संभल : 'सामूहिक बलात्कार करून पळून गेले, आता मुलीची हत्याही केली'

"त्यांनी माझ्या मुलीवर गँगरेप केला. न्याय मिळावा म्हणून मी आणि माझ्या मुलीने लहान-मोठ्या सर्व अधिकाऱ्यांच्या पायऱ्या झिजवल्या. एवढंच काय तर मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दाद मागितली पण काहीच झालं नाही.

"शेवटी त्या नराधमांनी 24 ऑगस्टला माझ्या मुलीची हत्या केली. त्या अपराध्यांना वेळीच पकडलं असतं तर आज माझी मुलगी जिवंत असती. ज्या पद्धतीने या नराधमांनी माझी मुलीला फासावर लटकवून मारलं अगदी तसंच सरकारनेही त्यांना फाशी द्यावी अशी माझी इच्छा आहे."

उत्तर प्रदेशच्या संभळ जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी असणाऱ्या चंदौसी पोलीस स्टेशनमध्ये रीना देवी यांची भेट झाली. त्या कुढ फतेहगढच्या रहिवासी आहेत. आपल्या मुलीबरोबर घडलेल्या घटनेविषयी सांगताना त्यांचा चेहरा कधी रागाने लालबुंद व्हायचा तर तिच्या आठवणीनं चेहऱ्यावर दुःख यायचं.

24 ऑगस्ट रोजी रीना देवींच्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला होता.

रीना देवींनी पोलिसांत केलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या आठवी इयत्तेत शिकणाऱ्या 16 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्यात आला होता. त्यांच्या शेजारी राहणाऱ्या तीन सख्ख्या भावांनी आणि त्यांच्या एका नातेवाईकाने तिच्यावर 12 जुलैच्या रात्री सामूहिक बलात्कार केला.

यानंतर 15 जुलै रोजी सोवेंद्र या एकाच आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

त्यानंतर हे प्रकरण न्यायदंडाधिकार्‍यांसमोर गेलं. तिथे झालेल्या जबाबानंतर 25 ऑगस्ट रोजी वीरेश गुर्जर, विपिन गुर्जर आणि जिनेश गुर्जर या उर्वरित तिघाजणांनाही सहआरोपी करण्यात आलं.

या प्रकरणातील आरोपींना वेळीच अटक केली नाही म्हणून निष्काळजीपणाचा ठपका ठेवत संबंधित पोलीस स्टेशनच्या इंचार्जला सस्पेंड करण्यात आलं आहे.

यावर पोलिस उपमहानिरीक्षक शलभ माथूर म्हणाले, "या प्रकरणात निष्काळजीपणा केलेल्या तपासकर्त्याला तसेच स्टेशन इंचार्जला सस्पेंड करण्यात आलं आहे. तसेच पीडित कुटुंबाच्या सुरक्षेसाठी गावात पोलीस तैनात करण्यात आले आहेत."

संभल जिल्ह्यात चांदौसी तालुक्यात फतेहगढ नावाचं गाव आहे. रीना देवी याच गावच्या रहिवासी आहेत. 24 ऑगस्टला त्यांच्या घरातून मोठ्याने रडण्याचा आवाज ऐकू आला. या आवाजाने सगळा गाव रीना देवींच्या घराबाहेर जमा झाला.

एका खोलीत रीना देवी यांच्या 16 वर्षीय मुलीचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत होता.

रीना देवी बीबीसीशी बोलताना म्हणाल्या की, "मी गावातच असलेल्या सरकारी शाळेत स्वयंपाक्याचं काम करते. त्या दिवशी मी कामावरून परतल्यावर बघते तर घराच्या मागच्या खोलीत माझ्या मुलीचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत होता."

आपल्या मुलीला अशा अवस्थेत पाहून रीना देवी बेशुद्ध पडल्या.

