किशोरी पेडणेकर : '100 व्या स्वातंत्र्यदिनी आदित्य ठाकरे दिल्लीतून येऊन ध्वजारोहण करतील' #5मोठ्याबातम्या

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :

1. 100 व्या स्वातंत्र्यदिनी आदित्य ठाकरे दिल्लीतून येऊन ध्वजारोहण करतील- किशोरी पेडणेकर

देशभरात सर्वत्र ध्वजारोहणसह विविध कार्यक्रमांद्वारे स्वातंत्र्यदिन साजरा केला गेला. स्वातंत्र्याला 75 वर्षं पूर्ण झाल्यानिमित्त शिवसेना भवनात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

स्वातंत्र्याला 50 वर्षं पूर्ण झाल्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याहस्ते शिवसेनाभवनामध्ये ध्वजारोहण करण्यात आले होते.

या पार्श्वभूमीवर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी एक विधान केले आहे. 100 व्या स्वातंत्र्यदिनी आदित्य ठाकरे दिल्लीतून येऊन ध्वजारोहण करतील असं त्या म्हणाल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यातून केलेल्या भाषणात घराणेशाहीवर भाष्य केले. किशोरी पेडणेकर यांनी घराणेशाहीबद्दल फक्त ठाकरे घराण्यालाच का विचारताय असा प्रश्न करुन भाजपातही मुलाला-मुलीला संधी दिली जाते असं म्हटलं आहे. ही बातमी लोकमतने प्रसिद्ध केली आहे.

2. हात तोडता आला नाही तर पाय तोडा- प्रकाश सुर्वे

शिवसेनेतील दोन गटांमध्ये निर्माण झालेला बेबनाव आता धमक्यांवरुन प्रक्षोभक भाषेपर्यंत पोहोचला आहे. एकमेकांना बघून घेऊची भाषा आता पुढच्या टप्प्यावर गेली आहे.

ठाकरे गटातील नेत्यांकडून होणारी विधाने संपल्यावर आता शिंदे गटाच्या आमदारांनीही अशाच प्रकारची भाषा सुरू केली आहे.

झी चोवीस तास या संकेतस्थळाने ही बातमी प्रसिद्ध केली आहे.

शिवसेनेचे मागाठाणे मतदारसंघाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी असेच विधान केले आहे.

एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, "आपण गाफिल राहायचं नाही. यांना यांची जागा दाखवून द्यायची. कुणी आरे केले तर त्याला कारे करा आणि ठोकून काढा प्रकाश सुर्वे इथे बसला आहे. हात नाही तोडता आला तर पाय तोडा. दुसऱ्या दिवशी टेबल जामीन करुन देतो."

"आम्ही कुणाच्या अंगावर जाणार नाही. पण आमच्या अंगावर कुणी आले तर त्याला शिंगावर घेऊन कोथळा फाडल्याशिवाय राहणार नाही," असा इशारा प्रकाश सुर्वे यांनी दिला.

3. मुंबईत इमारतीचा स्लॅब कोसळून वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू

मुंबईतील मुलुंडमधील नाणेपाडा परिसरामध्ये एका इमारतीचा स्लॅब कोसळण्याची घटना घडली आहे. यामध्ये देवशंकर शुक्ला (93) आणि आरती शुक्ला (87) या दाम्पत्याचा मृत्यू झाला.

ही इमारत पालिकेकडून अतिधोकादायक म्हणून घोषित करण्यात आली होती. घटना घडल्यावर अग्निशमन दल तसेच इतर पालिकेचे आपत्कालिन पथक तेथे पोहोचले. या दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत.

घटनेननंतर इमारतीमधील इतर रहिवाशांना इतरत्र हलवण्यात आले.

ही बातमी लोकसत्ताने प्रसिद्ध केली आहे.

4. 38 वर्षांनंतर सापडला जवानाचा मृतदेह

1984 साली झालेल्या ऑपरेशन मेघदूतमधील जवानाचा मृतदेह 38 वर्षांनंतर सापडला आहे.

लान्सनायक चंद्रशेखर हरबोला यांचे मेघदूत मोहिमेच्यावेळेस झालेल्या हिमवादळात मृत्यू झाला होता. ही घटना 29 मे 1984 रोजी घडली होती.

16 हजार फुटांपेक्षा जास्त उंचीवर सियाचीन येथे एक मृतदेह सापडला. तपासणीनंतर तो चंद्रशेखर यांचा असल्याचे स्पष्ट झाले. आता त्यांचे पार्थिव उत्तराखंडला नेऊन त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ही बातमी सामनाने प्रसिद्ध केली आहे.

5. बिल्किस बानो प्रकरणातील 11 दोषींची सुटका

बिल्किस बानो बलात्कार प्रकरणातील 11 दोषींची सुटका करण्यात आली आहे. गुजरात सरकारच्या माफी धोरणानुसार ही सुटका झाल्याचे सांगण्यात येत आहे.

मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने 21 जानेवारी 2008 रोजी बिल्किस बानोच्या कुटुंबातील सात सदस्यांवर सामूहिक बलात्कार आणि हत्या केल्याच्या आरोपाखाली अकरा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

या दोषींच्या सुटकेबद्दल एक समिती स्थापन करण्यात आली. समितीने दिलेल्या निर्णयानुसार पुढील कार्यवाही करण्यात आली.

ही बातमी सकाळने प्रसिद्ध केली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)