'हर घर तिरंगा' मोहिमेत लावलेल्या कोट्यवधी झेंड्यांचं आता काय होईल?

झेंडा

फोटो स्रोत, EPA

    • Author, सरोज सिंह,
    • Role, बीबीसी हिंदी

13 ते 15 ऑगस्टदरम्यान तुम्हीसुद्धा आपल्या घरी, कार्यालयात, कार किंवा बाईकवर भारताचा झेंडा लावला असेल.

खरं तर भारतात 15 ऑगस्ट रोजी तिरंगा झेंडा लावण्याची पद्धत पूर्वीपासूनच आहे. पण यंदाच्या वर्षी गोष्ट जरा वेगळी होती.

यंदाच्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 ते 15 ऑगस्ट असे एकूण 3 दिवस झेंडा लावण्याचं आवाहन देशवासियांना केलं होतं.

भारताच्या सांस्कृतिक मंत्रालयाने इतर मंत्रालय तसंच राज्य सरकारांना सोबत घेत यासाठी विविध प्रकारे तयारी केली. या मोहिमेला 'हर घर तिरंगा' असं नाव देण्यात आलं.

या मोहिमेअंतर्गत 20 ते 25 कोटी झेंडे लावण्याचं लक्ष्य प्रशासनाकडून ठेवण्यात आलं होतं.

यावेळी प्रशासनाने म्हटलं, "राष्ट्रध्वजासोबत भारताच्या नागरिकांचं वैयक्तिकपेक्षाही औपचारिक किंवा संस्थात्मक स्वरूपाचं नातं आहे. त्यामुळे या मोहिमेच्या माध्यमातून लोकांचं झेंड्यांसोबतचं नातं अधिक वृद्धिंगत होईल आणि त्यांच्यात देशभक्तीची भावना बळकट होईल."

याच कारणामुळे हर घर तिरंगा मोहिमेत भारतावासीयांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.

किती लोकांनी लावला झेंडा?

झेंडा लावून त्यासोबत आपली सेल्फी अपलोड करावी असं आवाहन देखील सरकारकडून करण्यात आलं होतं.

काहींनी सोशल मीडिया प्रोफाईलवर डिजिटल स्वरूपात झेंडा लावला. काही जणांनी आपलं घर किंवा कार्यालयात तर कुणी वाहनांवर झेंडा लावला.

झेंडा

फोटो स्रोत, EPA

सांस्कृतिक मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, मंगळवारी दुपारी 12 वाजेपर्यंत 6 कोटी जणांनी घरोघरी तिरंगा मोहिमेअंतर्गत झेंडा लावून आपली सेल्फी अपलोड केली होती.

वेबसाईटवर फोटो अपलोड न करता आपली घरे, दुकाने, वाहनं आणि कार्यालयातही अनेकांनी झेंडा लावला. पण मंगळवारी सकाळपर्यंत त्याची आकडेवारी सांस्कृतिक मंत्रालय जमा करू शकलं नाही.

पण ज्या पद्धतीने या मोहिमेचा प्रचार-प्रसार करण्यात आला तसाच प्रत्यक्षपणे झेंडा लावणाऱ्या नागरिकांची संख्याही कोट्यवधींच्या घरात असू शकते.

याचा अंदाज व्यापारी संघटनांच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीवरून येऊ शकतो.

कॉनफेडरेशन ऑफ इंडिया ट्रेडर्स (CAIT) च्या माहितीनुसार, यंदाच्या वर्षी 15 ऑगस्टपर्यंत देशभरातील व्यापाऱ्यांनी वेगवेगळ्या आकारांचे सुमारे 30 कोटी झेंडे विकले. झेंड्यांचा एकूण व्यवसाय सुमारे 500 कोटी रुपयांचा झाल्याचा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.

इतक्या झेंड्यांची विक्री झाली आहे, तर त्यांना सांभाळून ठेवणं हीसुद्धा आपली जबाबदारी आहे. कारण, तिरंगा झेंडा हा प्रत्येक भारतीयाच्या आन-बान-शान चं प्रतीक आहे.

याच कारणामुळे 15 ऑगस्टनंतर या झेंड्यांचं आता नेमकं काय करायचं, हा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

झेंडे जमा करण्यासाठी पुढाकार

याचं उत्तर समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी ट्विटरवर एक पोस्टर शेअर करून दिलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलंय, "15 ऑगस्टनंतर झेंड्याचं काय करायचं? घाबरू नका. ला मार्टिनअर गर्ल्स कॉलेज, लखनौ कॉलेजकडे याचं उत्तर आहे. आम्ही राज्यभरातील विविध शहरांतील रहिवासी भाग, घरे, इतर संस्था आणि रस्त्यांवरून जमा केलेले झेंडा जमा करत आहोत. वापरलेले झेंडे तुम्ही आम्हाला पोस्टामार्फतही पाठवू शकता."

ला मार्टिनिअर गर्ल्स कॉलेजच्या प्राचार्य आश्रिता दास यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की घरोघरी तिरंगा मोहिमेत अशा प्रकारे सहभाग नोंदवण्याचा निर्णय महाविद्यालयाचा होता. या निर्णयात राज्य सरकारचा सहभाग नाही.

