गुलाम नबी आझाद यांचा काँग्रेसला राम राम, सर्व पदांचा राजीनामा

फोटो स्रोत, Getty Images
काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. आझाद यांनी काँग्रेसचे प्राथमिक सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला आहे.
2005 ते 2008 या काळात गुलाम नबी आझाद जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री होते. त्यांनी केंद्रीय मंत्रिपदंही भूषवली. तसंच, राज्यसभेत विरोधी पक्षनेते म्हणूनही काम पाहिलं.
काँग्रेस पक्षातील सुधारणांसाठी पत्र लिहिणाऱ्या 23 नेत्यांमध्येही आझाद सहभागी होते.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
सोनिया गांधींना पाठवलेल्या पत्रात आझाद काय म्हणाले?
आपला राजीनामा देताना गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना एक पत्र पाठवलं आहे. हे पत्र तब्बल पत्र पानांचं असून त्यामध्ये आझाद यांनी काँग्रेस पक्षाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केल्याचं दिसून येतं. त्यांच्या पत्रातील ठळक मुद्दे खालीलप्रमाणे -
- जम्मू-काश्मिरमध्ये काँग्रेस पक्ष 'टॅबू' मानला असताना त्या स्थितीतही मी 1970 च्या मध्यात पक्षप्रवेश केला होता.
- माझ्या विद्यार्थी जीवनात मला महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद, सुभाषचंद्र बोल आणि इतर स्वातंत्र्यसैनिकांच्या लढ्यातून प्रेरणा मिळायची.
- संजय गांधी यांच्या आग्रहामुळे मी जम्मू काश्मीर युथ काँग्रेसचं अध्यक्षपद स्वीकारलं.
- 1977 साली हजारो युथ काँग्रेस कार्यकर्त्यांसह मी एकामागून एक तुरुंगांमध्ये कैदेत होतो.
- पुढे संजय गांधी यांच्या निधनानंतर मी युथ काँग्रेसचं अध्यक्षपद स्वीकारलं. त्या कालावधीत राजीव गांधी यांना पक्षात सक्रिय केलं.
- 1982 ते 2014 पर्यंत मी इंदिरा गांधी, राजीव गांधी, पी. व्ही. नरसिंहराव आणि डॉ. मनमोहन सिंह यांच्या मंत्रिमंडळात सेवा दिली.
- 1980 पासून काँग्रेसच्या प्रत्येक अध्यक्षासोबत जनरल सेक्रेटरी म्हणून काम करण्याची मला संधी मिळाली.
- माझ्या 35 वर्षांच्या कार्यकाळात मी प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचा प्रभारी राहिलो. त्यापैकी 90 टक्के राज्यांमध्ये काँग्रेसमध्ये विजय मिळवला, हे सांगण्यास मला आनंद वाटतो. याशिवाय, राज्यसभेत विरोधी पक्षनेता म्हणूनही मी गेली 7 वर्षे काम केलं.
- काँग्रेस पक्षात मी निःस्वार्थीपणाने दिलेली सेवा अधोरेखित करण्यासाठी यासगळ्या गोष्टी मी पुन्हा मोजून दाखवत आहे. माझं आरोग्य आणि कुटुंब यांच्याकडे दुर्लक्ष करून मी पक्षाची सेवा केली.
- तुम्ही (सोनिया गांधी) काँग्रेसच्या अध्यक्षा असताना UPA-1 आणि UPA-2 सरकारची स्थापना करण्यात तुम्ही महत्त्वाची भूमिका बजावली होती. या यशाचं प्रमुख कारण म्हणजे पक्षाध्यक्ष म्हणून तुम्ही ज्येष्ठ नेत्यांचा सल्ला ऐकून घेत होता, तसंच त्यांना आवश्यक ते अधिकारही तुम्ही दिले होते.
- पण, दरम्यान दुर्दैवाने तुम्ही जानेवारी 2013 मध्ये राहुल गांधी यांची पक्षाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती केली. त्यांनी काँग्रेस पक्षाची मूळ रचना उद्ध्वस्त करून टाकली.
