कुत्रे माणसांना का चावतात? कुत्रा चावल्यावर तातडीनं काय करावं?

  • मागच्या महिन्यात केरळमधील 12 वर्षांच्या एका मुलीवर भटक्या कुत्र्याने हल्ला केला होता. या हल्ल्यात मुलीचा मृत्यू झाला.
  • दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबादमध्ये एका पिसाळलेल्या कुत्र्याने दहा वर्षीय मुलाचा चावा घेतल्याची घटना समोर आली होती.
  • याच गाझियाबादमध्ये 2 सप्टेंबरला एका पिटबुल जातीच्या कुत्र्याने 6 वर्षीय मुलीवर हल्ला चढवला होता.
  • मुंबईत एका पाळीव कुत्र्याने फूड-डिलीवरी बॉयवर हल्ला करत त्याला जखमी केलं होतं.
  • उत्तरप्रदेशच्या लखनऊ शहरात पिटबुल जातीच्या कुत्र्याने 82 वर्षीय वृद्धेवर हल्ला केला होता. यात त्या वृद्धेचा जीव गेला.
  • उत्तरप्रदेशच्या नोएडा शहरातील एसडीएम गुंजा सिंग यांच्यावर जुलै महिन्यात भटक्या कुत्र्याने हल्ला करत चावा घेतला होता.

मागच्या काही महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्यांनी लहान मुले, वृद्ध आणि प्रौढांवर हल्ला चढवल्याच्या बातम्यांमुळे लोकांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने प्रकाशित केलेल्या एका रिपोर्टनुसार, जगभरात दरवर्षी 55 हजार लोकांना रेबीजमुळे आपले प्राण गमवावे लागतात.

कुत्रे चावण्याच्या सर्वाधिक घटना आशिया आणि आफ्रिकेत घडतात.

भारतात रेबीजमुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी 30 ते 60 टक्के मृत्यू हे 15 वर्षांखालील मुलांचे असतात.

कुत्रे चावण्याचं प्रकरण आता आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचलंय. यावरून प्रकरणाचं गांभीर्य लक्षात येतं.

मागच्या महिन्यात केरळमधील 12 वर्षांच्या मुलीवर भटक्या कुत्र्याने हल्ला केला होता. या हल्ल्यात मुलीचा मृत्यू झाला. याप्रकरणी वकील असलेल्या व्ही के बिजू यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली.

या याचिकेत म्हटल्याप्रमाणे, भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट दिवसेंदिवस वाढत चाललाय. मागच्या पाच वर्षात कुत्र्यांनी लोकांवर हल्ले केल्याच्या दहा लाख केसेस समोर आल्या आहेत.

ही याचिका 5 सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आली होती. 9 सप्टेंबर रोजी या याचिकेवरील सुनावणी पार पडली

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती जे.के.माहेश्वरी यांच्या खंडपीठासमोर पार पडलेल्या सुनावणीत न्यायालयाने काही महत्वपूर्ण सूचना दिल्या.

सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय की, लोकांची सुरक्षा आणि प्राण्यांचे हक्क यांच्यात समतोल राखला पाहिजे. त्याचप्रमाणे भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर तार्किक उपाय शोधणं गरजेचं असून या प्रकरणातील पुढील सुनावणी 28 सप्टेंबर रोजी होणार आहे.

पण कुत्रे का चावतात?

प्रसिद्ध वेटनरी डॉक्टर अजय सूद यांच्या मते, "बऱ्याचदा एखाद्या भागावर वर्चस्व मिळवणं आणि सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांमुळे कुत्रे माणसांवर हल्ला करतात."

ते सांगतात, "प्रत्येक कुत्रा आपली टेरिटरी (विभाग) ठरवून घेतो. एकीकडे माणसांची लोकसंख्या वाढते आहे तर दुसरीकडे कुत्र्यांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे त्यांची टेरीटरी लहान होत चालली आहे. आपल्या टेरीटरीचं संरक्षण करण्याच्या नादात कुत्र्यांना असुरक्षित वाटू लागतं. जेव्हा एखादा माणूस त्यांच्या टेरीटरीमध्ये येतो तेव्हा ते आक्रमक होतात आणि हल्ला चढवतात."

डॉ. अजय सूद सांगतात की, "कधीकधी तर एखाद्याला घाबरवायचं म्हणून देखील कुत्रे आक्रमक होतात. त्यांच्यासाठी हा खेळ असतो. म्हणजे समजा एखादा व्यक्ती कुत्र्यांना बघून पळायला लागला तर कुत्र्यांना वाटतं की माणूस आपल्याला घाबरतोय. मग ते त्यांच्या मागे मागे पळतात, तरी कधी चावतात."