त्यांचा मोठा मुलगा तरुण पुढे सांगू लागला की, "मी चांदौसीत मजुरीचं काम करतो. मला हे समजल्यावर मी तात्काळ घर गाठलं. घरासमोर गावकरी जमले होते. पोलिसही आले होते, ते माझ्या बहिणीचा मृतदेह उतरवून घेत होते. पुढे त्यांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला."

आपल्या मुलीच्या मृत्यूसाठी रीना देवी यांनी त्यांच्याच शेजारी राहणाऱ्या तीन मुलांना जबाबदार धरलं आहे.

रीना देवी सांगतात की, "12 जुलैच्या रात्री माझ्या दोन्ही मुली घरात झोपल्या होत्या. उकाडा असल्यामुळे मी आणि माझा धाकटा मुलगा रतन घराबाहेरच्या पारावर झोपलो होतो. तर माझी मोठी मुलं तरुण आणि अरुण घरासमोर असलेल्या झोपड्यात झोपले होते.

माझी धाकटी मुलगी उठून बाहेर आली आणि म्हणाली की मोठी बहीण तिच्या शेजारी नाहीये. आम्ही सगळीकडे शोधाशोध केली पण ती कुठेचं सापडली नाही. शेवटी ती आम्हाला घराच्या गच्चीवर सापडली."

"तेव्हा तर तिने आम्हाला काहीच सांगितलं नाही. पण नंतर तिने सांगितलं की, आमच्या घराशेजारी राहणाऱ्या सतपालच्या तीन मुलांनी वीरेश, जिनेश आणि विपिन यांनी आणि त्यांच्याच घरात राहणाऱ्या सोवेंद्रने जंगलात नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला."

रीना देवींनी पुढे सांगितलं की, "आम्ही 14 जुलैला पोलिसांत तक्रार दाखल केली. पण पोलिसांनी फक्त सोवेंद्रचीचं तक्रार लिहून घेतली. जेव्हा दंडाधिकार्‍यांसमोर माझ्या मुलीचा जबाब नोंदवण्यात आला तेव्हा या तिघाभावांची नावं सुद्धा आरोपी म्हणून लिहून घेतली. मात्र यांच्यातल्या कोणालाच अटक करण्यात आली नाही."

पोलिसांचं काय म्हणणं आहे?

या संपूर्ण प्रकरणात स्टेशन इंचार्जला निलंबित केल्याची माहिती मुरादाबादचे डीआयजी शलभ माथूर यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

या प्रकरणासंबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी बीबीसीने पोलिस अधीक्षक चक्रेश मिश्रा यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, "हे बघा, डीआयजींनी यावर आधीच एक बाईट दिली आहे."

या संपूर्ण प्रकरणात पोलिसांवर जे प्रश्न उपस्थित होत आहेत त्यावर मिश्रा म्हणाले की, "घटनेनंतर लगेचच म्हणजेच 15 जुलै रोजी आरोपींवर बलात्काराव्यतिरिक्त पॉक्सो कायद्यासह इतर अनेक कलमांखाली गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. कुटुंबीयांनी सांगितल्यानुसारच तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हाही आरोपींवर नोंदवण्यात आला आहे."

मिश्रा पुढे म्हणाले की, आरोपींना अटक करण्यात आली असून पीडित कुटुंबाच्या सुरक्षेसाठी गावात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.

नवीन स्टेशन इंचार्ज असलेले सीव्ही सिंह यांनी मृत्यूचं कारण स्पष्ट करताना सांगितलं की, पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार फास लागल्यामुळे मृत्यू झाला आहे.

24 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास मृतदेह पोस्टमॉर्टम करण्यासाठी पाठवण्यात आला होता.

रीना देवी सांगतात, "पोस्टमॉर्टम रात्री करण्यात आलं. पुढे रात्री दीडच्या सुमारास तिच्यावर जबरदस्तीने अंत्यसंस्कार करण्यात आले."

