मासिक पाळी महोत्सव: लेकीच्या 'फुलण्याचा सोहळा' आणि त्या माध्यमातून जनजागृती

    • Author, प्रवीण ठाकरे
    • Role, बीबीसी मराठीसाठी, नाशिकहून

'मासिक पाळी आली म्हणून मला झाड लावू दिलं नाही', असा आरोप जुलैमध्ये एका विद्यार्थिनीने शाळेच्या शिक्षकांवर केला होता. नाशिकमधील या 'कथित' घटनेवरुन वाद निर्माण झाला होता. त्याच नाशिकमध्ये नुकताच 'मासिक पाळी महोत्सव' नुकताच साजरा करण्यात आला केला.

"पाळीचा महोत्सव केला म्हणून अभिनंदन करणारे फोन येत आहेत. अनेकांनी भेट म्हणून मला सॅनिटरी पॅड दिले आहेत. काही लोक म्हणतात, पाळी आली की मुलींना बाजूला बसवा, पाण्याला हात लावून देऊ नका, पाळी विषयच टाळतात... असं करायला नको. मुलींना याचा त्रास होतो. अशा वेळा त्यांना नीट मार्गदर्शनाची गरज असते."

यशदा चांदगुडे सांगत होती. यशदाला 3 ऑगस्टला पहिल्यांदाच पाळी आली म्हणून हा महोत्सव तिच्या आई-वडिलांनी एका हॉटेलमध्ये आयोजित केला होता. महिलांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनी उपस्थिती लावली होती.

महोत्सवाच्या केंद्रस्थानी असलेली यशदा या मोकळ्या वातावरणामुळे आनंदी होती. तिला अवघडल्यासारखं वाटत नसल्याचं ती म्हणाली. तिला वाटतंय की, "असे आईबाबा सर्व मुलींना मिळायला हवेत, तरच बदल घडून येईल."

'नाजूक विषयावर मोकळी चर्चा'

नाशिकमध्ये या मासिक पाळी महोत्सवाची चर्चा खूप होती. आणि सोशल मीडियावर याविषयाच्या पोस्ट व्हायरल झाल्या. अनेकांनी या पोस्ट बघून कार्यक्रमाला हजेरी लावली.

नाशिकच्या रहिवासी नीलिमा जाधव अशाच माध्यमातून कार्यक्रमापर्यंत पोहचल्या. त्या सांगत होत्या- "मी पाळीविषयीची उत्पादनं बनवणार्‍या कंपनीत काम करते. हा विषय नाजूक असल्याने महिला लवकर बोलत नाही हा आमचा अनुभव आहे, याविषयी प्रबोधन व्हावं म्हणून असे महोत्सव होणं गरजेचं आहे. माझ्या मुलीच्या मासिक पाळीच्या वेळी मी असा महोत्सव नक्की साजरा करणार आहे."

मासिक पाळी संदर्भातील गैरसमज दूर व्हावेत यासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन होणे गरजेचे आहे असं या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या पालकांचं मत आहे.

"आजही महिलांना बुरसट्लेल्या प्रथांमुळे अडचणींना सामोरं जावं लागतं किवा संघर्ष करावा लागतो. मासिक पाळीशी निगडित असलेले सामाजिक आणि शारीरिक गैरसमज हा सुद्धा महत्त्वाचा संघर्ष आहे.

"त्यामुळे याबद्दल पालकांसह समाजाने सजग होणं आवश्यक आहे. असे महोत्सव म्हणूनच महत्त्वाचे आहेत. त्या दृष्टीने हे पाऊल स्वागतार्ह आहे," असं मत कार्यक्रमाला आलेल्या किरण यांनी व्यक्त केलं. त्यांची मुलगी सार्था ही 14 वर्षांची आहे.

'स्त्रीच्या फुलण्याचा सोहळा'

यशदाची आई विद्या या व्यवसायाने वकील आहेत. त्या म्हणतात- "आमच्या घरात सामाजिक प्रबोधनाचं वातावरण आहे. मासिक पाळी होती म्हणून मुलींना झाड लावण्यासारख्या कामातून वगळण्याचा विटाळ काहीजण पाळतात. झाडाला पाणी घालू दिलं तर झाड जळतं असा गैरसमज आहे. झाडाला पाणी न घालता ते जळणारच अशी मानसिकता ठेवली तर तर साहजिकच ते झाड वाळून जाईल."

"पाळी हा स्त्रीचा फुलण्याचा सोहळा आहे. अशातच आमच्या घरी माझ्या मुलीला पहिल्यांदाच पाळी आली. आणि आम्ही ठरवलं की याचा सोहळा केला पाहिजे. एक चांगला संदेश दिला पाहिजे. आम्ही मासिक पाळीचा महोत्सव जाहीर केला तेव्हा अनेकांनी त्याचं स्वागत केलं. यातून मोकळं वातावरण तयार झालं पाहिजे. नवीन पिढीसाठी ते गरजेचं आहे. आता परंपरा सांभाळून पुढे पुढे जाताना स्त्रीला दुय्यम स्थान देता कामा नये." असंही त्यांनी सागितलं.

