जेव्हा शिवसेनेने भाजपविरोधात निवडणूक लढवली होती...

फोटो स्रोत, Getty Images
"आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात आहोत", असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे सातत्याने म्हणत असतात. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.
बाळासाहेबांचे विचार नेमके काय आहेत हे जाणून घेण्याचा केलेला प्रयत्न.
"केंद्रीय रेल्वे मंत्री अब्दुल गनी खान चौधरी यांनी रेल्वेभाड्यात 60 टक्क्यांहून अधिक दरवाढ जाहीर केली. सामान्य माणसाला याचा थेट फटका बसणार होता. बाळासाहेब यामुळे चिडले. त्यांनी आंदोलनासाठी साद घातली. या निर्णयाविरोधात पहिला रेल्वेरोको मुलुंडला झाला. नंतर मुंबईत अनेक ठिकाणी विविध मार्गांनी निषेध व्यक्त करण्यात आला. हे आंदोलन इतकं तीव्र होतं की अखेर केंद्रीय मंत्र्यांना दरवाढ 10 टक्क्यांवर आणावी लागली. बाळासाहेबांचा असा दरारा होता", असं शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शिशिर शिंदे यांनी सांगितलं.
बाळासाहेबांच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. ते म्हणाले, "त्यांची व्यंगचित्रं आमच्यासाठी टॉनिक असायची. ते सामान्य माणसाची भाषा बोलायचे. तळागाळातला कार्यकर्ता आजारी असेल तर बाळासाहेब थेट घरी भेटायला जायचे. शिवसैनिकांशी त्यांचं भावनिक नातं होतं.
मुंबई हिरवीगार दिसते यामागेही त्यांची भूमिका मोलाची होती. शिवसेनेच्या वर्धापनदिनी, शिवजयंतीला, दसऱ्याला झाडं लावण्याचा त्यांचा संदेश असे. वृक्षारोपणाची चळवळच उभी राहिली".
"70-80च्या दशकात मराठी माणसाला एअर इंडिया, पोर्ट ट्रस्टमध्ये नोकऱ्या मिळत नसत. बाळासाहेबांच्या उपस्थितीत एअर इंडियाच्या एका उच्चपदस्थाला श्रीमुखात भडकावण्यात आली. त्यानंतर चित्र बदललं", अशी आठवण शिंदे यांनी सांगितली.
"1984-85 तसंच 1992 नंतरच्या दंगलीत शिवसेनेने निर्णायक भूमिका बजावली. दादा कोंडके यांचे 9 चित्रपट प्रचंड गाजले. बाळासाहेबांनी दादांना पाठिंबा दिला होता म्हणूनच हे चित्रपट प्रदर्शित होऊ शकले", असंही ते म्हणाले.
'आता गुंड म्हणताय, नंतर त्याला ओवाळाल'
"बाळासाहेबांचं वक्तृत्व अमोघ असं होतं. ते भाषण करत नसत, ते संवाद साधत. एकदा शिवसैनिकांच्या मेळाव्यासाठी ते मुलुंडला आले होते. त्यानंतर माझ्या घरी आले. त्यावेळी माझे वडील माझ्यावर चिडले होते. लोकसत्ताचं ऑफिस जाळल्याप्रकरणी मी तुरुंगात जाऊन आलो होतो. बाबांची नाराजी त्यासंदर्भात होती. बाबा बाळासाहेबांना म्हणाले, तुम्ही मुलांना गुंड करत आहात. माझा मुलगा तुरुंगात गेला.
तुम्हा शिशिरला आता गुंड म्हणताय, नंतर तुम्ही त्याला ओवाळाल असं ते वडिलांना म्हणाले. नंतर खरंच तसंच झालं. बाळासाहेबांच्या नेतृत्वात मी अनेक आंदोलनांमध्ये सहभागी झालो. वानखेडेची खेळपट्टी खणली होती. खलिस्तानी चळवळीविरोधात आंदोलन केलं", असं शिंदे म्हणाले.
