राणी एलिझाबेथ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय निगराणीखाली

फोटो स्रोत, Getty Images
राणी एलिझाबेथ यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी चिंता व्यक्त केल्यानंतर त्यांना वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे.
बकिंगहॅम पॅलेसने यासंदर्भात एक पत्रक प्रसिद्ध करुन याविषयी सर्वांना माहिती दिली आहे.
"आज (8 सप्टेंबर) सकाळी क्वीन एलिझाबेथ यांची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली. तसंच त्यांना वैद्यकीय निगराणीखाली ठेवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला."
"96 वर्षीय राणी एलिझाबेथ सध्या त्यांच्या बालमोरल कॅसल या निवासस्थानी विश्रांती घेत असून तिथंच त्यांच्यावर सर्व उपचार करण्यात येत आहेत," असंही प्रसिद्धीपत्रकामार्फत कळवण्यात आलं.
कुटुंबीय दाखल होण्यास सुरुवात
राणी एलिझाबेथ यांची प्रकृती बिघडल्याची माहिती त्यांच्या सर्व कुटुंबीयांनाही देण्यात आली आहे.
प्रिन्स चार्ल्स आणि कॅमिला हे बालमोरल या महाराणीच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. तर प्रिन्स विल्यम काही वेळात बालमोरल येथे दाखल होतील.
राणींना चार मुलं, आठ नातवंडं आणि 12 पतवंडं आहेत.
प्रिन्स चार्ल्स, द प्रिन्स ऑफ वेल्स हे राणीचे सर्वात मोठे पुत्र. त्यांच्यानंतर तेच गादीचे उत्तराधिकारी आहेत. त्यांचं लग्न डचेस ऑफ कॉर्नवॉल कॅमिला यांच्याशी झालं आहे.

फोटो स्रोत, Reuters
प्रिन्सेस अॅन, प्रिन्सेस रॉयल या राणीच्या दुसऱ्या आणि एकमेव कन्या आहेत. त्यांचं लग्न व्हाईस अॅडम टिमोथी लॉरेन्स यांच्याशी झालंय.
त्यांना आधीचे पती कॅप्टन मार्क फिलिप्स यांच्याकडून त्यांना दोन मुलंही आहेत. त्यांची नावं आहेत पीटर फिलिप्स आणि झारा टिंडल.
राणी एलिझाबेथ यांचे तिसऱ्या क्रमांकाचे पुत्र आहेत ड्यूक ऑफ यॉर्क प्रिन्स अँड्र्यू. त्यांना आपल्या माजी पत्नीकडून दोन मुली आहेत, प्रिन्सेस बिअट्रिस आणि प्रिन्सेस युजीन.
'न्यूजनाईट' या कार्यक्रमाला दिलेल्या एका वादग्रस्त मुलाखतीनंतर प्रिन्स अँड्र्यू यांनी आपली 'राजघराण्यातला व्यक्ती म्हणून जी कर्तव्य असतील' ती करणं थांबवलं.
राणी एलिझाबेथ यांचे चौथ्या क्रमांकाचे आणि सगळ्यात लहान पुत्र आहेत अर्ल ऑफ ससेक्स, प्रिन्स एडवर्ड. त्यांचं लग्न झालंय काउंटेस ऑफ वेसेक्स सोफी यांच्याशी. या दांपत्याला दोन मुलं आहेत. त्यांची नावं आहेत लुई आणि जेम्स माऊंटबॅटन-विंडसर.
ड्युक ऑफ केंब्रिज, प्रिन्स विल्यमही आज बालमोरलला आले आहेत. प्रिन्स विल्यम हे प्रिन्स चार्ल आणि त्यांच्या प्रथम पत्नी प्रिन्सेस ऑफ वेल्स प्रिन्सेस डायना यांचे जेष्ठ पुत्र आहेत.
प्रिन्स विल्यम यांचं लग्न डचेस ऑफ केंब्रिज कॅथरिन यांच्याशी झालं आहे. या दांपत्याला तीन मुलं आहेत - प्रिन्स जॉर्ज, प्रिन्सेस शार्लट आणि प्रिन्स लुई.
प्रिव्ही काऊन्सिलची बैठक रद्द
राणी एलिझाबेथ प्रकृती अस्वास्थ्यामुळे काल (बुधवार, 7 सप्टेंबर) आयोजित प्रिव्ही काऊन्सिल बैठकीत सहभागी होऊ शकल्या नाहीत.
त्यानंतर ही बैठक रद्द करून पुढे ढकलण्यात आली. प्रिव्ही काऊन्सिल ही एक औपचारिक समिती असते. संसदेतील वरीष्ठ नेते तसंच इंग्लंडच्या राणी यांना सल्ला देण्याचं काम या समितीमार्फत केलं जातं.