- सगळी जुनी आणि अनुभवी नेतेमंडळी राहुल गांधींनी बाजूला केली. केवळ खुशमस्करी करणाऱ्या अननुभवी नेत्यांची नवी चौकडी पक्षाचं काम पाहू लागली.
- त्यांच्या बालिशपणाचं एक ठळक उदाहरण म्हणजे राहुल गांधींनी सरकारचा अध्यादेश माध्यमांसमोरच फाडून टाकणं.
- संबंधित अध्यादेश काँग्रेसच्या कोअर ग्रुपने तयार केलेला होता. राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय मंत्रिमंडळ यांची त्याला मंजुरी मिळालेली होती. पण या बालिश वागणुकीने पंतप्रधानांचा अपमान झाला. याच कृत्याचा फटका 2014 च्या निवडणुकीतही पक्षाला बसला.
- 2013 मध्ये पक्षाला नवसंजीवनी प्राप्त करून देण्यासाठी मी काही प्रस्ताव तुम्हाला दिले होते. पण हे प्रस्ताव गेल्या 9 वर्षांपासून पक्षाच्या स्टोअररूममध्ये पडून आहेत.
- तुमच्या नेतृत्वाखाली 2014 पासून काँग्रेस पक्षाला दोन लोकसभा निवडणुकांमध्ये अपमानजनक पराभवांचा सामना करावा लागलेला आहे. त्याशिवाय 49 पैकी 39 विधानसभा निवडणुकीत पक्षाला पराभव मिळाला. पक्षाने चार राज्यांमधये विजय मिळवला. तर सहा राज्यांमध्ये आघाडी रून सत्तेत आली.
- 2019 पासून तर पक्षाची स्थिती आणखी बिकट बनली आहे.आज, केवळ दोन राज्यांमध्ये पक्ष सत्तेवर आहे. इतर दोन राज्यांत सत्तेत सहभागी आहे.
- रिमोट कंट्रोल मॉडेलमुळेच UPA सरकार गेलं. आता हेच मॉडेल काँग्रेस पक्षाचं नुकसान करत आहे. सध्या तुम्ही नामधारी अध्यक्ष असून सगळे निर्णय राहुल गांधी किंवा त्यांचे सुरक्षारक्षक अथवा पी. ए. यांच्याकडून घेतले जात आहेत.
- ऑगस्ट 2020 मध्ये मी आणि 22 ज्येष्ठ सहकाऱ्यांनी, ज्यामध्ये माजी केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्र्यांचा समावेश होता, त्यांनी मिळून पक्षातील 'कटोरी' पद्धतीबद्दल म्हणणं मांडलं होतं. पण तेव्हापासून आम्हाला अतिशय वाईट पद्धतीने त्रास देण्यात आला. याच लोकांनी कपिल सिब्बल यांच्या घरावरही हल्ला केला होता. पक्षातील चुकीच्या गोष्टी निदर्शनास आणून देणं हाच एकमेव गुन्हा या 23 ज्येष्ठ नेत्यांचा आहे.
- आपण आपली राष्ट्रीय राजकारणातील जागा भाजपला देऊन टाकली आहे. तर प्रादेशिक राजकारणात ती जागा आपण प्रादेशिक पक्षांना दिली आहे. गेल्या 8 वर्षात पक्षनेतृत्वाचं पक्षसंघटनेकडे लक्ष नसल्यामुळे ही स्थिती ओढावली आहे.
यापूर्वी गुलाम नबी आझाद यांनी पक्षातील सुधारणांवर स्पष्ट आणि जाहीर भाष्य केलं होतं. त्यासंबंधी बातमी खालीलप्रमाणे :
'काँग्रेस जोपर्यंत पदाधिकारी नेमत राहील, ते तळागाळात जाणार नाहीत'
रविवारी 22 नोव्हेंबर रोजी एएनआयशी बोलताना गुलाम नबी आझाद म्हणाले होते, "पक्षश्रेष्ठींना पत्र लिहिणारे नेते एका मेकॅनिकप्रमाणे होते. ते सांगू पाहत होते की, गाडीत दुरुस्तीची गरज आहे, गंज लागलेल्या भागाला दुरुस्त केलं जावं. काँग्रेसअंतर्गत कमकुवत होत चाललेल्या विचारधारेला जागृत करण्यासाठी ते पत्र होतं."
