You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'शाहरुखने अंकिताला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं, ती तडफडून गेली, त्याचाही अंत असाच व्हावा'
- Author, रवि प्रकाश
- Role, रांचीहून, बीबीसी हिंदीसाठी
"तो (शाहरुख) गेले काही दिवस माझ्या मुलीला त्रास देत होता. दहा बारा दिवसांपूर्वी त्याने अंकिताचा नंबर एका मैत्रिणीकडून घेतला. फोन करून तो तिला त्रास देऊ लागला. अंकिताने मला ही गोष्ट सांगितली. मी सुरुवातीला दुर्लक्ष केलं. पण 22 ऑगस्टच्या संध्याकाळी त्याने अंकिताला फोन करून सांगितलं की जर ती त्याला भेटली नाही तर जीवे मारेन."
एकतर्फी प्रेमाची बळी ठरलेल्या अंकिताच्या वडिलांचे हे शब्द आहेत.
ते पुढे सांगतात, "अंकिताने हे सगळं मला सांगितलं. तोपर्यंत रात्र झाली होती. मी विचार केला सकाळी शाहरुख आणि त्याच्या घरच्यांशी या विषयावर बोलावं.
यादरम्यान 23 ऑगस्टच्या सकाळी त्याने खिडकीशेजारी झोपलेल्या माझ्या मुलीवर पेट्रोल ओतलं. नंतर काडेपेटीने आग लावली. या सगळ्यात अंकिता होरपळून गेली. आम्ही तिचा जीव वाचवू शकलो नाही. माझी निरपराध मुलगी गेली. आम्ही फक्त रडतोय".
या भावना आहेत झारखंडमधल्या दुमका शहरातील जरुवाडीह मोहल्ल्यातील संजीव सिंह यांच्या. अंकिता उर्फ छोटीचे ते बाबा.
याच मोहल्ल्यात राहणाऱ्या शाहरुख हुसैन नावाच्या तरुणाने एकतर्फी प्रेमातून अंकिताला जाळलं.
सुरुवातीला दुमका आणि नंतर रांचीतल्या रुग्णालयात अंकिताचा जीवनासाठी संघर्ष सुरू होता.
27 आणि 28 ऑगस्टच्या दरम्यान रांचीतल्या राजेंद्र आयुर्विज्ञान संस्थान (एम्स) याठिकाणी अंकिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 29 ऑगस्टला सकाळी पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात अंकिताच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
झारखंड पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून शाहरुख आणि त्याच्या एका साथीदाराला अटक केली आहे.
दुमकाचे एसपी अंबर लकडा यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "या घटनेनंतर आम्ही तातडीने शाहरुख हुसैनला अटक केली आहे. सुरुवातीच्या चौकशीनंतर त्याचा एक साथीदार छोटू खानलाही अटक करण्यात आली आहे. हे एकतर्फी प्रेमाचं प्रकरण आहे.
मुलगा आणि मुलगी वेगवेगळ्या धर्माचे होते. त्यामुळे पोलीस प्रशासन काळजीपूर्वक याप्रकरणाचा तपास करत आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे. पोलीस याप्रकरणी कोणालाही वाचवणार नाहीत. पीडितेच्या घरच्यांना न्याय मिळवून द्यायला आम्ही कटिबद्ध आहोत.
अंकिताला जाळून मारल्याप्रकरणी भारतीय दंड संहितेतील कलम 320, 307, 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हत्येचं कलम 302ही जोडलं जावं असं आम्ही न्यायालयाला सांगणार आहोत."
मृत्यूआधी अंकिताचा जवाब
मृत्यूआधी अंकिता 23 ऑगस्टच्या सकाळी दुमकाच्या फूलो झानो मेडिकल कॉलेजमध्ये स्थानिक प्रसारमाध्यम आणि प्रशासाचे अधिकारी (एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट) यांच्याशी बोलली होती.
अंकिताचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांना रांचीतल्या एम्स रुग्णालयात पाठवण्यात आलं.
या व्हीडिओत अंकिता सांगते, "त्याचं नाव शाहरुख आहे. गेले 10-15 दिवस तो मला त्रास देतो आहे. शाळेत जाता येताना त्रास द्यायचा. त्याने माझा नंबर कोणाकडून तरी घेतला. म्हणायचा की बोलली नाहीस तर असं करीन.
