शाळेतल्या मुलांनी भाकऱ्या थापून केली 'शैक्षणिक क्रांती'

फोटो स्रोत, BBC/sarfraj sanadi
- Author, सरफराज सनदी
- Role, बीबीसी मराठीसाठी, सांगलीहून
तुम्हाला स्वयंपाक येतो का? खराखुरा स्वयंपाक येतो का? म्हणजे अडी-अडचणीला तुम्ही तुमचा स्वयंपाक करू शकता आणि खाऊ शकता, इतका येतो का. बहुतांश मुलं यांचं उत्तर देतील फक्त मॅगी आणि चहा येतो. पण फक्त मॅगीवाला स्वयंपाक नाही, खराखुरा स्वयंपाक येतो का?
मग या शाळेतल्या मुलांची गोष्ट तुम्ही नक्की वाचायला हवी. ही दहा-बारा वर्षांची मुलं चक्क भाकऱ्या थापतात आणि त्या पण एखाद्या सुगरणीसारख्याच.
ज्यांना भाकऱ्या बनवता येत असतील त्यांना त्यांचे सुरुवातीचे दिवस आठवत असतील. इतर स्वयंपाकाच्या मानाने भाकऱ्या बनवणे हे अवघडच काम असते.
आधी कणिक तिंबायची, त्यात कमी जास्त पाणी झालं तर ती बिघडते. मग भाकरी थापायची आणि भाजायची. परत कधी पीठ नसेल तर परातीलाच चिकटून बसते किंवा फिरवली नाही तर करपते अशा अनेक अडचणी येतात त्यामुळे तर भाकरी बनवणं म्हणजे महाकठीण काम असंच अनेक जण म्हणतील.
मजकूर उपलब्ध नाही
Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.Facebook पोस्ट समाप्त
पण सांगलीतील ही छोटी-छोटी मुलं अगदी खरपूस भाकऱ्या बनवतात. एकदोन नाही तर अख्ख्या शाळेतील मुलं अगदी आजींबाईंच्या भाकऱ्या जशा होतात तशा बनवताना दिसतात.
या एका छोटाशा उपक्रमामुळे या भागात शैक्षणिक क्रांती झाल्याचं मत जाणकार व्यक्त करत आहेत. हे म्हणण्याचे कारण म्हणजे या भागात बहुतांश कुटुंबं ऊसतोडीचं काम करतात.
जेव्हा ते फिरस्तीवर असतात तेव्हा लहान मुलांच्या जेवणाचा प्रश्न येतो त्यामुळे त्यांना त्यांच्या आई वडिलांसोबत जावे लागते.
पण भाकऱ्या बनवता येत असल्यामुळे या मुलांच्या जेवणाचा प्रश्न तर सुटलाच आहे आणि शाळेतून वगळण्याचे प्रमाण देखील कमी झाले आहे.
हे कसं घडलं याची ही गोष्ट.
माध्यमिक शाळेतील मुलांनी भाकरी बनवायला शिकावी. त्यांची आपण स्पर्धा ठेऊ असं जेव्हा शिक्षकांनी सांगितलं तेव्हा ही लहान मुलं आपल्या घरी जाऊन भाकरी बनवण्याचा हट्ट करू लागली.
त्यांच्या घरातील मुली किंवा महिला त्यांना म्हणायच्या की भाकऱ्या बनवणं तर मुलींचं बायकांचं काम आहे मग तुम्हाला ते कसं येईल? तरी आम्ही आमचा हट्ट कायम ठेवला आणि भाकऱ्या बनवायला शिकलो.
सांगली जिल्ह्यातील कुल्लाळवाडी जिल्हा परिषद शाळेत शिकणारा शरद कुल्लाळ अभिमानाने आपण भाकरी कसं बनवायला शिकलो हे सांगतो.
जिल्हा परिषदेच्या शाळेने राबवलेल्या 'माझी भाकरी' उपक्रमामुळे हे सारं शक्य झालंय. यामुळे मुलांच्या आयुष्यातील जेवण बनवण्याचा प्रश्न कायमचा सुटला आहे.
सांगली जिल्ह्यातील जत हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो.
याच तालुक्यातलं कुल्लाळवाडी हे छोटंसं गाव. सुमारे पंधराशे लोकवस्तीच्या या गावातील जवळपास 90 टक्के कुटुंब, हे ऊसतोड मजुरी करणारे आहेत. शाळेसाठी मुलांना घरी ठेवावे तर त्यांच्या जेवणाखाणाचा प्रश्न निर्माण होत असे म्हणून ते आपल्या मुलांना सोबतच घेऊन जात.
