You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उर्वशी रौतेला ऑस्ट्रेलियात, या कारणामुळे झाली ट्रोल
चित्रपट अभिनेत्री उर्वशी रौतेला ऑस्ट्रेलियात आहे. प्रवासादरम्यान तिनं तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अनेक फोटो शेअर केले आहेत. फोटोंसोबत लिहिलेल्या कॅप्शनमध्ये ती म्हणते, "मी माझ्या हृदयाचं ऐकलं आणि ते मला ऑस्ट्रेलियात घेऊन आलं."
या फोटो आणि कॅप्शनमुळे उर्वशी सध्या ट्रोल्सच्या निशाण्यावर आहे. इंटरनेट वापरकर्ते तिला स्टॉकर म्हणत आहेत.
कॉमेडियन शुभम गौर यांनी उर्वशीच्या पोस्टवर कमेंट केलीय की, "आमच्याकडे अजून काही आठवडे शिल्लक आहेत आणि आम्ही विश्वचषक दुसरीकडे कुठेतरी आयोजित करू शकतो का?"
तर दुसऱ्या एका यूजरनं लिहिलंय की, "दीदी, छोटू भैय्याचा पाठलाग करायचं सोडणार नाही."
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनु सिंघवी यांनीही या प्रकरणी ट्विट करत लिहिलंय, "ऋषभ पंत एक चांगला वकील आणि त्यांच्या बाजूनं निकाल येण्यासाठी पात्र आहेत."
याआधी आशिया चषकादरम्यान भारत-पाक सामना पाहण्यासाठी उर्वशी दुबईला पोहोचली होती. तेव्हाही तिच्यावर इंटरनेट वापरकर्त्यांनी कमेंट्स आणि मीम्स केले होते.
उर्वशी ट्रोल का होतेय?
पुढील आठवड्यापासून ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक सुरू होत आहे. भारतीय संघ आधीच ऑस्ट्रेलियाला पोहोचला आहे. ऋषभ पंतही भारतीय संघात आहे. उर्वशीनंही तिचे ऑस्ट्रेलियातील फोटो शेअर केले आहेत. आता युजर्स या गोष्टीला ऋषभ पंतसोबत जोडत आहेत आणि उर्वशीला टार्गेट करत आहेत.
ऋषभ आणि उर्वशी यांच्यातील वाद कोणापासून लपून राहिलेला नाही. दोघेही उघडपणे एकमेकांचा उल्लेख करत नसले तरी अप्रत्यक्षपणे त्यांच्या पोस्ट किंवा फोटोंद्वारे एकमेकांवर हल्ला करत आले आहेत.
'बॉलिवूड हंगामा' नावाच्या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत उर्वशीनं ऋषभ पंतबद्दल अनेक गोष्टींचा उल्लेख केल्यानंतर या दोघांमधील वाद सुरू झाला. "आरपीनं मला भेटण्यासाठी एकदा हॉटेलच्या लॉबीमध्ये कित्येक तास वाट पाहिली होती. पण, तिला हे माहिती नव्हतं. ती थकली होती आणि तिच्या खोलीत झोपली होती. तिला जाग आली तेव्हा तिला आरपीचे 16 ते 17 मिस्ड कॉल्स दिसले."
तिनं आरपीला पुढच्या वेळी मुंबईत भेटायला सांगितलं. ते मुंबईत भेटलेही, पण पॅप्स (स्टार्सचे फॉलोअर्स) आणि मीडियाने या भेटीबद्दल एवढी चर्चा केली की, जे काही घडलं असतं ते तिथंच थांबलं.
उर्वशीनं या संपूर्ण मुलाखतीत कुठेही ऋषभ पंतचं नाव घेतलं नाहीये. पण उर्वशीच्या या मुलाखतीनंतर ऋषभ पंतच्या एका इन्स्टा स्टोरीचा स्क्रीनशॉट व्हायरल होऊ लागला. त्यात त्यानं लिहिलं होतं की, "लोक प्रसिद्धच्या झोतात राहण्यासाठी आणि बातम्यांमध्ये राहण्यासाठी मुलाखतींमध्ये खोटे बोलतात, हे किती हास्यास्पद आहे. नाव आणि प्रसिद्धीसाठी लोक खोटे बोलतात हे पाहून वाईट वाटतं. मी त्यांना शुभेच्छा देतो. हॅशटॅग मेरा पीछा छोडो बहन. हॅशटॅग झूठ की भी लिमिट होती है.''
