मलेरिया, हत्तीरोगः मी डास मारत नाही फक्त पकडतो कारण...

- Author, मयांक भागवत
- Role, बीबीसी मराठी
"एक प्रौढ डास अनेकांना चावू शकतो. आजार पसरवू शकतो. मी एक डास पकडतो तेव्हा नागरिकांचं आजारापासून संरक्षण होतं. लोकांचं आरोग्य निरोगी राखण्यात माझा हातभार लागतोय याचं मला समाधान आहे," श्याम सकपाळ सांगत होते.
50 वर्षांचे श्याम सकपाळ, मुंबई महापालिकेत 'इन्सेक्ट कलेक्टर' आहेत. गेल्या दोन वर्षांपासून ते डास पकडण्याचे काम करतात. आठवड्यातून तीन वेळा विविध वॉर्डात त्यांना डास पकडावे लागतात.
हत्तीरोग पसरवणारे 'क्युलेक्स' प्रजातीचे डास ते पकडतात. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार 'क्युलेक्स' डास हत्तीरोगास कारणीभूत 'बुचेरिया बॅनक्रॉफ्टीया' या परजीवी जंतूंचा प्रसार करतात.
20 ऑगस्ट 'World Mosquito Day' म्हणून साजरा केला जातो. याच निमित्ताने डास पकडणाऱ्या या माणसांची गोष्ट तुम्हाला सांगणार आहोत. तुम्ही बहुदा या माणसांबद्दल ऐकलं किंवा यांना पाहिलं नसेल.
मी 'इनसेक्ट कलेक्टर' श्याम सकपाळ
सकाळचे साडेसहा वाजले असतील. आम्ही धारावीत किटकनाशक विभागाच्या ऑफिसमध्ये पोहोचलो.

फोटो स्रोत, Getty Images
खाकी गणवेष घातलेल्या पालिका कर्मचाऱ्यांची दैनंदिन कामासाठी बाहेर पडण्याची लगबग सुरू होती.
हळूहळू उजाडत होतं. रस्त्यावर रहदारी नव्हती. आम्ही थांबलो होतो डास पकडणाऱ्या माणसाला भेटण्यासाठी. ही व्यक्ती कोण असेल? याची उत्सुकता होती. तेवढ्यात चेक्सचा शर्ट, जीन्स आणि डोक्यावर टोपी घातलेल्या व्यक्तीने हाक मारली. मी 'इन्सेक्ट कलेक्टर' श्याम सकपाळ त्यांनी ओळख करून दिली.
ते म्हणाले, "सकाळी सहा वाजता डास पकडण्याचं काम सुरू करतो. काळोखातच डास मिळतात." त्यांच्या हातात एक रबरी नळी आणि पाईप होती.

फोटो स्रोत, Mayank bhagwat
धारावीतील अरूंद गल्लीबोळातून आम्ही मार्ग काढण्यास सुरूवात केली. हा माणूस डास पकडतो, म्हणजे नक्की काय करतो? डास कसा पकडतात? कशासाठी? अनेक प्रश्न मनात होते.
श्याम सकपाळ यांच्यासोबत स्थानिक पालिका कर्मचारी मुर्गेश होते. स्थानिक कर्मचाऱ्यांना जागा माहिती असतात. लोक परिचयाचे असतात. त्यामुळे डास पकडण्यासाठी जाताना त्यांना सोबत घेऊन शाम जातात.
फूउऊ...आणि डास पाईपमध्ये खेचला जातो
बोलता-बोलता आम्ही एका पडीक इमारतीत पोहोचलो. आत दोन-चार लोक झोपलेले दिसले. आजूबाजूला खूप कचरा पडला होता. ही इमारत बहुधा कोणी वापरत नसावं.
श्याम यांनी खिशातला टॉर्च काढला आणि भिंतीवर फिरवण्यास सुरूवात केली. एक-एक कानाकोपरा ते पिंजून काढू लागले. मुंबईत डेंग्यू, मलेरिया आणि हत्तीरोग पसरवणारे डास आढळून येतात.