फोटो स्रोत, Getty Images
सदर बैठकीदरम्यान नवनिर्वाचित पंतप्रधान लिझ ट्रस यांचा सुरुवातीला लॉर्ड ऑफ ट्रेझरी म्हणून शपथविधी होणार होता. यानंतर नव्या मंत्र्यांनाही शपथ दिली जाणार होती. पण हा कार्यक्रम आता पुढे ढकलण्यात आला आहे.
राणींच्या प्रकृतीबाबत प्रसिद्धीपत्रक ही दुर्मिळ गोष्ट
"पॅलेसकडून राणी एलिझाबेथ यांच्या प्रकृतीबाबत प्रसिद्धीपत्रकामार्फत कळवण्यात आलं आहे, पण असं नेहमीच घडत नाही. त्यामुळे ही दुर्मिळ बाब आहे," असं रॉयल ऑथर रॉबर्ट हार्डमॅन यांनी सांगितलं.
बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, "काही खूपच मोठं असल्याशिवाय पॅलेस राणी एलिझाबेथ यांच्या प्रकृतीबाबत प्रसिद्धीपत्रक काढत नाही. गेल्यावेळी राणी एलिझाबेथ यांना कोरोना व्हायरसची लागण झाली होती, तेव्हा त्यांनी शेवटचं अशा प्रकारचं प्रसिद्धीपत्रक जारी केलं होतं. त्यामुळे ही दुर्मिळ बाब आहे."
लिझ ट्रस यांच्याकडून प्रार्थना
दरम्यान, नवनिर्वाचित पंतप्रधान लिझ ट्रस यांनी राणी एलिझाबेथ यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
लिझ ट्रस यांनी मंगळवारीच (6 सप्टेंबर) राणी एलिझाबेथ यांची भेट घेतली होती. ट्रस यांना बालमोराल येथेच पंतप्रधानपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. आपल्या 70 वर्षांच्या शासनकाळात राणी एलिझाबेथ नव्या पंतप्रधानांची बकिंगहॅम पॅलेस येथे भेट घेतात.
बालमोरल कॅसलबाहेर हितचिंतकांची गर्दी
राणी एलिझाबेथ यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी चिंता व्यक्त केल्यानंतर सर्वत्र त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यात येत आहे.
सदर बातमी कळताच अबर्डीनशायर येथील बालमोरल कॅसलबाहेर राणी एलिझाबेथ यांच्या हितचिंतकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे.

फोटो स्रोत, Reuters
राणी एलिझाबेथ यांचे कुटुंबीयही बालमोराल कॅसलमध्ये दाखल होत आहेत.
या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडेकोट सुरक्षा बंदोबस्त या परिसरात तैनात करण्यात आला आहे.
बालमोरल कॅसल कुठे आहे?
बारमोरल कॅल स्कॉटलंडमधल्या अबर्डीनशायरमधल्या रॉयल डीसाईड इथे आहे.
गेल्या 150 वर्षांपासून हा राजवाडा शाही निवास म्हणून वापरात आहे. या वास्तूचा वापर सगळ्यांत आधी राणी व्हिक्टोरिया आणि प्रिन्स अल्बर्ट यांनी सुटी घालवण्याची जागा म्हणून केला होता.

फोटो स्रोत, PA Media
राणी एलिझाबेथ यांचं हे आवडतं निवासस्थान आहे असं म्हटलं जातं. त्यांनी गेल्या वर्षभरात बहुतांश वेळ इथेच घालवला.
या आठवड्याच्या सुरुवातीला लिझ ट्रस राणी एलिझाबेथ यांच्याकडून यूकेच्या नव्या पंतप्रधान म्हणून नेमणूक करून घेण्यासाठी इथे आल्या होत्या.
96-वर्षीय राणी एलिझाबेथ कदाचित तातडीने लंडनला येऊ शकणार नाहीत असं वाटल्यामुळे लिझ स्वतः इथे आल्या होत्या.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








