प्रकाश आंबेडकर - 'सुप्रीम कोर्टानं शिवसेनेबाबत दिलेल्या निर्णयाचं पुनरावलोकन करावं'

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सुप्रीम कोर्टानं मंगळवारी शिवसेनेसंदर्भात दिलेल्या निर्णायचं पुनरावलोकन करण्याची मागणी केली आहे. त्यांनी या निर्णयातून चुकीचा संदेश गेल्याचा दावा केला आहे. यामुळे इलेक्शन कमिशनची न्यूट्रॅलिटी कॉम्रोमाईज झालीय, असा दावासुद्धा त्यांनी केला आहे.

"सुप्रीम कोर्टानं शिवसेनेच्या संदर्भात दिलेला निर्णय सर्वांनाच बंधनकारक आहे. परंतु या निर्णयाचा आदर होईल का, याबाबत मला शंका आहे. संविधानाने आणि संसदेनं ही दक्षता घेतली की निवडणूक आयोग कुठेही तडजोड केली नाही किंवा त्यांच्यावर शिंतोडे ओडले जाणार नाहीत. पण निवडणूक आयोगानं स्वतःच्याच अधिकाराखाली सिंबल ऑर्डर 1968 जी काढली त्यामध्ये सेक्शन 15 प्रमाणे एखाद्या पक्षात निवडणूक चिन्हासाठी वाद झाला, तर आम्हाला हस्तक्षेप करता येतो अशी तरतूद आहे.

"पहिल्यांदा मी असं मानतो की सुप्रीम कोर्टाला संधी आली होती की सेक्शन 15 ऑफ दी सिंबल ऑर्डर हे संवैधानिक आहे की नाही याची तपासणी करण्याची. पण दुर्दैवानं ती तपासणी झाली नाही, तर निवडणूक आयोगाला शिवसेनेबाबत निर्णय घ्या असं सांगण्यात आलं. मी दुर्दैव असं मानतो की, आतापर्यंत संविधानाने आणि संसदेनं इलेक्शन कमिशनची जी न्यट्रॅलिटी ठेवली होती ती या निर्णयामुळे कॉम्प्रोमाईज झालीय.

यापुढे पक्षाचा वाद निवडणूक आयोग सोडवेल असा जो संदेश गेला आहे तो चुकीचा आहे. असं मी मानतो. याचं कारण निवडणूक आयोगाला आपण Frankenstein करायला निघालो आहोत का ही दाट शक्यता येते. म्हणून सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयाचं पुनरावलोकन करावं अशी विनंती वंचित बहुजन आघाडी करत आहे," असं आंबेडकर म्हणाले आहेत.

मंगळवारी (27 सप्टेंबर ) ला सुप्रीम कोर्टात शिवसेना आणि नवे सरकार याबाबत एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरें सुनावणी झाली. या सुनावणीमध्ये एकनाथ शिंदेंना दिलासा मिळाला तर उद्धव ठाकरेंना धक्का बसला आहे.

'निवडणूक आयोगाच्या कामकाजात मध्यस्थी करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. यामुळे पक्षचिन्हाबाबत निर्णय घेण्यासाठी निवडणूक आयोगाचा मार्ग मोकळा झाला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे शिंदे गटाला दिलासा मिळाला असून, ठाकरेंना मात्र मोठा धक्का बसला आहे.

'आपणच खरी शिवसेना असल्याचा शिंदे गटाचा दावा असून, निवडणूक आयोगाला यासंबंधी निर्णय घेण्यापासून रोखलं जावं,' अशी मागणी ठाकरेंच्या वतीने करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेची ही याचिका फेटाळून लावली.

आज दिवसभर पार पडलेल्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या कामकाजावर स्थगिती आणण्यास नकार दिला.

यामुळे पक्षचिन्हासंबंधी निर्णय घेण्याचा निवडणूक आयोगाचा मार्ग मोकळा झाला आहे. 'धनुष्यबाण' मिळवण्यासाठी शिंदे गट आणि ठाकरेंमध्ये सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेली लढाई आता निवडणूक आयोगासमोर पोहोचली आहे.

न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती एम. आर. शहा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह यांच्या पाच सदस्यीय घटनापीठापुढे सुनावणी पार पडली. आजपासून घटनापीठासमोर सुनावणीचं युट्यूबवर लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आल्याने हा दिवस ऐतिहासिक ठरला.

एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे काय म्हणाले?

या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "लोकशाहीत बहुमताला महत्त्व असतं. आज बहुमत आमच्याकडे आहे. विधानसभेतही आणि लोकसभेतही. जे काही निर्णय होतात ते घटनेनुसार होतात. कायदेकानून असतात. सर्वोच्च न्यायालयाने सर्व बाबींचा विचार करून निर्णय दिला आहे. निवडणूक विभाग स्वायत्त यंत्रणा आहे. काही निर्णय न्यायालयात होतात, काही निवडणूक आयोगासमोर होतात. लोकशाहीला साजेसा निर्णय. घटनातज्ज्ञांना असंच वाटत होतं."

तर, हा शिंदे गटाला दिलासा नाही, असं मत शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी व्यक्त केलं. "आमचा घटनेवर आणि लोकशाहीवर विश्वास आहे. त्यामुळे निवडणूक आयोगात आमच्या बाजूने निकाल लागेल," असा विश्वास आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला.

महत्त्वाची गोष्ट हीच आहे की मी काही ठिकाणी बघत होतो कोणत्या गटाला दिलासा मिळाला, पण हा दिलासा नाही. तर युक्तिवादाचा कोर्ट बदललेला आहे जे सुप्रीम कोर्टात होतं ते आता निवडणूक आयोगाकडे गेला आहे तिथे युक्तिवाद सुरू राहील, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

पुढे ते म्हणाले, "जे काय होत आहे ते जनतेच्या समोर आहे महाराष्ट्रातील जनता जगातील जनता बघत आहे हा युक्तिवाद देशातील लोकशाहीसाठी महत्त्वाचा राहील."

"आम्ही सत्तेच्या बाजूने आहोत सत्य आमच्या बाजूने राहील आम्ही सध्याच्या सोबत उभे आहोत विजय दशमीला जसा सत्याचा विजय झाला तसा आमचा देखील विजय होईल."

"कोणाचा विजय होतो तेव्हा असं वाटतं की कोणाला धक्का बसलाय जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाले तेव्हा देखील आपण बघितलं होतं टेबलावर चढून डान्स करत होते तर त्यांच्याकडून वेगळा अपेक्षित नाही."

"सुनावणी होईल त्यासाठी आम्ही तयार आहोत आमच्या न्यायव्यवतीवर विश्वास आहे लोकशाहीसाठी आणि देशासाठी हा लढा महत्त्वाचा ठरेल. आमचा विश्वास संविधानावर लोकशाहीर आहे आम्ही सत्याच्या बाजूने लढत राहू आम्ही ताकतीने लढू," असं आदित्य ठाकरे म्हणाले.

उज्ज्वल निकम काय म्हणाले?

ज्येष्ठ विधिज्ज्ञ उज्वल निकम म्हणाले, "सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना निवडणूक आयोग स्वायत्त यंत्रणा आहे हे स्पष्ट केलं. पक्ष कुणाचा, चिन्ह कुणाचं याबाबत निर्णयाचे अधिकार निवडणूक आयोगाकडे आहेत. यापुढे पक्ष-चिन्ह याबाबतचे निर्णय निवडणूक आयोग घेईल".

"आमदारांची अपात्रता हा विषय वेगळा आहे. निवडणूक आयोगाची स्थापना, अधिकार हा आयोगाचा आहे. निवडणूक आयोगाच्या कोणत्याही निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येते हेही लक्षात घेणं आवश्यक आहे.

निवडणूक आयोगाने त्वरित कार्यवाही करावी असंही न्यायालयाने म्हटलं आहे. शिवसेनेची घटना तसंच पदाधिकाऱ्यांचं प्रतिज्ञापत्र, शिवसेनेचे निवडून आलेले आमदार-खासदार कोणाच्या बाजूने आहेत यानुसार निवडणूक आयोग निर्णय घेईल," असं निकम म्हणाले.

"आमचे मुद्दे ऐकूनही कोर्टाने केंद्रीय निवडणूक आयोगाला सुनावणीची परवानगी दिली. आता आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगात लढू," असं शिवसेनेचे माजी खासदार अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान शिवसेनेचे खासदार अनिल देसाई म्हणाले, "हा निर्णय उद्धव ठाकरेंना धक्का कसा काय? न्यायालयात चांगला युक्तिवाद झाला. आम्ही निवडणूक आयोगासमोर बाजू मांडू. मुख्य याचिका बाकी आहे. निवडणूक आयोगाला कार्यवाही करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दिला आहे. निवडणूक आयोगात लढण्याची आमची तयारी पूर्ण झाली आहे".