फोटो स्रोत, Mayank bhagwat
श्याम सकपाळ म्हणाले, "आम्ही 'क्युलेक्स' प्रजातीचे प्रौढ डास शोधतो आणि पकडतो." 'क्युलेक्स' डास हत्तीरोग पसरवणाऱ्या 'बुचेरिया बॅनक्रॉफ्टी' या परजीवी जंतूचा वाहक आहे. हे डास नाल्यालगतच्या झोपड्या, बांधकाम मजूरांची घरं आणि पडीक इमारतीत आढळून येतात.
श्याम हळूच इशारा करून म्हणाले, "हा पाहा क्युलेक्स प्रजातीचा डास." आम्हाला ते डास कसा पकडतात हे पाहण्याचं कुतूहल होतं. डास खरंतर मारणंही कठीण. पण श्याम तो पकडणार होते.
हे नक्की कसं होतं? श्याम यांनी रबरी नळी तोंडात धरली आणि पुढे असणारा पाईप डासाजवळ नेला. टॉर्चचा प्रकाश डासावर होताच. आणि मग, त्यांनी जोरात श्वास आत ओढला. डास पाईपमध्ये खेचला गेला. ही प्रक्रिया अवघ्या एका सेकंदात पूर्ण झाली. "रबरी नळी आणि पाईपमध्ये एक पडदा असतो. त्यामुळे डास तोंडात जात नाही. डास पडद्यावर अडकून रहातो."

फोटो स्रोत, Getty Images
डास पकडल्यानंतर श्याम यांनी बोटानेच पाईपचं तोंड बंद केलं आणि दुसऱ्या ठिकाणी डास शोधण्यास सुरूवात केली. 15-20 मिनिटात त्यांनी 5-6 डास पकडून टेस्ट ट्यूबमध्ये टाकले आणि त्यावर नंबर लिहिला.
क्युलेक्स डास कसा शोधतात?
पकडलेले डास दाखवत श्याम बाहेर आले. दरम्यान, एका स्थानिकाने बाजूच्या राजर्षी शाहू हायस्कूलमध्ये डास असल्याची तक्रार केली. श्याम आणि त्यांच्यासोबतचे कर्मचारी शाळेच्या दिशेने रवाना झाले.
सामान्य माणसासाठी प्रत्येक डास सारखाच. पण, श्याम यांना 'क्युलेक्स' डास शोधून पकडावे लागतात.

काळोखात, कानाकोपऱ्यात फक्त टॉर्चच्या प्रकाशात या विशिष्ठ प्रजातीचा डास श्याम कसा ओळखतात?
श्याम पुढे सांगत होते, "प्रत्येक डासाची बसण्याची वेगळी स्टाईल आहे. क्युलेक्स डास कुबड काढून बसतो. तर अॅनाफिलिक्स डास 90 अंशाच्या कोनामध्ये बसतो." गेली दोन वर्ष सातत्याने डास पकडल्यामुळे त्यांची आता नजर बसलीये.
आमच्याशी बोलताना त्यांची बारीक नजर टॉर्चच्या प्रकाशात डासांवर होती. शाळेतील एका वर्गात त्यांना डास आढळून आले.
ते म्हणाले, "डासाची मादी जंतूंचा प्रसार करतात. नर डास नाही. त्यामुळे आम्ही मादी डासच पकडतो."
नर डासांची सोंड (प्रोबेसिस) बोथट असते. ते चाऊ शकत नाहीत. मादी डासांची सोंड टोकेरी असते. त्या डास रक्त पितात. आणि रक्त शोषून घेताना जंतू माणसाच्या शरीरात सोडतात.

