बिहारमधल्या नव्या समीकरणांचं असं आहे 'महाराष्ट्र कनेक्शन'

फोटो स्रोत, HINDUSTAN TIMES
- Author, नामदेव काटकर
- Role, बीबीसी मराठी
मंगळवारचा दिवस म्हणजे 9 ऑगस्ट महाराष्ट्र आणि बिहारमधील राजकीय घडामोडींनी गाजला. या दोन्ही घडामोडींमध्ये केंद्रस्थानी होती भाजप.
आणखी विशेष गोष्ट म्हणजे, बिहारमधील घडामोडींचं थेट नसलं, तरी महाराष्ट्र कनेक्शन आहे. आणि तेच आम्ही तुम्हाला या वृत्तलेखातून सांगणार आहोत.
तत्पूर्वी, महाराष्ट्र आणि बिहारमध्ये मंगळवारी (9 ऑगस्ट) नेमकं काय घडलं, यावर एक अगदी धावती नजर टाकूया. जेणेकरून पुढे आपल्याला 'महाराष्ट्र कनेक्शन' समजून घेण्यास अधिक सोपं जाईल.
सरकार विस्तारलं, सरकार पडलं!
एकनाथ शिंदेंनी 39 आमदारांसह शिवसेनेत बंडखोरी केली आणि भाजपसोबत सरकार स्थापन केलं. शिंदे मुख्यमंत्री, तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री बनले.
या गोष्टीला महिना लोटला होता, तरी मंत्रिमंडळ विस्तार होत नव्हता. त्यामुळे त्यांच्यावर टीकाही होत होती. मात्र, मंगळवारी म्हणजे 9 ऑगस्टला अखेर मंत्रिमंडळ विस्तार झाला.
महाराष्ट्रातल्या शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाच्या विस्तारानं भाजपमध्ये आनंदाची लाट पसरली असतानाच, बिहारमध्ये भाजपला धक्का बसला. तो धक्का दिला, नितीश कुमार यांनी.
बिहारमध्ये 2020 च्या विधानसभा निवडणुकीनंतर लालू प्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल सर्वांत मोठा पक्ष असतानाही नितीश कुमारांनी भाजपला सोबत घेऊन सत्ता स्थापन केली. बिहारमध्ये भाजपसाठी लॉटरी लागली होती. कारण ते निवडणुकीत तिसऱ्या स्थापनी फेकले गेले होते. तरीही सत्तेत बसले.
मात्र, नितीश कुमार यांनी दोन वर्षांनी म्हणजे मंगळवारी (9 ऑगस्ट) भाजपला बाजूला करत तेजस्वी यादव यांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रीय जनता दलाला सोबत घेतलं.
1967 च्या निवडणुकीत आचार्य अत्रे पराभूत झाले होते. मात्र, त्याचवेळी त्यांचे सहकारी जॉर्ज फर्नांडीस जिंकले होते. त्यामुळे निकालाच्या दुसऱ्या दिवशी आचार्य अत्रेंनी 'मराठा'मध्ये अग्रलेख लिहिला होता. त्याचा मथळा होता - 'आम्ही जिंकलो, आम्ही हरलो'
भाजपसाठी मंगळवारचा दिवस तसाच ठरला. अत्रेंच्या शब्दात थोडे बदल करून सांगता येईल - 'सरकार विस्तारलं, सरकार पडलं'.