त्यांची ही चिंता कुल्लाळवाडी जिल्हा परिषदेच्या शाळेने कायम स्वरूपाची सोडवली आहे.
'माझी भाकरी' या उपक्रमामुळे आता गावातील सुमारे 200 हून अधिक मुलांनी स्वयंपाकाचे कौशल्य आत्मसात केले आहे.
अशी सूचली संकल्पना
कुल्लाळवाडी शाळेतील शिक्षक भक्तराज गर्जे यांनी मुलांना स्वयंपाक करण्यास प्रोत्साहन मिळावे म्हणून भाकरी बनवण्याच्या स्पर्धेची संकल्पना मांडली. त्यातून 2016 पासून जिल्हा परिषदेच्या कुल्लाळवाडीमध्ये या स्पर्धा सुरू झाल्या.
शिक्षक भक्तराज गर्जे म्हणाले, "2016मध्ये आमच्या हे लक्षात आलं की की गावात ऊसतोड मजुरांची संख्या भरपूर आहे. त्यामुळे ऊसतोडीचा सीजन असेल तर विद्यार्थ्यांची संख्या घटते. कारण ही मुलं आपल्या पालकांसोबत ऊसतोडीला जात होती. आम्ही गावात जाऊन लोकांशी बोलून त्यांचे प्रश्न समजून घेतले.
"पालकांनी सांगितलं की मुलं घरी ठेवायची तर त्यांचे जेवण कोण बनवणार? असा सवाल अनेक कुटुंबांनी उपस्थित केला. यातून गावातल्या मुलांना स्वयंपाकाच्या दृष्टीने परिपूर्ण पूर्ण बनवण्याच्या विचारातून पहिल्यांदा भाकरी बनवायला शिकवणे याची कल्पना सुचली," गर्जे सांगतात.
या उपक्रमाने अनेक गोष्टी साध्य झाल्या असल्याचे गर्जे यांना वाटते.
"शाळेत मुलांना शिक्षण देताना शिक्षणाचा गाभा घटक, मूल्ये आणि जीवन कौशल्ये या तीन गोष्टीवर आपला भर राहिला. यातूनच मुलांना त्यांच्या आयुष्यात कौशल्यपूर्ण बनवताना भाकरी बनवणे ही प्राथमिक गोष्ट आली पाहिजे हा उद्देश होता. त्याशिवाय स्त्री-पुरुष समानता साधणे हे देखील होते. कारण भाकरी बनवणे हे केवळ महिला-मुलींचे काम समजले जाते आणि या समजुतीला छेद देण्याचे काम या छोट्या उपक्रमाने केले," असं गर्जे सांगतात.
गौऱ्या थापून काही मुलांनी केला सराव
पीठ वाया जाऊ नये म्हणून शेणापासून गौऱ्या थापण्याचा सराव आपण केल्याचंही मुलं हसत हसत सांगतात.
मुलं सांगतात, घरामध्ये आई-वडील पीठ देत नसत. कारण मुलांकडून भाकरी थापताना पीठ वाया जायचं. याला पर्याय म्हणून आपण मुलांना त्यांच्या घरी असणाऱ्या शेणा-पासून गौऱ्या थापण्याच्या सूचना केल्या.
त्याप्रमाणे मुलांनी भाकरी बनवण्याच्या दृष्टीने शेणाच्या गौऱ्या थापण्यास सुरुवात केली.
यातून मुलं अधिकाधिक चांगल्या पद्धतीने भाकरी बनवायला शिकू लागली.
शाळेतून बाहेर पडलेली काही विद्यार्थी आता बाहेरगावी शिकण्यासाठी आहेत. त्यांना आर्थिक परिस्थितीमुळे मेसचे जेवण परवडत नाही. त्यामुळे आता ते ज्या ठिकाणी राहतात तिथेच स्वतःचा स्वयंपाक बनवतात, असं शिक्षक सांगतात.
हे सर्व 'माझी भाकरी'या उपक्रमामुळे शक्य झाले आहे, अशी भावना जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक असणारे अशोक घोदे यांनी व्यक्त केली.
"शाळेत पुस्तकी शिक्षण देण्याबरोबर जीवन कौशल्यं विकसित व्हावीत या दृष्टीने देखील आम्ही शिकवतो," असं घोदे सांगतात.
स्पर्धेचे स्वरूप कसे आहे?
या स्पर्धेमध्ये प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला बक्षीस दिले जाते. यामध्ये भाकरी बनवण्यासाठी 50 गुण असून स्वच्छता, साहित्याचा योग्य वापर, नीटनेटकेपणा, भाकरीचा आकार आणि चव यावर गुण दिले जातात.
