जेव्हा काँग्रेसच्या बैठकीआधी सीताराम केसरी यांना बाथरूममध्ये कोंडलं होतं...

फोटो स्रोत, Getty Images
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे यांचा विजय झाला आहे. खर्गे यांना 7 हजार 897 मते मिळाली. तर शशी थरूर यांना 1072 मतेच मिळवता आली. त्यामुळे खर्गे यांच्या काँग्रेस अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब झालं आहे.
काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक शशी थरूर आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात झाली. परवा (17 ऑक्टोबर) या निवडणुकीसाठीचं मतदान झालं होतं. त्यानंतर आज या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला.
सध्या सोनिया गांधी या काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा म्हणून काम पाहत आहेत. 2001 साली काँग्रेसच्या अध्यक्षपदाची शेवटची निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्ष म्हणून निवडल्या गेल्या होत्या.
इतिहासात डोकावून पाहिल्यास अध्यक्षपदाची निवडणूक ही गेल्या काही वर्षांत काँग्रेस पक्षासाठी डोकेदुखी ठरली आहे.
गेल्या 25 वर्षांत काँग्रेस पक्षाध्यक्षपदाची निवडणूक केवळ 3 वेळा झाली. या तिन्ही वेळा कोणत्या ना कोणत्या कारणाने ती निवडणूक वादग्रस्त ठरली होती. हे तिन्ही किस्से आज आपण जाणून घेऊ -
1. सीताराम केसरी यांना बाथरूममध्ये कोंडलं- 1998
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा ज्या-ज्या वेळी विषय निघेल, त्या-त्या वेळी सीताराम केसरी आणि त्यांच्यासंदर्भातील या किश्शाचा उल्लेख होईल.
नरेंद्र मोदी यांनीही एका प्रचारसभेत या मुद्द्यावरून काँग्रेस पक्षावर टीका केली होती.
1998 सालची लोकसभा निवडणूक काँग्रेस पक्ष सीताराम केसरी यांच्या नेतृत्वाखाली लढत होता.
या निवडणुकीचा निकाल काँग्रेसच्या दृष्टीने अनपेक्षित असाच होता. निवडणुकीत काँग्रेसला केवळ 142 जागा जिंकता आल्या होत्या.

फोटो स्रोत, Getty Images
या निवडणुकीत सोनिया गांधी यांनी 130 सभा घेतल्या. पण सीताराम केसरी हे प्रचारासाठी घराबाहेरही पडले नाहीत, त्यामुळे पराभवाची जबाबदारी ही पूर्णपणे त्यांची आहे, असं काँग्रेस नेत्यांचं मत बनलं.
निकालाच्या समीक्षणासाठी 5 मार्च 1998 रोजी काँग्रेस वर्किंग कमिटीची एक बैठक बोलावण्यात आली.
सोनिया गांधी यांना पक्षात आणखी मोठी आणि अर्थपूर्ण भूमिका देण्याचं या बैठकीत ठरवण्यात आलं.
त्यानुसार, सीताराम केसरी यांनी सुरुवातीला राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. पण अचानक त्यांना आपला निर्णय बदलला.
यानंतर प्रणव मुखर्जी यांच्या घरी आयोजित एका बैठकीत अतिशय नाट्यमय पद्धतीने सोनिया गांधींना अध्यक्ष बनवण्याचा प्रस्वात मांडण्यात आला.
याच दरम्यान, सीताराम केसरी यांच्या नावाची पाटी काढून कचरा पेटीत टाकण्यात आली. तसेच त्यांना बाथरूममध्ये कोंडल्याचा प्रकार घडला होता. यावरून विविध प्रकारचे आरोपही त्यावेळी करण्यात आले होते.
अखेर, सीताराम केसरी यांना पदावरून हटवण्यात आलं. ते शेवटचे बिगर-गांधी काँग्रेस अध्यक्ष ठरले. तेव्हापासून आजपर्यंत सोनिया गांधी यांच्याकडेच पक्षाची कमान आहे.
2. जितेंद्र प्रसाद यांचा अफरातफरीचा आरोप- 2000
1998 साली सोनिया गांधी यांच्याकडे काँग्रेस पक्षाची जबाबदारी आल्यानंतर केवळ एकाच वेळी अध्यक्षपदाची निवडणूक झाली.
2000 साली झालेल्या या निवडणुकीत सोनिया गांधी यांच्या विरुद्ध ज्येष्ठ काँग्रेस नेते जितेंद्र प्रसाद हे उभे होते.