बोलली नाहीस तर तुला मारेन. सगळ्यांना मारेन. तो अनेक मुलींशी बोलत असे. त्यांना फिरायला घेऊन जात असे. त्याने रात्री साडेआठला फोन करून धमकी दिली होती. मी बाबांना सांगितलं. पहाटे चार वाजता येऊन पेट्रोल टाकून, आग लावून पळून गेला."
प्रशासनाकडून कार्यवाही
अंकिताला जाळून मारल्यानंतर काही तासातच दुमकाचे उपायुक्त (डीसी) रवीशंकर शुक्ल यांनी तिचे आजोबा अनिल सिंह यांना एक लाख रुपयांचा धनादेश दिला. आम्ही अंकिताच्या कुटुंबीयांबरोबर आहोत असं त्यांनी सांगितलं.
एम्समध्ये अंकितावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी बीबीसीला सांगितलं की अंकिता 45 टक्के जळली होती. तिचा चेहरा व्यवस्थित होता. पण शरीर भीषण पद्धतीने जळलं होतं. तिला वाचवता आलं नाही.
अंकिताचे वडील संजीव सिंह यांनी याला दुजोरा दिला.
त्यांनी सांगितलं, "भाजपच्या लोकांनी उपचारादरम्यान खूप मदत केली. रुग्णालयात कशाची उणीव जाणवली नाही. आम्ही महिन्याला 10,000 रुपये कमावतो. आमचं मोठं कुटुंब आहे. मदत मिळाली नसती तर अंकितावर उपचार झाले नसते.
एम्सचे डॉक्टर अंकितला सर्वोत्तम उपचार मिळतील याची काळजी घेत होते. खाणंपिणं वेळेवर मिळत होतं. पण माझी मुलगी वाचली नाही. त्यामुळे माझी मागणी आहे की शाहरुखला फाशी देण्यात यावी. तरच अंकिताच्या आत्म्याला शांती मिळेल. ती तडफडून गेली आहे. तिचा जीव घेणाऱ्याचाही असाच अंत व्हायला हवा."
सरकार नुकसानभरपाई देणार
दुमकाचे आमदार आणि मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे भाऊ बसंत सोरेन यांनी बीबीसीला सांगितलं की, "ते याप्रकरणातील घडामोडींकडे लक्ष ठेवून आहेत. जसं आम्हाला या घटनेविषयी कळलं तसं आम्ही अंकिताच्या कुटुंबीयांना भेटून एक लाख रुपयांचा धनादेश दिला. अंकिताच्या उपचारांमध्ये कोणतीही कसर राहू नये यासाठी काळजी घेतली. डॉक्टरांकडून सातत्याने तिच्या प्रकृतीविषयी माहिती घेत होतो. पण तिचा मृत्यू झाला. याचं आम्हाला दु:ख आहे."
"मी तिथल्या डीसी आणि एसपींशी बोललो आहे. या घटनेची सुनावणी फास्ट ट्रॅक न्यायालयात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही अतिशय दुर्देवी घटना आहे. या घटनेची पुनरावृत्ती व्हायला नको आणि दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी याची आमचं सरकार काळजी घेईल.
याप्रकरणावरून राजकारण व्हायला नको. मी केलेल्या विनंतीनंतर सरकारने अंकिताच्या कुटंबीयांना 10 लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. एक दोन दिवसातच त्यांना ही मदत देण्यात येईल", असं बसंत सोरेन यांनी सांगितलं.
मृत्यूवरून राजकारण
मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचं विधानसभा सदस्यत्व रद्द होण्याच्या शक्यतेवरून झारखंडमध्ये राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. त्यातच अंकिता प्रकरणामुळे भाजपला एक मुद्दा मिळाला आहे.
भाजपचे आमदार आणि माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी यांनी सोमवारी दुमका इथे जाऊन अंकिताच्या घरच्यांची भेट घेतली. त्यांचे प्रवक्ते पिंटू अग्रवाल यांनी प्रसारमाध्यमांना यासंदर्भात माहिती दिली.
बाबूलाल मरांडी यांनी ट्वीट करून सांगितलं की, "ज्या रुग्णालयाच्या अवस्थेवरून न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत आणि हे रुग्णालय बंद का करण्यात येत नाही असा सवाल विचारला होता. तिथे पॅरासिटामोल आणि सीरिंजही मिळेल की नाही सांगता येत नाही. तिथे आगीत होरपळून गेलेल्या मुलीवर सर्वोत्तम उपचार कसे होणार? आरोग्य मंत्री निर्लज्जपणे सांगतात की उपचारांमध्ये कोणताही कमी राहणार नाही".
