You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
खडी गंमत : पुरुषांनी पुरुषांसाठी सादर केलेली 'ही' लोककला खरंच अश्लील आहे?
- Author, नीलेश धोत्रे
- Role, बीबीसी मराठी
मावशी: अहो! त्या डॉक्टरने मले बेंचावर उतानी झोपवली हो...😟
नाच्या: …आणि तू झोपली? 😳
मावशी: 2 कानात घातलेले आणि एक वाकडं वाकडं घेऊन आला हो… 🩺
नाच्या: आता हे काय वाकडं? 🤔
मावशी: वाकडं होतं बाई आणि एवढं एवढं लांब होतं... 😔
नाच्या: एवढं लांब होतं? हे सांगा पाहायला कसं होतं? 😠
मावशी: समोरून बारीक नं मागून ठोकर होतं गं...😨
नाच्या: समोरून बारीक आणि मागून ठोकर? 😳
मावशी: का करू जी? 🥺
नाच्या: अगं ते गाजर होतं!🥕 तुला खायला दिलं होतं डॉक्टरनी…🤣
(हे सगळं सुरू असतं ते नको तसे हातवारे आणि खाणाखुणा करून...)
हे वाचताना किंवा ऐकताना तुम्हाला अश्लील किंवा द्विअर्थी वाटेल कदाचित... पण हे संवाद आहेत एका अशा लोककलेतले जिला इतिहास आहे, परंपरा आहे. महाराष्ट्राच्याच एका भागात या लोककलेवर लोक उदंड प्रेम करतात. ही कला लोकांचं मनोरंजनही करते, पण त्याचबरोबर प्रबोधनासाठीही तिचा वापर होतो.
जुन्या मराठी सिनेमामधून तमाशा, लावणी हे आपल्याला माहीत झालं आहे. पण याच तमाशाचं जुळं भावंड शोभेल अशी 'खडी गंमत' तुम्हाला माहीत आहे का?
"सावनेरमध्ये एकदा एका कार्यक्रमानंतर काही तरुणांनी मला घेरलं होतं. मग आम्हाला पोलिसांना फोन करावा लागला होता. मग पोलीस आले आम्ही त्यांच्या गाडीत बसलो. त्यानंतरसुद्धा तरुणांनी गाडीच्या काचा ठोकल्या. यांना आम्ही उचलणारच असं ते म्हणत होते. मी खूप घाबरलो होतो. मग मी पोलीस स्टेशनला जाऊन संपूर्ण मेकअप काढला आणि कपडे बदलले. त्यानंतर मात्र त्या मुलांनी आम्हाला ओळखलं नाही. मगच आम्ही घरी जाऊ शकलो."
पुरुषच स्त्री पात्र रंगवून सादर करत असलेला खडी गंमत हा लोककलेचा प्रकार विदर्भात अतिशय लोकप्रिय आहे. यातलेच एक कलाकार (नाच्या) दीपक उर्फ बंटी यांच्याशी मी बोलत होतो. त्यावेळी त्यांनी हा प्रसंग सांगितला. दीपक स्त्रीच्या वेशात खडी गंमतमध्ये नाचतात.
विदर्भात खडी गंमत लोककलेचे पश्चिम महाराष्ट्राप्रमाणेच फड असतात. पश्चिम महाराष्ट्रात त्याला लावणी किंवा तमाशा म्हणतात तर विदर्भात त्याला खडी गंमत किंवा खडा तमाशा म्हणतात.
ही लोककलासुद्धा पश्चिम महाराष्ट्रातल्या तमाशाएवढीच किंवा त्याहून जुनी आणि लोकप्रिय आहे. तमाशाचं मूळरूप म्हणूनसुद्धा याकडे पाहिलं जातं. तसंच पश्चिम महाराष्ट्रातल्या तमाशाचं जुळं भावंड म्हणूनसुद्धा खडी गंमतचा उल्लेख होतो.
पण या खडी गंमत किंवा खड्या तमाशात आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या तमाशात एक मुलभूत फरक आहे...तो म्हणजे, विदर्भात ही कला पारंपरिकरीत्या फक्त पुरुषच सादर करतात.
गेल्या काही वर्षांत महिलांचाही त्यात सहभाग झाला आहे, पण तो शाहिरीपुरता मर्यादित आहे. नाचकाम किंवा नृत्य हे पुरुषच महिलेचं रूप घेऊन करतात आणि भल्याभल्यांना विश्वास बसणार नाही एवढ्या चपखलपणे हे पुरुष ही कला सादर करतात.
पण खडी गंमत म्हणजे फक्त एवढंच नाही. या कलेला एक मोठा एतिहास आहे, परंपरा आहे आणि आधुनिकतासुद्धा आहे.
