You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
धनंजय मुंडे यांच्याबद्दल देवेंद्र फडणवीस सावध भूमिका घेत आहेत का?
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेनं बलात्काराचा आरोप केला आणि महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. त्यातही धनंजय मुंडे यांनी फेसबुकद्वारे दिलेल्या स्पष्टीकरणामुळे आणखीच नवे प्रश्न निर्माण झालेत.
धनंजय मुंडे यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यावर बलात्काराचे आरोप झाल्यानं विरोधी पक्षात असलेल्या भारतीय जनता पक्षाकडूनही टीकेची झोड उठण्यास सुरुवात झाली.
लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही, त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
भाजपच्या महिला मोर्चानंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी केली आहे.
"या सर्व प्रकरणात धनंजय मुंडे जोपर्यंत मुक्त होत नाहीत, तोपर्यंत त्यांना मंत्रिमंडळात राहण्याचा कुठलाही अधिकार नाही," असं किरीट सोमय्या म्हणालेत.
या प्रकरणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. पण भाजपच्या इतर नेत्यांप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली नाहीये. किंबहुना त्यांनी याप्रकरणी जी भूमिका घेतली त्यामुळे अनेकांच्या भुवयाही उंचावल्या आहेत.
धनंजय मुंडेबद्दल देवेंद्र फडणवीस हे नरमाईची भूमिका घेत आहेत का? आणि जर तसं असेल तर फडणवीसांच्या या मवाळ भूमिकेमागचं कारण काय आहे? हे प्रश्न त्यामुळे उपस्थित होत आहेत.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
नाशिक इथे एका पुस्तक प्रकाशनासाठी आलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त केली.
पत्रकारांशी बोलताना त्यांनी म्हटलं, "धनंजय मुंडे यांनी कबुली दिली आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी व्हायला हवी. चौकशी झाल्यावरच आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू."
"नैतिकतेच्या आधारावर त्यांच्या पक्षानं मुंडेंच्या कबुलीसंदर्भात विचार करायला हवा. यातली कायदेशीर बाब धनंजय मुंडे, तक्रारदार तरूणी या दोघांनीही मांडली आहे. पोलिसांनी याबद्दलचे सत्य बाहेर आणावे. सत्य बाहेर आल्यानंतर आम्ही आमची मागणी करू," असंही फडणवीस यांनी म्हटलं.
एकूणच फडणवीस यांनी थेट धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी तर केली नाहीयेच, पण नैतिकतेचा आधार घेत मुंडेंच्याच पक्षानं म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रसनंच काय तो विचार करावा, असंही सूचित केलं.
धनंजय मुंडेंची 'त्या' शपथविधीमधली भूमिका
23 नोव्हेंबर 2019 ला पहाटे देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या साथीनं मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.
या शपथविधीपूर्वी ज्या काही हालचाली घडल्या होत्या, त्यात एक महत्त्वाचं केंद्र होतं ते नरिमन पॉइंटमधला B4 हा बंगला. हे धनंजय मुंडे यांचं निवासस्थान होतं.
इथेच अजित पवार यांनी काही आमदारांना महत्त्वाची चर्चा करण्यासाठी बोलावलंआणि इथूनच ते त्यांना राजभवनावर घेऊन गेले असा त्यावेळी अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांचा दावा होता.
या घटनाक्रमात धनंजय मुंडे यांचं नाव सातत्यानं येत राहिलं. मग शोध सुरू झाला तो धनंजय मुंडे कुठे आहेत याचा. प्रसारमाध्यमांमध्ये ते नॉट रिचेबल असल्याचं वृत्त आलं. त्यांच्याबरोबर काही आमदार असल्याच्याही चर्चा मीडियात सुरू झाल्या.
या नाट्यामध्ये त्यांनी नेमकी काय भूमिका बजावली असेल याची चर्चा सुरू झाली. मात्र नंतर धनंजय मुंडेंनी आपण राष्ट्रवादीत असल्याचं सांगितलं आणि शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या यशवंतराव चव्हाण सेंटर इथल्या बैठकीलाही हजेरी लावली.