'मराठी माणसाला व्हाईट कॉलर जॉब मिळायला हवा'
मुंबई, ठाण्यापुरती मर्यादित असलेली शिवसेना राज्यात फोफावली तेव्हा बाळासाहेबांनी हिंदुत्वाची कास धरली. त्यानंतर त्यांच्या राजकारणाचा पोत बदलला. त्यांचं हिंदुत्व सनातनी नव्हतं. कर्मकांड, मंदिर-पूजाअर्चा यामध्ये अडकलेलं नव्हतं. रुढार्थाने पाहिलं तर त्यांचं हिंदुत्व उदारमतवादी होतं. भाजप आणि शिवसेनेच्या हिंदुत्वात हा फरक होता. शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळात मराठी माणूस गिरणी कामगार म्हणून काम करत होता. एअर इंडिया, पोर्ट ट्रस्ट ऑफ इंडिया, बँका याठिकाणी टायपोग्राफर, स्टेनो म्हणून दाक्षिणात्य मंडळी काम करत असत. मराठी माणसाला व्हाईट कॉलर जॉब मिळायला हवेत अशी बाळासाहेबांची भूमिका होती. मराठी माणूस कामगार न राहता कर्मचारी झाला पाहिजे असं त्यांना वाटायचं असं ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांनी सांगितलं. अकोलकर यांनी शिवसेनेवर पुस्तक लिहिलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
ते पुढे म्हणाले, "बाळासाहेबांचे विचार अँटी एस्टॅब्लिशमेंट असायचे. शिवसेनेचं सरकार 30 वर्षानंतर आलं. मधल्या काळात त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला होता पण त्यांचा सूर आणि स्वर सरकारविरोधी असे. तरुण वर्ग त्यांच्याबरोबर होता. 70च्या दशकात बाळासाहेबांनी उत्तम वक्तृत्वाच्या बळावर तरुणांना साद घातली. त्याच काळात अमिताभ बच्चन यांची अँग्री यंग मॅन ही प्रतिमा ठसली. अमिताभ साकारत असलेली पात्रं व्यवस्थेला आव्हान देत. राजकारणाच्या पटावर बाळासाहेबांना सरकारला प्रश्न विचारले. मराठी माणसाच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा केला".
"स्थानिक लोकाधिकार समितीच्या माध्यमातून मराठी मुलांना नोकरी मिळण्यासाठी प्रयत्न झाले. बँका तसंच एअर इंडियात हवाईसुंदरी म्हणून काम करण्यासाठी शिवसेनेतर्फे प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आले होते. त्याकाळी बँकेतली नोकरी अतिशय प्रतिष्ठेची समजली जायची. शिवसेनेच्या माध्यमातून अनेक मराठी मुलं या आस्थापनांमध्ये नोकरीला लागले. त्यांच्या आयुष्याला आर्थिक स्थैर्य प्राप्त झालं", असं अकोलकर म्हणाले.
शिवसेनेत तिकीट देताना, पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीत जातीपातीचा विचार केला जात नसे हे खरं आहे. मराठा, आगरी, कोळी, भंडारा, ब्राह्मण अशा कोणत्याही समाजातल्या व्यक्तीला तिकीट मिळत असे.
जेव्हा शिवसेनेने भाजपविरोधात निवडणूक लढवली होती
"1987 मध्ये पार्ल्यात पोटनिवडणूक झाली होती. या निवडणुकीत भाजपचा शरद पवारांच्या पुलोदला पाठिंबा होता. शिवसेनेतर्फे डॉ. रमेश प्रभू रिंगणात होते. बाळासाहेबांनी या निवडणुकीत हिंदुत्वाची कास धरली. तिरंगी चुरशीच्या लढतीत डॉ. प्रभू यांनी प्रचंड मतांनी विजय मिळवला. त्यावेळी राष्ट्रीय पातळीवर हिंदुत्वाचं वारं होतं. प्रमोद महाजन यांच्या लक्षात आलं की राज्यात सत्ता हवी असेल, लोकांना आपलंसं करायचं असेल तर शिवसेनेशिवाय पर्याय नाही. तसं केलं नाही तर हिंदुत्वाची मतं ठाकरेंना म्हणजेच पर्यायाने शिवसेनेला मिळतील हे त्यांच्या लक्षात आलं. यातूनच शिवसेना-भाजप एकत्र आले", असं अकोलकर यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images
शिवसेनेचं प्रारुप छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारी सेना असंच होतं. शिवाजी जयंती, मलंगगडाचा उत्सव हे शिवसेनेनं सुरू केलं. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची कल्पना मांडली होती. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंच्या डोक्यात हिंदुत्व सुरुवातीपासूनच होतं.
