You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
आम्ही मंत्री आहोत, त्यामुळे 'असे' कायदे तोडण्याचा आम्हाला अधिकार - नितीन गडकरी #5मोठ्याबातम्या
आज सकाळी विविध वर्तमानपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांचा आढावा.
1. आम्ही मंत्री आहोत, त्यामुळे 'असे' कायदे तोडण्याचा आम्हाला अधिकार - नितीन गडकरी
आम्ही मंत्री असल्याने गरीबाच्या कल्याणाला आडवा येणारा कायदा तोडण्याचा अधिकार असल्याचं विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे.
'महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स'च्या नागपूर शाखेने आदिवासींच्या आरोग्यासाठी 'ब्लॉसम' नावाचा प्रकल्प सुरू केला आहे. त्याचं उद्घाटन करताना गडकरी बोलत होते.
नितीन गडकरी म्हणाले, "मी महाराष्ट्रात 1995 मध्ये मंत्री होतो. त्यावेळी मी मुंबईत अनेक रस्ते, पूल बांधले, पण गडचिरोली आणि मेळघाटमध्ये तसं करताना अडचणी आल्या. या भागात कुपोषणामुळे 2 हजार मुलांचा मृत्यू झाला. तेथील 450 गावांना रस्ते नव्हते. त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री मनोहर जोशी होते. खूप प्रयत्न केले, आयुक्तांनी सांगितलं, मात्र वनविभागाचे अधिकारी रस्तेच बांधू देत नव्हते. त्यामुळे खूप त्रास झाला."
"वनविभागाने त्रास देऊनही मी माझ्या मार्गाने नंतर प्रश्न सोडवला. गरीबाचं कल्याण करण्यासाठी कुठलाही कायदा आडवा येत नाही. गरीबाच्या कल्याणाला आडवा येणारा कायदा एकदा नाही, तर दहावेळा तोडावा लागला तरी तोडला पाहिजे असं महात्मा गांधींनी सांगितलं आहे. तो कायदा तोडण्याचा अधिकार आमचा आहे, कारण आम्ही मंत्री आहोत," असंही नितीन गडकरींनी म्हटलं.
लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.
2. मी लहान विचारांचा माणूस नाही- बच्चू कडू
गेले महिनाभर रखडलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार मंगळवारी (9 ऑगस्ट) पार पडला. या विस्तारात शिंदे गटातील अपक्ष आमदार बच्चू कडू यांना संधी देण्यात आली नाही.
नवीन मंत्र्यांच्या शपथविधीनंतर बच्चू कडू यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना त्यांनी आपल्याला अजूनही आशा असल्याचं म्हटलं.
आमचा उद्देश मंत्रिपदाचा नाहीये. मी एवढ्या लहान विचारांचा माणूस नाहीये. आम्हाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मंत्रिपदाचा शब्द दिला आहे. तो ते नक्की पूर्ण करतील एवढा विश्वास मला आहे, असं बच्चू कडू यांनी म्हटलं.
"आमचं सरकार शेतकऱ्यांसाठी चांगलं काम करत आहे. मैं अभी कॅबिनेटसे कम नहीं हूँ, अकेला बच्चू कडू काफी है सबके लिए," असंही बच्चू कडू यांनी म्हटल्याचं लोकमतनं आपल्या बातमीत म्हटलं आहे.
3. शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावर पंकजा मुंडेंचं ट्वीट
शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार मंगळवारी (9 ऑगस्ट) पार पडला. एकूण 18 आमदारांचा शपथविधी पार पडला. पुढील महिन्यात होणाऱ्या विस्तारात अनेकांना संधी मिळणार असल्याचं मुख्यमंत्र्यांकडून सांगितलं जात आहे.
दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारावेळी भाजप नेत्या पंकजा मुंडे उपस्थित नव्हत्या. त्यामुळे त्यांच्या नाराजीची चर्चा सुरू झाली. काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांच्या वाढदिवशी लावलेल्या फ्लेक्सवरही कोणत्या भाजप नेत्याचं नाव नव्हतं.
मात्र, पंकजा यांनी ट्वीट करुन आपली भावना व्यक्त केली. न्यूज18 लोकमतनं ही बातमी दिलीये.
पंकजा यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, 'नवनिर्वाचित मंत्री मंडळातील सर्व मंत्री महोदय यांचे अभिनंदन.... महाराष्ट्र अपेक्षा ठेवून पाहत आहे आपल्याकडे त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी शुभेच्छा... विकास आणि विश्वास याची जोड ठेवून तुम्ही सर्व जण काम करून महाराष्ट्र राज्याची भरभराट कराल अशी शुभकामना!'
4. भाजपला फक्त धमकावणं आणि लोकांना विकत घेणं माहिती आहे- तेजस्वी यादव
भाजपच्या 16 आमदारांनी राजीनामे दिल्यानंतर अल्पमतात आलेल्या नितीश कुमार यांनीही आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. पण लगेचच त्यांनी तेजस्वी यादव यांची भेट घेत सत्ता स्थापनेचा दावा केला.
राजदसाठी अशा प्रकारे सत्तेचा मार्ग खुला झाल्यांतर तेजस्वी यादव भाजपविरोधात पुन्हा आक्रमक झाले आहेत.
तेजस्वी यादव यांनी म्हटलं, "प्रादेशिक पक्षांना संपवण्याची भाषा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी केली होती. भाजपला फक्त धमकावणं आणि लोकांना विकत घेणं माहिती आहे. आम्हाला भाजपचा अजेंडा बिहारमध्ये कदापी लागू होऊ द्यायचा नाहीये. भाजपबाबत सौम्य धोरण कदापी घेता कामा नये. आज सर्व पक्षांनी आणि बिहार विधानसभेच्या भाजपच्या सोडून सर्व सदस्यांनी नितीशकुमार यांना आपला नेता मानलं आहे."
सकाळनं ही बातमी दिली आहे.
5. स्वाइन फ्लूची लस घ्यायला आरोग्य कर्मचारीही अनुत्सुक
करोना संसर्गानंतर आता स्वाइन फ्लूचा संसर्ग वाढत असल्याने आरोग्य विभागाने प्रतिबंधक लसींची मागणी नोंदवली आहे. मात्र लस घेण्यास मिळणारा प्रतिसाद अतिशय कमी आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या लसीकरणासाठी मोठ्या संख्येने आरोग्य कर्मचारी पुढे येत नसल्याने करोना प्रतिबंधक लसीकरणाप्रमाणे जनजागृती करण्याची गरज व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.
प्रत्येक वर्षी स्वाइन फ्लू संसर्गाच्या विषाणूच्या स्वरूपामध्ये बदल होत असतो. लक्षणांची तीव्रता कोणत्या स्वरूपाची आहे त्यानुसार लसीकरण ठरवण्यात येतं. करोनापूर्वी स्वाइन फ्लूच्या संसर्गाचा फैलाव रोखणाऱ्या मात्रा पडून राहिल्याचंही दिसून आले आहे. हे लसीकरण तुलनेने अधिक वेदनादायी असल्याने तसेच प्रत्येक वर्षी लस घ्यावी लागत असल्याने आरोग्य कर्मचारी लस घेण्यासाठी उत्सुक नसतात, असं या वृत्तात म्हटलं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)