You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
‘ज्या गर्भाशयातून मी जन्माला आले, त्यातूनच माझं बाळही जन्म घेणार’
- Author, सुशीला सिंह और भार्गव परीख
- Role, बीबीसी प्रतिनिधी
अहमदाबादच्या 'इन्स्टिट्यूट ऑफ किडनी डिसिस अँड रिसर्च सेंटर'मध्ये एकाच दिवसात दोन गर्भाशय प्रत्यारोपण झाले. या शस्त्रक्रियेला 12-14 तास लागतात.
जुनागडच्या रिना वाघासिया यांनी आपल्या गर्भाशय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर बीबीसीला सांगितलं, "माझ्या आईनं मला गर्भाशय दिलंय. ज्या गर्भाशयात मी जन्माला आले, त्यामध्येच माझं बाळही जन्म घेईल."
त्या म्हणाल्या, "जन्मापासूनच माझं गर्भाशय दोन भागात विभागलेलं होतं. मला ते लग्नानंतर समजलं. मला मूल होत नव्हतं. मी उपचार घ्यायला गेले तेव्हा मी कधीच आई होऊ शकणार नाही असं मला समजलं."
रिना यांचे पती या प्रत्यारोपणानंतर अत्यंत आनंदात आहेत.
ते सांगतात, "गर्भाशय प्रत्यारोपण पुण्यात होतं याची आम्हाला माहिती मिळाली, पण त्यासाठी लाखो रुपयांचा खर्च येतो. माझे बाबा शेती करतात आणि मी लहान-मोठं काम करतो. परंतु अहमदाबादच्या या सरकारी रुग्णालयात आम्हाला ही सुविधा मिळाली, माझ्या सासुबाईंनीच माझ्या पत्नीला कुस दिली."
मोठं यश
इन्स्टिट्यूट ऑफ किडनी डिसिस अँड रिसर्च सेंटरचे डॉक्टर विनित मिश्रा सांगतात, "आम्ही पहिल्यांदाच दोन महिलांचं गर्भाशय प्रत्यारोपण यशस्वी केलंय. आधी आम्हाला याची परवानगी नव्हती, आता मात्र अशी समस्या असणाऱ्या महिलांना याची मदत होईल."
भारतात झालेल्या पहिल्या गर्भाशय प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेसाठी आणि कर्करोगाचे तज्ज्ञ म्हणून डॉ. शैलेश पुणतांबेकरांना ओळखलं जातं.
ते सांगतात, "गर्भाशय प्रत्यारोपण करणारा स्वीडन, अमेरिकेनंतर भारत हा तिसरा देश आहे. तसेच लॅप्रोस्कोपीद्वारे प्रत्यारोपण करणारा भारत हा पहिलाच देश आहे. म्हणजे हे प्रत्यारोपण दात्याच्या पोटाला मोठा छेद न देता हे प्रत्यारोपण केलं जातं."
कसं होतं प्रत्यारोपण?
ज्या मुलींमध्ये जन्मतःच गर्भाशय नसतं किंवा ज्यांच्या गर्भाशयाला आरोग्यविषयक काही त्रास, आजार असतो त्याच मुलींमध्ये गर्भाशय प्रत्यारोपण होतं असं डॉक्टर सांगतात.
किंवा काही कारणांनी ते काढण्यात आलं असेल आणि त्यांचे अंडाशय सामान्य स्थितीत असतील अशा मुलींमध्ये प्रत्यारोपण होतं.
डॉ. शैलेश पुणतांबेकर यांनी बीबीसीला सांगितलं, गर्भाशय प्रत्यारोपण फक्त आई आणि मुलीतच होऊ शकतं, कारण त्यांच्यामध्ये समान जनुकं असतात. यात आई दाता (डोनर) आणि मुलगी स्वीकारकर्ता (रेसिपिएंट) होते.
कोणती आई दाता- डोनर होऊ शकते?
- आईचं वय 49-50 पर्यंत
- त्यांची मासिक पाळी सुरू असेल
- जर पाळी होत नसेल तर औषधं देऊन सुरू केली जाते.
कोणती मुलगी स्वीकारकर्ता- रेसिपिएंट होऊ शकते?
- मुलगी विवाहित असली पाहिजे
- मुलीचं वय 18-35 मध्ये असलं पाहिजे
- क्रोमसोम म्हणजे गुणसुत्र 46XX असावेत म्हणजे जनुकीय किंवा अनुवंशिकदृष्ट्या ती महिला असली पाहिजे.
ही प्रक्रिया कशी असते?
डॉ. शैलेश पुणतांबेकर सांगतात, प्रत्यारोपणासाठी हे सर्व मापदंड पूर्ण केलेले असावे लागतात. जसं मूत्रपिंड किंवा हृद् य प्रत्यारोपण होतं त्याचप्रकारे हे होतं.
