You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नवरात्र उत्सवाचा खरा इतिहास : 'तिने बीज रोवलं नसतं तर...'
- Author, प्रा. प्रतिमा परदेशी
- Role, .
नवरात्र-घटस्थापना खरंतर स्त्रियांचा उत्सव. आदिशक्तीच्या अभिवादनाचा, नमनाचा, तिच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा उत्सव आहे.
नेमकं काय केलं जात घटस्थापनेत? मातीचा शिग करायचा. त्या मधोमध एक पाण्याचं छोटं गाडगं (मडकं) ठेवायचं, माती पाण्यानं भिजवायची आणि धान पेरायचं. हाच घट! याप्रकारेच केली जात होती आदिमाया-आदिशक्तीची उपासना.
ही आदिशक्ती नेमकी कोण? याच पध्दतीनं घट स्वरूपात तिची आराधन का केली जाते? या प्रश्नाच्या ऐतिहासिक शोधाकडे आपण गेलो की लक्षता येतं, घटस्थापना करतात त्या स्त्रियाच.
पुरुषांना घटस्थापीत करण्याचा अधिकार परंपरेने नाही. असं का बरं? त्याचं उत्तर प्रच्यविद्यापंडीत शरद पाटील यांच्यासारख्या तत्ववेत्याने मांडलंय. त्यांच्या मांडणीचा सार असा:
"घटस्थापना म्हणजे स्त्रीसत्तेची नेणीव! (सब कॉन्शस) मानवी वर्तन जाणीव आणि नेणीव यातून घडते. फ्रॉइडसारख्या मानसशास्त्रत्ज्ञानी मानवी मनाच्या दोन अवस्था सांगितल्या आहेत. बोधावस्था आणि अबोधावस्था. ही अबोधवस्था महणजेच नेणीव.
मानवी मनाच्या मेंदूच्या मागील पटलावर या आठवणी उमटल्या जातात. त्या दैनंदिन कामात सतत मुख्य पटलावर येत नाही. अबोध मनाच्या पटलावर स्त्रियांच्या निरहुती दुर्गा आणि इतर आदिमायेचे आठवणी कोरल्या गेल्या आहेत. जस त्यांच्या नेणीवेत बळीराजाच्या आठवणी साठल्या आहेत. त्याचा इतिहास त्यांनी एका म्हणीतून जतन करून ठेवला आहे - इडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो!"
घटस्थापना हा निऋती दुर्गेचा उत्सव!
स्त्रीसत्ताक गणसमाज ही मानवी इतिहासाची आद्य अवस्था, सुरुवात.
याच मानवी विकासाच्या टप्प्यावर शेतीचा शोध लागला. स्त्रिया गरोदरपणात भटकंती न करता एका ठिकाणी वास्तव्य करू लागल्या. मानवी वस्ती अर्थातच नदी काठी राहू लागल्या .
या काळात स्त्रियांच्या ध्यानात आलं की खाल्लेल्या फळाच्या बिया नदी काठच्या गाळपेराच्या जमिनीत पडल्या की नवं झाड उगवतं.
मग त्यांनी काठी हातात घेतली. तिला पुढील भागात टोकदार बनवलं, तिच्या सहाय्याने गाळपेराच्या गमिनीत छिद्र केलं आणि बी पेरलं. स्त्रिया पेरत्या झाल्या. हाच ठरला शेतीचा शोध.
शेतीच्या शोधाच्या जननी स्त्रिया आहेत. शेतीचा संस्कार स्त्रियांच्या नेणिवेत आज कोरला गलेला दिसतो. त्या कधी एखाद्या उत्सवात भाजलेले अन्न खात नाहीत, कधी तवा चुलीवर ठेवत नाहीत, कधी तळणं खायचं नाही इ. इ. यामागे स्त्रीसत्ताक नेणिवा कार्यरत दिसतात.
घटस्थापना म्हणजे आम्ही शेतीच्या शोधकर्त्या आहोत ही नेणिवेतली गोष्ट घटस्थापनेतून त्या व्यक्त करतात. आम्हाला पाऊस पडला की पेरतं व्हा असं शिकवणार्या स्त्रीसत्तेच्या गणमाता, कुलमुख्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा काळ म्हणजे नवरात्र!
निऋती, दुर्गा, भवानी, तुळजा, येडेश्वरी, जोगेश्वरी, सप्तश्रुंगी, आंबाबाई, रेणूका, हिंगलाज, बाणाई, म्हाळसा, देवमोगरा या गणमुख्या - कुलमुख्या. घटस्थापनेत नवरात्री त्यांचाच जागर केला जातो.
त्यातूनच लख्ख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, उदे ग अंबे उदे सारखी आराधी गीतं जन्माला आलेली दिसतात. देवीची आराधना प्राधान्याने स्त्रिया करतात; पण त्यात पुरुषांना मज्जाव नाही. तेही या गणमाता-कुलमातांची आराधना करतात.
शेतीच्या शेध लावणार्या स्त्रिया अन् अपत्य जन्माला घालणार्याही त्याच. स्त्रीसत्ताक गणसमाजात ही धारणा होती सृजनाचं, नवनिर्मितीच काम फक्त स्त्रियाच करू शकतात. याच धारणेतून पुरुषही आदिशक्तीपुढे नतमस्तक होतात.
देशभर नवरात्र उत्सव किंवा घटस्थापनेचा महाउत्सव सुरू आहे. नऊ दिवस देवीची आरधना, उपासना, गुणगान केलं जातं. या दिवसांमध्ये देशभर कुठे दुर्गा पूजा, कुठे गरबा, कुठे गोंधळ घातला जातो. नवरात्रीचा इतिहास सांगताना नऊ आदिशक्तीची रूप म्हणजे...