त्या म्हणाल्या, या पुढाकाराबद्दल आम्ही स्थानिक महानगरपालिका प्रशासनालाही कळवलं आहे. याविषयी जनजागृती करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे.

आश्रिता दास यांच्या मते, 15 ऑगस्टच्या संध्याकाळीच त्यांनी यासंबंधित पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं.

झेंडा जमा करण्यासाठी

फोटो स्रोत, Social media

ही फक्त सुरुवात आहे. आम्हाला इतकाही चांगला प्रतिसाद मिळाला नाही. पण आम्ही महापालिका आणि इथे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांशी याविषयी चर्चा केली आहे," असंही त्या म्हणाल्या.

ला मार्टिनिअर गर्ल्स कॉलेजप्रमाणेच इंडियन ऑईल कंपनीच्या मुंबई शाखेनेही फ्लॅग कलेक्शन ड्राईव्हची सुरुवात केली आहे.

तुम्ही मुंबई परिसरात राहत असाल, तर इंडियन ऑईलच्या पेट्रोल पंपावर जाऊन झेंडा जमा करू शकता.

याच धर्तीवर माय ग्रीन सोसायटी नामक एका NGO नेसुद्धा झेंडे जमा करण्यासाठीचं उपक्रम सुरू केलं आहे.

खासगी पातळीवर सुरू करण्यात आलेले हे काही उपक्रम आहेत. केंद्र किंवा राज्य सरकारकडून यासंदर्भात कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

नियम काय सांगतो?

झेंड्याचा वापर झाल्यानंतर ते जमा करून घेत असलेल्या व्यक्ती किंवा संस्थांकडे जाणं हा एकच पर्याय आपल्यासमोर आहे, असं बिलकुल नाही.

सर्वसामान्य नागरिक स्वतः काही गोष्टी लक्षात ठेवून झेंडा योग्य प्रकारे नष्ट करू शकतात.

झेंडा जमा करण्यासाठी मोहीम

फोटो स्रोत, SOCIAL MEDIA

इंडियन फ्लॅग फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी असीम कोहली यांच्या मते, हर घर तिरंगा मोहिमेबाबत अनेक प्रकारचे गैरसमज पसरले आहेत.

बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, "लोकांच्या मनात चुकीची धारणा आहे की झेंडा केवळ 13 ते 15 ऑगस्टपर्यंतच लावायचा आहे. केंद्र किंवा राज्य सरकारकडून झेंडा 15 ऑगस्टनंतर उतरवायलाच हवा, असं कधीच सांगण्यात आलं नाही, हे सर्वप्रथम जनतेने लक्षात घ्यावं."

ते म्हणतात, "भारतात वर्षाचे 365 दिवस घरात किंवा कार्यालयात झेंडा लावण्याची परवानगी जनतेला आहे. सुप्रीम कोर्टाच्या 2004 च्या निर्णयानंतर हे शक्य झालं. याचमुळे 15 ऑगस्टनंतर झेंडा घरांवरून उतरवणं हे काही अनिवार्य नाही. आपल्या इच्छेनुसार ते आहे तिथेच लावून ठेवता येऊ शकतं."

पण, झेंडा हवेमुळे फाटला किंवा खराब झाला, किंवा इतर कारणामुळे त्यावर घाण जमा झाल्यास फ्लॅग कोड 2002 (भारतीय झेंडा संहिता) अंतर्गत ते नष्ट करता येतं.

भारतीय झेंडा संहिता 2002 मध्ये बनवण्यात आली होती. त्यामध्ये 2021 मध्ये काही बदल करण्यात आले आहेत.

फ्लॅग कोड

फोटो स्रोत, FLAG CODE 2022

फ्लॅग कोड अंतर्गत झेंडा फाटला किंवा त्यावर घाण साठली तर एकांतात ते नष्ट करता येतं. आपल्या योग्य वाटेल त्या पद्धतीने आदरपूर्वकपणे ते नष्ट करता येतं. पण हे करत असताना त्याचे अवशेष छिन्नविछिन्न स्वरुपात राहणार नाहीत, याची काळजी घ्यावी.

याबाबत बोलताना असीम कोहली सांगतात, "काही जणांसाठी आदरपूर्वक पद्धत दफन करणं असू शकते. काहींसाठी गंगेत वाहून देणं असू शकतं. तर काही लोकांसाठी ते अग्नीच्या स्वाधीन करून नष्ट करणंही असू शकतं. पण कोणत्याही प्रकारे तुम्ही झेंडा नष्ट करत असताना तो एकांतात करावा. त्याचा व्हीडिओ कधीही बनवू नये."

"हे काम आपण आपल्या घरात एकांतात योग्य पद्धतीने करू शकतो. त्यासाठी झेंडा जमा करणाऱ्यांकडेच जायला हवं, याची काहीही आवश्यकता नाही," असं कोहली सांगतात.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)