अनेकांना ही लोककला फक्त ग्रामीण आणि अश्लील वाटते, तर अनेकांना ती निखळ मनोरंजन वाटते. ग्रामीण भागात प्रबोधनासाठीसुद्धा तिचा वापर झालाय. संतांनीसुद्धा या लोककलेचा वापर प्रबोधनासाठी केला आहे.
पण ही कला खासकरून पूर्व विदर्भापुरतीच का मर्यादित राहिली? तिचा महाराष्ट्रभर प्रसार का झाला नाही? इतिहास आणि परंपरा असूनही ती मोठ्या लोकसंख्येपासून दूर का राहिली?
साधारण संध्याकाळी सातची वेळ. गावात 12 बाय 15चा स्टेज लागलेला. या स्टेजवर वरून दोरीने सोडलेल्या एका आडव्या काठीवर 5 फुटांच्या अंतरात 5 माईक लटकवलेले असतात, आणि समोर बघ्यांची ही तोबा गर्दी जमलेली असते. कुणी शिट्ट्या मारतंय. कुणी 'कार्यक्रम लवकर सुरू करा,' अशी हाक मारतंय. कुणी काय बोलतंय, तर कुणी...
खडी गंमत म्हटलं ही पूर्व विदर्भातल्या ग्रामीण भागात हे चित्र हमखास दिसतं.
अशा सगळ्या माहोलात खडी गमतीच्या पार्टीची माणसं स्टेजवर येतात (किंवा असेल तिथे पडदा वर जातो) आणि लोकांचा एकच गोंगाट सुरू होतो. अस्सल वैदर्भीय बाजात शाहीर गणेशवंदना सुरू करतात आणि कार्यक्रमाला सुरुवात होते.
गणेशवंदना कधीकधी हिंदी आणि मराठी मिश्रीत भाषेतसुद्धा असते. गणेश वंदना सुरू असतानाच एक एक करून स्त्रीच्या वेशातील पुरुष नाचे स्टेजवर येतात आणि सुरू होते गंमत...
खडी गंमत म्हणजे उभं राहून गंमत करणे. यामध्ये रात्रभर पुरुष कलावंत डफ, ढोलकी, झांज, सिंथेसाझर, किबोर्ड, क्लॅरिओनेट (पिपाणीसारखं वाद्य) आणि हार्मोनियम या वाद्यांच्या सहाय्याने गण, गवळण, बतावणी आणि नाट्यरूपात कथा सादर केली जाते.
महत्त्वाचं म्हणजे खडीगंमतमध्ये 18 पगडजातीचे कलावंत असतात. कुठल्याही एका जातीधर्मापुरती मर्यादित असलेली ही लोककला नाही. साधारण सप्टेंबर ते फेब्रुवारीपर्यंत हे कार्यक्रम सादर होतात. म्हणजे साधारण पोळ्यापासून ते महाशिवरात्रीपर्यंत.
पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी गावात खडी गंमत झालीच पाहिजे, अशी अनेक गावांमध्ये प्रथा आहे. पोळा, दिवाळी, संक्रात या सणांना हामखास या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं.
संक्रातीनंतर महाशिवरात्रीपर्यंत तर खडी गंमत कलावंतांना विश्रांतीच नसते. एका फडात साधारण 9 माणसं असतात. शाहीर, सुरते, ढोलक्या, चोंडक्या, टाळवादक, क्लॅरिओनेटवादक, नाच्या अशा मंडळींचा त्यात सहभाग असतो.
रचना आणि सादरीकरण
दिवाळी संपली की पूर्व विदर्भातल्या नागपूर, भंडारा, गोंदीया, गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळमध्ये खडी गंमतीच्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. अमरावती, वर्धा, अकोला या पश्चिम विदर्भातल्या जिल्ह्यांमध्येसुद्धा त्याचं आयोजन केलं जातं. पण तुलनेने पूर्व विदर्भात ही लोककला जास्त लोकप्रिय आहे. शिवाय खडी गंमतच्या फडांची संख्या सर्वांत जास्त भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातच आहे.
पूर्वी नागपूर शहरात प्रत्येक भागात या कार्यक्रमाचं आयोजन केलं जायचं. त्याला अस्सल वैदर्भीय भाषेत 'मंडई लागणं' म्हणतात. म्हणजे नागपूर शहराच्या अनेक भागांमध्ये कार्तिक पौर्णिमा किंवा त्याच्या आसपास मंडई लागायची आणि साधारण आठवडाभर कार्यक्रम चालायचे. या आठ दिवसांमध्ये वेगवेगळे फड येऊन त्यांची कला सादर करायचे. आजही नागपूर शहरात मंडईची लोकप्रियता कमी झाली असली तरी, ग्रामीण भागात या लोककलेचे चाहते आजही तितकेच पाहायला मिळतात.