ते म्हणाले, "या विशाल आणि विविधतेनं नटलेल्या देशात गांधी, नेहरू, सरदार पटेल आणि मौलाना आझाद यांची विचारधारा म्हणजेच काँग्रेसची विचारधाराच एकता राखू शकते. काँग्रेस धर्म, जात आणि वर्गाच्या आधारे भेदभाव करत नाही. आमच्यासाठी सर्वजण एकसारखेच आहेत."
त्या पत्राबाबत आझाद यांना विचारले असता ते म्हणाले, पत्र लिहिणाऱ्या नेत्यांनी पक्षाला पूर्णवेळ नेतृत्त्वाची मागणी केली होती. त्याचसोबत, काँग्रेस कार्यसमितीच्या निवडणुकीचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला होता.
बिहार निवडणूक आणि 11 राज्यांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसनं वाईट कामगिरी केली. त्यानंतर अनेक दिग्गज नेत्यांनी पक्षाला घरचा आहेर देत काही ठोस पावलं उचलण्याची मागणी केली.

फोटो स्रोत, Hindustan Times
गुलाम नबी आझाद म्हणाले, "आम्ही हे सांगू पाहतोय की, मशीनचा जो भाग विचारधारा चालवत आहे, त्याला गंज लागलीय किंवा कमकुवत झालाय. जिथं गंज लागलीय, ते बदलण्याची गरज आहे किंवा मजबूत करण्याची गरज आहे."
"त्यामुळे आम्ही एका मेकॅनिकप्रमाणे काम करत आहोत. आम्ही गंज लागल्याचं सांगतोय, जेणेकरून गाडीतील वाईट गोष्टी दूर होतील. आम्ही चालकाला गाडी सोडून देण्याची किंवा दुसऱ्याकडे गाडी सोपवण्याची मागणी नाही करत," असं आझाद म्हणाले.
आझाद विरूद्ध अधीर
लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी एबीपी न्यूजशी बोलताना पक्षाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या नेत्यांबाबत नाराजी व्यक्त केली. इतकंच नव्हे, तर अशा नेत्यांनी पक्षा सोडून जावं, असंही ते म्हणाले.
अधीर रंजन चौधरी म्हणाले, "नाराजी तर दाखवावीच लागेल, आम्ही काय करायचं मग, बसून-बसून या नेत्यांचं ज्ञान ऐकत बसायचं का? आम्ही पश्चिम बंगालच्या मैदानात उतरलोय, आम्हाला कार्यकर्ते विचारतात की, आम्ही इथे लढतोय खरं, पण ज्या नेत्यांना काँग्रेसनं कायम संधी दिल्या, ते नेतेच काँग्रेस, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना विरोध करत असतील, तर आम्ही लोकांना काय सांगायचं?"
"मी त्या नेत्यांना एवढाच सल्ला देईन की, ज्ञान देणं बंद करा, किंवा काहीतरी करून दाखवा, नाहीतर गप्प बसा," असा थेट हल्लाच अधीर रंजन चौधरी यांनी केलाय.

फोटो स्रोत, ANI
पक्षावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या नेत्यांनी पक्षापासून वेगळं झालं पाहिजे, असंही ते म्हणाले.
अधीर रंजन चौधरी म्हणतात, "प्रत्येक गोष्टीत काँग्रेसवर टीका करण्याची यांची सवय बनत जातेय. जर त्यांना हेच राजकारण वाटत असेल, तर त्यांना काँग्रेस चांगली वाटत नाहीय आणि असं असेल तर ते बाजूला जाऊन वेगळा पक्ष काढू शकतात."
