शिंदे-फडणवीस सरकारमधील 18 पैकी किती मंत्र्यांवर आरोप आहेत?

    • Author, मयांक भागवत
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला कॅबिनेट विस्तार मंगळवारी (9 ऑगस्ट) पार पडला. यात शिंदेगट आणि भाजपकडून 9 आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.

शिंदे-फडणवीस सरकारमधील 18 पैकी काही मंत्र्यांवर गुन्हे दाखल आहेत. तर संजय राठोड यांच्यासारख्या काही मंत्र्यांवर आरोपही करण्यात आलेत.

संजय राठोड यांना मंत्रिपद दिल्यानंतर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "संजय राठोड यांना पोलिसांनी क्लिनचीट दिली आहे. त्यामुळेच त्यांना मंत्रिपद देण्यात आलंय." दुसरीकडे, "ज्यांना क्लीनचिट मिळाली नाही अशांना मंत्रिमंडळात घेतलं नसतं तर बर झालं असतं," असं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलंय.

कोणत्या मंत्र्यांवर आरोप आहेत? जाणून घेऊया.

विजय कुमार गावित

आदिवासी नेते आणि भाजप आमदार विजय कुमार गावित शिंदे-फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेटमंत्री बनलेत. 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सोडून गावित भाजपवासी झाले होते. त्यांच्यावर आदिवासी विकास विभागात मंत्री असताना कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते.

विजय कुमार गावित तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारमध्ये 2004-2009 या काळात आदिवासी विकास मंत्री होते. भाजपने विजय कुमार गावित यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती.

विजय कुमार गावित यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत बॅाम्बे हायकोर्टात जनहित याचिका (PIL) दाखल करण्यात आली होती. या जनहित याचिकेवर हायकोर्टात अजूनही सुनावणी सुरू आहे.

मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत विचारलं असता बीबीसी मराठीशी बोलताना विजय कुमार गावित म्हणाले, "या प्रकरणी माझी चौकशी पूर्ण झाली आहे. या आरोपात काही तथ्य नाही. कोणी आरोप केले तर त्या आरोपांना मी उत्तर देईन."

आदिवासी विभागातील या कथित घोटाळ्याच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्ती एम जी गायकवाड कमिशन स्थापन करण्यात आलं. 2017 मध्ये चौकशी आयोगाने विजय कुमार गावित यांच्यावरील आरोपात तथ्य असल्याचा रिपोर्ट दिला होता.

इंडियन एक्स्प्रेसच्या बातमीनुसार, कमिशनने गावित यांच्याविरोधात काय कारवाई करावी याबाबत रिपोर्टमध्ये स्पष्ट केलं नव्हतं.

2004 ते 2012 या काळात आदिवासी विकास विभागात नेते, सरकारी अधिकारी आणि काँट्रॅक्टर यांनी संगनमत करून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला होता.

गायकवाड कमिशनच्या रिपोर्टवर आदिवासी विकास विभागाने 2018 मध्ये पुणे, गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये गुन्हे दाखल केले होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होते आणि गावित भाजप आमदार होते.

संजय राठोड

विदर्भातील यवतमाळचे शिवसेना आमदार आणि बंजारा समाजाचे मोठे नेते अशी राठोड यांची ओळख आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर संजय राठोड शिंदे गटात सामील झाले होते.

संजय राठोड उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात वनमंत्री होते. पुण्यातील पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संजय राठोड यांचं नाव पुढे आलं. भाजपने प्रकरण लावून धरत, राठोड यांच्यावर पूजाच्या आत्महत्येसाठी जबाबदार असल्याचा आरोप केला. भाजपच्या दबावामुळे संजय राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पत्रकारांनी संजय राठोड यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला. पण राठोड प्रतिक्रिया न देता निघून गेले.

संजय राठोड यांच्यावरच आरोपांबाबत प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "संजय राठोड यांना पोलिसांनी क्लीनचीट दिली आहे. त्यामुळेच त्यांना मंत्रीपद देण्यात आलंय. यावर कोणाचा काही आक्षेप असेल तर आम्ही तो ऐकून घेऊ."

राठोड यांच्यावर आरोप झाल्यानंतर तत्कालीन विरोधी पक्षनेते आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर मुख्यमंत्री असताना मोठा आरोप केला होता.

देवेंद्र फडणवीस त्यावेळी म्हणाले होते, "पूजा चव्हाण प्रकरणी मुख्यमंत्र्यांची केविलवाणी परिस्थिती मी पाहिली. सगळे पुरावे असताना काहीच झालं नाही असं सांगावं लागतं. त्यावेळी नैतिक धैर्य साथ देत नाही."

देवेंद्र यांनी पुढे उद्धव ठाकरेंना, "क्लिप खऱ्या आहेत का खोट्या? यवतमाळच्या मेडिकल कॅालेजमध्ये घडलं ते खरं का खोटं?" असा प्रश्न विचारला होता. तर विधानसभेत "पुरावे असताना कारवाई का होत नाही?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.

ज्या फडणवीसांनी संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. तेच संजय राठोड आता फडणवीसांसोबतच कॅबिनेट बैठकीत एकत्र बसलेले दिसून येतील.

पुण्यात पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस संजय राठोड यांच्याबाबत प्रश्न विचारला. ते म्हणाले, "संजय राठोड यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. मी यावर काही बोलणार नाही."