फोटो स्रोत, Getty Images
एकीकडे भाजपसाठी आनंदाची घटना, तर दुसरीकडे धक्का. महाराष्ट्रात सरकार विस्तारल्याचं आनंद मानायचा की बिहारमध्ये सत्तेतून बाहेर गेल्याचं वाईट, अशी अवस्था कार्यकर्त्यांची झाली.
तर एकूण 9 ऑगस्ट हा दिवस असा गेला. या दोन्ही राज्यांमधील घडामोडी एकमेकांशी साम्य सांगणाऱ्या आहेत. म्हणूनच मुंबईपासून जवळपास दीड-दोन हजार किलोमीटर दूर असलेल्या बिहारमधील या राजकीय घडामोडींचं 'महाराष्ट्र कनेक्शन' सांगण्याचा हा प्रयत्न.
1) आरसीपी सिंग यांच्या बंडखोरीचे संकेत
नितीश कुमार यांनी भाजपसोबतची युती तोडण्याचं एक कारण जदयूचे नेते आरसीपी सिंग अर्थात रामचंद्र प्रकाश सिंग हेही सांगितलं जातं.
गेल्या काही महिन्यांपासून आरसीपी सिंग यांची भाजपसोबत जवळीक वाढल्याचं म्हटलं जात होतं.
आरसीपी सिंग हे खरंतर नितीश कुमार यांच्या जवळचे आयएएस अधिकारी. त्यांना राजकारणात आणून राज्यसभेवर 2010 पासून सतत निवडून आणण्याचं काम नितीश कुमार यांनी केलं. पण तेच आरसीपी सिंग 2020 पासून पलटले आणि भाजपच्या जवळ गेले.
त्यामुळेच 2022 मध्ये आरसीपी सिंग यांची खासदारकीची मुदत वाढवायला नितीश कुमार यांनी नकार दिला आणि त्यांच्याविरोधात भ्रष्टाचाराची चौकशी सुरू केली. त्यामुळे चिडलेल्या आरसीपी सिंग यांनी शनिवारी (6 ऑगस्ट) राजीनामा दिला.

फोटो स्रोत, Getty Images
यात आणखी मेख अशी होती की, ते बाहेर पडताना आपल्याबरोबर काही आमदार घेऊन बाहेर पडतील, अशी नितीश कुमारांना भीती होती आणि पक्षात महाराष्ट्रासारखं बंड होऊन आरसीपी सिंग 'बिहारचे एकनाथ शिंदे' होण्याआधी त्यांनी तातडीने पावलं उचलत भाजपशी नातं तोडलं असं बोललं जातंय.
जी सतर्कता उद्धव ठाकरेंना जमली नाही किंवा शक्य झाली नाही, ती नितीश कुमार यांनी बाळगली. अन्यथा, नितीश कुमार यांनाही महाराष्ट्रात शिंदे गटानं घडवलेल्या बंडासारख्या स्थितीला सामोरं जावं लागण्याची शक्यता होती.
2) सरकारच्या निम्म्या कार्यकाळात नवीन समीकरणं
महाष्ट्रात 2019 च्या निवडणुकीनंतर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आलं. त्यानंतर अडीच वर्षे पूर्ण झाल्यानंतर म्हणजे जुलै 2022 मध्ये एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर कोसळलं.
महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा नवीन समीकरणं जुळली. एकनाथ शिंदे यांचा बंडखोर आमदारांचा गट आणि भाजप यांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली.
तिकडे बिहारमध्ये 2020 मध्ये भाजप आणि नितीश कुमार यांचा जदयू एकत्र लढले होते. मात्र, अडीच वर्षांनी म्हणजे ऑगस्ट 2022 मध्ये नितीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर सरकार कोसळलं.