पंतनं ही स्टोरी पोस्ट केल्यानंतर काही वेळातच ती डिलीट केली. पण यानंतर उर्वशी गप्प बसली नाही. तिनं इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केलं, "छोटू भैयानं बॅट-बॉलच खेळला पाहिजे. तुझ्यासाठी बदनाम व्हायला मी मुन्नी थोडीच आहे. रक्षाबंधनाच्या शुभेच्छा. हॅशटॅग आरपी छोटू भैया."
उर्वशीने माफी मागितली?
काही दिवस हे प्रकरण शांत राहिलं आणि त्यानंतर सप्टेंबर महिन्यात उर्वशीचा आणखी एक व्हीडिओ व्हायरल होऊ लागला. या व्हीडिओमध्ये ती एका मुलाखतीदरम्यान मिस्टर आरपीला सॉरी म्हणताना दिसत आहे. हा व्हीडिओ समोर आल्यानंतरही ती ट्रोल्सच्या निशाण्यावर आली होती.
यानंतर पंतकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. हे प्रकरण थंडावलं असतं, पण उर्वशीच्या दुबई आणि आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यानं पुन्हा एकदा या संपूर्ण वादाला तोंड फुटलं आहे.
कोण आहे उर्वशी रौतेला?
उर्वशी रौतेलाने 2013 मध्ये सिंह साब ग्रेट चित्रपटाद्वारे पदार्पण केलं. 20व्या वर्षी उर्वशीने मिस दिवा युनिव्हर्स 2015 हा किताब जिंकला. त्याच वर्षी तिने मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व केलं. पण ती किताबावर नाव कोरू शकलं नाही.
उर्वशीने आतापर्यंत सनम रे, ग्रेट ग्रँड मस्ती, हेट स्टोरी4, पागलपंती या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. उर्वशीने अनेक म्युझिक अल्बम्समध्ये कामही केलं आहे.
2018 मध्ये अंदमान निकोबार द्वीपसमूहाने उर्वशीची जगातली सगळ्यात कमी वयाची सुंदर महिला म्हणून गौरवलं.
उर्वशी उत्तराखंडची आहे. तिने स्वत:च्या नावाने एक फाऊंडेशन सुरू केलं आहे. गरजू लोकांना या फाऊंडेशनच्या माध्यमातून मदत केली जाते.
ऋषभ पंत कोण आहे?
ऋषभ पंत भारतीय संघातील फलंदाज आणि विकेटकीपर आहे. 19व्या वर्षी 2016 U19 वर्ल्डकपमध्ये दिमाखदार प्रदर्शनासह त्याने छाप उमटवली. मूळच्या उत्तराखंडच्या ऋषभने दिल्लीत क्रिकेटची धुळाक्षरं गिरवली.
आयपीएल स्पर्धेतील दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने ऋषभचं नैपुण्य हेरलं आणि त्याला संघात समाविष्ट केलं. 2017 मध्ये ऋषभने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. तेव्हा त्याचं वय 19 होतं. भारतासाठी सगळ्यात लहान वयात ट्वेन्टी20 सामना खेळणारा तो खेळाडू ठरला.
2018 मध्ये पदार्पणाच्या टेस्टमध्ये ऋषभने पहिलाच फटका षटकार लगावला. असा विक्रम करणारा ऋषभ जगातला केवळ 12वा खेळाडू आहे. 2019 मध्ये ऋषभने 50 ओव्हर्स वर्ल्डकप स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व केलं. काही दिवसांवर असलेल्या ट्वेन्टी20 वर्ल्डकपमध्ये तो भारतीय संघाचा भाग आहे.
25वर्षीय पंत तडाखेबंद फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. 2020-21 मध्ये भारताने ऑस्ट्रेलियात टेस्ट सीरिज जिंकली. त्यावेळी ऋषभने दोन सामन्यात दिमाखदार खेळी करत भारतीय संघाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली होती.
ऋषभच्या नावावर टेस्ट क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिकेत शतकी खेळी आहेत. दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने ऋषभकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे. तब्बल 16 कोटी रुपये खर्चून दिल्लीने ऋषभला रिटेन केलं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)