'तो माझा जिल्हाप्रमुख आहे, जातीपातीचं सांगू नका'
"शिवसेनेत जातीपातीला कधीच स्थान नसे याचा अनुभव मी स्वत: घेतला आहे. 1991 निवडणुकीवेळी अनंत गुढे अमरावतीत उमेदवार होते. तेव्हा ते जिल्हाप्रमुख होते. भाजप-शिवसेनेची युती होती. प्रमोद महाजनांनी गुढेंना तिकीट नको अशी भूमिका घेतली. गुढे लिंगायत समाजाचं प्रतिनिधित्व करतात. त्या भागात लिंगायत समाजाची 200 घरंही नाहीत, त्यांना तिकीट देऊ नका असं महाजन म्हणाले. त्यावेळी जातीपातीचं सांगू नका. त्यांच्यासाठी मी आणखी एखादी सभा घेईन असं बाळासाहेब म्हणाले. गुढे जिल्हाप्रमुख आहेत. लोकांमध्ये फिरून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील असतात. त्यांनाच तिकीट देऊ अशी ठाम भूमिका बाळासाहेबांनी घेतली", शिवसेना नेते योगेंद्र ठाकूर यांनी आठवण सांगितली.
"औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे हे बुरुड समाजाचे आहेत. हा समाज तुलनेने कमी आहे. पण खैरे पाचवेळा खासदार झाले. मराठवाड्याचा चेहरा झाले. नवी मुंबईत गणेश नाईक हे आगरी समाजाचे आहेत. त्यांनाही संधी देण्यात आली. राहुल शेवाळे एससी समाजाचं प्रतिनिधित्व करतात, त्यांना खुल्या गटातून उमेदवारी देण्यात आली.
प्रबोधनकारांची आई जातपात पाळायची नाही. तेच संस्कार बाळासाहेबांनी जपले. रक्तदान शिबीर, रुग्णवाहिका यासाठी शिवसेना सातत्याने पुढाकार घेते. 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण असं स्वरुप होतं. सामान्य माणसाचे जे प्रश्न-अडचणी असतात त्यासंदर्भात काम करण्याला प्राधान्य असे. म्हणूनच शिवसेनेची शाखा ही सामान्य माणसाला आपलीशी वाटत असे", असं ठाकूर म्हणाले.
महागाईविरोधात शिवसैनिकांनी सातत्याने आंदोलनं केली. बाहेरगावचे जिल्हाप्रमुख त्यांना भेटायला यायचे. चहा प्यायलाशिवाय कोणालाही परत पाठवलं जात नसे. बाळासाहेब आलेल्यांची विचारपूस करत. रात्रीचा प्रवास करू नका असा सल्ला देत. कुठे थांबला आहात विचारणा करत असं ठाकूर म्हणाले.

फोटो स्रोत, Getty Images
"शिवसेनेच्या पहिल्या दसऱ्या मेळाव्याला 3 लाखाहून अधिक माणसं आली होती. शाहीर साबळे यांच्या जय जय महाराष्ट्र या गाण्याने सभेला सुरुवात झाली. भारावून टाकणारं असं ते वातावरण होतं.
1980च्या दशकात खलिस्तानी चळवळीविरोधात बाळासाहेबांनी ठाम भूमिका घेतली. 'गर्व से कहो हिंदू है, हिंदू मार खाणार नाही' हे त्यांनी जाहीर सभांमधून ठामपणे सांगायला सुरुवात केली. एका सभेत नवाकाळचे नीळकंठ खाडीलकर आले होते. प्रॅक्टिकल सोशॅलिझमला त्यांनी पाठिंबा दिला होता".