फोटो स्रोत, Getty Images
बिहारमध्ये आता नवीन समीकरणं तयार झाली. त्यानुसार नितीश कुमार यांचा जदयू आणि तेजस्वी यादव यांच्या नेतृत्त्वातील राजद एकत्र आलेत. काँग्रेस, जीतनराम मांजींचा HAM यांसह लहान पक्षांनीही या नव्या समीकरणांचं समर्थन केलंय.
इथेही सरकार पडून नव्या समीकरणांच्या जुळण्यामध्ये 'महाराष्ट्र कनेक्शन' दिसून आलंय.
3) जेपी नड्डांचं प्रादेशिक पक्षांबाबतचं 'ते' विधान
बिहारच्या पाटण्यात काही दिवसांपूर्वीच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले की, "देशातील सगळे लोक संपून गेले आहेत. जे उरले आहेत ते सुद्धा संपून जातील. आपण जर आपल्या विचारधारेवर चालत राहिलो तर सर्व प्रादेशिक पक्ष संपून फक्त भाजपच अस्तित्व राहील."
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षांत भाजपाच्या नड्डांच्या विधानानं अधिक इंधन घातलं आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही भाजपवर टीका करताना नड्डांच्या विधानाचा उल्लेख केला.
किंबहुना, भाजप प्रदेशिक पक्षांना संपवू पाहतंय, हा अनेक प्रादेशिक पक्षांनी वारंवार आरोप केलाय. पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी असो वा महाराष्ट्रात शिवसेना, किंवा तेलंगणात केसीआर यांनीही याच मुद्द्यावर अनेकदा भाजपवर टीकास्त्र सोडलंय.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
बिहारमधील निवडणुकीत याच मुद्द्यानं डोकं वर काढलंय आणि सध्याच्या घडामोडींना या विधानानंही फोडणी दिलीय.
भाजपची साथ सोडून नितीश कुमार यांनी राजदसोबत जाण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर नितीश कुमार आणि तेजस्वी यादव जेव्हा पहिल्यांदा माध्यमांसमोर आले, तेव्हा तेजस्वी यादव म्हणाले की, "प्रादेशिक पक्षांना संपवण्याची भाषा जेपी नड्डा करतात. भाजप एखाद्या पक्षावर दबाव आणू शकते किंवा खरेदी करू शकते. मात्र, भाजपचा हा अजेंडा बिहारमध्ये चालू देणार नाही. लालू प्रसाद यादवांनी अडवाणींचा रथ इथेच थांबवला होता."
त्यामुळे जेपी नड्डांचं प्रादेशिक पक्षांबाबतचं विधान सुद्धा महाराष्ट्र आणि बिहारमधील 'कनेक्शन' बनलं आहे.
4) 'महाविकास आघाडी मॉडेल'
शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे सध्या कथित पत्राचाळ घोटाळ्यात तुरुंगात आहेत. मात्र, त्यांनी काही दिवसांपूर्वी केलेलं वक्तव्य बिहारमधील घटनांमुळे पुन्हा चर्चेत आलं.
संजय राऊत म्हणाले होते, "महाराष्ट्रात विभिन्न राजकीय तत्त्वज्ञान असणारे पक्ष महाविकास आघाडीच्या बॅनरखाली एकत्र आले आणि त्यांनी उत्तम सरकार चालवलं. असाच प्रयोग केंद्रीय पातळीवर यूपीए आघाडीने राबवला पाहिजे."
राऊत पुढे म्हणाले होते, "महाविकास आघाडीच्या प्रयोगातून महाराष्ट्रानं भाजपविरोधी राजकीय पक्षांना एक नवीन मार्ग दाखवला आहे. हेच मॉडेल आता सर्व भाजपविरोधी पक्षांनी राष्ट्रीय पातळीवर राबवायला हवं."

फोटो स्रोत, Getty Images
बिहारमध्ये भाजपला बाजूला ठेवूनच इतर सर्व पक्ष एकत्र आलेत. यात नितीश कुमारांचा जदयू, तेजस्वी यादवांच्या नेतृत्त्वातील राजद, जीतनराम मांझींचा HAM आणि काँग्रेस हे प्रमुख पक्ष आहेत. मात्र, यासह काही अपक्ष आणि लहान पक्षसुद्धा आहेत. एकूण 7 पक्ष बिहारमध्ये भाजपविरोधात 'महागठबंधन'च्या बॅनरखाली एकवटलेत.
243 जागांच्या बिहार विधानसभेत भाजपच्या 77 जागा आहेत. मात्र, आता भाजपेतर पक्ष एकत्र आल्यानं त्यांच्याकडे 164 जागा झाल्यात. तसा दावा नितीश कुमारांनीच केलाय.
संजय राऊतांनी ज्या मॉडेलबाबत म्हटलं होतं, ते बिहारमधील या 7 पक्षांमधील कुणी ऐकलं असेल किंवा नसेल, पण त्या मॉडेलच्या जवळ जाणारं सत्तांतर मात्र बिहारमध्ये झालंय, हे निश्चित.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








