नाना पटोले : भाजपच्या 'वंदे मातरम्'नंतर आता काँग्रेसकडून 'जय बळीराजा' #5मोठ्याबातम्या

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा -

1. भाजपच्या 'वंदे मातरम्'नंतर आता काँग्रेसकडून 'जय बळीराजा'

महाराष्ट्रातील सगळ्या सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी फोन संवादादरम्यान हॅलोऐवजी 'वंदे मातरम्' म्हणावं, असा आदेश सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला होता.

यासंदर्भात विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत असतानाच काँग्रेसकडून या घोषणेवर आगळ्यावेगळ्या स्वरुपाची भूमिका मांडली जात आहे.

काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकमेकांना भेटताना तसंच जनतेशी संवाद साधताना जय बळीराजा म्हणावं, अशी सूचना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्विट करून केली. लोकमतने याबाबत बातमी दिली आहे.

नाना पटोले म्हणाले, "राष्ट्रगीत - वंदे मातरम् हा आमचा स्वाभिमान आहे. मात्र बळीराजा हा जगाचा पोशिंदा आहे. म्हणून यापुढे राज्यातील काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी आपापसांत भेटताना जय बळीराजा म्हणावं."

2. अजितदादांना त्रास, कारण मागचं सरकार तेच चालवत होते - एकनाथ शिंदे

"हे सर्वसामान्यांचं सरकार आहे ही भावना जनतेच्या मनात तयार झाली आहे. मात्र अजितदादांना त्रास होणं स्वाभाविक आहे, कारण मागचं सरकार तर तेच चालवत होते, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर टीका केली आहे.

महाराष्ट्र सरकारवर अजित पवार यांनी नुकतीच टीका केली होती. या सरकारच्या काळात केवळ स्थगिती देण्यात येत आहे, याकडेही पवारांनी लक्ष वेधलं होतं. त्याला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे यांनी पवार यांच्यावर निशाणा साधला.

ते म्हणाले, "लोकशाहीत तत्त्वं असतात, भूमिका असते, विचार असतो. आमचं सरकार एका भूमिकेतून, बाळासाहेबांच्या भूमिकेतून स्थापन झालं आहे. आमची भूमिका जनतेला पटली नसती तर आज राज्यभरात आमच्या आमदार-खासदारांचं स्वागत झालं असतं का?"

पण, सरकार चुकीचं काम करत असेल तर सल्ला देण्याचा अधिकार नक्कीच विरोधकांना असल्याचंही शिंदे यावेळी म्हणाले. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली.

3. राज्यात 75 वर्षावरील नागरिकांना ST बसचा प्रवास मोफत

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वयाची 75 वर्षं पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन सेवेच्या बसेस (ST) मधून मोफत प्रवास करता येणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भातील घोषणा मंगळवारी (16 ऑगस्ट) केली आहे.

यापूर्वी नागरिकांना प्रवासात 50 टक्के सवलत देण्यात येत होती. परंतु यामध्ये बदल करून 75 वर्षांवरील नागरिकांना राज्य सरकारने आनंदाची बातमी दिली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनुसार, 15 ऑगस्ट 2022 रोजी वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांना एसटी बसचा प्रवास पूर्णपणे मोफत असणार आहे. त्यांना तिकिटाचा कोणत्याही स्वरुपाचा दर आकारण्यात येणार नाही. ही बातमी साम टीव्हीने दिली.

4. रतन टाटांची वृद्धांसाठीच्या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक

उद्योजक रतन टाटा यांनी वृद्धांसाठीच्या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. गुडफेलो असं या स्टार्टअपचं नाव असून याची स्थापना शंतनू नायडू या युवा उद्योजकाने केली आहे.

रतन टाटा यांच्याकडून केली जाणारी गुंतवणूक नेमकी किती आहे, याबाबतची माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

या घोषणेची माहिती देताना शंतनू नायडू म्हणाले, "जगात 15 दशलक्ष वृद्ध लोक आहेत, जे एकटे आहेत, ही गुडफेलोसाठी एक संधी आहे. या वडिलांचे सोबती म्हणून, गुडफेलोज तरुण पदवीधरांना नियुक्त करतात ज्यांच्याकडे संवेदनशीलता आणि भावनिक बुद्धिमत्ता आहे. योग्य जोडीदार निवडण्यासाठी मानसशास्त्रज्ञाची मदत घेतली जाईल."

गेल्या सहा महिन्यांत कंपनीने मुंबईत 20 वयोवृद्ध नागरिकांना या स्टार्टअपमार्फत जोडलं आहे. लवकरच पुणे, चेन्नई आणि बंगळुरू येथे विस्तार करण्याची कंपनीची योजना आहे. ही बातमी एबीपी माझाने दिली.

5. CNG सहा रुपयांनी तर PNG चार रुपयांनी स्वस्त

मुंबई महानगर गॅस लिमिटेडकडून इंधनाचे नवे दर जाहीर करण्यात आले आहेत.

यामध्ये सर्वसामान्यांना दिलासा देण्यात आला असून CNG आणि PNG च्या दरात कपात करण्यात आली आहे.

नव्या दरपत्रकानुसार, CNGच्या दरात सहा रुपये प्रति किलो तर PNGच्या दरात चार रुपये प्रति किलो कपात करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, 2 ऑगस्ट रोजी सीएनजीच्या दरात सहा रुपयांची तर पीएनजीच्या दरात चार रुपयांची वाढ करण्यात आली होती.

त्यानंतर आता या दरात पुन्हा कपात करण्याचा निर्णय महानगर गॅस लिमिटेडने (MGL) घेतला आहे. आजपासून इंधनाचे नवे दर लागू होतील, असं कंपनीने सांगितलं आहे. ही बातमी ईटीव्ही भारतने दिली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)