स्ट्रे-डॉग्स म्हणजेच भटक्या कुत्र्यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर, वाढणार तापमान, खाण्याच्या समस्या, ट्रॅफिकचा कर्णकर्कश आवाज, रस्त्यावर चमकणारे दिवे याचा कुत्र्यांवर परिणाम होतो आणि ते आक्रमक होतात.

पाळलेले कुत्रे चावतात, कारण..

डॉक्टर सूद सांगतात की, पाळीव कुत्र्यांना बिघडवण्यामागे त्यांना पाळणारे लोकच असतात.

ते सांगतात की, "जेव्हा कुत्र्याचं पिल्लू लहान म्हणजेच दोन-तीन महिन्यांचं असतं तेव्हा त्याला दात येत असतात. दरम्यानच्या काळात हे पिल्लू प्रत्येक गोष्ट दाताखाली घट्ट पकडत असतं. आता या पिल्लाला पाळणारे लोक त्याच्या या कृतीकडे मजा म्हणून बघतात, ते त्याला या गोष्टी करण्यापासून रोखत नाहीत. परिणामी हे पिल्लू जसजसं मोठं व्हायला लागतं तसतसं त्याला ही सवय होत जाते. त्यामुळे पिल्लू लहान असतानाच त्याला काही गोष्टी शिकवण गरजेचं असतं."

सूद पुढं आणखीनही एक कारण सांगतात.

ते सांगतात की, "बरेच लोक कुत्रा पाळण्यासाठी घरी आणतात मात्र त्याला एका कोपऱ्यात बांधून ठेवतात. अशात कुत्रा एकटा पडून त्याला असुरक्षित वाटायला लागतं. त्यामुळे तो आक्रमक होऊन चावण्याची दाट शक्यता असते."

कुत्रे आक्रमक होण्यामागे आणखीन एक कारण म्हणजे त्यांच्या खाण्यापिण्यात असणारा असमतोल.

बऱ्याचदा होतं असं की, कुत्र्यांना नेहमीपेक्षा जास्त खाऊ घातलं जातं. किंवा त्यांचा वर्कआऊट हव्या त्या प्रमाणात होत नाही. याचा परिणाम त्यांच्या शरीरात असणाऱ्या उर्जेला वाट मिळत नाही आणि ते आक्रमक होतात.

भारतीय प्राण्यांसाठी काम करणाऱ्या फ्रेंडिकोज संस्थेचे अभिषेक सिंग सांगतात की, "स्ट्रे-डॉग आणि पाळीव कुत्रे यांमध्ये सर्वाधिक धोकादायक कोण असा सरळधोट प्रश्न विचारला तर त्याच उत्तर देत येत नाही. मात्र कुत्र्यांच्या ब्रीड म्हणजेच जातीवरून ते किती धोकादायक आहेत हे नक्कीच सांगता येईल. जर हायपर ब्रीडचा कुत्रा असेल तर तो निश्चितचं आक्रमक असेल."

ते पुढे सांगतात की, "जर कुत्रा हायपरब्रीडचा असेल तर त्याचा मूड कधी बदलेल हे सांगता यायचं नाही. समजा जर तुम्ही त्याला चुकीच्या ठिकाणी स्पर्श केला किंवा मग तुमचा स्पर्श त्याला समजलाच नाही तर मात्र तो हल्ला करू शकतो."

पाळीव आणि भटक्या कुत्र्यांच्या चावण्यात काय अंतर आहे?

डॉ. सूद यांच्या सांगतात की, यात बराच मोठा फरक आहे. जेव्हा एखादा पाळीव कुत्रा चावतो तेव्हा तो माघारही लगेच घेतो.

कारण चावल्यानंतर आपण चूक केलीय असं त्यांना वाटायला लागतं. त्यामुळे चावा घेतल्यानंतर ते शक्यतो मागे सरतात. पण भटक्या कुत्र्यांची वृत्ती तशी नसते. ते एखाद्याकडे शिकार म्हणून बघतात. त्यांच्यात हल्ला करण्याची, एखाद्याचा चावा घेण्याची प्रवृत्ती जास्त असते.

पाळीव कुत्र्यांचं लसीकरणही केलेलं असतं. त्यामुळे धोका कमी असतो. तेच भटक्या कुत्र्यांचं लसीकरण झालेलं नसतं त्यामुळे ते चावल्यावर रेबीज होण्याचा धोका जास्त असतो.

पिसाळलेला कुत्रा चावल्यावर काय होतं?

पिसाळलेला कुत्रा चावल्यावर बऱ्याचदा त्याच्यावर लक्ष ठेवलं जातं. तो जिवंत असेल तर ठीक पण त्याचा मृत्यू ओढवला तर मात्र धोका असतो.

यावर डॉ. सूद सांगतात की, "एखाद्या कुत्र्याला रेबिजचा संसर्ग झाला असेल तर तो चार ते दहा दिवसांत मरतो. अशातच एखाद्या भटक्या कुत्र्याने कोण्या व्यक्तीचा चावा घेतला तर त्याला त्याच दिवशी संसर्ग झाला असावा असं मानलं जातं. त्यामुळे त्याच्यावर लक्ष ठेवलं जातं. जर कुत्र्याला रेबिजची लागण झाली असेल तर लवकरात लवकर इंजेक्शन घेणं बंधनकारक आहे."