"महाराष्ट्राला लढल्याशिवाय, झगडल्याशिवाय, बलिदान केल्याशिवाय काही मिळत नाही. काही महाभाग आरोप करतात की शिवसेना हे नाव देऊन आपण शिवाजी महाराजांना प्रांतीयतेचं कुंपण घालत आहात, पण महाराजांच्या बाजूला जे कुंपण आहे ते प्रांतीयतेचं नसून आमच्या श्रद्धेचं आहे", असं बाळासाहेबांनी पहिल्या दसऱ्या मेळाव्यात सांगितलं होतं.
'हिंदुत्ववादी असले तरी निरपराध मुस्लिमांबद्दल त्यांच्या मनात द्वेष नव्हता'
"मी बाळासाहेब ठाकरेंसोबत 35 वर्षांहून अधिक काळ घालवला आहे. त्यांच्या विचारांबद्दल जर बोलायचं झालं तर, मराठी माणसाच्या न्याय हक्काच्या लढाईतूनच शिवसेनेचा जन्म झाला. त्यातून ते राजकारणात आले. ते हिंदुत्वाची भूमिका ठामपणे मांडू लागले. त्यातूनच त्यांना हिंदूहदयसम्राट असं संबोधले जाऊ लागलं.

फोटो स्रोत, Getty Images
जरी ते हिंदुत्ववादी असले तरी निरपराधी मुस्लिमांबद्दल त्यांच्या मनात कधीच द्वेष नव्हता. कोकणी मुस्लिमांना ते शिवसैनिक म्हणायचे. त्यांच्याकडून कधीच चुकीचं काही घडणार नाही याची मला खात्री असल्याचं त्यांनी शिवाजी पार्कच्या मेळाव्यात जाहीरपणे म्हटलं होतं. हिंदूविरोधी कारवायांबाबत त्यांना द्वेष होता. मराठी माणसाचं अस्तित्व त्यांनी महाराष्ट्रात टिकवून ठेवलं", असं शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी सांगितलं.
'प्रतिभाताईंना पाठिंबा द्यायला हवा'
"कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या विचारांना त्यांनी आयुष्यभर विरोध केला. शरद पवारांशी त्यांचे चांगले संबंध होते. इतर पक्षातील नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध होते. पण व्यक्तिगत संबंधांसाठी त्यांनी आपली राजकीय भूमिकेत तडजोड केली नाही. व्यक्ती म्हणून इंदिरा गांधीच्या ते उत्तम कार्यशैलीचं जाहीर कौतुक करायचे. पण कॉंग्रेसच्या विचारांना त्यांनी कायम विरोध केला. प्रतिभाताई पाटील जेव्हा राष्ट्रपती होणार होत्या तेव्हा मातोश्रीवर दोन तास चर्चा झाली. सर्वांची मतं बाळासाहेबांनी जाणून घेतली. मी ही त्या बैठकीत होतो. काहींनी म्हटलं काहीही झालं तरी त्या कॉंग्रेसच्या उमेदवार आहेत. त्यांना पाठिंबा देणं योग्य नाही. काहींनी सकारात्मक मतं दिली. पण बाळासाहेब म्हणाले, त्या कॉंग्रेसच्या असल्या तरी एक मराठी महिला राष्ट्रपती पदी बसतेय ही अभिमानाची गोष्ट असली पाहीजे आणि आपण त्यांना पाठिंबा दिला पाहिजे", असं कदम म्हणाले.
"घेतलेल्या भूमिकेतून बाळासाहेब काहीही झालं तरी माघार घ्यायचे नाहीत. शिवसेनेत प्रमुख म्हणून त्यांचा दरारा असला तरी पक्षात लोकशाही त्यांनी कायम ठेवली. ते महत्वाच्या निर्णयांआधी नेत्यांच्या बैठका घ्यायचे. त्यांची मतं जाणून घ्यायचे. मग स्वतः च मत सांगायचे. भेटीसाठी ताटकळत बसून ठेवायचे नाहीत. जर भेट शक्य नसेल तर स्पष्ट सांगायचे. त्यांच्या विचारांमध्ये आणि भूमिकांमुळे स्पष्टता आणि ठामपणा आम्ही अनुभवला आहे", असं कदम यांनी सांगितलं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








