि सगळ्यांची घरं एकमेकांच्या जवळच आहेत.

घटनेच्या रात्री काय झालं?

या भागात राहणाऱ्या लोकांशी ज्यावेळी बीबीसीनं चर्चा केली, तेव्हा त्यांचं म्हणणं होतं की, रात्रीच्या 11.30 वाजण्याच्या सुमारास परिसरात गोंधळ झाल्याचं त्यांना लक्षात आलं.

या घटनेच्या प्रत्यक्षदर्शी सीमा म्हणतात की, "माझे पती कामावरून परत आले होते आणि मी चपात्या करत होते. त्यावेळी मला बाहेरून मोठ्यानं आवाज आला. पतीला जेवण वाढून मी बाहेर आले, तर मुलं भांडण करत होती."

"तिकडून गुडियासुद्धा आली आणि तिच्या मुलाला आणि त्याच्या मित्राला समजावू लागली. त्यानंतर मुलं त्या गल्लीमध्ये निघून गेले. नंतर अचानक गुडिया ओरडू लागली की, माझ्या मुलाला चाकूनं भोसकलं. मग आम्ही खूप घाबरलो."

गुडिया पांडे आणि त्यांचं कुटुंब सध्या मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे पुढील विधी पूर्ण करण्यासाठी गावी गेले आहेत.

त्याची आजी माया देवी यांच्याशी आम्ही बातचित केली. त्या घराबाहेर बसल्या होत्या.

BBC
फोटो कॅप्शन, माया देवी, मृत पावलेल्या व्यक्तीची आजी

त्यांनी रडत रडतच म्हटलं की, "मला तर सकाळी कळलं की, माझ्या नातवाची हत्या झालीय. दोषींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे."

मृत मुलाची मामी (सावित्री) आणि सीमा यांना आम्ही विचारलं की, तुम्ही इन्स्टाग्रामसंबंधी मुलांमध्ये चर्चा होताना ऐकलीय का?

दोघींचंही उत्तर होतं की, "कधीच नाही, आम्हाला इन्स्टाग्राम आणि याबाबत काहीच माहिती नाही."

घटनेनंतर लोकांनी काय म्हटलं?

मात्र, सीमा असंही म्हणतात की, "जर इन्स्टाग्रामवरून काही वाद झाला असेल, तरी त्यावरून एखाद्याची हत्या थोडी करेल."

मृत मुलाचा मित्र रजा (नाव बदललं आहे) म्हणतो की, आम्ही शाळेत एकत्र शिकायला होतो.

"हे सर्वजण, ज्यांचा मृत्यू झाला आणि जे आरोपी आहेत, ते सर्व इन्स्टाग्रामवर होते आणि पोस्ट शेअर करत असत. त्यांच्यात कधी लाईक्स किंवा फॉलोअर्सवरून वाद झाल्याचं मी तरी ऐकलं नव्हतं."

BBC
फोटो कॅप्शन, मुकंदपूर हा भाग उत्तर दिल्लीत आढळतो.

मृत मुलाचा मोठा भाऊ विशाल पांडे यांनी गावातून बीबीसीशी माहिती दिली. ते म्हणाले की, "इन्स्टाग्रामवर मीही आहे. मात्र, इन्स्टाग्रामचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. मला याबाबत अधिक माहिती नाही."

मयंक पांडे सुद्धा या दोन्ही मुलांना शाळेच्या दिवसांपासून ओळखतात.

ते म्हणतात की, "तुम्ही या सगळ्यांचे इन्स्टाग्राम अकाऊंट पाहा, हे कसे व्हीडिओ बनवत होते. यांचा उद्देश एकच होता की, प्रसिद्धी मिळावी. मात्र, चाकू कुठल्या कारणानं चालवला गेला, सांगू शकत नाही."

या प्रकरणात पोलिसांनी ज्यांना अटक केली, त्यांच्या कुटुंबीयांशी बीबीसीनं बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या घराला कुलूप लावण्यात आलं होतं.

पोलीस आणि जवळपसाच्या लोकांशी बोलल्यानंतर लक्षात आलं की, मृत मुलं आणि आरोपी म्हणून पकडण्यात आलेल्या मुलांनी शालेय शिक्षणही पूर्ण केलं नव्हतं.

सोशल मीडियाचा परिणाम

सोशल मीडिया असं माध्यम बनत चाललंय, जिथे एखादी व्यक्ती कमी काळात प्रसिद्धी मिळवू शकते. इथे फॉलोअर्स आणि लाईक्ससाठी अक्षरश: स्पर्धा सुरू असते. आपल्या वैयक्तिक भावना शेअर करायला लोक मागेपुढे पाहत नाहीत. एकूणच पर्सनल स्पेस म्हणून याकडे पाहतात.

