शरद पवार: 'एकच मुलगी, म्हणून लोक विचारायचे अग्नी कोण देणार', पवार म्हणाले... #5मोठ्याबातम्या

शरद पवार, सुप्रिया सुळे

फोटो स्रोत, Getty Images

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया...

1) एकच मुलगी, म्हणून लोक विचारायचे अग्नी कोण देणार, पवार म्हणाले...

'पुणे डॉक्टर असोसिएशन'च्या वतीने 'सिंगल डॉक्टर फॅमिली' या उपक्रमाचा शुभारंभ झाला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. यावेळी शरद पवारांनी उपस्थितांशी संवाद साधताना सार्वजनिक आयुष्यातील किस्से सांगितले. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.

यावेळी, केवळ एकाच मुलीवर कुटुंब नियोजन केल्यावर कोणता सामना करावा लागला, असं विचारलं असता शरद पवारांनी उत्तर दिलं की, "मला फारसा काही सामना करावा लागला नाही. पण काही वेळा विविध प्रश्नांना तोंड द्यावं लागलं. एकदा निवडणुकीनिमित्त एका गावात गेलो होतो. यावेळी एका वयोवृद्ध व्यक्तीने विचारलं, तुम्हाला एकच मुलगी आहे, उद्या अचानक काही झालं तर अग्नी कोण देणार?"

"तेव्हा मी त्यांना सांगितलं, मला एकच मुलगी आहे आणि मला अजिबात काळजी नाही. लोकांना अग्नीची चिंता आहे, ही गोष्ट मला काही मान्य नाही. हे मी त्यांना स्पष्ट सांगितलं."

Facebook पोस्टवरून पुढे जा

मजकूर उपलब्ध नाही

Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

Facebook पोस्ट समाप्त

"जिवंत असताना मुलीशी नीट वागण्याची चिंता करायची की मेल्यावर चितेला अग्नी कोण देणार याची चिंता करायची?" असंही पवार म्हणाले.

"कर्तृत्वाची मक्तेदारी केवळ पुरुषांकडे नाही. कर्तृत्व आहे हे इंदिरा गांधीं यांच्यासह अनेक महिलांनी सिद्ध केले," असंही शरद पवार यावेळी म्हणाले.

2) शिवसैनिकांना चुन-चुन के मारणारा जन्माला यायचाय - अंबादास दानवे

"शिवसैनिकांना गिनके आणि चुनके मारणारा अजून जन्माला यायचा आहे. दादागिरीला दादागिरीनेच उत्तर देणार," असा इशारा शिवसेनेचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांना दिला आहे. बुलडाणा येथे आयोजित शिवसेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली.

"कोणी मोजायला आलंय का?" असा सवाल विचारत दानवेंनी भाषणाची सुरुवात केली. "कुणीतरी इथे येऊन आधी गिनून घ्या आणि एखाद्याला चुनून घ्या. तोच कार्यकर्ता तुमच्याकडे पाठवतो. मग पाहतो कोण भारी ठरते ते," अशा शब्दांत दानवे विरोधकांवर बसरले.

अंबादास दानवे

फोटो स्रोत, Twitter

फोटो कॅप्शन, अंबादास दानवे

"इथले आमदार देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोरोनाचे जंतू कोंबत होते. मग आता तुम्हाला तुमच्या बॅनरवर फडणवीस कसे चालतात?" असा सवाल दानवेंनी गायकवाडांना विचारला.

"बुलडाण्यात दादागिरी चालते. पण शिवसैनिकांनो घाबरू नका. दादागिरीला दादागिरीने उत्तर देऊ," असेही दानवे म्हणाले.

3) आंतरधर्मीय विवाहाबाबत खासगी विधेयक मांडणार - खासदार अनिल बोंडे

आंतरधर्मीय विवाहाबाबत खासगी विधेयक मांडणार असल्याची माहिती भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी दिली. आंतरधर्मीय विवाह कायद्यात सुधारणा करण्याची गरज असल्याचेही खासदार बोंडे म्हणाले. एबीपी माझानं ही बातमी दिलीय.

खासदार अनिल बोंडे म्हणाले, "अमरावती येथील उमेश कोल्हे हत्याकांडमधील आरोपी देखील लव्ह जिहादला प्रोत्साहित करायचा. त्याने इंदोरमधील मुलगी पळून आणली होती. शिवाय मेळघाट मधील मुलींना प्रलोभनं देऊन किंवा धमक्या देऊन पळवून घेऊन जातात. यावर मी एक बिल आणणार आहे."

अनिल बोंडे

फोटो स्रोत, Twitter

फोटो कॅप्शन, अनिल बोंडे

बोंडे पुढे म्हणाले, "बोगस संस्था हे विवाह लावून देतात, यात खोटा मौलवी उभा केला जातो. अमरावतीची जी मुलगी पळून गेली होती त्या मुलीच्या आई-वडिलांनी रडत-रडत मला फोन केला होता. आमच्या मुलीला शोधा अशा विनवण्या त्यांच्याकडून करण्यात येत होत्या. त्यानंतर ते खासदार नवनीत राणा यांच्याकडे गेले. त्यानंतर नवनीत राणा या पोलीस ठाण्यात गेल्या. त्यांनी जर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन याबाबत पोलिसांना जाब विचारला असेल तर त्यात वावगं काय?"

दरम्यान, यापूर्वीही अनिल बोंडेंनी लव्ह जिहादबाबत अधिवेशनात विधेयक आणणार असल्याचे म्हटले होते.

4) तेजस्वी यादव यांचा जामीन रद्द करा - सीबीआय

IRCTC घोटाळा प्रकरणी 2018 च्या ऑक्टोबर महिन्यात कोर्टानं बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना दिलेला जामीन रद्द करावा, अशी मागणी सीबीआयनं केलीय.

द हिंदू वृत्तपत्रानं ही बातमी दिलीय.

तेजस्वी यादव

फोटो स्रोत, Twitter

फोटो कॅप्शन, तेजस्वी यादव

सीबीआयनं तेजस्वी यादव यांचा जामीन रद्द करण्यासाठी कोर्टात धाव घेतली आहे.

विशेष न्या. गीतांजली गोयल यांनी नोटीस काढत, तेजस्वी यादव यांना 28 सप्टेंबरपर्यंत सीबीआयच्या मागणीवर उत्तर देण्याचे आदेश धिले आहेत.

5) 'आप'च्या आमदाराला 4 दिवसांची पोलीस कोठडी

राऊस अव्हेन्यू कोर्टाने वक्फ बोर्डातल्या अनियमिततेच्या प्रकरणात आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्लाह खान यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीय.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

एसीबीनं खान यांची 14 दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र, कोर्टानं चार दिवसांच्या कोठडीला मंजुरी दिली.

परवा, 16 सप्टेंबरला, अमानतुल्लाह खान यांना एसीबीनं अटक केली होती.

एनडीटीव्हीनं ही बातमी दिलीय.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)