टोमॅटो फ्लू: 7 प्रश्नांमध्ये जाणून घ्या लहान मुलांना होणारा हा आजार

टोमॅटो फ्लू

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, मयांक भागवत
    • Role, बीबीसी मराठी

देशभरात गेल्याकाही दिवसांपासून 'टॉमेटो फ्लू'ची जोरदार चर्चा सुरू आहे. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे या आजाराचा आणि टॉमेटोचा काही संबंध नाही.

लहान मुलांना होणाऱ्या या आजारात, अंगावर लाल रंगाचे पुरळ किंवा फोड उठतात. हे फोड हळूहळू वाढत जातात. केरळमध्ये या आजाराला 'तक्काली पनी' म्हणतात. ज्याचा इंग्रजीत अर्थ होतो 'टॉमेटो फ्लू'.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, 'टॉमेटो फ्लू' काही वेगळा आजार नाही. लहान मुलांना विषाणूसंसर्गामुळे होणारा 'हॅंड फूट माऊथ' (HFMD) आजार आहे. मुंबईच्या सर जे.जे.रुग्णालयाच्या अधीष्ठाता आणि बालरोगतज्ज्ञ डॉ. पल्लवी सापळे म्हणतात, "हॅंड फूट माऊथ' सिझनल आजार आहे. काही दिवसात आपोआप बरा होतो." त्यामुळे घाबरून जाण्यचं कारण नाही.

'टॉमेटो फ्लू' किंवा 'हॅंड फूट माऊथ' आजार नेमका काय आहे? आम्ही तज्ज्ञांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

1. आजाराचं नाव 'टॉमेटो फ्लू' का आहे?

या आजारात लहान मुलांच्या हातावर, पायावर, कुल्यावर आणि तोंडात लाल रंगाचे पुरळ किंवा फोड येतात.

हे फोड टॉमेटोसारखे दिसतात. त्यामुळे केरळमधील काही लोकांनी याला 'तक्काली पनी' असं नाव दिलं.

'तक्काली पनी' हा मल्याळी शब्द आहे. इंग्रजीत याचा अर्थ 'टॉमेटो फ्लू' होतो. त्यामुळे बोली भाषेत याचं नाव पडलं 'टॉमेटो फ्लू'

टोमॅटो फ्लू

फोटो स्रोत, Getty Images

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, 'टॉमेटो फ्लू' काही नवीन आजार नसून लहान मुलांना होणारा "हॅंड फूट माऊथ' आजार आहे.

2. कोणाला हा आजार होतो?

बालरोगतज्ज्ञांच्या माहितीनुसार, या आजारात लहान मुलांना होणारा हा संसर्ग अत्यंत सौम्य प्रकारचा असतो.

'हॅंड फूट माऊथ' किंवा 'टॉमेटो फ्लू' हा तीव्र वेगाने पसरणारा साथीचा आजार आहे.

हा आजार 'एन्टेरोव्हायरस' (Enteroviruses) प्रकारच्या विषाणूंच्या संसर्गामुळे पसरतो.

मुंबईच्या सर जे. जे. रुग्णालयाच्या अधीष्ठाता आणि बालरोगतज्ज्ञ डॉ. पल्लवी सापळे म्हणतात, "हॅंड फूट माऊथ' सिझनल आजार आहे. काही दिवसात आपोआप बरा होतो. त्यामुळे घाबरून जाण्यचं कारण नाही."

नुकत्याच जन्मलेल्या अर्भकांपासून 7 ते 8 वर्षापर्यंतच्या बालकांना प्रामुख्याने हा आजार होतो.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, काही प्रकरणांमध्ये हा आजार किशोरवयीन मुलं आणि प्रौढांनाही होण्याची शक्यता असते.

टोमॅटो फ्लू

फोटो स्रोत, Getty Images

"या आजारात दीर्घकाळासाठी शरीरात रोगप्रतिकारशक्ती निर्माण होत नाही. त्यामुळे एका सिझनमध्ये एक किंवा दोन वेळा मुलांचा याचा संसर्ग होतो," बालरोगतज्ज्ञ डॉ. तुषार मणियार सांगतात.