रेबीज हा दोन प्रकारचा असतो. यातला पहिला प्रकार म्हणजे डम्ब रेबीज. या रेबिजमुळे कुत्र्याच्या शरीरातील नसा ढिल्या पडतात, तो एखाद्या कोपऱ्यात पडून राहतो. मग त्याला पॅरालिसिस होऊन तो चार दिवसात मरतो.

दुसरा प्रकार आहे फ्युरियस फॉर्म ऑफ रेबीज. यात कुत्रा मरायला दहा दिवस लागतात. यादरम्यान त्याच्या स्वभावात खूप आक्रमकपणा येतो.

डॉ. सूद सांगतात, "या प्रकारच्या रेबीजमध्ये कुत्रा आक्रमक होतो. त्याला त्याची लाळ गिळताना त्रास होतो. त्यामुळे ती लाळ टपकत राहते. त्याच्या घशातील नसा पॅरालाईज्ड होऊ लागतात. मग तो अस्वस्थ होऊन चावायला लागतो."

कुत्रा चावला तर काय कराल?

कुत्रा चावला म्हटलं की बऱ्याच जणांना रेबीजची भीती वाटायला लागते.

यावर डॉ. सूद सांगतात की, कुत्रा चावल्यावर ती जखम किमान दहा मिनिटं साबणाने धुवा. त्यानंतर जखमेवर बीटाडीन लावा.

"बऱ्याचदा पाळीव कुत्र्यांना लसीकरण केलेलं असतं त्यामुळे रेबीजचा धोका नसतो. त्यामुळे एखादी साधी जखम झालीय असं समजून उपचार करा. पण जर हेच भटका कुत्रा चावला असेल तर मात्र त्याच्यावर लक्ष ठेवा. तो मेला तर अँटी रेबीजचं इंजेक्शन घ्या."

डॉ. सूद पुढे सांगतात की, "अँटी रेबीजमध्ये पहिल्या दहा दिवसांत लक्ष ठेवावं लागतं. ज्या दिवशी कुत्रा चावला त्या दिवशी, नंतर तिसऱ्या दिवशी, सातव्या दिवशी, चौदाव्या दिवशी आणि नंतर अठ्ठावीसव्या दिवशी अशी पाच इंजेक्शन्स घ्यावी लागतात."

रेबीजच्या एका इंजेक्शनची किंमत 300-400 रुपयांच्या दरम्यान असते. याआधी इम्युनोग्लोब्युलिनचे इंजेक्शनही दिलं जातं. भारतातील सरकारी रुग्णालयांमध्ये हे इंजेक्शन्स मोफत दिले जातात.

कोणाला कुत्रा पाळायचा असेल तर त्यासाठी कोणते नियम आहेत?

प्रत्येक कुत्र्याची स्वतःची एक जीवनशैली असते.

उदाहरण म्हणून जर्मन शेफर्ड जातीचा कुत्रा घेऊ. या जातीचे कुत्रे सहसा मेंढ्याचा कळप राखण्यासाठी पाळले जातात. पण जर तुम्ही त्याला पाळलं आणि एकाच जागेवर बसवलं तर मात्र हे त्याच्यासाठी योग्य नाही.

आता पिटबुल या अजस्त्र कुत्र्याचं उदाहरण घेऊ. हे कुत्रे शक्यतो राखणदारी करण्यासाठी पाळले जातात. जर तुमच्याकडे ऐसपैस जागा असेल तर असे कुत्रे पाळायला हरकत नाही. पण जर तुमच्याकडे पुरेशी जागाच नसेल तर मग असे कुत्रे पाळणं टाळा.

जर तुम्हाला कुत्रे पाळण्याची हौस असेल तर जागा बघून कुत्र्यांची निवड करा. जसं की लहान जागेत एखादा लहान कुत्रा तुम्ही पाळू शकता.

फ्रेंडकोज संस्थेचे अभिषेक सिंग पाळीव कुत्रे पाळताना काही गोष्टी लक्षात ठेवायला सांगतात.

तुमच्या प्राण्यांचं लसीकरण करणं आवश्यक आहे.

त्याचं लसीकरण कार्ड अपडेट असायला हवं.

प्राण्यांचे रेग्युलर हेल्थ चेकअप व्हायला हवेत.

प्राण्यांचं रिलोकेशन करू नये. म्हणजे प्राण्यांना वारंवार एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवू नये.

प्राण्यासोबत कोणत्याही प्रकारचा हिंसाचार होता कामा नये.

शिवाय सोसायटीचेही काही नियम असतात, जे तुम्हाला पाळावे लागतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)