दिल्लीस्थित सेंट स्टीफन हॉस्पिटलमध्ये मानसोपचारतज्ज्ञ डॉ. रुपाली शिवलकर म्हणतात की, साधारणपणे हल्लीच्या मुलांना लवकर राग येतो. मात्र, दिल्लीतल्या ताज्या घटनेकडे पाहिल्यास, ही मुलं समाजाच्या अशा स्तरातून येतात, जिथे पालक शिकलेले नसतात.

BBC
फोटो कॅप्शन, डॉक्टर रूपाली शिवलकर

"या मुलांचे आई-वडील रोजंदारीवर काम करतात आणि ही मुलं शिक्षण पूर्ण करत नाहीत. अशावेळी त्यांच्या आसपास घडणाऱ्या घटनांनी ते प्रभावित होतात. या मुलांना काय चूक आणि काय बरोबर, हे सांगणारं कुणी नसतं," अशा डॉ. शिवलकर सांगतात.

त्या म्हणतात की, "मुलांना लवकर राग येण्याची अनेक कारणं असू शकतात. यात स्वत:बद्दल एकप्रकारचं फ्रस्ट्रेशन हे प्रमुख कारण आहे. कुणासारखं तरी बनू पाहणं किंवा कंडक्ट डिसऑर्डरमधून ते जात असतात."

डॉ. शिवलकरांच्या म्हणण्यानुसार, कंडक्ट डिसऑर्डरचा संबंध व्यवहाराशी आहे, ज्यात मुलं सामाजिक नियमांनुसार व्यवहार करत नाहीत. त्यांना आपल्या गुन्ह्याची जाणीव होत नाही.

त्या पुढे सांगतात की, जर अशावेळी मूळात जाऊन पाहिल्यास अनेक कारणं दिसू शकतात, जसं की लक्ष केंद्रित करण्यातले अडथळे, मादक पदार्थांचा वापर, किंवा इतर धक्क्यातूनही ती मुलं जात असू शकतात.

भारतात सोशल मीडियाचा वापर

इन्स्टग्रामवर 13 वर्षांनंतर कुणीही मुलगा आपलं अकाऊंट बनवू शकतं. तिथं कुणी आपलं अकाऊंट प्रायव्हेट केलेलं नसेल, तर त्या व्यक्तीची पोस्ट सार्वजनिक असते. कुणीही ती पोस्ट पाहू शकतं आणि त्यावर कमेंट करू शकतं.

केंद्र सरकारनं गेल्यावर्षी सोशल मीडिया कंपन्यांना उद्देशून नियम जारी केले होते. तत्कालीन केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी सांगितलं होतं की, भारतात व्हॉट्सअपचे 53 कोटी युजर, यूट्यूबचे 44.8 कोटी युजर, फेसबुकचे 41 कोटी युजर आणि ट्विटरचे 1.75 कोटी युजर्स आहेत.

हल्ली इन्स्टाग्राम तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरलं जातं.

जाणकारांच्या मते, तंत्रज्ञान हे दुधारी तलवारीसारखं आहे, ज्यातून दुष्परिणामही होऊ शकतात. त्यामुळे तंत्रज्ञानाचा संतुलित वापर करणं आवश्यक आहे. लोक नेमकं हेच विसरतात.

डॉ. रुपाशी शिवलकर म्हणतात की, गेल्या काही वर्षांमध्ये, विशेषत: कोव्हिड महासाथीच्या दरम्यान स्मार्टफोन आणि सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. भारतात इंटरनेटच्या आहारी गेलेल्यांसाठी डिअॅडिकेशन क्लिनिक उघडत आहेत. यावरून आपल्याला लक्षात येईल की, इंटरनेटचं व्यसन किती गंभीर रूप धारण करतंय.

मुलांना घराबाहेरील खेळ खेळण्यास प्रवृत्त केलं पाहिजे, मित्रांना प्रत्यक्षात भेटण्यासाठी सांगितलं गेलं पाहिजे, घरातील छोटी-मोठी कामं मुलांना सांगितली पाहिजेत इत्यादी गोष्टी इंटरनेटच्या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी करता येऊ शकतात, असं मानसोपचारतज्ज्ञ सांगतात.

सुरुवातीला मुलांना ते पटणार नाही, पण स्थिती हाताबाहेर जाण्याऐवजी हे उपाय चांगले आहेत. शिवाय, जर व्यसन अधिक वाढलं असल्यास मानसोपचारतज्ज्ञांना भेटण्यासाठी हयगय करायला नको, असंही जाणकार सांगतात.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)