नितीश कुमार यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ, तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री

नितीश कुमार यांनी आज (10 ऑगस्ट) आठव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. लालू प्रसाद यादवचे पुत्र आणि राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. ते या नवीन सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होतील.

9 ऑगस्ट रोजी राजीनामा दिल्यावर नितीश कुमार यांनी राज्यपाल फागू चौहान यांच्याकडे पुन्हा एकदा सत्तास्थापनेचा दावा केला आहे. नव्या सरकारचा दवा करण्यासाठी नितीश कुमार, राजदचे नेते तेजस्वी यादव, जदयू अध्यक्ष ललन सिंह एकाच गाडीतून बसून राजभवनात गेले.

राजभवनातून आल्यावर नितीशकुमार पत्रकारांना म्हणाले, "आम्ही तिकडे होतो. आज त्यांच्याबरोबरचा मार्ग आम्ही बंद करून टाकलाय. आम्ही आता सात पक्षांचे 164 आमदार आणि एका अपक्षाच्या पाठिंब्याचा दावा सादर केलाय. आता राज्यपाल सरकार स्थापनेचं आमंत्रण कधी देतात ते पाहू."

बिहार विधानसभेत एकूण आमदार आहेत 243. म्हणजे बहुमताचा आकडा 122 चा.

सध्या भाजपकडे आहेत 77 जागा. जनता दर युनायटेडकडे 45 आणि इतर मित्रपक्ष 5.

तर प्रमुख विरोधी पक्ष राष्ट्रीय जनता दलाकडे 79 जागा. आणि त्यांच्या महागठबंधनमधल्या इतर पक्षांकडे 16. काँग्रेसकडे 19 जागा आहेत.

नितीश कुमार भाजपला सोडून राष्ट्रीय जनता दलाकडे गेले आणि काँग्रेसनंही त्यांना पाठिंबा दिला तर या नवीन संभाव्य आघाडीकडे 45 अधिक 79 अधिक 19 अशा 133 जागा होतात.

शिवाय इतरही काही पक्ष त्यांच्या बाजूने येतीलच. म्हणजे बहुमत त्यांच्या बाजूने असेल. राष्ट्रीय जनता दलाने तर सोमवारीच नितीश कुमार यांनी तसा निर्णय घेतला तर त्यांचं स्वागतच केलं आहे.

तर काँग्रेसनं परिस्थितीवर लक्ष ठेवण्याची भूमिका ठेवलीय.

माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य यांनी ट्वीट करून जदयू आणि भाजप युती तोडल्याचे संकेत दिले आहेत.

'राजतिलक की करो तयारी, आ रहे हे लालटेन धारी' असं ट्विट त्यांनी केलं आहे.

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यपाल फागू चौहान यांच्या भेटीची वेळ मागितली आहे. नितीश कुमार राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बिहारचे उद्योगमंत्री शाहनवाज हुसैन यांनी बिहार बदलत असल्याचं विधान केलं आहे. बिहार आता रोजगार मागत आहे. असं ते म्हणाले.

त्याचवेळी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे खासदार कौशल किशोर म्हणाले की जदयू आणि भाजपा यांची युती टिकून रहावी आणि पुढे काम करावं कारण हेच बिहारच्या हिताचं आहे. कौशल किशोर म्हणाले की बिहारच्या सध्याच्या स्थितीवर त्यांना कोणतीही टिप्पणी करायची नाही.

नितीश कुमार गेल्या काही काळापासून नाराज

मुख्यमंत्री नितीश कुमार गेल्या काही काळापासून भाजपवर नाराज आहेत. रमजान महिन्यात ते लालूप्रसाद यादव यांच्या निवासस्थानी इफ्तार पार्टीला गेले होते. त्यानंतर जदयू ने बोलावलेल्या इफ्तार पार्टीत नितीश कुमार तेजस्वी यादव यांचा पाहुणचार करताना आढळले होते.

हा प्रसंग पाहून जदयूच्या अनेक नेत्यांनी आनंद व्यक्त केला होता. काका आणि पुतण्या एकत्र आले तर प्रदेशाच्या दृष्टीने चांगलं लक्षण आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केल्या होत्या.

जदयूचे माजी अध्यक्ष आरसीपी सिंह यांच्यावर प्रमाणाबाहेर संपत्ती असल्याचा आरोप झाला आणि त्यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.

पक्ष सोडताना जदयू हे बुडतं जहाज असल्याची टिप्पणी त्यांनी केली होती.

नितीश कुमार सातत्याने भाजपापासून दुरावत आहेत. ते केंद्र सरकारने बोलावेल्या सगळ्या बैठकांना गैरहजर होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथविधीलाही ते उपस्थित नव्हते.

त्याचवेळी तेजस्वी यादव यांचीही नितीश कुमार यांच्यावरची टीकेची धार बोथट झाली आहे. आता ते त्यांचं नावही घेत नाही आणि केंद्र सरकाकवर मात्र सातत्याने टीका करत असतात.

सध्या सर्व पक्षांच्या बैठकांचं सत्र सुरू आहे. आता नितीशकुमार राज्यपालांना भेटून काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)