फॉरेस्ट गंपमधल्या अॅडल्ट सिनचं लालसिंह चढ्ढामध्ये काय झालं? आमिर खान म्हणतो...

    • Author, मधु पाल
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

गेल्या काही महिन्यांमध्ये बॉलीवूडमध्ये अनेक सिनेमे प्रदर्शित झाले पण त्यातले फारच थोडे सिनेमे चालले. पण आमिर खानचं मत मात्र वेगळं आहे.

मुंबईत झालेल्या एका पत्रकारपरिषदेत आमिर म्हणाला, असं काही नाहीये...गंगूबाई, भूलभुलैय्या 2, काश्मीर फाइल्स, पुष्पा, आरआरआर हे सर्व सिनेमे चालले.

आमिर खान म्हणतो, या सिनेमांनी 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त व्यवसाय केला आहे.

सिनेमे न चालण्यामागे एक आणखी कारण असल्याचं तो सांगतो. ते म्हणजे ओटीटी.

आमिर सांगतो, लोकांना वाटतं की थोडं थांबलं तर आपल्याला घरीच सिनेमा पाहाता येईल.

ज्या चित्रपटांची चर्चा होतो ते पाहाण्यासाठी लोक चित्रपटगृहात नक्कीच जातात असं आमिरला वाटतं आणि त्यामुळेच आपल्या सिनेमांसाठी त्यानं वेगळा विचार केला आहे.

तो सांगतो, "मी पहिले सहा महिने सिनेमा ओटीटीवर आणणारच नाही. मी तो चित्रपटगृहासाठी तयार केलेला आहे. लोकांनी चित्रपटगृहात जाऊनच तो पाहावा असं मला वाटतं. ओटीटीसाठी संधी मिळाली तर मी नक्की काहीतरी करेन. ओटीटीवर असं भागांमध्ये काम करायला मजा येते. पण सिनेमा करत असेन तर तो असाच करेन."

लोक चित्रपटगृहापर्यंत कसे येणार? ही सर्वात मोठी चिंता

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियाला 'बॉयकॉट लाल सिंह चड्ढा' ट्रेंड होत आहे, त्यामुळे आमिर खानही थोडे त्रस्त आहे.

तो म्हणतो, "मला फक्त एकच काळजी लागून राहिलेली असते ती म्हणजे एवढ्या कष्टाने आम्ही सिनेमा तयार केलाय आणि तो पाहायला लोकांनी चित्रपटगृहापर्यंत यावं."

57 व्या वर्षी 18 वर्षाच्या तरुणाची भूमिका करण्याचं आव्हान

गेल्या 30 वर्षांपासून वेगवेगळ्या भूमिका करणाऱ्या आमिर खानचं म्हणणं आहे की लालसिंह चढ्ढाची भूमिका त्याच्या कारकिर्दीतली सर्वात कठीण भूमिका होती.

तो म्हणतो, "हा एक हॉलिवूडमधला फॉरेस्ट गंप सिनेमाचा रिमेक आहे. त्याच्या कथानकामुळे अनेक ठिकाणी चित्रीकरण करावं लागलं ही सर्वांत मोठी समस्या होती. सिनेमात जो पळण्याचा सिन आहे त्याचं चित्रिकरण करायलाच मला दोन महिने गेले. सिनेमा असा फिरत भटकतच पूर्ण केला. एका जागेवर असा एकही सिन चित्रित झालेला नाही."

तो पुढे म्हणाला, "दुसरा एक प्रश्न होता तो म्हणजे वयाचा. मी 57 वर्षांचा आहे. पण जी भूमिका मी यात केलीय ती 18 वर्षाच्या मुलाची, कधी 22 व्या वर्षांच्या, कधी 30 वर्षांच्या कधी 50 वर्षांच्या माणसाची. मला प्रत्येक वयाचं दाखवलं गेलंय. तंत्रज्ञानामुळे वय कमी दिसण्यात थोडीशी मदत झाली."

लाल सिंह चढ्ढा हा सिनेमा हुबेहुब फॉरेस्ट गंपसारखा आहे का?

यावर आमिर खान म्हणाला, नाही पूर्ण आहे तसं हुबेहूब कथानक नाही. आम्ही तो भारतीय संस्कृतीनुरुप बनवला आहे. मूळ सिनेमात जे प्रौढांचे सिन होते ते आम्ही ठेवले नाहीत. कारण हा सिनेमा कुटुंबांनी एकत्र पाहावं असं माझं आणि आमच्या दिग्दर्शकांचं मत होतं. या सर्व गोष्टी लक्षात ठेवून आम्ही ते सिन काढून टाकले. कथानकात केलेला हा आम्ही मोठा बदल आहे."

जुनैदला करायचा होता सिनेमा

आमिर खानचा मुलगा जुनैद हा या सिनेमामधून बॉलिवूडमध्ये प्रदार्पण करणार होता. पण तसं झालं नाही.

याबद्दल आमिर खान म्हणाला, "माझा मुलगा जुनैद थिएटर समजून घेण्यासाठी अमेरिकेला गेला होता. दोन वर्षांचा कोर्स पूर्ण केल्यावर तो भारतात आला तेव्हा मी या सिनेमाची तयारी करत होतो."

"जुनैदचे लाल सिंहचे काही सीन शूट करुया असं मी दिग्दर्शकांना सुचवलं होतं, जेणेकरुन तो काय शिकून आलाय हे समजेल. त्याच्या कामानं आम्ही प्रभावित झालो. पण जुनैद हा 'महाराजा' या सिनेमातून प्रदार्पण करणार आहे."

किरण रावने का नाकारलं?

घटस्फोटानंतरही आमिर आणि किरण राव एकत्र काम करताना दिसतात.

धोबी घाटसारख्या सिनेमांचं दिग्दर्शन करणारी किरण राव लवकरच लापता लेडीज नावाचा सिनेमा दिग्दर्शित करणार आहे.

प्रत्येक सिनेमाप्रमाणे आमिर खान याही सिनेमात असेल का?

आमिर खान म्हणतो यावेळेस किरण रावने 'रिजेक्ट' केलं आहे.

तो म्हणाला, "किरणने मला स्क्रीन टेस्टमध्ये रिजेक्ट केलं आहे. तिनं कोणत्याही प्रकारची तडजोड केलेली नाही. एक अभिनेता म्हणून मला वाईट वाटतं, पण हा तर आमच्या जीवनाचाच भाग आहे. अर्थात किरणने या भूमिकेसाठी कोणी मिळालं नाही तर मला घेण्यात येईल असं मला किरणने सांगितलं होतं. मला बॅकअप म्हणून ठेवण्यात आलं होतं."

आमिर खानचा लाल सिंह चढ्ढा सिनेमा 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.

टॉम हँक्सच्या हॉलिवूडमधील फॉरेस्ट गंप सिनेमाच्या या रिमेकमध्ये आमिर खानबरोबर करिना कपूर खान आणि दक्षिण भारतीय अभिनेता नागाचैतन्यही आहे.

या चित्रपटाचं दिग्दर्शन अद्वैत चंदनने केलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)