3. 'टॉमेटो फ्लू' किंवा 'हॅंड फूट माऊथ'ची लक्षणं कोणती

बालरोगतज्ज्ञ डॉ. सुहास प्रभू पुढे म्हणाले, "सात वर्षांखालील लहान मुलांमध्ये या आजाराचा प्रामुख्याने संसर्ग आढळून येतो." विषाणू संसर्ग झाल्यानंतर 3 ते 7 दिवसांनी याची लक्षणं दिसू लागतात.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार,

  • पहिलं लक्षणं म्हणजे ताप 24 ते 48 तास रहातो. भूक लागत नाही. खूप थकवा येतो आणि घशाला कोरड पडते
  • तापानंतर दोन दिवसांनी तोंडात, हात आणि पायावर लाल रंगाचे पुरळ उठतात.
  • एक-दोन दिवसांनी हाता-पायाच्या तळव्यांवर रॅश उठते
  • बहुतांश रुग्ण 7 ते 10 दिवसांनी पूर्णत: बरे होतात
  • हॅंड फूट माऊथला कारणीभूत 'एन्टेरोव्हायरस' विषाणू मेंदूज्वर होण्यासाठीदेखील कारणीभूत असतो. त्यामुळे काही रुग्णांमध्ये मेंदू आणि श्वसनासंबंधी गुंतागुंत निर्माण होऊ शकते

गर्भवती महिलेला हॅंड फूट माऊथ आजार झाल्यास गर्भातील बाळावर याचा काही परिणाम झालेला दिसून आलेला नाही.

4. 'हॅंड-फूट-माऊथ'चे आजार कसा पसरतो?

हॅंड फूट माऊथ ज्याला बोली भाषेत टॉमेटो फ्लू म्हणून ओळखलं जातं. हा अत्यंत तीव्र संसर्गजन्य आहे. याचा संसर्ग लहान मुलांमध्ये झपाट्याने पसरतो.

  • खोकला, लाळ, फोड फुटून बाहेर येणारं पाणी यामुळे आजार पसरतो
  • हा आजार माणसापासून माणसाला होतो. रुग्णाने हाताळलेल्या वस्तूच्या संपर्कात आल्यामुळे आजार पसरण्याची शक्यता
  • आजाराचं निदान झाल्यानंतर पहिल्या आठवड्यात संसर्ग पसरण्याची भीती सर्वात जास्त

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, घरातील पाळीव प्राणी किंवा इतर प्राण्यांपासून आजाराचा संसर्ग होत नाही. डॉ. मणियार पुढे म्हणाले, "रुग्णाच्या त्वचेशी थेट संपर्क आल्यामुळे हा आजार पसरतो. त्यामुळे यावर प्रतिबंध खूप कठीण आहे."

डॉ. पल्लवी सापळे पुढे सांगतात, हॅंड फूट माऊथ आजारात तोंडात फोड आल्यामुळे काही प्रमाणात रेस्पिरेटरी (श्वसननलिका) संसर्गातून पसरू शकतो.

5. टॉमेटो फ्लूची तपासणी कशी होते?

टॉमेटो फ्लूची लक्षणं डेंग्यू आणि चिकनगुनियासारखीच दिसतात. त्यामुळे डॉक्टर मॉलिक्युलर आणि सेरॉलॉजिकल टेस्ट करण्यासाठी सांगतात. तपासणीत डेंग्यू, हर्पीस, चिकनगुनिया, झिका व्हायरस यांच्या संक्रमणाचे पुरावे मिळाले नाहीत. तर डॉक्टर याला हॅंड फूट माऊथ म्हणतात.

टोमॅटो फ्लू

फोटो स्रोत, Getty Images

मुंबईतील बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रभू महाराष्ट्र सरकारच्या लहान मुलांच्या कोव्हिड टास्कफोर्सचे सदस्य आहेत. ते पुढे म्हणाले, ""हॅंड फूट माऊथ' आजार सेल्फ लिमिटिंग किंवा आपोआप बरा होणारा आहे. यात मुलांना औषध दिली जात नाहीत." फक्त अंगदुखीसाठी वेदनाशमक गोळ्या, गुळण्या करणं आणि अंगाला खाज येऊ नये यासाठी मलम दिलं जातं.