पुढची प्रक्रिया सांगताना ते म्हणाले, "आईच्या पोटाच्या अगदी खालच्या भागात लॅप्रोस्कोपद्वारे दोन इंचाचा छेद घेतात आणि रिट्रॅक्शनद्वारे गर्भाशय काढून घेतात. त्याबरोबरच रक्तवाहिन्या म्हणजे पुरवठा करणारी आणि बाहेर जाणारी दोन्हीही काढून घेतात. त्यानंतर ते स्वच्छ केलं जातं. नंतर मुलीच्या पोटाला छेद देऊन गर्भाशय बसवलं जातं आणि रक्तवाहिन्या जोडल्या जातात."
ते सांगतात, प्रत्यारोपणानंतर 30-35 दिवसांनंतर त्या मुलीची मासिक पाळी सुरू होते.
पाळीची लक्षणं सामान्य असतात. मात्र ज्या महिलांमध्ये प्रत्यारोपण होतं त्यांना पाळीच्या वेदना होत नाहीत, आता त्या आई होण्यास सक्षम झालेल्या असतात.
डॉ. शैलेश सांगतात, हृदय आणि मूत्रपिंड प्रत्यारोपणात आम्ही जसं लोकांना नवं आयुष्य देतो तसं इथं गर्भाशय प्रत्यारोपणाने आम्ही एका नव्या व्यक्तीला जन्म देण्यासाठी मदत करतो.
डॉक्टर सांगतात, गर्भधारणेआधी प्रथम भ्रूण तयार करतात, ते महिलेचे अंडाणू आणि पुरुषाच्या शुक्राणूपासून तयार करतात आणि मग गर्भाशयात स्थापित करतात.
एकच जनुक
परंतु आईचंच गर्भाशय काढून मुलीच्या शरीरात का प्रत्यारोपित केलं जातं?
याचं उत्तर देताना डॉ. मानसी चौधरी सांगतात, आई आणि मुलीची जनुकं एकसारखीच येतात, त्यामुळे पेशी किंवा कोशिका या एकसारख्याच असतात.
त्यांच्यामते मुलीचं शरीर त्याला फॉरेन पार्टिकल म्हणजे बाहेरील गोष्ट मानत नाही. त्याामुळे मुलीच्या शरीरात घातलं जाणारं गर्भाशय अनुवंशिकतेच्या कसोटीवर नाकारलं जात नाही.
आता विज्ञानानं भरपूर प्रगती केली आहे. आता अत्याधुनिक यंत्रांद्वारे गर्भवतींचे स्क्रीनिंग म्हणजेच तपासणी करता येते. एखाद्या गर्भात अनुवंशिक बिघाड म्हणजेच जेनेटिक अॅबनॉर्मिलिटी असेल तर ते त्यात समजतं.
पण मग अशा तपासणीत होणाऱ्या मुलीमध्ये गर्भाशय नसल्याचं समजत नाही का? असा प्रश्न विचारला जाऊ शकतो.
त्या स्त्री भ्रूणामध्ये गर्भाशय आहे की नाही याची माहिती समजत नाही कारण ते लिंगचाचणीत येतं आणि लिंगचाचणी करणं कायद्याविरोधात आहे, त्यामुळे त्या भ्रूणामध्ये गर्भाशय आहे की नाही हे समजत नाही.
भारतात मुलगा व्हावा या हट्टासाठी भ्रूणाची लिंगचाचणी व्हायची. इच्छेप्रमाणे नसेल तर गर्भपात केला जायचा.
हे थांबवण्यासाठी 1994 साली पीसीपीएनडीटी कायदा आणला गेला. त्यात 2003 साली दुरुस्तीही करण्यात आली.
डॉ. शैलेश पुणतांबेकर सांगतात, "दरवर्षी 5000 मुलींमागे एक मुलगी गर्भाशयाविना जन्मास येते. एखाद्या मुलीत गर्भाशय नसणं जनुकीय दोष मानला जातो."
ते पुढे सांगतात, "मात्र अनेकदा गाठ झाल्यामुळे किंवा गर्भाशय खराब असल्यामुळेही काढलं जातं. कर्करोगमुळं गर्भाशय काढावं लागण्याचे प्रकारही होतात."
डॉ. शैलेश पुणतांबेकर यांच्यामते गर्भाशय प्रत्यारोपण फक्त गर्भधारणेसाठी केलं जातं. असं प्रत्यारोपण करणाऱ्या महिलांना पाच वर्षांनी गर्भाशय काढून टाकण्याचा सल्ला ते देतात.
याचं कारण सांगताना ते म्हणाले, "ज्या महिलांमध्ये गर्भाशयाचं प्रत्यारोपण होतं त्यांना इम्यून- सप्रेसेंट दिलं जातं. जी व्यक्ती गर्भाशय स्वीकारतेय तिचं शरीर त्या युटेरसला नाकारू नये म्हणून हे औषध दिलं जातं."
त्यांच्या मतानुसार, "मूत्रपिंड किंवा हृदय प्रत्यारोपणात इम्यून-सप्रेसेंट महत्त्वाचं औषध आहे. कारण त्यांचं आयुष्य त्या अवयवांवर अवलंबून असतं. परंतु इथं तसं नाही. मूल जन्माला घातलं की इथं गर्भाशयाची गरज नसते आणि औषधं घेतली नाही तर गर्भाशयावर परिणामही होऊ लागतो."
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)