मात्र, रीना देवींचे हे आरोप संभळ पोलिसांनी फेटाळले असून त्यांनी त्यासंबंधी एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या निवेदनात म्हटलंय की, "मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय नातेवाईक आणि गावकऱ्यांचा होता. जबरदस्तीने अंत्यसंस्कार करायला लावले हे आरोप बिनबुडाचे आहेत. अंत्यसंस्कार करताना तिथे कोणताही पोलीस कर्मचारी उपस्थित नव्हता. "

गावकरी काय सांगतात?

या गावात जाटव, गुर्जर, भुर्जी समाजासह इतर अनेक समाजाचे लोक राहतात. पीडितेच्या घराची गच्ची आरोपींच्या घराला खेटून आहे.

आरोपींच्या घरी आम्हाला कोणी दिसलं नाही. हे लोक शेती करतात आणि ते आर्थिकदृष्ट्या सबल असल्याचं गावातील इतर लोक सांगतात.

या प्रकरणामुळे गावचे प्रमुख मुन्ने सिंगही दुःखी आहेत.

बीबीसीशी बोलताना ते म्हणाले की, "गावात 1526 लोक आहेत. आजवर गावात अशी कोणतीच घटना घडली नाही. मुलीच्या मृत्यूबाबत मला खूप दुःख झालं आहे. ही घटना घडली तेव्हा प्रकरण माझ्यापर्यंत आलं होतं. पण मी या प्रकरणात काय करणार?"

मुलीच्या मृत्यूला जबाबदार कोण या प्रश्नावर ते म्हणाले की, "हे बघा, सोवेंद्र सतपालच्या घरी राहायला होता. तो बहजोई गावचा रहिवासी आहे. तिथे पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या नातेवाईकांचा काहीतरी वाद सुरू होता म्हणून तो इथे येऊन राहत होता."

आधी भाकरीसाठी मेहनत आणि आता न्यायासाठी

कुढ फतेहगड पासून पीडितेच्या गावाकडे जाईपर्यंत रस्त्याच्या चोहोबाजुंनी हिरवळ दाटली होती. रस्ते पण मोठेच्या मोठे पण वर्दळ तशी कमीच होती. गावात पोहोचल्यावर रस्ता काहीसा अरुंद झाला. गावात शिरल्यावर एका अरुंद गल्लीच्या डाव्या बाजूला पीडितेचं घर आहे.

घराबाहेर एक पार आहे. घरात आत शिरल्यावर छोटसं अंगण आणि अंगणात उजव्या बाजूला हातपंप आहे. घरात जमिनीवर चटई टाकून आजूबाजूच्या काही महिला बसल्या होत्या.

रीना देवी सांगतात की, पूर्वी एकवेळची भाकरी मिळवायला कष्ट उपसावं लागायचं. पण आता न्याय मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. पण शुक्रवारी त्यांच्या घरी डीएम आले होते. त्यांनी रीना देवींना मदतीचं आश्वासन दिलं आहे.

आरोपींचे नातेवाईक काय म्हणाले?

याप्रकरणी आरोपींच्या नातेवाईकांना गाठलं असता नाव आणि फोटो न छापण्याच्या अटीवर ते बोलायला तयार झाले.

त्यांनी अल्पवयीन मुलीच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला. पण ते पुढे म्हणाले की, ज्या भावांवर आरोप केला जातोय त्यातला एक भाऊ विपीन तर त्या दिवशी गावात नव्हता.

"तो बाहेर गेला होता. काही लोक मुलीच्या घरच्यांना उलट सुलट शिकवतं आहेत."

किंबहुना एका पोलीस अधिकाऱ्यानेही सांगितलं की, घटना घडली त्या दिवशी दोन भाऊ गावात नव्हते. त्यांचं लोकेशन ट्रेस केलं असता ते गावाबाहेर दिसत आहे. पण सगळ्या गोष्टी तपासानंतरच स्पष्ट होतील असं ही त्यांनी सांगितलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)