सॅनिटरी पॅड्सची भेट

पाळी आलेल्या आपल्या लेकीचा जाहीर सन्मान करत जनजागृतीचा उपक्रम करत असल्याचं नाशिकमधील कृष्णा चांदुगडे आणि विद्या चांदुगडे यांनी म्हटलंय. मासिक पाळीविषयीच्या गैरसमजुतींवर आणि अंधश्रद्धांवर मात करण्यासाठी हा मासिक पाळीचा महोत्सव केल्याचं त्यांनी सांगितलं. कृष्णा चांदुगडे हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आहेत.

"मासिक पाळीच्या दिवसांत मुलींच्या, महिलेच्या मनात अपराधीपणाची भावना असते, ती पुसून काढणं गरजेचं असतं. तसेच मासिक पाळीच्या बाबतीत समाजात प्रबोधन व्हावं हा आमचा महोत्सव करण्यामागचा उद्देश होता", असं चांदुगडे म्हणाले. त्यासाठी त्यांनी मासिक पाळी महोत्सवासाठी अनेकांना निमंत्रण देत फार उघडपणे न बोलल्या जाणाऱ्या या विषयावर चर्चासत्र, परिसंवाद, व्याख्यानं आणि स्नेहभोजन आयोजित केलं होतं.

विशेष म्हणजे त्यांनी कुणालाही भेटवस्तू न आणण्यासाठी विनंती केली. पण सामाजिक सहभाग म्हणून सॅनिटरी पॅड स्वीकारले जातील असं संगितलं. आता भेटवस्तू मिळालेले सॅनिटरी पॅड ते गरजू मुलींना देणार आहेत. यशदाचं अभिनंदन करत अनेक महिलांनी तिला मासिक पाळी आणि लैंगिक शिक्षण या विषयांवरील पुस्तकं भेट म्हणून दिली.

मेडिकल स्टोअरमधून सॅनिटरी पॅड आणताना ते पेपरमध्ये गुंडाळून किंवा पिशवीत पॅक करून घरी आणण्याची पद्धत आहे. पण या कार्यक्रमात मुख्य फलकावर पॅड ठळकपणे लावलेले होते. सॅनिटरी पॅड हा सजावटीचाच भाग होता.

हा महोत्सव करण्यामागे नाशिकमध्ये एक दुःखद आणि अप्रिय घटना घडली असं चांदगुडे म्हणाले.

'तू झाड लावू नकोस'

नाशिक जिल्ह्यातील त्रंबकेश्वर तालुक्यात देवगाव आश्रमशाळेत यावर्षी 25 जुलैला विज्ञान शाखेच्या विद्यार्थिनीने मासिक पाळी असल्यामुळे वृक्षारोपण कार्यक्रमात सहभाग घेऊ नये असं शिक्षकाने सांगितल्याचा आरोप केला होता. याची तक्रार या विद्यार्थिनीने थेट आदिवासी आयुक्तांकडे केली होती. आणि तक्रार करणारा स्वतःचा व्हीडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध केला होता.

'मासिक पाळी असलेल्या तरुणीने झाड लावल्यास ते जळून जातं' असं शिक्षक म्हणत होते असं त्या मुलीने तक्रारीत म्हटलं होतं. त्यानंतर आदिवासी भागात काम करणाऱ्या श्रमजीवी संघटना आणि अंधश्रद्धा निर्मुलन समितीने अंधश्रद्धेला खतपाणी घातलं जात आहे असा आरोप शिक्षकावर केला होता. सामाजिक संस्थांनी शाळेत जाऊन मासिक पाळीविषयी प्रबोधनही केलं होतं.

'शिक्षकावर कारवाई करा'

शाळेचे मुख्याध्यापक अरविंद सुरवडे यांनी झालेला प्रकार निंदनीय असल्याचं बीबीसीशी बोलताना सांगितलं. 'विद्यार्थिनीने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हीडिओवर आक्षेप नोंदवताना म्हटलं की, तिने शाळेकडे रितसर तक्रार करायला हवी होती. शाळेत गैरहजर राहण्यावरून शिक्षकांनी तिला इशारा दिला होता.'

आदिवासी संघटना तसंच महिला आणि बालहक्क आयोगाने या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली.

आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त संजय गोलाईत यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.

या सगळ्या प्रकारानंतर महिला आणि बाल हक्क आयोगाच्या सदस्या सायली पालखेडकर यांनी "विद्यार्थिनीला वृक्षारोपणापासून वंचित ठेवणाऱ्या शिक्षकावर कारवाई करावी" अशी मागणी केली होती. "मुलीला आधाराची गरज असून आम्ही तिच्या मागे खंबीरपणे उभे आहोत, तसंच या आश्रमशाळेत अनेक त्रुटी आढळल्या असून मी सुचना दिल्या आहेत" असं पालखेडकर म्हणाल्या. त्यानंतर आदिवासी विभागाने विद्यार्थिनीच्या हस्ते वृक्षारोपण केलं.

आता या प्रकरणातील शिक्षकाची दुसर्‍या आश्रमशाळेत बदली करण्यात आली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)