चहा - कॉफी आरोग्यासाठी चांगलं की वाईट?

फोटो स्रोत, Getty Images
मुसळधार पाऊस पडायला लागला, हवेतला गारठा वाढला की हटकून अनेकांना चहाची तल्लफ येते...किंवा मग काम करताना झोप येत असेल, रात्री अभ्यासासाठी जागायचं असेल तर एक स्ट्राँग कॉफी तरतरी देऊन जाते. पण या दोन्हीचे शरीरावर काय बरेवाईट परिणाम होतात? आणि या चहा कॉफीतून जी साखर शरीरात जाते, त्याने काय होतं?
Pew ने केलेल्या पाहणीनुसार आशिया खंडातल्या देशांमधल्या लोकांचा कल चहाकडे तर युरोपियन देशांमध्ये कॉफीला पसंती दिली जाते. अपवाद युकेचा.
पण लोकं चहा किंवा कॉफीच निवड कशाच्या आधारे करतात? खरंतरं लोक त्यांच्या शरीरासाठी काय चांगलं आहे, कमी धोकादायक आहे, असं त्यांना वाटतं त्याची निवड करतात. काहींच्या मते एका पेयामुळे मिळणारं मानसिक समाधान हे दुसऱ्यापेक्षा जास्त असतं.
असेही काही जण असतात जे चव आणि गंधावरून चहा घ्यायचा की कॉफी हे ठरवतात.
पण चहा वा कॉफीची निवड करण्यामागे काही आरोग्यविषयक कारणंही आहेत का?
काय चांगलं - चहा की कॉफी?
चहा वा कॉफीमधलं कॅफीनचं प्रमाण हे त्याच्या दर्जा, प्रकार आणि तयार करण्याच्या प्रक्रियेवरून कमी-जास्त असतं.
पण कॉफीमध्ये चहापेक्षा जास्त कॅफीन असतं. काही लोकांचा असा समज असतो की कॅफीनचं सेवन जास्त केलं तर ते जास्त अॅलर्ट वा जागे राहू शकतात.
कॉफी तुम्हाला अधिक प्रभावीपणे जागं ठेवू शकते, हे खरं आहे. पण म्हणून कॉफीप्रेमींनी इतक्यातच खुश होऊ नये.

