You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मोहन भागवत- गेल्या काही वर्षांत समाजाला तोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत
आम्ही विश्वात बंधुभावाच्या बाजूने आहोत. आम्हाला कोणाला घाबरवायचं नाही. गेल्या काही वर्षांत समाजाला तोडण्याचे प्रयत्न चालू आहेत. उदयपूर, अमरावती अशा काही घटना झाल्या आहेत. यावेळी मुस्लिम लोकांनीही विरोध केला. अन्यायाविरुद्ध असंच उभं रहायला हवं. हिंदू समाज गुन्हेगारांच्या पाठीशी कधीच उभा राहत नाही. सगळ्यांनी असं वागायला हवं, असं सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.
लोकांनी कितीही उकसवलं तरी कायद्याची मर्यादा पाळायला हवी, असंही त्यांनी म्हटलं.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. नागपूरमध्ये आज (5 ऑक्टोबर) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळाव्याचा कार्यक्रम पार पडला.
या सोहळ्याला पद्मश्री संतोष यादव प्रमुख पाहुणे आहेत. त्याचबरोबर विदर्भातील भाजपचे अनेक नेते उपस्थित होते.
राष्ट्रविरोधी कारवाईंचा निषेध
शत्रूंना आश्रय द्यावा म्हणून ते आमच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे राष्ट्रविरोधी बाबींचा निषेधच करावा लागेल, असं मोहन भागवतांनी म्हटलं.
ही कारवाई जी चालू आहे त्यात भोळेपणाने सामावून जाऊ नये. त्यामुळे समाजाचं सहकार्य आवश्क आहे, असं म्हणताना त्यांनी अप्रत्यक्षपणे पीएफआयवर निशाणा साधला.
इंग्रजी शिक्षणाचा बाऊ का?
जोपर्यंत पालक मुलांना केवळ पैसा कमावण्याच्या हेतूने शिक्षण, डिग्री घ्यायला प्रेरित करत आहेत, तोपर्यंत संस्कार कसे घडणार? असा प्रश्न सरसंघचालक मोहन भागवत यांनी उपस्थित केला आहे.
हल्ली उच्च शिक्षणापर्यंत बहुतांश मातृभाषेत शिक्षण मिळतं. इंग्रजीचा फार बाऊ केला जातो. पण ते तितकंसं गरजेचं नाही. करिअर करण्यासाठी वेगळ्या गोष्टी लागतात, असंही मोहन भागवत यांनी म्हटलं.
मोहन भागवत यांनी म्हटलं की, सगळे प्रसिद्ध लोक मातृभाषेत शिकलेत.आपण आपल्या भाषेत सही करतो का? दारावरची प्लेट इंग्रजीत असते का? लग्नाची पत्रिका इंग्रजीत छापली जाते.
'सध्याचा काळ हा देशाच्या नवनिर्मितीचा काळ'
मोहन भागवत यांनी म्हटलं, "संतोष यादव दोनदा गौरीशंकर पर्वत चढल्या आहेत. संघाच्या कार्यक्रमात महिलांचं प्रमुख अतिथी असणं हे डॉक्टरांच्या हेडगेवारांच्या काळापासूनच सुरू झालं आहे. याआधी सुद्धा अनेक विद्वान स्त्रिया या मंचावर आल्या आहेत. कुमुदताई रांगणेकरही एकदा अकोल्यात आल्या होत्या. पुरुष आणि स्त्रिया परस्परपूरक आहेत. म्हणून व्यक्तीनिर्माण करणाऱ्या आमच्या दोन शाखा आहेत. समिती आणि संघ."
जे सगळं महिला करू शकतात ते पुरुष करू शकत नाही. म्हणून त्यांना अधिकाधिक शक्ती देण्याची गरज आहे. त्यामुळे मातृशक्तीच्या जागरुतीचं काम आपल्याला घरी, समाजात सगळीकडे करावं लागेल.
आंतरराष्ट्रीय समुदायात भारताच्या शब्दाला महत्त्व प्राप्त झालं आहे हे सांगताना मोहन भागवत यांनी म्हटलं की, आम्ही श्रीलंकेची मदत केली, रशिया युक्रेनला मदत केली. आपलं वजन वाढलं आहे. शब्दाला महत्त्व प्राप्त झालं आहे.
कोरोनातून बाहेर आल्यावर अर्थव्यवस्था पुढे जातेय. खेळाच्या क्षेत्रात ऑलिम्पिक्स खेळात देशाचं नाव उंचावलं आहे.
सरकारी आणि खासगी क्षेत्रात 30 टक्के नोकऱ्या असतात. आपण स्टार्ट अपला प्रोत्साहन दिलं पाहिजे, असंही त्यांनी म्हटलं.
आमचा शेजारी चीन आता म्हातारा झाला आहे. भारताइतकी तरुणांची संख्या कुठेच नाही. त्याचा लाभ घेतला पाहिजे, असं मोहन भागवत यांनी म्हटलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)