अब्दुल सत्तार

2019 मध्ये काँग्रेसमधून शिवसेनेत दाखल झालेले अब्दुल सत्तार उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात महसूल राज्यमंत्री होते. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ते शिंदे गटात सामील झाले. आता सत्तार कंबिनेटमंत्री बनले आहेत.

सोमवारी (8 ऑगस्ट 2022) अब्दुल सत्तार यांच्या मुलांची नावं पुण्यातील TET (टीईटी) घोटाळ्याशी जोडली गेली. त्यामुळे सत्तार अडचणीत येतील अशी चर्चा सुरू झाली.

सत्तारांच्या चारही मुलांचं टीईटी प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याचं उघड झालंय. परीक्षा परिषदेकडून टीईटी गैरव्यवहार प्रकरणात कारवाई करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या यादीत अब्दुल सत्तारांच्या दोन मुलींची नावं आहेत. गैरप्रकारात अडकलेल्या तब्बल 7 हजार 874 विद्यार्थ्यांची यादी परीक्षा परिषदेनं प्रसिद्ध केलीय. या यादीत अब्दुल सत्तारांच्या चार मुलांच्या नावांचाही समावेश आहे.

मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले, "टाईटी घोटाळा आणि मंत्रिपदाचा संबंध नाही. माझ्या कुटुंबाने याचा लाभ घेतलेला नाही," या प्रकरणी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलंय. याची चौकशी सुरू आहे.

"दोन मुलांनी परिक्षा दिली आणि चार लोकांचं नाव आलं. त्यामुळे ती लिस्ट पहावी लागेल. हो सूडाचं राजकारण सुरू आहे." असं ते पुढे म्हणाले.

मंगलप्रभात लोढा

मुंबई भाजप अध्यक्ष आणि बांधकाम व्यवसायिक मंगलप्रभात लोढा यांना पहिल्यादाच मंत्रिपद देण्यात आलंय. राजकीय जाणकारांच्या मते, मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने त्यांना मंत्री बनवलं आहे.

लोढा यांनी शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने ट्वीट करून लोढा यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल असल्याचा आरोप केलाय. लोढा यांच्यावर खरंच गुन्हा दाखल आहे का? याची आम्ही तपासणी केली.

न्यूज एजन्सी ANI च्या माहितीनुसार, मंगल प्रभात लोढा यांच्यावर मार्च 2021 मध्ये पुण्याच्या चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनमध्ये फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रॅापर्टी प्रकरणात लोढा आणि त्याच्या मुलावर हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पुण्यातील एका महिलेने लोढा यांच्याकडे घर खरेदी केलं होतं. पैसे देऊनही घर मिळालं नाही असा या तक्रारदार महिलेने आरोप केला होता. त्यानंतर कोर्टाच्या आदेशानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

या प्रकरणाची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी पुणे पोलिसांची प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही.

संदिपान भुमरे

संदिपान भुमरे उद्धव ठाकरे सरकारमध्ये रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री होते. शिंदे गटात सामील झाल्यानंतर त्यांना पुन्हा कॅबिनेट मंत्री बनवण्यात आलंय.

संदिपान भुमरे यांनी शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने ट्वीट करून भुमरे यांच्यावर कोर्टाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याचा आरोप केला आहे.

भुमरे यांच्यावर फेब्रुवारी 2022 मध्ये बॅाम्बे हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. पैठणमधील सरकारी जमीन हडपल्याप्रकरणी तक्रारदार दत्तात्रय गोर्डे यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. या प्रकरणी कोर्टाने पोलिसांना भुमरेंवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते.

साम टीव्हीच्या बातमीनुसार, तक्रारदार दत्तात्रय गोर्डे यांनी भुमरे यांच्या मुलाने बेकायदा भूखंड लाटल्याचा दावा केला होता. तर कोर्टाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याची माहिती दिली होती.

या प्रकरणाच्या सद्यस्थितीबाबत अजून पुढे माहिती मिळू शकलेली नाही.

गिरीश महाजन

देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मानले जाणारे गिरीश महाजन यांच्या विरोधात पुणे आणि जळगाव येथे गुन्हे दाखल आहेत. महाजन यांना कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे.

जळगावची नूतन मराठा विद्या प्रसारक संस्थेत सत्ता मिळवण्यासाठी दोन गटांमध्ये स्पर्धा सुरू होती. यासाठी दोन गट स्पर्धेत होते. ही संस्था हडप करण्यासाठी गिरीश महाजन यांनी भोईटे गटाला साथ दिली आणि बनावट पद्धतीने संस्था बळकावली असा आरोप पाटील गटाने केला आहे.

नरेंद्र पाटील यांचे लहान भाऊ अॅड. विजय पाटील यांनी गिरीश महाजन यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. आपलं अपहरण आणि मारहाण झाल्याचा त्यांचा आरोप आहे. तसंच चाकूचा धाक दाखवून संस्थेतून राजीनामा द्यायला सांगितलं असाही त्यांचा आरोप आहे. या प्रकरणी त्यांनी कोथरुड आणि जळगाव दोन्ही ठिकाणी गुन्हा दाखल केला.

याप्रकरणातील सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्याविरोधातील काही व्हिडिओ क्लिप्स विधिमंडळात देवेंद्र फडणवीस यांनी सादर केल्या होत्या. गिरीश महाजन यांच्याविरोधात कट रचण्यात आला होता असा आरोप भाजपने केला आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)