उद्धव ठाकरे यांच्या वतीने कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद सादर केला. सिब्बल म्हणाले, "शिंदे यांना पक्षातून काढून टाकण्यात आले आहे. त्यांच्याकडे सदस्यत्वच नाही."

आज सकाळीच सुप्रीम कोर्टात उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे सुनावणी सुरू झाली.

एखादी गोष्ट सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे म्हणून आम्ही निवडणूक आयोगाचं कामकाज थांबवू शकत नाही असं निरीक्षण सुप्रीम कोर्टाने नोंदवलं.

आम्हीच खरी शिवसेना आणि पक्षाचं चिन्ह आमच्याकडे असावं ही मागणी घेऊन एकनाथ शिंदे निवडणूक आयोगाकडे गेलेत. तर त्याचवेळी पक्षांतर, विलिनीकरण आणि अपात्रता या मुद्द्यावर निर्णय झाल्याशिवाय निवडणूक आयोगाचं कामकाज थांबवावं अशी मागणी उद्धव ठाकरेंकडून करण्यात आली.

ठाकरे गटाचा आजचा युक्तिवाद

सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांनी उद्धव ठाकरेंची बाजू मांडली. ते म्हणाले, "की हा खटला घटनापीठाकडे आहे म्हणून आम्ही आज इथे आहोत. निवडणूक आयोगाने चिन्हाच्या मुद्द्यावर काहीही निर्णय दिलेला नाही. आता मुंबई महापालिकेच्या निवडणुका आहेत. सध्या निवडणुका घेऊ नयेत. असं झाल्यास मोठा अनर्थ होईल."

"दहाव्या अनुसूचीच्या संदर्भात पक्षांतर्गत लोकशाहीवरील युक्तिवाद मला पटलेला नाही. याचा अर्थ तुम्ही विरोधी पक्षांशी हातमिळवणी करून कोणतेही सरकार पाडू शकता का?" अशी विचारणा कपिल सिब्बल यांनी केली आहे.

"तुम्ही अपात्र ठरलात तरी, 10व्या सूचीच्या अंतर्गत काय सुरू आहे याची आम्हाला चिंता नाही असंच निवडणूक आयोग म्हणत आहे. तुम्ही पक्षाचे सदस्य असल्याचं गृहित धरु असं निवडणूक आयोग म्हणू शकत नाही असं कपिल सिब्बल म्हणाले आहेत. 10व्या सूचीचा मुद्दा आल्यानंतर अपात्रतेचा मुद्दाही उपस्थित होते. यामुळे सदस्यत्व सोडणारे पक्षाच्या चिन्हावर दावा करु शकत नाहीत," असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला आहे.

कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाने पाठवलेल्या नोटिसचे वाचन केलं.

"तुम्ही विरोधी पक्षासोबत मिळून अशा अनेक गोष्टी केल्या आहेत ज्यामधून तुम्ही स्वच्छेने पक्षाचं सदस्य सोडल्याचं सूचित होत आहे. आता जर अध्यक्षांनी निर्णय घ्यायचा असेल तर 21 जूननंतर काय झालं याच्याशी संबंध जोडावा लागेल.

निवडणूक आयोगाकडील कागदपत्रांनुसार, उद्धव ठाकरे 20180 ते 2023 पर्यंत पक्षप्रमुख आहेत. शिंदेंकडे पक्षाचं प्राथमिक सदस्यत्वही नाही. ते निवडूनही आले नव्हते असा युक्तिवाद ठाकरेंच्या वतीने कपिल सिब्बल यांनी केला आहे.

सकाळी काय घडले?

सुरुवातीला कपिल सिब्बल यांनी घटनेच्या दहाव्या सुचीतील काही भाग वाचून दाखवला.

19 जुलै 2022 ला एकनाथ निवडणूक आयोगाकडे गेले आणि त्यांनी सांगितलं की मी शिवसेना आहे. त्याच्यावर सिब्बल यांनी प्रश्न उपस्थित केले.

10 व्या परिशिष्टाचा मुद्दा उपस्थित करत सिब्बल यांनी शिंदे गटाच्या वैधतेवरच प्रश्न उपस्थित केले.

