नितीश कुमार यांचा राजीनामा, भाजप-जदयू वादाची ठिणगी कुठे पडली?

नितीश कुमार

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, नितीश कुमार
    • Author, ऋजुता लुकतुके
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

महाराष्ट्रातला सत्तासंघर्ष कोर्टात सुरू आहे. पण, मैदानात तरी शांतता आहे. त्याचवेळी महाराष्ट्रापासून दीडहजार किलोमीटर दूर बिहारमध्ये नवं सत्ता नाट्य आकार घेत आहे.

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भारतीय जनता पार्टीशी काडीमोड घेत असल्याचं जाहीर केलंय. आता तिथं जनता दल युनायटेड, राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस असं महागठबंधन सरकार अस्तित्वात येऊ शकतं. बिहारमध्ये नेमकं काय घडतंय आणि तिथं जे घडतंय त्याचा महाराष्ट्राशी काय संबंध आहे?

द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपतिपदाची शपथ घेतली तेव्हा भाजपशासित सगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री त्यासाठी हजर होते. एक अनुपस्थिती सलत होती ती बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांची…पण, नितीश यांनी नाराजी व्यक्त करण्याची ही काही पहिलीच घटना नव्हती. यापूर्वीही भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या दिल्लीतल्या तीन बैठकांना त्यांनी दांडी मारलेली होती.

म्हणजेच जनता दल युनायटेड आणि भारतीय जनता पार्टी जरी निवडणूकपूर्व युती करून सत्तेत आले असले तरी त्यांच्यात आलबेल कधी नव्हतंच. पण, अलीकडच्या काळात बिहार आणि महाराष्ट्रात एक राजकारण समांतर सुरू होतं जे तात्कालिक कारण घडलंय सरकार तुटण्यासाठी. हे कनेक्शन नेमकं काय आहे बघूया…

बिहारमधलं सत्ता समीकरण

बिहार विधानसभेचं आताचं गणित बघा.

बिहार विधानसभेत एकूण आमदार आहेत 243. म्हणजे बहुमताचा आकडा 122 चा.

सध्या भाजपकडे आहेत 77 जागा. जनता दर युनायटेडकडे 45

आणि इतर मित्रपक्ष 5.

तर प्रमुख विरोधी पक्ष राष्ट्रीय जनता दलाकडे 79 जागा. आणि त्यांच्या महागठबंधनमधल्या इतर पक्षांकडे 16.

काँग्रेसकडे 19 जागा आहेत.

नितीश कुमार भाजपला सोडून राष्ट्रीय जनता दलाकडे गेले आणि काँग्रेसनंही त्यांना पाठिंबा दिला तर या नवीन संभाव्य आघाडीकडे 45 अधिक 79 अधिक 19 अशा 133 जागा होतात. शिवाय इतरही काही पक्ष त्यांच्या बाजूने येतीलच. म्हणजे बहुमत त्यांच्या बाजूने असेल.

नितिश कुमार, बिहार

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, नितिश कुमार यांनी पुन्हा सोडली भाजपाची साथ

हीच शक्यता सध्या बिहारमध्ये दिसतेय. पण, एक छोटीसी मेख यात आहे ती म्हणजे जनता दल युनायटेडचे एक सदस्य आरसीपी सिंग जे मनाने भारतीय जनता पार्टीच्या जवळ आहेत आणि त्यांनी शनिवारीच जनता दलाचा राजीनामाही दिलाय. ते आपल्याबरोबर काही आमदारांना घेऊन गेले तर मात्र या नवीन आघाडीसमोर आव्हान उभं राहू शकतं. तशी शक्यता किती आहे? आणि नितिश कुमार भारतीय जनता पार्टीपासून दूर कसे गेले?

नितीश कुमार आणि भाजपामध्ये काय बिनसलं?

यासाठी बिहारमधलं अंतर्गत राजकारणही समजून घेणं गरजेचं आहे. बिहारमध्ये जातीनिहाय राजकारणाचा पगडा आहे. आणि त्याचबरोबर समाजवादी विचारसरणीची पूर्वापार बैठकही आहे.

नितीश कुमारांचं जनता दल युनायटेड, तेजस्वी प्रसाद यांचं राष्ट्रीय जनता दल, चिराग पासवान यांचा लोकजनशक्ती असे विविध समाजांचं प्रतिनिधित्व करणारे पक्ष इथं आहेत. काळाच्या ओघात काँग्रेस पक्षाचं इथलं प्रस्थ कमी झालं असलं तरी तो एक प्रमुख राष्ट्रीय पक्ष आहे. भारतीय जनता पार्टीनंही 2013 पासून नंतर इथं पाय रोवायचे पद्धतशीर प्रयत्न केले आहेत.

नितीश यांचे भाजपाबरोबरचे संबंध मात्र तिखट-गोड असेच आहेत.

