औरंगाबाद: 'भगरीची भाकर खाल्ल्यानंतर अशी चक्कर आली की वाटलं आता मी जगतच नाही'

फोटो स्रोत, Shrikant bangale/bbc
- Author, श्रीकांत बंगाळे
- Role, बीबीसी मराठी
"त्रास म्हणजे खूप चक्कर यायला लागले. एकदम उलट्या व्हायला लागल्या. संडासला पळावं लागलं. येड्यावानी चक्कर आले. असं वाटलं आता मी जगत नाही."
50 हून अधिक वयाच्या कमलाबाई निकम सांगत होत्या.
औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यातील घायगावच्या कमलाबाई निकम यांच्यावर सध्या वैजापूरमधल्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 27 सप्टेंबरला आमची त्यांच्याशी भेट झाली तेव्हा त्यांचं डोकं दुखत होतं.
सध्या नवरात्र उत्सव सुरू आहे आणि यादरम्यान अनेक जण उपवास करतात.
उपवासासाठी फराळ म्हणून भगरीचे पदार्थ (वरीच्या तांदळाचे) खाल्ले जातात. कमलाबाई यांच्या कुटुंबीयांनी वैजापूरमधल्या एका दुकानातून भगरीचं पीठ विकत घेतलं होतं. पण, या पीठापासून बनवलेली भाकर खाल्ल्यानंतर त्रास सुरू झाल्याचं त्या सांगतात.
"नेहमीच खातो भगर. असं माहिती आहे का, की असं होईल म्हणून. दरवर्षीच भगर खातो. यंदा पहिल्यांदाच झालं. 20 वर्षांपासून उपवास करते मी. कधीच असं झालं नाही. यंदा भगरीनंच झालं हे. भाकर खाल्ल्यानंतर एक दीड तासात झालं ना मला तसं."
कमलाबाई यांच्यासोबत त्यांचा मुलगा राहुल दवाखान्यात थांबला आहे.
बीबीसी मराठीशी बोलताना तो म्हणाला, "माझ्या बहिणीनं शेतात जी भगर आलीय ती खाल्ली, तर तिला काहीच नाही झालं. उलट्या नाही की चक्कर नाही. आईनं बाहेरून आणलेली भगर खाल्ली तर तिला मात्र खूप त्रास झाला."

फोटो स्रोत, Shrikant bangale/bbc
वैजापूरमधल्या उपजिल्हा रुग्णालयातल्या दुसऱ्या मजल्यावर भगरीमुळे विषबाधा झालेल्या रुग्णांना ठेवण्यात आलं आहे. कमलाबाई यांच्याशेजारच्या बेडवर विलास चव्हाण (42) होते. त्यांना सलाईन लावलेलं होतं.
ते वैजापूर तालुक्यातल्या अकोली वडगावचे रहिवासी आहेत.
नेमकं काय झालं, असं विचारल्यावर ते म्हणाले, "भगर खाल्ल्यानंतर त्रास सुरू झाला. पोटात तोडायला लागलं. वांत्या व्हायला लागल्या. तेव्हा समजलं की विषबाधा झाली म्हणून. त्यानंतर लगेच आम्ही गावात लोकांना भगर खाऊ नका असं सांगितलं."

फोटो स्रोत, Shrikant bangale/bbc
दवाखान्यात भरती केल्यानंतर विलास यांना गोळ्या आणि इंजेक्शन देण्यात आलं. तेव्हा त्यांना चक्कर यायचं बंद झालं आणि उलट्या थांबल्या.
विलास यांच्यासोबत त्यांच्या घरातील 4 जणांना विषबाधा झालीय. यात त्यांच्यासहित त्यांचा दहावीत शिकणारा मुलगा, वडील आणि बायको यांचा समावेश आहे.
विलास यांना दोन मुली आहेत.
"माझ्या मुलींना भगर आवडत नाही म्हणून त्यांनी ती खाल्ली नाही, तर त्यांना काहीच झालं नाही," विलास पुढे सांगतात.
वैजापूर, गंगापूरमध्ये एका दिवसात 160 जणांना विषबाधा
औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर, गंगापूर, कन्नड आणि सिल्लोड या तालुक्यांमध्ये भगर खाल्ल्यानंतर विषबाधा झाल्याची प्रकरणं समोर आली आहेत.
27 सप्टेंबरला वैजापूर आणि गंगापूर या दोन तालुक्यांमध्ये 160 जणांना विषबाधा झाली आहे. यापैकी 108 रुग्ण बरे झाले असून 52 जण उपचाराखाली असल्याचं औरंगाबादचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी बीबीसी मराठीला सांगितलं.
एकट्या वैजापूर शहरात खासगी आणि शासकीय रुग्णालय मिळून एकूण 129 जणांना विषबाधेमुळे दवाखान्यात दाखल व्हावं लागलं. पण, हे नेमकं कशामुळे झालं, असा प्रश्न आम्ही रुग्णालय प्रशासनाला विचारला.

