राहुल गांधी : काँग्रेस आणि भाजप आपले राष्ट्रीय अध्यक्ष नेमके कसे निवडतात?

व्हीडिओ कॅप्शन, काँग्रेस आणि भाजपमध्ये अध्यक्षपदाची निवडणूक कशी होते? सोपी गोष्ट
    • Author, सरोज सिंह
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा कोणाकडे जाणार? या प्रश्नाचं उत्तर अखेर येत्या 19 ऑक्टोबरपर्यंत मिळेल हे आता स्पष्ट आहे. पण काँग्रेसमध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून गदारोळ सुरूय.

आतापर्यंत काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणूक प्रक्रियेवर भारतीय जनता पार्टीकडूनच प्रश्न उपस्थित केले जात होते. परंतु यावेळेस काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडूनही आवाज उठवला जात आहे.

काँग्रेस कार्यकारीणीची नुकतीच एक बैठक पार पडली आणि या बैठकीत नेते आनंद शर्मा यांनी निवडणूक प्रक्रियेसंदर्भात काही प्रश्न उपस्थित केले. त्यांच्यापाठोपाठ मनीष तिवारी यांनीही यासंदर्भात ट्वीट केलंय.

काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष निवडणूक प्रक्रियेचे प्रमुख मधुसूदन मिस्त्री यांना टॅग करत मनीष तिवारी आपल्या ट्वीटमध्ये लिहितात, "पक्षाच्या मतदारांची यादीच सार्वजनिकरित्या उपलब्ध नाही, मग निवडणूक नि:पक्ष आणि स्वतंत्र कशी होऊ शकते?"

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

नि:पक्ष निवडणुकीसाठी मतदारांची नावं आणि पत्ता काँग्रेस वेबसाईटवर पारदर्शी पद्धतीने प्रकाशित करणं गरजेचं आहे, असंही मनीष तिवारी म्हणाले आहेत.

दरम्यान, मधुसूदन मिस्त्री यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत दावा केला आहे की, ज्या सदस्यांना मतदारांची यादी हवीय त्यांना ती प्रदेश काँग्रेस कमिटीकडून मिळू शकते. तसंच अध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांनाही यादी उपलब्ध करून दिली जाईल.

काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक समजून घेण्यासाठी बीबीसीने मधुसूदन मिस्त्री यांना संपर्क साधला परंतु त्यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री
फोटो कॅप्शन, काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री

काँग्रेस पक्षाच्या घटनेत मात्र राष्ट्रीय अध्यक्षपदाची नेमणूक कशी व्हावी? त्यासाठी निवडणूक प्रक्रिया नेमकी कशी असावी? उमेदवारी अर्ज, मतदान, मतमोजणी अशा सर्व प्रक्रिया कशा पार पाडाव्यात याची माहिती देण्यात आली आहे. याचविषयी आपण जाणून घेऊया,

काँग्रेस संघटना

सुरुवातीला काँग्रेस पक्षाची बांधणी कशी आहे आणि संघटना कशी काम करते ते पाहूया,

वेगवेगळ्या समित्यांची मिळून काँग्रेस संघटना बनते.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (AICC)

काँग्रेस कार्यकारिणी समिती (CWC)

काँग्रेस

फोटो स्रोत, AFP/GETTY IMAGES

प्रदेश काँग्रेस कमिटी (PCC)

जिल्हा आणि ब्लॉक काँग्रेस कमिटी

या सर्व समित्यांच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाचं कामकाज चालतं.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे जवळपास 1500 सदस्य आहेत. हे सदस्य मिळून काँग्रेस कार्यकारिणी कमिटीत 24 सदस्यांची निवड करतात.

भारतात एकूण 30 प्रदेश काँग्रेस कमिटी आहेत तर 5 केंद्र शासित प्रदेशातही समित्या आहेत, याचे 9 हजारहून अधिक सदस्य आहेत.

अध्यक्ष निवडणुकीची जबाबदारी

काँग्रेस पक्षाच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाची स्थापना केली जाते. काँग्रेस कार्यकारिणी समिती हे प्राधिकरण ठरवते.

काँग्रेस नेते

फोटो स्रोत, ANI

सर्वप्रथम केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाच्या सदस्यांची नियुक्ती केली जाते. यात तीन ते पाच सदस्य असतात. यापैकी एका सदस्याला प्राधिकरणाचा अध्यक्ष केलं जातं.

सध्या काँग्रेस नेते मधुसूदन मिस्त्री या प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत.