दुमकाच्या डीएसपींवर त्यांनी आदिवासीविरोधी असल्याचा आरोप केला. याप्रकरणापासून त्यांना दूर ठेवावं अशी मागणी केली आहे.
भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री रघुबर दास यांनी अंकिताच्या घरच्यांना एक कोटी रुपयांची मदत देण्याचं आवाहन केलं आहे.
अंकिताच्या घरच्यांनी त्यांना घरी येऊन भेटण्याची विनंती केली होती, मात्र त्यांची तब्येत बरी नाही. ते 2-3 दिवसात दुमका इथे अंकिताच्या घरच्यांची भेट घेतील. भाजपच्या एका कार्यकर्त्याने रघुबर दास आणि अंकिताचे अजोबा अनिल सिंह यांचं बोलणं करून दिलं होतं.
मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचं वक्तव्य
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी अंकिताच्या कुटुंबीयांना 10 लाखांच्या नुकसानभरपाईची घोषणा केली आहे.
"अंकिताला भावपूर्ण श्रद्धांजली. अंकिताच्या घरच्यांना 10 लाखांची मदत देण्यात यावी तसंच हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्यात यावं. याप्रकरणी पोलीस महासंचालकांना तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत", असं सोरेन यांनी सांगितलं.
"अशा लोकांना कठोर शिक्षा मिळायला हवी. अशा प्रकारचे गुन्हे घडू नयेत यासाठी कठोर कायदे असायला हवेत. समाजात वाईट प्रवृत्ती वाढल्या आहेत. आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याला लवकरात लवकर शिक्षा व्हावी असा आमचा प्रयत्न असेल. ही घटना मन पिळवटून टाकणारी आहे," असं ते म्हणाले.
दुमका इथे जमावबंदीचा आदेश लागू
राज्यपाल रमेश बैस यांनी मुख्य सचिव आणि डीजीपी यांना याप्रकरणी लक्ष घालण्याचे आदेश दिले आहेत.
दुमका इथे रविवारनंतर बहुतांश दुकानं बंद आहेत. भाजप, बजरंग दल आणि हिंदुत्ववादी संघटनांनी रविवारी मोर्चा काढून दुकानं बंद करवली.
आरोपी शाहरुख हुसैन याला फाशी व्हावी असं आंदोलन करणाऱ्यांचं म्हणणं आहे. सोशल मीडियावर जस्टीस फॉर अंकिता ही मोहीम चालवण्यात येत आहे.
स्थानिक पत्रकरांच्या मते काही लोक याप्रकरणाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलिसांनी सावधानतेने कार्यवाही करत परिस्थिती नियंत्रणात राखली आहे. दुमका इथे जमावबंदी लागू करण्यात आली आहे. पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोक एकत्र येऊ शकत नाही.
कोण होती अंकिता आणि शाहरुख?
अंकिता कुमारी सिंह आणि शाहरुख हुसैन हे दोघेही कनिष्ठ मध्यववर्गीय आहेत. अंकिताचे वडील संजीव सिंह एका किराण्याच्या दुकानात काम करतात. त्यांची पत्नी आणि अंकिताची आई यांचं दीड वर्षांपूर्वी निधन झालं.
तीन भावाबहिणींमध्ये अंकिता दुसऱ्या नंबरची. दहावीची परीक्षा अंकिता प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली. अंकिता, वडील-आजीआजोबा-छोटा भाऊ यांच्यासह राहत असे. तिच्या मोठ्या बहिणीचं लग्न झालं आहे.
अंकिताला मारल्याचा आरोप असणारा शाहरुख याच भागात राहतो. त्याचं मातीचं एक छोटेसं घर आहे. त्याचे वडील पेंटर होते. त्यांचं निधन झालं आहे.
रंगाची कामं मिळवून ते उदरनिर्वाह करत असत. शाहरुखच्या घरचे यावर काहीही बोललेले नाहीत. शाहरुखच्या घरचे दुमका जिल्ह्यातल्या शिकारीपाडा प्रखंडचे आहेत. पण गेल्या काही वर्षांपासून ते दुमका इथे कच्या घरात राहत आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)