फोटो स्रोत, Shrikant bangale/bbc
वैजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, डॉ. गजानन टारपे यांनी सांगितलं, "रुग्णांच्या हिस्ट्रीमधून, रुग्णाकडून केलेली विचारणा याच्यातून असं लक्षात येतं की भगर खाल्ल्याच्या नंतरच त्यांना हे लक्षणं दिसायला लागले आणि त्यानंतर ते दवाखान्यात यायला लागले."
भगरीतून विषबाधा झालेल्या रुग्णांना चोवीस तास निगराणीखाली ठेवलं जात आहे. त्यानंतर त्यांना काही लक्षणं आढळल्यास पुढचे उपचार त्यांच्यावर केले जात आहेत.
एका दिवसात 1220 किलो भगर जप्त
भगर किंवा भगरीपासून तयार केलेले पदार्थ खाऊ नयेत, असं आवाहन आरोग्य विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे. तर, अन्न व औषध प्रशासन विभागानं केलेल्या कारवाईत आतापर्यंत औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर आणि कन्नड तालुक्यातील काही दुकानांमधून 1220 किलो इतकी भगर आणि भगरीचं पीठ जप्त केलंय. जवळपास 2 लाख रुपयांचा हा माल आहे.

फोटो स्रोत, FDA
औरंगाबादच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त अजित मैत्रे यांनी बीबीसी मराठीला सांगितलं, "याप्रकरणी विभागाकडून सध्या कारवाई सुरू आहे. रुग्णांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. रुग्णांकडील भगरीच्या शिल्लक साठ्यातील नमुने आणि त्यांनी ज्या दुकानातून भगर घेतली, तेथील नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. वैजापूर आणि कन्नड येथील काही दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे."
भगर खाल्ल्यानं झालेल्या विषबाधाप्रकरणी स्थानिक पोलीस विभागानंही अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे आणि पुढील चौकशी सुरू केली असल्याचं वैजापूरचे पोलीस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांनी बीबीसी मराठीला सांगितलं.
'मुलीला काहीच दिसत नव्हतं'
वैजापूर उपजिल्हा रुग्णालयातल्या दुसऱ्या इमारतीत आमची भेट छाया राजपूत (40) यांच्याशी झाली.
त्या आणि त्यांची मुलगी अशा दोघींनाही भगर खाल्ल्यामुळे विषबाधा झाली आहे.

फोटो स्रोत, Shrikant bangale/bbc
त्यांनी सांगितलं "आम्ही भगरीचं पॅकिंगचं पीठ आणलं होतं. त्या पीठावर काही सही-शिक्का नव्हता. त्यापासून भाकर बनवली. भाकर खाल्ल्यानंतर डोकं जड पडलं. हातपाय लटलट कापत होते. उलट्या होत होत्या. घाम तर इतका येत होता की वाटलं आता जातो आम्ही."
छाया यांची 22 वर्षीय मुलगी राधिकाला भगर खालल्यानंतर काहीच दिसत नव्हतं. आम्ही रुग्णालयात तिच्या आईशी बोलत असताना राधिका झोपलेली होती.
गावांमध्ये भीतीचं वातावरण
भगर खाल्ल्यानं विषबाधा होते, असा मेसेज ग्रामीण भागात पसरल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असल्याचं दवाखान्यात आलेले रुग्णांचे नातेवाईक सांगत होते.
किरतपूरचे रहिवासी संदीप मोटे यांच्या मित्राच्या घरच्यांना भगरीतून विषबाधा झाली होती. त्यांना बघण्यासाठी ते दवाखान्यात आले होते.
बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "भगरीतून विषबाधा पसरल्याचे मेसेज व्हॉट्सअपवरून सगळीकडे व्हायरल झाले. त्यामुळे गावागावात भीतीचं वातावरण तयार झालं. अनेकांनी त्यांच्याकडची भगरीची पाकिटं वापस केलीय, तर अनेकांनी उपवासच बंद केलेत."

फोटो स्रोत, SHRIKANT BANGALE/BBC
वैजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयातून विषबाधा झालेल्या 26 जणांना काल (28 सप्टेंबर) घरी सोडण्यात आलं.
या रुग्णालयातील एका नर्सनं सांगितलं, "भगरीतून विषबाधा झालेल्या 16 महिला, 7 पुरुष आणि 3 लहान मुलांना डिस्चार्ज देण्यात आला. दोन दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणावर पेशंट भरती झाले होते. पण याप्रकरणी मोठ्या प्रमाणावर जागृती केल्यामुळे रुग्णांची संख्या आता खालावली आहे."
भगर खाताना ही काळजी घ्या...
अन्न व औषध प्रशासनं विभागानं भगरीसंदर्भात काही खबरदारीचे उपाय सांगितले आहेत.
- भगर ग्रेन (धान्य) स्वरुपात आणून आपण खावी. भगरीचं पीठ जरी केलं तरी एका दिवसात ते संपवून टाकावं. ते पीठ एक-दोन दिवस ठेवलं तर ते आरोग्याला अतिशय हानिकारक आहे. त्याच्यामध्ये फंगल (बुरशी) वाढतो आणि मल उलट्या वगैरे अशा अन्नविषबाधेच्या बाबी घडतात.
- कुठल्याही रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांकडून भगर खरेदी करू नये. ज्या किराणा दुकानातून खरेदी करतो त्याच्याकडे परवाना आहे का ते पाहून खरेदी करावी. खरेदी केल्याची पावती जपून ठेवावी. म्हणजे भविष्यात संबंधितानं चुकीचा माल विकल्यास त्याच्यावर कारवाई करणे सोपे जाते.
दरम्यान, भेसळयुक्त भगर विकणाऱ्यांना अटक करायला पाहिजे, अशी इच्छा कमलाबाईंनी बीबीसी मराठीला बोलून दाखवली.
त्या म्हणतात, "अटक व्हायलाच पाहिजे त्यांना. विचारलंच पाहिजे कुठून आणली, काय आणली. कसं काय खरेदी केली. हे विचारायलाच पाहिजे."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