निवडणूक प्राधिकरणाचे सदस्य निवडणूक पार पाडत नाहीत तोपर्यंत संघटनेत कोणतेही पद अधिकृतपणे मिळवलं जाऊ शकत नाही. या प्राधिकरणाचा कार्यकाळ तीन वर्षांचा असतो. हे प्राधिकरण वेगवेगळ्या राज्यांमध्ये निवडणूक प्राधिकरण नेमतात आणि या प्राधिकरणाच्या माध्यमातून जिल्हा आणि ब्लॉक निवडणूक अधिकाऱ्यांची नेमणूक होते.

काँग्रेसकडून अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी जाहीर झालेलं वेळापत्रक.

खरं तर अनेक वर्षांनी काँग्रेस पक्षात अध्यक्षपदासाठी निवडणुकीची घोषणा झाली आहे.

येत्या 22 सप्टेंबर रोजी निवडणुकीची अधिसूचना जारी केली जाणार आहे.

24 सप्टेंबर ते 30 सप्टेंबरपर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत असेल.

सर्व अर्जांची छाननी केल्यानंतर उमेदवारांची पहिली यादी 1 ऑक्टोबर रोजी जाहीर केली जाईल.

उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 8 ऑक्टोबर दुपारी 3 वाजेपर्यंत वेळ देण्यात आली आहे.

अध्यक्षपदासाठी मतदान 17 ऑक्टोबरला मतदान होणार असून मतमोजणी 19 ऑक्टोबरला होणार आहे.

निवडणूक प्रक्रिया कशी होते?

प्रदेश काँग्रेस कमिटीच्या 10 सदस्यांचं समर्थन असणारा कोणताही सदस्य अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी पात्र असू शकतो.

सोनिया गांधी आणि राहुल गांधी

फोटो स्रोत, Reuters

काँग्रेसच्या घटनेनुसार, अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी एक रिटर्निंग अधिकारी नियुक्त केला जातो. केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाच्या अध्यक्षांनाच रिटर्निंग अधिकारी म्हणून नेमलं जातं.

कोणत्याही प्रदेश काँग्रेस कमिटीचे 10 सदस्य मिळून अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी एखाद्या नावाचा प्रस्ताव देऊ शकतात. अशी सर्व नावं एखाद्या नियोजितवेळी रिटर्निंग अधिकाऱ्यांना दिली जातात. यापैकी कोणताही उमेदावर सात दिवसांच्या आत आपला उमेदवारी मागे घेऊ शकतो.

इतर सर्व उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतल्यास आणि अध्यक्षपादासाठी एकच उमेदवार असल्यास संबंधित उमेदवारालाच अध्यक्ष मानलं जातं. त्यामुळे यावेळी जर काँग्रेस अध्यक्षपदासाठी एकच उमेदवार अर्ज असल्यास 8 ऑक्टोबरलाच काँग्रेसच्या नवीन अध्यक्षांची घोषणा केली जाऊ शकते.

दोन किंवा त्यापेक्षा अधिक उमेदवार शर्यतीत असल्यास...

अध्यक्षपदाच्या शर्यतीत दोन किंवा त्यापेक्षा अधिक उमेदवार असल्यास रिटर्निंग अधिकारी उमेदवारांची नावं प्रदेश काँग्रेस कमिटीकडे पाठवतात.

काँग्रेस बैठक

फोटो स्रोत, ANI

मतदानादिवशी प्रदेश काँग्रेस कमिटीचे सर्व सदस्य यात सहभाग घेतात. प्रदेश काँग्रेस कमिटीच्या राज्य मुख्यालयात मतपत्रिका आणि बॅलेट बॉक्सच्या माध्यमातून निवडणूक होते.

अध्यक्षपदासाठी दोन उमेदवार असल्यास मतदारांना कोणतेही एक नाव लिहून बॅलेट बॉक्समध्ये टाकायचं असतं.

दोनपेक्षा अधिक उमेदवार असल्यास मतदारांना आपले पहिले दोन प्रेफरंस म्हणजेच प्राधान्य क्रमानुसार दोन उमेदवारांची नावं लिहायची असतात. मतदार दोनपेक्षा अधिक उमेदवारांची नावंही लिहू शकतात. पण ती प्राधान्य क्रमानुसार असायला हवीत. दोनपेक्षा कमी नावं लिहिल्यास संबंधित वोट रद्द केलं जातं.

प्रदेश काँग्रेस कमिटी मुख्यालयात जमा केलेले बॅलेट बॉक्स अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात पाठवले जातात.

