You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जमिनीच्या मालकी हक्कात कोणत्या 5 गोष्टींमुळे बदल होतात माहितीये का?
- Author, श्रीकांत बंगाळे
- Role, बीबीसी मराठी
आमच्या जमिनीवरील मालकी हक्कात अचानक बदल झाला, आमच्या वडिलांऐवजी दुसऱ्या व्यक्तीचंच नाव सातबारा उताऱ्यावर लागलं, अशा तक्रारी अनेक जण करताना दिसून येतात.
गेल्या काही वर्षांपासून शहरात राहणाऱ्या माणसांनी गावातील जमिनींविषयी अशा अनेक तक्रारी बीबीसी मराठीकडे बोलताना व्यक्त केल्या.
खरं तर जमिनीच्या मालकी हक्कात अनेक कारणांमुळे बदल होत असतो. एका व्यक्तीच्या नावावरील मालमत्ता दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर होते, तेव्हा त्याला जमिनीच्या मालकी हक्कात बदल होणं असं म्हणतात.
साधारपणे वारस नोंदीमुळेच मालकी हक्कात बदल होत असल्याचं आपल्या निदर्शनास येत असतं किंवा असा अनेकांचा समज असतो.
पण, वारस नोंदींव्यतिरिक्तही इतर काही बाबी आहेत, ज्यामुळे जमिनीच्या मूळ मालकाचं नाव जाऊन त्याजागी नवीन मालकाचं नाव लागतं.
जमिनीच्या मालकी हक्कात हे बदल ज्या मार्गांनी होते, ते मार्ग कोणते आहेत याचीच माहिती आपण आता जाणून घेणार आहोत.
1. भूसंपादन
भूसंपादन किंवा जमीन अधिग्रहण केल्याची माहिती अनेकदा आपल्या कानावर येते. भूसंपादन म्हणजे एखाद्या कामासाठी जमीन संपादित करणं किंवा ताब्यात घेणं.
एखाद्या सरकारी प्रकल्पासाठी किंवा सार्वजनिक कामाकरता जमीन संपादित केली जाते. त्यानंतर सरकारतर्फे ज्याची जमीन संपादित झाली, त्या व्यक्तीला बाजार मूल्यानुसार मोबदला दिला जातो.
भूसंपादन व पुनर्वसन कायद्यानुसार याबाबत कारवाई केली जाते आणि मग त्या मालमत्तेवरील मूळ मालकाचं नाव जाऊन त्याजागी संपादन यंत्रणेचं नाव लागतं. म्हणजे जमिनीच्या मालकी हक्कात बदल होतो.
2. खरेदी-विक्री
एखाद्या मालमत्तेचा व्यवहार (खरेदी-विक्री) झाल्यास त्याचं खरेदी खत केलं जातं. खरेदी खत जमिनीच्या मालकी हक्काचा प्रथम पुरावा असतो.
यावर जमिनीचा व्यवहार किती तारखेला, कोणत्या दोन व्यक्तींमध्ये, किती क्षेत्रावर आणि किती रुपयांना झाला याची सविस्तर माहिती असते. त्यानंतर मग ते तलाठ्याकडे जाऊन तलाठी फेरफार घेतात.
फेरफार उताऱ्यात जमिनीची खरेदी-विक्री, वारस नोंदी, शेतजमिनीवर बोजा लावणं अशा बदलांची सविस्तर माहिती दिलेली असते.
फेरफारावरील नोंदींची तपासणी करण्यासाठी ते मंडळ अधिकाऱ्याकडे पाठवलं जातं.
मंडळ अधिकाऱ्याला ते 25 दिवसांच्या आत मंजूर करायचं असतं. त्यानंतर मग संबंधिताचं नाव सातबारा उताऱ्याव लागतं. अशारितीनं जमिनीच्या मालकी हक्कात बदल होतो.
3. वारस नोंद
जमिनीच्या मालकी हक्कात वारसांच्या नोंदीनंतर बदल होत असतो.
एखादी व्यक्ती मयत झाली तर त्याच्या मालमत्तेवर वारसांची नावं लावली जातात. पण, त्यासाठी संबंधित वारसांनी 90 दिवसांच्या आत तलाठ्याकडे अर्ज करावा लागतो. यात वारसांनी विलंब केल्यास त्यांना कायद्याप्रमाणे दंड आकारला जातो.
वारसांच्या अर्जानंतर जमिनीच्या जुन्या मालकाचं नाव जाऊन नवीन मालकाचं नाव त्याजागी लागतं.
4. न्यायालयीन खटले
जमिनीची वाटणी म्हणजे सहहिस्सेदार किंवा वारसांना त्यांचं क्षेत्र विभागून देणं. जमिनीची वाटणी वेगवेगळ्या मार्गांनी केली जाते.
महाराष्ट्र महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 नुसार, जमिनीचं वाटप होतं. पण, यासाठी सहहिस्सेदारांची संमती आवश्यक असतं.
"सर्व हिस्सेदारांची संमती नसेल तर तहसीलदाराला कलम 85 खाली जमिनीचं वाटप करता येणार नाही. तहसीलदाराला असे प्रकरण ताबडतोब बंद करून संबंधितांना दिवाणी न्यायालयातच दाद मागावी असे सुचित करावे लागेल," असं महसूल कायदेतज्ञ संजय कुंडेटकर सांगतात.
दिवाणी प्रक्रिया संहिता 1908च्या (CPC) कलम 54 अंतर्गत जमिनीचं वाटप करून दिलं जातं.
उदाहरणार्थ. एखाद्या व्यक्तीला 3 अपत्यं असतील आणि त्यांना ती जमीन त्यांच्या नावावर वाटप करून द्यायची असेल आणि परस्पर सहमतीनं ते होत नसेल तर मग अशावेळी CPC च्या अंतर्गत मालमत्ता वाटपाचा अर्ज न्यायालयात दाखल केला जातो.
त्यानुसार मग संबंधित जमिनीवर कुणाचा किती मालकी हिस्सा आहे यासंदर्भात न्यायालय आदेश देतं आणि मग जमिनीचं वाटप प्रशासकीय यंत्रणेद्वारे केलं जातं. त्यानुसार जमिनीच्या मालकी हक्कात बदल होतो.
5. सक्षम अधिकाऱ्याचा आदेश
एखाद्या व्यक्तीनं मालकी हक्क बेकायदेशीरपणे मिळवला असेल तर सक्षम अधिकाऱ्याच्या आदेशानं मालकी हक्कात बदल होऊ शकतो.
एखाद्यानं दस्त चुकीचा दिला असेल आणि त्याविरोधात अपील केलं तर त्यानंतर फेरफारात बदल केला जातो आणि मग तो बदल सातबाऱ्यावर नोंदवला जातो. अशाप्रकारे सक्षण अधिकाऱ्याच्या आधेशानंतर जमिनीच्या मालकी हक्कात बदल होतो.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)