पालघर: हॉस्पिटलला जायला वाटच नसल्याने महिलेची रस्त्यातच प्रसुती, जुळी मुलं दगावली

    • Author, दीपाली जगताप
    • Role, बीबीसी मराठी

पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात 'रस्ता नसल्याने दोन जुळ्या बालकांचा मृत्यू' झाल्याची घटना घडली आहे.

मोखाडा तालुक्यातील मरकटवाडी पाड्यात वंदना बुधर यांच्या दोन जुळ्या मुलांची प्रसूती घरीच करावी लागली आणि त्यावेळी त्यांच्या जुळ्या बालकांचा मृत्यू झाला.

प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाण्यासाठी रस्त्या नसल्याने महिलेला झोळीतून 3 किमी पायपीट करून दवाखाना गाठावा लागला.

एक मुलगी आणि एक मुलगा-जुळ्या बालकांचा मृत्यू

सात महिने गरोदर असलेल्या वंदना बुधर यांना शुक्रवारी (13 ऑगस्ट) अचानक पोटात दुखायला लागलं. पण घरापासून, पाड्यातून दवाखान्यापर्यंत पोहचण्यासाठी रस्ताच नसल्याने त्यांची मोठी अडचण झाली.

सातव्या महिन्यातच पोटात कळा सुरू झाल्याने आधीच परिस्थिती गंभीर होती. त्यात डॉक्टरांकडे जायचं कसं हा प्रश्न होता. पालघर येथील स्थानिक सामाजित कार्यकर्ते तुकाराम पवार यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "मरकटवाडी पाड्यातून जाण्यासाठी रस्ता नसल्याने झोळी करून न्यायची वेळ येते. त्यामुळे उपचार मिळण्यासाठी उशीर होतो. 13 ऑगस्टला आम्ही 108 नंबरवर फोन करून अॅम्ब्यूलन्स बोलवली पण झोळी करेपर्यंत महिलेने मुलांना जन्म दिला. पुढच्या काही वेळात दोन्ही मुलं दगावली."

यात एक मुलगा आणि एक मुलगी अशी जुळी बालकं दगावली आहेत. एका नवजात बालकाचं वजन 1 किलो 200 ग्राम होतं तर दुसऱ्याचं वजन 2 किलो होतं.

या घटनेनंतर महिलेला डॉक्टरांकडे नेण्याची गरज होती. रस्ता नसल्याने झोळीतून महिलेला दवाखान्यात न्यावं लागलं.

मरकटवाडी पाड्याकडे जाण्यासाठी एकही पक्का रस्ता नाही. पाड्यातून तीन किलोमीटर पायी चालत मुख्य रस्त्यापर्यंत पोहचावं लागतं. मग तिथून साधारण 8 ते 10 किमी अंतरावर असलेल्या आरोग्य केंद्रात पोहचता येतं.

'आम्ही गाडी पाठवतो पण...'

मोखाडा तालुक्याचे आरोग्य अधिकारी डॉ. भाऊसाहेब छत्तर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "वंदना बुधर यांची साधारण दोन वर्षांपूर्वी एक प्रसूती प्राथमिक आरोग्य केंद्रात झाली आहे. यावेळेसही त्यांचं नाव आपल्याकडे नोंदवलेलं आहे. परंतु शनिवारी त्यांना अचनाक त्रास होऊ लागला. त्यांच्या पाड्यातून बाहेर येण्यासाठी रस्ताही नाही. त्यामुळे आपण गाडी पाठवली तरी घरापर्यंत जात नाही."

"जिथपासून पक्का रस्ता तयार होतो तिथे गाडी किंवा अँब्युलन्स पाठवतो. पण गावकऱ्यांना तीन किलोमीटर पायी चालत गाडीपर्यंत यावं लागतं. ही घटना दुर्देवी आहे. पण यावेळेस या महिलेने आम्हाला कळवलं नाही. आपल्याकडे तालुक्यात 4 अँम्ब्यूलन्स आहेत पण त्यांनी फोन केला नाही. कदाचित तशी परिस्थिती नसेल," असंही ते सांगतात.

मरकटवाडी सुमारे 20 घरांचा छोटा पाडा आहे. असे सात ते आठ पाडे या भागात आहेत.

आरोग्य अधिकारी सांगतात, मोखाडा तालुक्यात असे अनेक पाडे आहेत जिथे पोहण्यासाठी पक्का रस्ता नाही. पावसाळ्यात परिस्थिती आणखी कठीण होते कारण गावांशी संपर्क तुटतो.

"आमच्याकडे गरोदर महिलांची नोंदणी झालेली असते. त्यानुसार आम्ही त्यांची तपासणी करतो. रस्ते नसलेल्या पाड्यांमध्ये गरोदर महिला असल्यास आम्ही विशेष लक्ष देतो. प्रसूतीची तारीख जवळ आली असल्यास आम्ही आठवडाभर आधीच त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रांत दाखल करून घेतो. पण या केसमध्ये संबंधित महिलेला सातव्या महिन्यातच त्रास होऊ लागला. सगळं अचानक घडलं."

'20 वर्षांपासून रस्ता बांधण्यासाठी प्रस्ताव दिला आहे पण'

आम्ही गेल्या 20 वर्षांपासून 3 किलोमीटर रस्त्यासाठी प्रस्ताव पाठवतोय असंही तुकाराम पवार सांगतात.

ते म्हणाले, "14 ऑगस्टला सुद्धा आम्ही आमच्या पाड्यातील आणखी एका गरोदर महिलेला झोळीतून दवाखान्यात नेलं. त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलं आहे. दरवेळी अशाच प्रकारे झोळीतून 3 किमी प्रवास करावा लागतो. पण रस्ता काही बांधत नाहीत. आम्ही रस्त्यासाठी अनेकदा प्रस्ताव दिले आहेत."

"रस्त्याच्या प्रस्तावाचं पुढे काही होत नाही. इथे कोणी आमदार, खासदार भेटी सुद्धा देत नाहीत." असंही पवार सांगतात.

आदिवासी मंत्र्यांचं आश्वासन

पालघरची घटना दुर्देवी आहे अशी प्रतिक्रिया आदिवासी मंत्री विजयकुमार गावित यांनी दिली आहे.

ते म्हणाले, "100 लोकसंख्या असलेल्या नागरी वस्तीसाठीही रस्ते करणार. केंद्राच्या पंतप्रधान योजनेअंतर्गत निधी आणला जाईल. राज्य सरकारच्याअंतर्गत उपक्रम राबवून आदिवासी भागात रस्त्यांचे जाळं तयार करणार." अशी घोषणा विजयकुमार गावित यांनी केली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)