मतमोजणी

अखिल भारतीय काँग्रेस कमिटी कार्यालयात रिनटर्निंग अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मतमोजणी सुरू केली जाते.

सर्वप्रथम पहिल्या प्राधान्याच्या उमेदवारांची मतमोजणी होते. ज्या उमेदवाराला 50 टक्क्यांहून अधित मतं मिळतात त्यांचं नाव अध्यक्ष म्हणून घोषित केलं जातं.

काँग्रेस

फोटो स्रोत, PTI

पहिल्या प्राधान्य क्रमात जर कोणालाही 50 टक्के मतं मिळाली नसल्यास ज्याला सर्वात कमी मतं आहेत त्या उमेदवाराचे नाव यादीतून हटवले जाते आणि एलिमिनेशनच्या माध्यमातूनच अध्यक्षपदाची निवडणूक होते.

शेवटी ज्या उमेदवारला सर्वाधिक मतं मिळतात तो काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष बनतो.

यापूर्वी झालेल्या निवडणुका

काँग्रेसच्या इतिहासात अध्यक्षपदाच्या निवडणुकीची वेळ फारशी आली नाही.

गेली अनेक दशकं काँग्रेसचे राजकारण जवळून पाहिलेले ज्येष्ठ पत्रकार रशीद किडवई सांगतात, "आतापर्यंत प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रतिनिधींची यादी सार्वजनिक करण्यात आलेली नाही. वेगवेगळ्या प्रदेश काँग्रेस कमिटी ही यादी तर नेत्यांना अशीच देणार नाहीत. समजा एखाद्या नेत्याने अध्यक्ष पदासाठी निवडणूक अर्ज दाखल केला तर त्यांना प्रदेश काँग्रेस कमिटीकडे जाऊन मतदारांची यादी घ्यावी लागेल."

सीताराम केसरी (टोपी घातलेले)

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सीताराम केसरी (टोपी घातलेले)

ते पुढे सांगतात, "2000 साली जितेंद्र प्रसाद यांनी सोनिया गांधी यांच्याविरोधात अध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज भरला होता. तेव्हा त्यांचा प्रचार सुरू असतानाच भोपाळ काँग्रेसचं कार्यलय बंद होतं. काही ठिकाणी त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. पीसीसीच्या प्रतिनिधींना फोन करून सांगितलं गेलं की त्यांना कोणाला मतदान करायचं आहे.

अशाचपद्धतीने शरद पवार आणि राजेश पायलट यांनी सीताराम केसरी यांच्याविरोधात 1997 साली निवडणूक लढवली. त्यावेळी त्यांचा प्रभाव होता त्यामुळे ते अनेक ठिकाणी प्रचार करू शकले होते. पण तरीही सीताराम केसरी जवळपास 70 टक्के मतांनी निवडणूक जिंकले."

28 ऑगस्टला निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी म्हटलं की, भारतात काँग्रेस असा एकमेव राजकीय पक्ष आहे जो पारदर्शी पद्धतीने अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करत आला आहे. आजही अशीच निवडणूक होते आणि भविष्यातही होत राहील.

भाजपमध्ये अध्यक्ष पदाची नेमणूक कशी होते?

भाजपच्या घटनेनुसार पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष तोच होऊ शकतो जो कमीत कमी 15 वर्षं पक्षाचा सदस्य असेल.

जेपी नड्डा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा

भाजपमध्ये राष्ट्रीय अध्यक्षाची नेमणूक निवडणूक समितीच्या माध्यमातून केली जाते. या समितीत राष्ट्रीय परिषदेचे सदस्य आणि प्रदेश परिषदेचे सदस्य असतात.

भाजपच्या घटनेत असंही म्हटलंय की, निवडणूक मंडळाचे कोणतेही 20 सदस्य राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवाराचे नाव संयुक्तरित्या सुचवू शकतात. परंतु हा संयुक्त प्रस्ताव राष्ट्रीय परिषदेची निवडणक पूर्ण झालेल्या कमीत कमी पाच प्रदेशांमधूनच यायला हवा.

दरम्यान, भाजप अध्यक्षपदाची निवडणूक कव्हर केलेल्या अनेक पत्रकारांचं म्हणणं आहे की, भाजपमध्ये राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक सामान्य मतप्रवाह काय आहे त्यानुसार पार पडते. यात आरएसएसची भूमिका महत्त्वाची असते. भाजपचे नेते एक नाव ठरवतात आणि त्यानंतर आरएसएसकडून त्यावर शिक्कामोर्तब केलं जातं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)