फोटो स्रोत, Mayank bhagwat
शाळेतील दोन वर्ग तपासून सापडलेले डास टेस्ट ट्यूबमध्ये टाकून आम्ही पुढे निघालो.
जवळच्याच बांधकाम मजूरांच्या घरात तपास करायचा होता. त्यावेळी सकाळचे सात वाजले असतील.
पहाटेच्या वेळी डास पकडण्यामागचं कारण काय? आम्हाला प्रश्न पडला. श्याम पुढे म्हणाले, "क्युलेक्स डास रात्री चावतात. माणसाचं रक्त शोषून घेतल्यानंतर त्याचं शरीर जड होतं. त्यांना उडता येत नाही. मग विश्रांतीसाठी ते भिंतीवर बसतात." सूर्यप्रकाशात त्यांना शोधता येत नाही. त्यामुळे पहाटे 6-7 च्या सुमारास डास पकडावे लागतात.
"मी डास पकडतो, लोक निरोगी रहातात"
श्याम सकपाळ 2006 पासून किटकनाशक विभागात कार्यरत आहेत. यासाठी त्यांना ट्रेन करण्यात आलंय. माहिती घेता-घेता आम्ही बांधकाम मजूरांच्या घराकडे पोहोचलो.
त्यांनी दरवाजा ठोकला. BMC मधून आलोय, डासांची तपासणी करायची आहे. त्यांनी सांगितलं. घरातील पुरुषाने दरवाजा उघडला आणि श्याम घरात शिरले. "सकाळी कोणाच्याही घरात डास पकडण्यासाठी जाणं सोप नाही. काही लोक एन्ट्री देत नाही," शाम सांगत होते.
ते पुढे म्हणाले, सकाळी लोकांची कामाची तयारी सुरू असते. मुलांची शाळेची गडबड सुरू असते. त्यामुळे लोक नकार देतात. पण आम्ही त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. "अशावेळी मुर्गेश सारख्या स्थानिक कर्मचाऱ्यांची मदत होते. ते लोकांना ओळखत असतात," मग काम सोपं होतं.

फोटो स्रोत, Mayank bhagwat
श्याम यांना काही डास या घरातही मिळाले. आम्ही विचारलं हे काम चॅलेंजिंग आहे? ते म्हणाले, "कोणतंही काम छोटं नाही. मला यात समाधान मिळतं. मी नोकरी करतोय. पण, एक सामाजिक काम माझ्या हातून घडतंय. लोकांना निरोगी राखण्यात माझा हातभार लागतो आणि काय पाहिजे."
सकाळी साडेसहा वाजता सुरू झालेलं डास पकडण्याचं काम साडेआठपर्यंत सुरू होतं. श्याम यांनी एव्हाना 15-20 डास पकडून आपल्याकडील टेस्ट ट्यूबमध्ये टाकून बंद केले होते.
ते सांगतात, "आम्ही डास पकडून आजार प्रतिबंध करण्याचा प्रयत्न करतो. आजार पसरवणारा परजीवी वाहक असलेला डास 7-10 लोकांना चावू शकतो. मी एक डास पकडतो तेव्हा 7-10 लोकांचं आजारापासून संरक्षण करतो. याचं समाधान मिळतं."
लोकांना निरोगी ठेवण्याच्या या कामात काहीवेळा त्यांना घसादुखीचा त्रास सहन करावा लागतो.
ते सांगतात, "भिंतीवरची धूळ, जंतू श्वास आत घेताना जाळीतून आरपार घशात जातात. त्यामुळे, ज्या दिवशी डास पकडतो तो दिवस आणि पुढचे दोन दिवस घशात खवखव होते. मिठाच्या गुळण्या करतो, औषध घेतो. नाहीतर घसादुखी सुरू होते."
डास पकडून पुढे काय करतात?
पकडलेले डास दुपारी श्याम आणि इतर वॉर्डातील इन्सेक्ट कलेक्टर महापालिकेच्या ऑफिसला घेऊन येतात.
कीटकनाशक विभागातील प्रयोगशाळेत डासांचं डायसेक्शन करून तपासणी केली जाते.
दुपारी 12.30 च्या सुमारास शाम सकपाळ किटकनाशक विभागात पोहोचले. त्यांनी एक-एक करून मादी डास मिठाच्या पाण्यात ठेवले.
प्रयोगशाळेतील तज्ज्ञ उषा वाघ यांना आम्ही याबाबत विचारलं. त्या म्हणाल्या, "मिठाच्या पाण्यात ठेवल्यामुळे डासांच्या शरीरात फायलेरियाचे (हत्तीरोग) जंतू असतील. तर ते मायक्रोस्कोपमध्ये जास्त वळवळताना दिसून येतात."