पण तरीही या प्रकरणातल्या धनंजय मुंडेच्या भूमिकेबद्दलचं कोडं उलगडलं नाही. त्यावेळी (देवेंद्र फडणवीस-अजित पवार शपथविधीनंतर) बीबीसी मराठीनं फ्री प्रेस वृत्तपत्राचे राजकीय संपादक प्रमोद चुंचुवार यांना याबद्दल विचारलं असता त्यांनी सांगितलं होतं की, "धनंजय मुंडे यांचे देवेंद्र फडणवीसांशी उत्तम संबंध आहेत. काही दिवसांपूर्वी अजित पवार आणि धनंजय मुंडे यांना 'वर्षा' बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांनी बोलावलं होतं. त्यावेळी रात्री दीड वाजता धनंजय मुंडे आणि अजित पवार हे दोघेही तिथं गेले होते.
त्यामुळे या सर्व घडामोडींमध्ये त्यांचा रोल असेल हे नक्की. कारण त्यांच्या बंगल्यातच सर्व लोकांना बोलावण्यात आलं होतं. ते अजित पवार यांचे कट्टर समर्थक मानले जातात."
देवेंद्र फडणवीसांनी धनंजय मुंडेंवर होत असलेल्या आरोपांबद्दल जी भूमिका घेतली त्यामुळे या सर्व घटनाक्रमांना उजाळा मिळाला आणि फडणवीस मुंडेंना पाठिशी घालत आहेत का हा प्रश्नही निर्माण झाला.
'कायदेशीर बाबी तपासून केलेलं वक्तव्यं'
या प्रश्नाचं उत्तर देताना ज्येष्ठ पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांनी म्हटलं, "धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रितपणे युवा मोर्चाचे काम केलेलं आहे. तेव्हापासून त्यांचे चांगले संबंध असल्याचं सर्वश्रुत आहे. पंकजा मुंडे या परळीतून विधानसभा निवडणूक हरल्या तेव्हा फडणवीसांनी धनंजय मुंडे यांना मदत केली असा आरोपही त्यांच्यावर पंकजा मुंडे यांनी अप्रत्यक्षपणे केला होता.
याचबरोबर जेव्हा अजित पवार यांनी फडणवीसांबरोबर शपथ घेतली होती तेव्हाही धनंजय मुंडे त्यांच्यासोबत होते. त्यामुळे राजकारणात घनिष्ठ संबंध आणि त्यातून निर्माण होणारी आशा दिसत असते. ती यावेळी फडणवीसांच्या वक्तव्यातून दिसून येते."
सूर्यवंशी यांनी पुढे म्हटलं, "त्यांचे 'त्या' महिलेशी विवाहबाह्य संबंध होते. पण त्यांचं लग्न त्या महिलेशी लग्न झालेलं नाही. त्यामुळे हे प्रकरण कायदेशीरदृष्ट्या सिध्द होण्याची शक्यता नसल्याची फडणवीस यांना माहिती असेल. ते वकील आहेत. त्यांनी कायदेशीर बाबी तपासून मुंडे यांच्या पदाला धोका निर्माण होणार नाही याची खात्री पटल्यावर हे वक्तव्य केलं असू शकतं."
'मुंडेशी असलेले संबंध महत्त्वाचे वाटल्याची शक्यता'
फडणवीस आणि धनंजय मुंडे हे एकत्रित मोठे झालेले नेते आहेत. त्यामुळे फडणवीस यांना धनंजय मुंडेंबाबत सहानुभूती असू शकते, असं मत 'लोकमत'चे वरिष्ठ सहायक संपादक संदीप प्रधान यांनी व्यक्त केलं.
संदीप प्रधान यांनी म्हटलं, "धनंजय मुंडे हे मूळचे भाजपचे आहेत. ते राष्ट्रवादीमध्ये असले तरी त्यांचे मूळचे संस्कार भाजपचे आहे. गोपीनाथ मुंडेच्या नेतृत्वात फडणवीस यांनीही काम केलं आहे. मुंडेचा वारसदार कोण? हा प्रश्न जेव्हा समोर आला तेव्हा धनंजय मुंडे राष्ट्रवादीत गेले."
"पंकजा मुंडे या कायम महाराष्ट्र भाजपमध्ये फडणवीस यांच्या प्रतिस्पर्धी राहिलेल्या आहेत. त्यांच्यातलं शीतयुद्ध सर्वांना माहिती आहे. त्यासाठी धनंजय मुंडे यांच्याशी असलेले संबंध जपणं फडणवीसांना महत्त्वाचं वाटलं असेल म्हणून फडणवीस यांनी सावध भूमिका घेतली असू शकते, असं संदीप प्रधान यांनी म्हटलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)