You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
आलिया भट्ट: मी आवडत नसेन, तर माझे सिनेमे पाहू नका #5मोठ्याबातम्या
आज विविध वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :
1) मी आवडत नसेन, तर माझे सिनेमे पाहू नका - आलिया भट्ट
मी आवडत नसेन, तर माझे सिनेमे पाहू नका, असं म्हणत अभिनेत्री आलिया भट्टने ट्रोलिंग करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. एबीपी माझानं ही बातमी दिलीय.
"माझे आई-वडील सिनेसृष्टीत काम करतात, यात माझी काय चूक? उद्या जर कोणत्या अभिनेता-अभिनेत्रीच्या मुलांना चित्रपटसृष्टीत पदार्पण करायचं असेल तर त्यांना स्वत:ला सिद्ध करावं लागेल," असं आलिया 'मिड डे'ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली.
नेपोटिझमबाबतच्या टीकेवर 'मिड डे'ला दिलेल्या मुलाखतीत आलिया म्हणाली, "मी या टीकांना उत्तरं देऊ शकत नाही. जर तुम्हाला मी आवडत नसेन, तर मला पाहू नका. मी यात काहीच करू शकत नाही."
पुढे आलियानं असा विश्वासही व्यक्त केला की, "मी आज ज्या जागेवर आहे, तिथं मी असणं किती योग्य आहे, हे सिद्ध करेन."
आलियाचा 'ब्रह्मास्त्र' हा सिनेमा प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. या सिनेमात रणबीर आणि आलिया दोघे एकत्रित दिसणार आहेत.
नुकता आलियाचा 'डार्लिंग्स' सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला.
2) दहीहंडीच्या सातव्या थरावरून पडलेल्या गोविंदाचा मृत्यू
दहीहंडीमध्ये सातव्या थरावरून पडून जखमी झालेल्या संदीप दळवी या मुंबईतील गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिलीय.
मुंबईतील विलेपार्ले पूर्वेकडील शिवशंभो गोविंदा पथकानं विलेपार्ले पूर्वेकडीलच बामनवाडा भागात दहीहंडी फोडण्यासाठी सात थर रचले. यावेळी सातव्या थरावरून संदीप दळवी कोसळला असता, त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.
यानंतर संदीपला नानावटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यानच त्यानं अखेरचा श्वास घेतला.
संदीप दळवी हा 22 वर्षीय तरुण मूळचा विलेपार्ले येथील असून, नुकतंच त्याचं कुटुंब कुर्ल्यात राहायला गेलं होतं.
3) बेरोजगारांना महिन्याकाठी 5 हजार रुपये भत्ता सुरू करा - एकनाथ खडसे
"महाराष्ट्रातील सेवायोजन कार्यालयं जवळपास बंद झालेले आहेत. पूर्वी त्यातून रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हायच्या, त्या आता होत नाहीत. तसंच, राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांना पूर्वी बेरोजगारी भत्ता मिळत होता. राज्य सरकारने तो भत्ता बंद केलेला आहे. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांना महिना 5 हजार रुपये भत्ता द्यावा," अशी मागणी माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्नाद्वारे केली. लोकमतनं ही बातमी दिली.
"सेवायोजन कार्यालय जवळपास बंद झालेले आहे. रोजगाराच्या संधी आता उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे कौशल्य विकास विभाग किंवा अन्य विभागांमार्फत बेरोजगारांची नोंदणी करण्यासाठी काही प्रक्रिया राबवणार का?" असा प्रश्न एकनाथ खडसे यांनी विचारला.
कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी बेरोजगारांच्या नोंदणीबाबत सकारात्मक विचार करु असे उत्तर दिले.
कौशल्य विकास विभागाने पोर्टल तयार केले असून त्यात बेरोजगारांची नोंदणी केली जाते. तसेच विविध उद्योग-आस्थापने देखील तिथे नोंदणी करु शकतात असे सांगत बेरोजगारी भत्त्याचा विषय मात्र माझ्या अखत्यारीत येत नसल्याचे सांगून त्यांनी उत्तर देणे टाळले.
4) सध्याच्या अस्थिर राजकीय परिस्थितीकडे संधी म्हणून पाहा - राज ठाकरे
"सध्याच्या अस्थिर राजकीय परिस्थितीकडे एक संधी म्हणून पाहा, आपल्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहून भेटीगाठी वाढवा," असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत पार पडलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केलं. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.
तसंच, राज ठाकरे लवकरच राज्यव्यापी दौरा करणार असून येत्या 25 ऑगस्टपासून सदस्य नोंदणी सुरू करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
येणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्ये सर्वच जागा आपण स्वबळावर कशा लढू शकतो याची चाचपणीही करण्याच्या सूचना राज ठाकरेंनी दिल्याचे समजते.
पक्षाच्या पुणे ग्रामीणमधील तीन लोकसभा मतदारासंघांसाठी पक्ष निरीक्षक पदाच्या निवडी जाहीर करण्यात आल्या असून पुणे ग्रामीणमधील मावळ, बारामती आणि शिरुर लोकसभा मतदारासंघांतील पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. यात मावळ लोकसभा मतदारसंघात किशोर शिंदे, हेमंत संभूस आणि गणेश सातपुते यांची पक्ष निरीक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
शिरुर लोकसभा मतदारसंघाच्या निरीक्षक पदावर अजय शिंदे आणि बाळा शेडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बारामतीमध्ये पक्ष निरीक्षक म्हणून वसंत मोरे, सुधीर पाटसकर, रणजित शिरोळे यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे.
5) मनिष सिसोदियांकडे भाजपच्या 'ऑफर'चं रेकॉर्डिंग?
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदियांकडे भाजप नेत्यानं सीबीआय प्रकरणाची चौकशी थांबवण्यासाठी आम आदमी पक्ष सोडण्याची ऑफर दिल्याची ऑडिओ क्लिप असल्याची माहिती 'आप'च्या सूत्रांनी दिलीय. एनडीटीव्हीनं आम आदमी पक्षातील सूत्रांच्या हवाल्यानं ही बातमी दिली आहे.
"आम्हाला या क्षणी हा संवाद जाहीर करायचा नाहीय. मात्र, गरज भासल्यास आम आदमी पक्ष फोनवरील संवाद प्रसिद्ध करेल," असं 'आप'च्या नेत्यानं नाव न सांगण्याच्य अटीवर एनडीटीव्हीला सांगितलं.
मनिष सिसोदियांची सध्या सीबीआयच्या मार्फत चौकशी सुरू आहे. त्यावरून आम आदमी पक्ष आणि भाजप यांच्यात गेल्या काही दिवसांपासून जुंपली आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)