1. शैलपुत्री
2. ब्रह्मचारिणी
3. चन्द्रघंटा
4. कुष्मांडी
5. स्कंदमाता
6. कात्यायनी
7. कालरात्री
8. महागौरी
9. सिद्धिदात्री
अशी सांगितली जातात.
गोंधळी संबळ वादनासह देवीची स्तुती असणारी कवनं म्हणतात. देवीचा गुणगौरव आणि तिच्या एखाद्या गडावर येण्याची, शौर्याची गाथाच गोंधळी गाताना दिसतात.
अलिकडे हा देवीच्या गुणगौरवाचा उत्सव सणात/ इव्हेंटमध्ये रुपांतरीत होताना दिसत आहे. पायात चप्पल न घालणे, गादीवर न झोपणे, निरंकार उपावास करणे, अंगात येणे, वेगवेगळ्या रंगांच्या साड्या परिधान करणे, त्याचं सोहळ्यात (इव्हेंट) मध्ये रुपांतर करणे आदी कारणांवरून हा उत्सव अनेकांच्या टिकेचा विषय बनला आहे.
इतक्या रंगांच्या साड्या गरिब स्त्रियांकडे नसतात या कारणांपासून हे थोंताड आहे, या निष्कर्षापर्यंत लोक अगदी सहज येतात. यातून नेहमीचाच म्हणजे मोठा धोका निर्माण होतो तो धार्मिक विरुध्द नास्तिक किंवा अधार्मिक! अशा धृवीकरणाचा.
मूळात समाजव्यवस्थेत असे दोनच तट असतात का? हा प्रश्न अधिक महत्त्वाचा. या वादात विविध रंगी साड्या, मोठ्या पटांगणातील गरबा इव्हेंटस्... ही मूळ उत्सवातील घुसखोरी आहे हे सांगायला कोणी विद्वान-पंडीताची गरज नाही.
परंतु एवढ्या बाजाराधिष्ठित मूल्यांच्या शिरकावावरून आपण त्या उत्सवालाच कंडम करायचे की त्याचे मूळ, त्याची ऐतिहासिकता शोधत, मूळ परंपरा समजावून घेत त्याचा जागर करायचा हा खरा प्रश्न आहे.
नवरात्र उत्सवाचा हा खरा इतिहास आज समाजापुढे अणणे फारच गरजेचे आहे. कारण तो दडवून ठेवला गेला. इतिहासाची जातपुरुषसत्ताक मांडणी होत आली आहे. इतिहास हा वर्चस्व- प्रभुत्व ठेवण्यासाठी इतरांना अंकीत ठेवण्यासाठी एक साधन म्हणून वापरला जात असतो. म्हणूच इतिहासाच्या पुनर्लेखनाचा मुद्दा महत्त्वाचा ठरतो.
इतिहासच जर पराभवाचा, चुकीचा एका गटाच्या सोयीचा लिहिला गेला तर वर्तमानात दडपल्या गेलेल्यांना लढण्याची प्रेरणा मिळणार तरी कुठून? आत्मनिर्भरता येणार तरी कशी?
परंपरेपासून, सुरुवातीपासून तुम्ही दुय्यम, अप्रतिष्ठित, दास/दासी आहात तर शरणागत मानसिकता तयार होते. गुलामी सहज स्वीकारली जाते. किंबहुना त्याठीच अशा प्रकारे चुकीचा इतिहास लिहिला जात असतो.
घटस्थापनेचा खरा स्त्रीसत्ताक गणसमाजाचा खरा इतिहास पुढे आला तर कर्मकांड, बाजाराधिष्ठित सोहळे-निसत्व साजरीकरण, अंधश्रध्देची पूटं गळून पडू शकतात. वास्तव इतिहासातून लढ्याची, आत्मसन्मानाने जगण्याची नवी उमेद मिळू शकते. आपलं भणंग वर्तमान बदल्यासाठीची सिध्दता येऊ शकते.
त्यामुळे एक संयत भूमिका घेत घटस्थापनेच्या उत्सवाची टिंगल न करता, त्यावर अतिशयोक्तीयुक्त विवेकवादी न बनता त्यावर चढलेली, चढविण्यात आलेली जळमटं दूर केली पाहिजेत.
हे कष्टसाध्य काम आहे. कारण जळमट दूर करताना व्यवस्थेवर, घडवण्यात आलेल्या जनसमजावार, सहमतीवर ओरखडे उठण्याची शक्यता असतेच. परंतु नवा समाज घडताना हे होणे स्वाभाविकच आहे. अतिरेकी टोक न गाठता एक "संवादी घट" स्थापन करावाच लागेल. हाच घट स्त्रीवादी घट ठरेल. कारण हा घटस्थापनेच्या नव्या शोधामुळे आपण स्त्रीसत्तेच्या अस्सल वारश्यापर्यंत पोहचतो.
स्त्रिया सदा सर्वदा शोशितच होत्या, दडपलेल्या - दासी होत्या असे नाही तर त्या गणसमजाच्या कालखंडात राज्यकर्त्या होत्या, हे या ऐतिहासिकतेपर्यंत आपण येतो. आज सर्व स्त्रिया जात- पुरुषसत्तेच्या तुरुंगात बंदिवान आहेत. पण सर्व जातीधर्माचे स्त्रियांची आदिमाया, आदिशक्ती , पुर्वाजा या गण मुख्या, कुलमुख्या आहेत. त्यांच्याकडून नवनिर्माणाची, सृजनाची, जगण्याची, त्यासाठी संघर्ष करण्याची प्रेरणा आजच्या सर्वहाराना मिळते .
(प्राध्यापक प्रतिमा परदेशी या स्त्रीवाद, सत्यशोधक समाज या विषयांच्या अभ्यासक आहेत)
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)