"भाजपला मतदान करून आता शिंदे स्वतःचं पक्ष असल्याचा दावा करत आहेत, त्यांनी गट विलिन केला नाही. त्यामुळे त्याआधी त्यांचे आमदार आणि पक्ष सदस्य म्हणून अधिकारांवर निर्णय घ्यावा लागेल," असं सिब्बल यांनी कोर्टाला सांगितलं.

"शिंदे यांनी मूळ पक्ष म्हणून निवडणूक आयोगाकडे दावा केलाय. पण त्यांच्या पक्ष सदसत्वाबाबत निर्णय होणं महत्त्वाचं आहे," असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला.

"तसंच कोर्टात प्रकरण सुरू असताना निवडणूक आयोगाचे चिन्हं गोठवल्यास याचे मोठे परिणाम होतील," असा दावासुद्धा सिब्बल यांनी केला आहे.

10व्या परिशिष्टानुसार शिंदे गटासमोर फक्त विलिनीकरणाचा पर्याय असल्याचा दावा ठाकरे गटाकडून अभिषेक मनु सिंघवी यांनी केला आहे.

शिंदे गटाचा आजचा युक्तिवाद

शिंदे गटाकडून नीरज कौल यांनी बाजू मांडली.

नीरज कौल यांनी युक्तिवाद करताना म्हटलं "मूळ शिवसेना कोणाची याचा निर्णय निवडणूक आयोग ठरवेल. निवडणूक आयोगाने कागदपत्र मागवली आणि मग ठाकरे गट कोर्टात आला. घटनात्मक संस्था असल्याने आयोगाला याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार आहे."

"आम्हाला निलंबित केलं तरी पुढे जाऊन आम्हाला निवडणूक आयोगाकडे जाऊन आम्ही शिवसेना आहोत हे सांगण्याचा दावा कायम राहतो", असा दावा कौल यांनी केला आहे.

"निवडणूक आयोगाकडे गेलेली व्यक्ती समजा निलंबित झाली तरी या निलंबनाचा निवडणूक आयोगावर परिणाम होईल का," असा सवाल कौल यांनी उपस्थित केला.

"शिंदे गटानं पक्ष सोडलेला नाही. आम्हाला पक्षात बहुमत आहे. लोकसभा आणि विधिमंडळात आम्ही सांगत आहोत की आम्ही शिवसेना आहोत," असं कौल यांनी कोर्टात सांगितलं.

किशन कौल एकनाथ शिंदे यांची बाजू मांडली. ते म्हणाले की जूनच्या तिसऱ्या आठवड्यात काही शिवसेना आमदारांनी शिंदे यांना काढण्याचा प्रयत्न केला आहे. 29 जूनला आमची भूमिका मांडण्यासाठी कोर्टाने आम्हाला 12 जुलैपर्यंतचा वेळ दिला.

"पक्षाचं चिन्हं हे कोणत्याच आमदाराची मालमत्ता नाही. एक आमदारसुद्धा त्याच्यासाठी पक्षाचं चिन्ह वापरू शकतो," असा दावा त्यांनी केला.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

एकीकडे ही सुनावणी सुरू होती त्याच वेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी मातोश्रीवर संवाद साधला.

उद्धव ठाकरे म्हणाले, "ज्यांना तुम्ही मोठे केले ते खोक्यात गेले. मी तर अजून घराच्या बाहेर पडलो नाहीये. ज्या क्षणी मी वर्षा सोडून मातोश्रीत आलो तेव्हापासून असे शिवसैनिक मातोश्रीवर येत आहेत.

"जर शिवसैनिक बोलले असते तर एक मेळावा इथेच झाला असता. दसरा मेळाव्याच्या कितीतरी पटीने एक मिळावा इथेच झाला असता. मला फोन येत आहेत कुठेही काही आपलं वाकडं झालेलं नाही."

"भवानी मातेची कृपा आहे. ती कृपा नाही तर खरे कोण आणि चुकीचे कोण हे दाखवून दिलंय. शिवाजी महाराजांना भवानी मातेने तशी तलवार दिली अशी श्रद्धा आहे तसंच तसंच तुमच्याकडे बघून मला असं वाटतंय की भवानी मातेने मला ही तलवार दिली आहे," असं उद्धव ठाकरे म्हणाले.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)