फोटो स्रोत, Mayank bhagwat
डासांचं डोकं आणि छातीच्या भागात हत्तीरोग पसरवणारा जंतू असू शकतो. त्यामुळे डास काचेच्या पट्टीवर ठेऊन त्यांचं डोकं, छातीचा भाग आणि पंख श्याम यांनी वेगळे केले.
त्यानंतर उषा वाघ यांनी तपासणी सुरू केली. "डायसेक्शन झाल्यानंतर 2-3 मिनिटातच परजीवी मरतो. त्यामुळे लगेच तपासणी करावी लागते. नाहीतर परजीवी दिसणार नाही."
श्याम यांनी पकडलेल्या कोणत्याही क्युलेक्स डासात हत्तीरोग पसरवणारा जंतू आढळून आला नव्हता.
पण, मग एखाद्या डासात हा परजीवी आढळून आला तर? पुढे काय केलं? उषा वाघ सांगतात, "ज्या ठिकाणी क्युलेक्स डास मिळतात तिथे धूर फवारणी होते. फायरेलियाचे परजीवी मिळाले तर तीन वेळा फॉगिंग होतं. इनसेक्ट कलेक्टर्स त्याठिकाणी तीन वेळा पुन्हा डास पकडण्यासाठी जातात." हा चार आठवड्याचा कार्यक्रम असतो. कारण डासांचं लाईफ साधारणत: 28 दिवसांचं असतं.
कीटकनाशक अधिकारी म्हणाले, डासांवर धूर फवारणीचा काय परिणाम होतो. हे पाहण्यासाठी डासांना पिंजऱ्यात ठेऊन त्यावर धूर सोडला जातो. जेणेकरून किती मरतात याची चाचपणी केली जाते.
हत्तीरोग काय असतो?
- हत्तीरोगात रुग्णाच्या पायांना सूज येते. त्यामुळे पायाचा आकार बदलतो आणि पाय विदृप दिसतो.
- महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये हत्तीरोगाचं प्रमाण जास्त आहे.
- स्थलांतरीत लोकसंख्या, काम आणि इतर कारणांमुळे वारंवार स्थलांतर करणाऱ्या लोकांमुळे हा रोग एकभागातून दुसऱ्या भागात पसरतो.
- आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यभरात सध्यस्थितीत 29,000 पेक्षा जास्त अॅक्टिव्ह हत्तीरोग रुग्ण आहेत.
- कोरोनानंतर मुंबईत गेल्यावर्षी मोठ्या प्रमाणावर हत्तीरोग पसरवणारे वाहक डास आढळून आले होते.
पालिकेच्या प्रयोगशाळा तज्ज्ञ उषा वाघ याचं कारण सांगताना म्हणाल्या, "कोरोनाकाळात मोठ्या प्रमाणात स्थलांतर झालं. मजूर आपल्या गावी राहिले. त्यानंतर परत आलेले काही लोक बहुदा संक्रमित होते. त्यामुळे आम्हाला गेल्यावर्षी खूप इनफेक्टेड डास आढळून आले होते."
राज्याच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार,
- भारतात 98 टक्के रुग्णांमध्ये हत्तीरोगाचा प्रसार बुचेरिया बॅनक्रॉप्टी या परजीवी कृमींमुळे झालेला आढळून येतो.
- देशातील 250 जिल्हयांमध्ये स्थानिक स्वरुपात लागण झालेल्या हत्तीरोग रुग्णांची नोंद आहे.
- प्रौढ अवस्थेमध्ये हत्तीरोगाचे जंतू लसीका संस्थेच्या वाहिन्यांमध्ये राहतात. लसीका संस्था ही लसीका ग्रंथी आणि लसीका वाहिन्यांची बनलेली यंत्रणा असून ती शरीरातील रोगप्रतिकार शक्ती अबाधित ठेवण्याचे कार्य करते.
- हत्तीरोगाच्या संसर्गक्षम जंतूचा शरीरातील प्रवेश आणि आजाराची लक्षणे दिसण्याचा कालावधी हा 8-16 महिन्यांचा असतो.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