बिहार विधानसभा निवडणुकीनंतर पक्षांतर्गत टीका-प्रतिटीका
बिहार विधानसभा निवडणुकीत 70 जागांवर लढलेल्या काँग्रेसला केवळ 19 जागा जिंकता आल्या. या मुद्द्यावरून गुलाम नबी आझाद म्हणाले, निवडणूक फाईव्ह स्टार कल्चरने नाही लढल्या जात आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची निवड सुद्धा निवडणुकीच्या माध्यातून व्हायला हवी.
गुलाम नबी आझाद यांनी पक्षाच्या नेतृत्त्वाला क्लीनचिट दिलीय की, कोरोनाच्या काळात वरिष्ठ नेतृत्त्व संघटनेत निवडणुका करू शकत नाही. यावेळी आझाद यांनी असेही संकेत दिलेत की, कोरोना कमी झाल्यानंतर पुढच्या सहा महिन्यात पक्ष संघटनेत निवडणुका घेतल्या जाऊ शकतात.
आझाद म्हणाले, "फाईव्ह-स्टारने निवडणुका लढल्या जात नाहीत. आमच्या नेत्यांची अडचण अशी आहे की, जर तिकीट मिळालं तर फाईव्ह-स्टार ह़ॉटेल बुक करतात. एअर कंडीशन गाडीविना जात नाहीत. खराब रस्ते असता तिथं जात नाहीत. ही संस्कृती जोपर्यंत बदलत नाही, तोपर्यंत आम्ही निवडणुका जिंकू शकत नाही."

फोटो स्रोत, Getty Images
आझाद पुढे म्हणाले, "पक्षाला झालेल्या नुकसानामुळे आम्हाला चिंता आहे. विशेषत: बिहार विधानसभा निवडणूक आणि पोटनिवडणुकांमध्ये झालेला पराभव. मी यासाठी राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना दोष देत नाही. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी समजलं पाहिजे की, त्यांच्या नियुक्तीसोबतच त्यांच्यावरील जबाबदारी सुरू होते. त्यांनी पक्षावर प्रेम केलं पाहिजे. मला एक शेर आठवतोय : ये इश्क नहीं आसान, बस इतना समझ लीजिए, इक आग का दरिया है और डूब के जाना है."
"पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी समजली पाहिजे. जोपर्यंत पक्ष पदाधिकारी नेमत राहील, ते तळागाळात जाणार नाहीत. या पक्षात कुणी अध्यक्ष नाहीय, ही भावना लोकांमध्ये आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी दोघांनीही हे सांगितलं होतं की, ऑक्टोबरमध्ये संघटनेच्या निवडणुका व्हायला हव्यात. मात्र, आम्ही कोरोनामुळे त्या सहा महिने पुढे ढकलायला सांगितल्या. अनेक पदं रिकामी आहेत. बिहारमध्येही होती. अशावेळी आम्ही निवडणुका कशा जिंकू?" असं गुलाम नबी आझाद म्हणाले.
"जिल्हा पातळीवरील, ब्लॉक स्तरावरील लोकांशी आमचा संबंध तुटला आहे. जेव्हा आमच्या पक्षात एखादा पदाधिकारी होतो, तेव्हा तो लेटरपॅड प्रिंट करतो, व्हिजिटिंग कार्ड बनवतो, त्याला वाटते की माझे काम संपले आहे. खरंतर त्या वेळेपासून काम सुरू झाले पाहिजे."
"आमची संघटना कमकुवत आहे. आधी आम्हाला संघटना नीट बांधावी लागेल. मग तिथे कुणीही नेता चालेल. केवळ नेता बदलून पक्ष बदलेल आणि बिहार, मध्य प्रदेश किंवा उत्तर प्रदेश जिंकू असं वाटत असेल, तर नाही, ते व्यवस्थेने बदलेल."