यामध्ये किमान 35 तर 45 गुण आता पर्यंत मिळली आहेत. एक भाकरी बनवण्यासाठी 5 ते 10 मिनिटे लागतात, तर एका स्पर्धेत किमान 100 भाकऱ्या तयार होतात.
या स्पर्धा ऐच्छिक आहेत, पण शाळेतील प्रत्येक मुलगा या मध्ये आता उत्स्फूर्तपणे सहभागी होतो, वर्षातून एकदा स्पर्धा भरवल्या जातात आणि त्याचं बक्षीस वितरण हे 26 जानेवारी किंवा 15 ऑगस्ट रोजी केले जाते.
इयत्ता सातवी मध्ये शिकणाऱ्या शरद कुल्लाळ हा आता उत्तम प्रकारची भाकरी बनवतो. त्याला इतर स्वयंपाक देखील येतो. बीबीसी मराठीला शरद सांगतो, "शाळेत भाकरी बनवायची स्पर्धा होणार असल्याचे कळल्यावर आम्ही मुलांनी यामध्ये सहभाग घ्यायचा ठरवले.
"सुरुवातीला मुली म्हणायच्या की तुम्ही कशी भाकरी बनवणार? मात्र आम्ही म्हटलं की, आम्ही भाकरी बनवू शकतो. हळुहळू आता भाकरी बनवायला शिकलोय," असे शरद अभिमानाने सांगतोय.
इयत्ता पाचवीत शिकणारा बिरुदेव तांबे हा देखील भाकरी बनवण्यात तरबेज बनलाय. बिरुदेव हा आपले आई-वडील लहान भाऊ संग्राम आणि बहीण सुप्रिया यांच्यासोबत गावात राहतो. बिरुदेवचा या स्पर्धेत पहिला नंबर आला.
बिरुदेवचे आई-वडील ऊसतोडीसाठी जातात. सुरुवातीला आई-वडील ऊसतोडीसाठी जात असताना बिरुदेव आणि संग्राम या दोघांना घेऊन जायचे. नंतर त्यांची बहीण थोडीशी मोठी झाल्यावर बहिणीवर दोघांच्याही स्वयंपाकाची जबाबदारी आली.
आठवीत शिकणारी सुप्रियासाठी देखील तिघांचे जेवण बनवणे सोपं नव्हतं. कारण तिला घरातील धुणी-भांडी इतर काम नंतर शाळा,अभ्यास मग स्वयंपाक बनवणे अवघड व्हायचे.
मात्र आता त्यांच्या शाळेतील 'माझी भाकरी' स्पर्धेमुळे बिरुदेव आणि चौथीमध्ये शिकणारा संग्राम या दोघे भावंडांना आता भाकरी बनवण्याबरोबर इतर स्वयंपाकाचे कौशल्य अवगत झालंय.
'त्यांच्या जेवणाचा प्रश्न सुटला'
बिरुदेवची आई कल्पना तांबे या बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाल्या, "खरंतर सुरुवातीला वाईट वाटायचं, आपल्या मुलांना भाकरी बनवायला लागते, पण करणार काय, त्यांच्या शिक्षण आणि पोटासाठीचं आम्हाला मजुरीसाठी जावं लागतं."
"त्यांना आता भाकरी बनवायला येऊ लागल्याने त्यांच्या जेवणाचा प्रश्न सुटला आहे. पहिल्यांदा बिरुदेवने भाकरी बनवली, त्यावेळी मला खूप आंनद झाला. मुलांच्या जेवणाची चिंता मिटली असं आम्हाला वाटलं" असे सांगतात.
पहिली ते आठवीपर्यंत असणाऱ्या कुल्लाळवाडी जिल्हा परिषदेच्या शाळेची पटसंख्या 250 च्या घरात आहेत. ज्यामध्ये किमान 100 मुलं आहेत. यापैकी किमान 80 मुलं स्वतःसह कुटुंबासाठी भाकरी बनवतात. अनेक मुलांना चहा बनवण्यापासून आता वेगवेगळ्या प्रकारचा स्वयंपाक देखील करता येतो.
त्यामुळे सांगली जिल्हा परिषदेच्या कुल्लाळवाडी शाळेने पुस्तकी ज्ञाना बरोबर मुलांना भविष्यात सामोरे जाताना जेवण बनवण्याची अडचणी दूर करण्याच्या दृष्टीने त्यांच्या अंगी निर्माण केलेली 'भाकरी' बनवण्याची कौशल्य नक्कीच उपयोगी ठरेल, असा विश्वास गावकरी आणि शाळेकडून व्यक्त करण्यात येतोय.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