फोटो स्रोत, Getty Images
खरंतर, काँग्रेसच्या निवडणूक समितीने अध्यक्षपदाच्या निवडणुकीची घोषणा केली, त्यावेळी त्यांची बिनविरोध निवड होईल, हे निश्चित मानलं जात होतं.
पण उत्तर प्रदेशच्या शाहजहाँपूर येथून खासदार असलेल्या जितेंद्र प्रसाद यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करताच गदारोळ माजला.
जितेंद्र प्रसाद हे पंतप्रधान राजीव गांधी आणि पी. व्ही. नरसिंहराव यांचे सल्लागार राहिले असल्याने त्यांच्या अर्जाने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.
सुरुवातीला उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटीने अर्ज मागे घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला होता. पण प्रसाद हे निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर ठाम होते.
जितेंद्र प्रसाद यांनी पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न केले. पण देशभरातून त्यांना अपेक्षित पाठिंबा मिळाला नाही. ही निवडणूक पारदर्शक पद्धतीने होणार नाही, काँग्रेस कमिटीकडे असलेली डेलिगेट्सची यादी बोगस आहे, त्यामध्ये अफरातफरी झाली आहे, असा आरोप प्रसाद यांनी त्यावेळी केला होता.
या निवडणुकीत सोनिया गांधी यांनी एकतर्फी विजय प्राप्त केला. सोनिया गांधी यांना 7448 मते मिळाली, तर प्रसाद यांना केवळ 94 मते मिळवता आली होती.
ही काँग्रेसची शेवटची अध्यक्षीय निवडणूक ठरली. यानंतर प्रत्येकवेळी अध्यक्षपदाचा विषय निघाला की सोनिया गांधी यांचीच या पदावर बिनविरोध नियुक्ती करण्यात येत होती.
3. शहजाद पुनावालांचेच राहुल गांधींवर आरोप- 2017
2017 साली राहुल गांधी यांच्याकडे काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी देण्याचं ठरलं होतं. यावेळी राहुल गांधी यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला. त्यांची बिनविरोध निवड होणार हे स्पष्ट होतं. मात्र राहुल गांधी यांच्या लांबच्या नात्यातील शहजाद पूनावाला यांच्या आरोपांमुळे वाद निर्माण झाला होता.
पूनावाला हे त्यावेळी महाराष्ट्र काँग्रेसचे सचिव म्हणून कार्यरत होते. शहजाद यांची त्यावेळी निवडणूक लढवण्याची इच्छा होती. पण निवडणूक लढवण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रतिनिधींचा प्राथमिक पाठिंबा त्यांना मिळाला नाही. अखेर, या निवडणुकीत राहुल गांधी यांची अध्यक्षपदावर बिनविरोध निवड झाली होती.

फोटो स्रोत, Ani
"अध्यक्षपदाची निवडणूक हा केवळ दिखाऊपणा आहे. हे इलेक्शन नाही तर सिलेक्शन आहे," असं पुनावाला त्यावेळी म्हणाले होते. पण काँग्रेसचे तत्कालीन महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शहजाद यांचा आरोप फेटाळून लावला होता.
पुनावाला हे काँग्रेस पक्षातच नाहीत, गेल्या अडीच वर्षांपासून त्यांचा पक्षासोबत काहीएक संबंध नाही, असं चव्हाण यांनी म्हटलं.
शिवाय, शहजाद पूनावाला हे केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी हे कृत्य करत आहेत, असा आरोप चव्हाण यांनी केला होता.
शहजाद पूनावाला हे राहुल गांधी यांच्या नात्यातील असल्यामुळेच याची जास्त चर्चा झाली होती.
शहजाद यांचे भाऊ तहसीन पूनावाला हे प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांची बहीण मोनिका यांचे पती आहेत. शहजाद यांच्या आरोपांनंतर त्यांच्या कुटुंबातही मोठा गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं होतं. शहजाद यांच्या वरील भूमिकेनंतर भाऊ तहसीन यांनी त्यांच्याशी सगळेच संबंध तोडून टाकले होते.
पुढे शहजाद पूनावाला हे भाजपमध्ये दाखल झाले. सध्या ते भाजपचे प्रवक्ते म्हणून कार्यरत आहेत.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