सिब्बल आणि चिदंबरम यांचे प्रश्न
गुलाम नबी आझाद यांना कपिल सिब्बल आणि चिदंबरम यांच्याविषयी विचारलं असता ते म्हणाले, "पी. चिदंबरम आणि कपिल सिब्बल यांनी पक्षाच्या आत्मचिंतनासंदर्भात जे काही म्हटलं आहे ते चुकीचं नाही, मात्र त्याचा अर्थ अव्वल नेतृत्वात बदल करणे असा होत नाही. सिब्बल आणि चिदंबरम यांनी काहीही चुकीचं म्हटलेलं नाही.
आत्मपरीक्षणाचा अर्थ ते सोनिया गांधी यांच्या विरोधात आहे असा होत नाही. याचा अर्थ राहुल गांधींच्या विरोधात आहेत असाही नाही. आत्मपरीक्षणाचा अर्थ असा की बिहारच्या निवडणुकीत पराभव का झाला याची कारणमीमांसा करणं. मध्य प्रदेशातही काहीच जागा का जिंकू शकलो? यावर विचार व्हायला हवा

फोटो स्रोत, Getty Images
या मुद्यांवर चर्चा तसंच वादविवादानंतर जे निष्कर्ष हाती येतील, ते कशा पद्धतीने लागू केले जाणार हेही निश्चित व्हायला हवं".
कपिल सिब्बल यांनी गेल्या आठवड्यात 'इंडियन एक्स्प्रेस'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं की केवळ बिहार राज्यात नव्हे तर देशात ज्या ज्या ठिकाणी पोटनिवडणुका झाल्या तिथे तिथे काँग्रेसला पर्याय म्हणून लोकांनी नाकारलं आहे.
काँग्रेस पक्षात फूट
बिहार निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या साधारण कामगिरीनंतर काँग्रेस पक्षात धुसफूस सुरू झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
काही दिवसांपूर्वी कपिल सिब्बल यांनी जाहीरपणे काँग्रेस नेतृत्वावर टीका केली होती. या टीकेला राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आक्षेप घेतला होता.
सिब्बल म्हणाले की, "बिहार निवडणुकांमधील सर्वसाधारण कामगिरीसंदर्भात काँग्रेस नेतृत्वाने अद्याप काहीही भाष्य केलेलं नाही. त्यांना असं वाटतं आहे की जे काही सुरू आहे ते योग्य आहे.

फोटो स्रोत, Getty Images
पक्ष कमकुवत झाला आहे हे काँग्रेस नेतृत्वाने मान्य करायला हवं. पक्षाला संजीवनी देण्यासाठी राजकारणाची चोख समज असणाऱ्या खंबीर आणि अनुभवी माणसांची आवश्यकता आहे".
कपिल सिब्बल यांच्या मुलाखतीनंतर अशोक गेहलोत यांनी अनेक ट्वीट केलं होतं.
त्यांनी लिहिलं की, "सिब्बलजी पक्षांतर्गत गोष्टींची प्रसारमाध्यमांमध्ये चर्चा करण्याची काहीच आवश्यकता नव्हती. यामुळे देशभरातल्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहेत. 1969, 1977, 1989, 1996 या वर्षांमध्येही काँग्रेसने आव्हानांचा सामना केला आहे. मात्र प्रत्येकवेळी काँग्रेस पक्ष विचारधारा, धोरण, नीतीनियम, नेतृत्वावर विश्वास यांच्या बळावर नव्याने उभा राहिला आहे. या संकटाने आम्ही डगमगून न जाता आणखी कणखरपणे उभे राहू. सोनिया गांधीच्या नेतृत्वात 2004 मध्ये यूपीएचं सरकार देशात आलं होतं. आता जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यातूनही काँग्रेस पक्ष अधिक सक्षम होऊन बाहेर पडेल.
निवडणुकीत पराभव होण्याची अनेक कारणं असतात. मात्र प्रत्येकवेळी कार्यकर्ते तसंच पदाधिकाऱ्यांनी नेतृत्वावर विश्वास ठेवला आहे. त्यामुळेच या संकटाचा आम्ही कसोशीने मुकाबला करू आणि निग्रहाने बाहेर पडू", असं गेहलोत यांनी सांगितलं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