फोटो स्रोत, Getty Images
एक कप कॉफीमध्ये अल्प म्हणजे 40 ते 300 मिलीग्रॅम प्रमाणात कॅफीन असेल तर त्याने तुम्ही जास्त अॅलर्ट राहता, तुमची एकाग्रता वाढते आणि एखाद्या गोष्टीला प्रतिक्रिया देण्याची क्षमताही सुधारते. पण कॉफीचे निर्णय क्षमता आणि स्मरणशक्तीवर काही दुष्परिणामही होतात.
चहात आढळणाऱ्या कॅफीनला L-Theanine या अमिनो आम्लाची जोड मिळाल्याने त्याचा परिणामकारकता वाढत असल्याचं अभ्यासात आढळलंय. "L-Theanine हे कॅफीनसोबत मिळून तुमची सजगता वाढवायला मदत करतं," असं संशोधनात म्हटलंय.
पण अशा प्रकारे चहा - कॉफीच्या मदतीने सतर्क राहण्याची किंमत आपल्या शरीराला मोजावी लागते. एका कपातून तुमच्या शरीरात गेलेल्या कॅफीनपैकी निम्मं 5-6 तास उलटून गेल्यानंतरही तुमच्या शरीरात असतं. तर 10-12 तास उलटून गेल्यानंतरही 25 टक्के कॅफीन तुमच्या शरीरात असण्याची शक्यता असल्याचं झोपेविषयी संशोधन करणारे मॅट वॉकर सांगतात.
चहा घेतल्याने तुम्हाला झोप लागायला किंवा गाढ झोप लागायला अडचणी येऊ शकतात. तुम्ही किती काळ झोपू शकता यावर कॅफीनचा परिणाम होतो आणि झोपेचा काळ कमी होत असल्याचं वॉकर सांगतात. यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावरही तुम्हाला फ्रेश वाटत नाही.
"जर तुम्ही कमी कॅफीन असलेला चहा दिवसभर थोड्या प्रमाणात घेत राहिलात तरीही याचा कॉफीसारखाच परिणाम होतो, तुम्ही जागे राहता. पण अशा प्रकारचा चहा घेतल्याने तुमच्या झोपेच्या चक्रावर याचा कदाचित कमी दुष्परिणाम होतो," असं एका अभ्यासात म्हटलंय.
पण असं असलं तरी झोपायला जायच्या आधी चहा वा कॉफी कोणत्याच पेयाचं सेवन चांगलं नाही.
मनःशांतीसाठी कोणतं पेय योग्य?
गरम पेय प्यायल्यानंतर आपल्याला रिलॅक्स वाटत असल्याचं अनेक जण सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
'काळा चहा प्यायलास अनेकांना रोजच्या आयुष्यातला तणाव कमी व्हायला मदत होते, असं युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनने केलेल्या एका अभ्यासात आढळलं, पण चहातल्या नेमक्या कोणत्या घटकामुळे तणाव जातो आणि रिलॅक्स वाटतं हे अजून माहिती नाही, ' असं या विद्यापीठाच्या एपिडेमऑलॉजी आणि पब्लिक हेल्थ शाखेचे प्राध्यापक अँड्रयू स्टेपटो सांगतात.
ग्रीन टीमध्ये कॅफीनचं प्रमाण कमी असतं. हा चहा प्यायलानेही काही लोकांना ताण कमी झाल्यासारखं वाटतं.
कॉफी तणावावर नेमकं कसं काम करते याविषयी तुलनेने कमी अभ्यास करण्यात आलाय. पण कॅफीनचं प्रमाण अधिक झालं तर त्याने तणाव निर्माण होऊ शकतो, हे संशोधकांना आढळलंय.
"कॅफीनचं खूप जास्त प्रमाणात सेवन केल्यास तुम्हाला नेहमीपेक्षा नव्हर्स किंवा अस्वस्थ वाटू शकतं," असं ब्रिटनच्या आरोग्य विभागाने म्हटलंय.
दातांवर डाग का पडतात?
चहा आणि कॉफीमुळे दातांवर डाग पडू शकतात. पण कॉफीपेक्षा चहामुळे दातांवर जास्त डाग पडत असल्याचं आढळलंय. मग दातांवर डाग पडणं कमी कसं करायचं? डेंटिस्ट अॅना मिडलटन काही टिप्स सांगतात.
- चहा किंवा कॉफीमध्ये दूध किंवा दुधासारखे पदार्थ वापरा.
- चहा किंवा कॉफी घेतल्यावर पाण्याने किंवा फ्लोराईड माऊथवॉशने गुळणा भरा.
- आईस टी किंवा कॉफी पिण्यासाठी स्ट्रॉ वापरा.
- इलेक्ट्रिक टूथब्रशचा वापर करा
- दातांच्या मधल्या फटी फ्लॉसच्या मदतीने साफ करा.
आरोग्याच्या दृष्टीने किती सेवन योग्य?
चहा किंवा कॉफी हे तुमच्या संतुलित आहाराचा एक भाग असावेत असं युकेचा आरोग्य विभाग सांगतो. पण कॅफीन असणाऱ्या पेयांमुळे शरीर लवकर लघवी तयार करतं आणि परिणाम शरीर लवकर डिहायड्रेटहतं असं काही संशोधनं म्हणतात.
चहा आणि कॉफी या दोन्हीमध्ये पॉलीफेनॉल्स असतात. हे आरोग्यासाठी चांगले असल्याचं आहारतज्ज्ञ सोफी मेडलीन सांगतात. चहापेक्षा कॉफीमध्ये पॉलीफेनॉल्सचं प्रमाण जास्त असतं. पण या दोन्हीतले पॉलीफेनॉल समान नसल्याचं अभ्यासात आढळलंय.

फोटो स्रोत, Getty Images
या दोन्हींचे काही फायदे आहेत. या दोन्हींमुळे Type 2 प्रकारचा डायबिटीस होण्याचा धोका कमी होतो.
पण एका दिवसात 4 पेक्षा जास्त कप कॉफी प्यायल्याने रक्तदाब वाढण्याचा धोका असू शकतो, असं युकेच्या NHS ने म्हटलंय.
तर काही लोकांच्या शरीराला कॅफीनचा त्रासही होऊ शकतो. अशा लोकांना पचनसंस्थेच्या अडचणी, तणाव येणं, रात्री झोप न लागणं असं त्रास जाणवू शकतात.
तुम्हाला तुम्ही घेत असलेल्या कॅफीनचं प्रमाण कमी करायचं असेल, तर एकदम थांबवू नका. हे प्रमाण टप्प्याटप्याने कमी करा. नाहीतर अचानक कॅफीन थांबवल्याने त्याचे परिणाम दिसायला लागतील. तुमच्या शरीराला किती प्रमाणातल्या कॅफीनची सवय होती, यावर हे अवलंबून आहे. कॉफी पिणाऱ्यांच्या बाबतीत हे जास्त आढळून येतं.
गरोदर महिलांनी कॅफीन असणाऱ्या पेयांच्या सेवनाचं प्रमाण कमी करावं आणि कॅफीन असणारी पेयं लहान मुलांना देऊ नयेत असं NHSने म्हटलंय.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