नितिश कुमार, बिहार

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, नितिश यांनी अलीकडेच लालूप्रसाद यादव यांचीही भेट घेतली होती

आणि 2013मध्ये नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित केल्यानंतर नितिश कायम नाराजच होते. पुढे राजकारण चिघळत गेलं. काही ठळक घटना बघा.

2015 बिहार विधानसभा निवडणूक - नितिश कुमार यांनी भाजपची साथ सोडून राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस असं महागठबंधन सरकार स्थापन केलं. ही त्यांनी भाजपशी घेतलेली पहिली फारकत होती. पण, पुढे हे सरकार दोनच वर्षं टिकलं. आणि नितिश यांनी पुन्हा 2017मध्ये भाजपबरोबर सरकार स्थापन केलं.

2019 मोदींचा मंत्रिमंडळ विस्तार - असं म्हणतात, 2015मध्ये नितिश यांनी साथ सोडली याचा वचपा नरेंद्र मोदींनी 2019च्या मंत्रिमडळ विस्तारात काढला. जनता दल युनायटेडला त्यांनी फक्त एक मंत्रिपद दिलं. आणि मोदींनी एक मंत्रिपद वाढवलं ते दिलं आरपीसी सिंग या भाजपशी जवळीक असलेल्या जदयूच्या राज्यसभा खासदाराला. हे नितिश यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखं होतं.

अनैसर्गिक युती - म्हणूनच जेव्हा 2020च्या निवडणुकांसाठी दोघांमध्ये युती झाली तेव्हा सुरुवातीपासूनच ही युती अनैसर्गिक मानली गेली. दोन पक्षांमध्ये काही ना काही धुमसतच होतं. जनता दलाची मतं फोडण्यासाठी भाजपने लोकजनशक्तीच्या चिराग पासवान गटाची मदत घेतल्याचा आरोप नितिश कुमारांच्या जवळच्या नेत्यांनी वारंवार केला आहे. म्हणजे सत्तेतल्या दोन भागिदार पक्षांमध्ये विश्वास कधी नव्हताच.

आरसीपी सिंग फॅक्टर - त्यातच ताजं प्रकरण घडलं रामचंद्र प्रकाश सिंह यांच्या भाजपच्या जवळीकीशी. आरसीपी सिंग हे खरंतर नितिश यांच्या जवळचे आयएएस अधिकारी. त्यांना राजकारणात आणून राज्यसभेवर 2010 पासून सतत निवडून आणण्याचं काम नितीश यांनी केलं. पण, तेच आरसीपी सिंग 2020 पासून पलटले. आणि भाजपच्या जवळ गेले. त्यामुळेच 2022मध्ये त्यांची खासदारकीची मुदत वाढवायला नितीश यांनी नकार दिला.

आणि त्यांच्याविरोधात भ्रष्टाचाराची चौकशी सुरू केली. त्यामुळे चिडलेल्या आरसीपी सिंग यांनी शनिवारी राजीनामा दिला. यात आणखी मेख अशी होती की, ते बाहेर पडताना आपल्याबरोबर काही आमदार घेऊन बाहेर पडतील अशी नितिश कुमारांना भीती होती. आणि पक्षात महाराष्ट्रासारखं बंड होऊन आरसीपी सिंग बिहारचे एकनाथ शिंदे होण्याआधी तातडीने पावलं उचलत भाजपशी नातं तोडलं असं बोललं जातंय.

राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे यांना भारतीय जनता पार्टीसाठी हा खूप मोठा धक्का वाटतो. कारण, 'त्यांच्यामते राष्ट्रीय जनता दल आणि जेडीयु यांचं एक सशक्त सरकार बिहारमध्ये उभं राहील. आणि पुढे जाऊन 2024 साठीची समीकरणंही बदलतील'

आपला मुद्दा पुढे नेत अशोक वानखेडे म्हणतात, 'बिहारमध्ये तेजस्वी यादव हा ओबीसी नेता सरकार चालवेल. आणि नितिश कुमार यांना राष्ट्रीय पातळीवर पुन्हा एकदा संधी मिळेल. विरोधकांनाही तिथं मोदींविरोधात नेतृत्व हवंच आहे. ते नेतृत्व नितिश कुमारांच्या निमित्ताने मिळेल. आणि नितिश कुमारांच्या नेतृत्वाखाली विरोधक एकवटले तर 2024च्या निवडणुकीत भाजपला नक्कीच कठीण जाईल.'

2024 अजून दूर असलं तरी वानखेडे यांच्यामते बिहारमधलं आताचं वळण तिथलं राजकारण आणि राष्ट्रीय राजकारणही बदलणारा असू शकतो.

राष्ट्रीय जनता दलाने एनडीएमधून माघारी फिरलेल्या नितिश कुमार यांचं 'गले लगो' म्हणत स्वागत केलंय. काँग्रेसनंही तातडीच्या बैठकांचं सत्र सुरू केलंय. पण, बिहारमधलं सत्तानाट्य अजून संपलं नाहीए.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)