भारतीय पुरुषांनी जेव्हा मासिक पाळीच्या वेदना अनुभवल्या...

मासिक पाळी आणि त्याबरोबर येणारं अवघडलेपण भारताच्या अनेक भागांमध्ये अजूनही टॅबू मानलं जातं.

मात्र केरळमध्ये एक उपक्रम राबवण्यात आला आहे. तो या दृष्टिकोनाबदद्ल जनजागृती करत आहे. एर्नाकुलम मधील एक शाळा आणि मॉलमध्ये मासिक पाळीच्या वेदना चेतवणारं यंत्र लावण्यात आलं आहे.

त्याचा प्रयोग पुरुषांवर करण्यात येत आहे. मासिक पाळीच्या काळात होणाऱ्या वेदनेवर मोकळेपणाने चर्चा व्हावी हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

या उपक्रमातला एक व्हीडिओ व्हायरल झाला आहे. त्यात मुलं वेदनेने कळवळताना दिसत आहेत आणि मुली आश्चर्यचकित झालेल्या दिसत आहेत.

"मला खूप दुखलं. मला त्याचा अनुभव कधीही घ्यायचा नाही," असं शरण नायर म्हणाले. ते सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेत. त्यांनी या यंत्राचा प्रयोग स्वत:वर केला.

हे तंत्र Cup of life या प्रकल्पाचा भाग आहे. मेन्स्ट्रुअल कप्स वाटणं आणि पाळीचे गैरसमज दूर करणं हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. काँग्रेस नेते हिबी एडन आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प राबवण्यात येत आहे.

बायकांचं आरोग्य, विशेषत: मासिक पाळीबदद्ल भारतात फारसं बोललं जात नाही. स्त्रियांना मासिक पाळी आली की अनेक भागात अजूनही ते अपवित्र मानलं जातं. त्यांना सामाजिक, धार्मिक कार्यक्रमातून अगदी स्वयंपाकघरातूनही बाहेर ठेवलं जातं.

शहरी भागात ही परिस्थिती थोड्याफार प्रमाणात बदललेली असली तरी या काळात होणाऱ्या वेदनांबद्दल त्या त्यांच्या पुरुष सहकाऱ्यांशी किंवा पुरुषांशी मोकळेपणाने बोलू शकत नाहीत. अनेक कंपन्यांनी भारतात या काळात सुटी देण्याचं कबुल केलं आहे तरी हा विषय अद्यापही फारसा चर्चिला जात नाही.

केरळ हे भारतातील एक प्रगतीशिल राज्य आहे. या उपक्रमामुळे या चर्चेला चालना मिळेल, असा संयोजकांना विश्वास आहे.

सँड्रा सनी यांनी #feelthepain हा उपक्रम सुरू केला. त्यांच्या मते या यंत्रामुळे एक महत्त्वाची चर्चा घडेल आणि वृत्तीत फरक होईल.

"पाळीदरम्यान होणाऱ्या वेदनेबाबत तुम्हाला काय माहिती आहे, असा प्रश्न कॉलेजवयीन मुलांना विचारला तर ते फारसं बोलत नाहीत. पाळी या विषयावर कोणाशी बोलतात असा प्रश्न विचारला तरी ते मोकळेपणाने बोलत नाहीत. या यंत्रामुळे त्यांना या समस्येची जाण आली आहे." असं त्या म्हणाल्या.

या यंत्राला दोन तारा आहेत. त्या एका वेळी दोघांना लावता येतात. एक कळ दाबली की 1 ते 10 या पातळीवर वेदना होण्यास सुरुवात होते.

नायर सांगतात की जेव्हा मुलींना हे यंत्र लावलं तेव्हा त्यांना कोणत्याही वेदना झाल्या नाहीत. मात्र मुलांना अगदी नायर यांना जेव्हा ते यंत्र लावलं तेव्हा ते अक्षरश: गडाबडा लोळले.

काही मुलांना हे यंत्र कॉलेजमध्ये लावण्यात आलं तेव्हा त्यांना त्या वेदना अजिबात सहन झाल्या नाहीत. बंद करा बंद करा असं म्हणत त्यांनी ओरडायला सुरुवात केली असं एका आयोजक विद्यार्थ्याने बीबीसीला सांगितलं.

ही स्वाभाविक प्रतिक्रिया आहे असं डॉ. अखिल मॅन्युएल यांनी सांगितलं. ते IMA चे संयुक्त सचिव आहेत आणि या उपक्रमाचे समन्वयक आहेत.

"नऊ या पातळीवर जेव्हा ते यंत्र लावलं तेव्हा बायकांना काहीही झालं नाही. मात्र चारच्या पलीकडे वेदना माणसांना सहन झाल्या नाहीत. खरंतर या पातळीवर फक्त दहा टक्के वेदना होतात." असं ते म्हणाले.

बायका वर्षानुवर्षं या वेदना कशा सहन करतात हे या यंत्रामुळे समजेल असं सनी सांगतात. "त्यांच्यासाठी हे एक यंत्र आहे. ते कधीही बंद करता येतं. मात्र आम्हाला तसं करता येत नाही."

या यंत्रामुळे पुरुष कळवळण्याची ही पहिली वेळ नाही. गेल्या वर्षी दोन संघटनांनी उत्तर भारतात पाळी या विषयावर एक परिषद भरवली होती. तेव्हापासून या यंत्राचा वापर करून पुरुषांना मासिक पाळीच्या वेदनेची जाणीव करून देण्यात येते.

"हे यंत्र म्हणजे मुलांना संवाद सुरू करून देण्यासाठीचं एक माध्यम आहे," डॉ. सॅम्युअल सांगतात.

ही संकल्पना फार युनिक नाही. Someday या अमेरिकन कंपनीने पुरुषांना हे यंत्र वापरण्यास उद्युक्त केलं जेणेकरून पुरुषांना त्याची जाणीव होईल. त्याचे टिक टॉक व्हीडिओ प्रचंड हिट झाले. अगदी लाखो लोकांनी पुरुषांना कळवळताना पाहिलं.

एडन म्हणतात की त्यांनी हा उपक्रम जिल्हा पातळीवर चालू केला. त्या आधी त्यांनी कुमलंगी गावात हजारो मेन्स्ट्रुअल कप वाटले. यावर्षीच्या सुरुवातीला केरळच्या राज्यपालांनी कुमलंगी जिल्ह्याला सॅनिटरी पॅड मुक्त जिल्हा म्हणून घोषित केलं.

Cup of life ही चळवळ चार महिन्यांपूर्वी सुरू झाली आणि त्यांनी अनेक उपक्रम चालू केले. त्यांनी 1,00,000 मेन्सट्रुअल कप वाटले आणि एक विक्रम प्रस्थापित केला.

मासिक पाळीबद्दल सविस्तर चर्चा व्हावी हाच या संपूर्ण उपक्रमाचा उद्देश आहे, असं एडन म्हणाले.

मॅन्युएल म्हणाले की अनेक संस्थांनी देशभर हा उपक्रम राबवण्यात रस दाखवला आहे. त्यांच्या समुदायात कसा राबवता येईल याबद्दल विचारणा केली.

मात्र मॅन्युएल यांची एक अट आहे. "तुम्ही आमच्या गटाबरोबर काम करायला हवं. कामाची पद्धत समजून घ्यायला हवी आणि संवाद अधिकाधिक शक्तीशाली कसा करता येईल याचे वेगवेगळे मार्ग शोधले पाहिजेत."

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)