हॅंड फूट माऊथ संसर्गजन्य असल्याने शाळेतील मुलांमध्ये याचा संसर्ग झपाट्याने पसरल्याचं दिसून आल्याचं तज्ज्ञ सांगतात. डॉ. प्रभू म्हणतात, मुलांना ताप आला असेल किंवा अंगावर पुरळ दिसून येत असतील. तर त्यांना शाळेत पाठवू नका.

या आजाराने ग्रस्त मुलांना 10 दिवस क्वॉरेंटाईन ठेवण्याचा डॉक्टर पालकांना सल्ला देतात. जेणेकरून दुसऱ्या मुलांचा संसर्ग होणार नाही. मुलांच्या तोंडात फोड आल्यामुळे मुलांना खाण्यात अडचण होते. अशावेळी मुलांना मऊ पदार्थ द्यावेत असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

6. महाराष्ट्रात आढळतो का टॉमेटो फ्लू किंवा 'हॅंड फूट माऊथ' आजार?

मुंबईत पाउस आणि हवामान बदलामुळे व्हायरल 'फ्लू'ची साथ दिसून येते. बालरोगतज्ज्ञ म्हणतात, याच काळात हॅंड फूट माऊथने ग्रस्त मुलांची संख्या वाढते.

बालरोगतज्ज्ञ डॉ. सुहास प्रभूंकडे जुलै महिन्यात हॅंड फूट माऊथच्या केसेस अचानक वाढल्या होत्या. 10-12 दिवसातच 100 पेक्षा जास्त मुलं हॅंड फूट माऊथमुळे उपचारांसाठी आली होती अशी त्यांनी माहिती दिली.

पालक आणि मूल

फोटो स्रोत, Getty Images

पावसाळ्याच्या दिवसात हा आजार मुलांमध्ये दिसून येतो. डॉ. तुषार पुढे सांगतात, "मुलांच्या अंगावर पुरळ उठल्याचं दिसून आल्यास तात्काळ बालरोगतज्ज्ञांना संपर्क करा."

मुंबईत हॅंड फूटस माऊथ काही नवीन आजार नाही. गेल्या अनेक वर्षांपासून हा आजार मुलांमध्ये दिसून आलाय.

7. मंकीपॉक्स आणि हॅंड फूट माऊथमध्ये फरक काय?

जगभरात सद्यस्थितीत मंकीपॉक्सची भीती पसरली आहे. यात रुग्णाच्या अंगावर पुरळ उठतात. भारतात सद्य स्थितीत मंकीपॉक्सचे चार रुग्ण असून राज्यात एकही रुग्ण आढळून आलेला नाही.

मग मंकीपॉक्स आणि हॅंड फूट माऊथ सारखेच आहेत का? मुंबईतील जे.जे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे सांगतात, "मंकीपॉक्समध्ये अंगावर येणारे फोड सुरूवातीला हॅंड फूट माऊथसारखेच असतात. पहिल्या दोन-तीन दिवसात दोन्ही रोग डॉक्टरांनाही सारखे वाटू शकतात." याचं कारण हाता, पायावर पुरळ असतं.

लहान मूल

फोटो स्रोत, Getty Images

डॉ. पल्लवी सापळे बालरोगतज्ज्ञ आहेत. मंकीपॉक्स आणि हॅंड फूट माऊथमधील फरक त्या समजावून सांगतात.

  • मंकीपॉक्समध्ये दोन आठवड्यांनी अंगावरील फोड मोठे होतात, त्यात पू भरतो. त्यानंतर खपली धरून 2 ते 4 आठवड्यात रुग्ण बरा होतो. तर, हॅंड फूट माऊथमध्ये फोड मोठे होत नाहीत. हा आजार सात-आठ दिवसात पूर्ण बरा होतो.
  • मंकीपॉक्समध्ये लिंफनोडमध्ये (ग्रंथी) सूज येते. जे हॅंड फूट माऊथमध्ये फार दिसून येत नाही
  • हॅंड फूट माऊथ अत्यंत सहजतेने पसरतो. पण मंकीपॉक्स रुग्णाशी अत्यंत जवळचा संपर्क आल्यामुळे पसरतो. सहज पसरत नाही

तज्ज्ञ सांगतात, मंकीपॉक्सचा आजार लहान मुलांमध्ये झाल्याचं अजूनही आढळून आलेलं नाही.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)