पूर्व विदर्भात खडी गंमतीचे शेकडो फड आहेत आणि दिवाळी संपली की त्यांचं शेड्यूल अत्यंत बिझी होऊन जातं. गावागावात खडी गमतीचं आयोजन केलं जातं. ग्रामीण तरुण आणि एकंदर जनता या गमतीची अजूनही चाहती आहे. त्याचं कारण त्यांच्या 'double meaning' / द्विअर्थी संवादांमध्ये असल्याचंही बोललं जातं.
विदर्भात महिलेच्या वेशात कला सादर करणाऱ्या पुरुषांना नाच्या म्हणतात. महत्त्वाचं म्हणजे विदर्भात या शब्दाचा वापर सन्मानपूर्वक केला जातो. (या नाच्यांची अदाकारी आणि प्रेक्षकांना पडलेली भूरळ याचे रंजक किस्से आपण पुढे पाहणारच आहोतच.) खडी गंमतमध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची असते.
गोऱ्या आणि सुंदर दिसणाऱ्या पुरुषाला बरेचदा हे नाच्याचं पात्र साकारायची संधी दिली जाते. विदर्भातल्या झाडीबोलीत नाच्याला 'लेमडा'सुद्धा बोलतात.
गणेशवंदनेनं या खडी गंमतची सुरुवात होते आणि नंतर ढोलकी आणि डफाची सलामी दिली जाते. त्याला चोंडकं (तुणतुणं) तसंच झांज, क्लॅरिओनेट आणि हार्मोनियमची साथ असते. काही ठिकाणी कीबोर्ड किंवा सिंथेसायजरसुद्धा वापरला जातो.
त्यानंतर गण म्हटला जातो. त्यावेळी सर्वजण हात जोडून उभे राहतात. प्रार्थना करतात. त्यानंतर गवळण होते. त्यानंतर लावणी नृत्य सादर केलं जातं (ज्यावर आजकाल हिंदी सिनेमांचा मोठा प्रभाव असतो).
मग एखादं कथानाट्य सादर केलं जातं. त्याचे विषय वेगवेगळे असतात. कधी ते ग्रामस्वच्छता, साक्षरता, दारूबंदी, हुंडाबंदी, अंधश्रद्धा निर्मूलन, स्त्रीभ्रूण हत्या असे असतात. तर कधी ते निखळ मनोरंजनाचे असतात.
खड्या गंमतमध्ये पोवाडेसुद्धा सादर केले जातात. पण ते पश्चिम महाराष्ट्रातल्या पोवाड्यांपेक्षा वेगळे असतात. खडी गंमतमधले पोवाडे हे प्रदीर्घ काव्य असतं. कधीकधी ते तास-दोन तास चालतात. एखादं कथानक निवडून त्यासंदर्भातील चरित्राख्यान यामध्ये गायलं जातं. ऐतिहासिक, सामाजिक, आधुनिक असे सर्व पोवाडे गायले जातात.
फक्त मनोरंजनासाठी सादर केलेल्या कथांमधल्या श्रृंगारिक भावांमुळे अनेकदा कार्यक्रमांमध्ये प्रेक्षकांकडून नाच्याला उद्देशून अश्लील टिपण्णी होते. शिट्ट्या मारल्या जातात.
खडी गंमतमध्ये तरुण गवळण आणि वृद्धपती हे कथानक हमखास सादर केलं जातं. त्याचा मूळ आधार हा संत नामदेवांच्या गवळणीचा असतो. ज्यामध्ये वृद्धपती तरुण पत्नीला दही विकण्यासाठी बाजारात जाण्यास सांगतो.
आता मात्र या गवळणीत सध्याचे संदर्भसुद्धा वापरले जातात. उदाहरणार्थ, गवळणीला दही विकायला जाण्याऐवजी बचत गटाच्या बैठकीला जायचं असतं. शिवाय त्यात तात्कालिक विनोदसुद्धा केला जातात, ज्यात 'डबलमीनिंग' ठासून भरलेलं असतं. गवळणीवर पतीने घेतलेल्या संशयाचं कथानकसुद्धा अनेक ठिकाणी सादर केलं जातं.
गवळण हा केवळ गीतगायनाचा प्रकार नसून त्यात आकृतीबंध संवाददेखील असतात. त्याची सुरुवातच मुळात पती-पत्नीच्या संवादाने होते. डफाचा त्यात भरपूर वापर होतो.
खडी गंमतवर असलेल्या डफगाण्याचा प्रभाव यातून जाणवतो. डफगाण ही महानुभव पंथाच्या काळात सुरू झालेली कला होती. पण हेही तेवढंच खरं आहे की आजकाल सिनेमांच्या गाण्यांचा-संगीताचा मोठा प्रभाव या लोककलेवर पडला आहे.
सिनेमाच्या गाण्यांच्या चालीवर आधारीत अनेक गाणी शाहीर मंडळी रचतात, ज्यांचे विषय अनेकदा तात्कालिक असतात.हा संपूर्ण कार्यक्रम रात्रभर चालतो. 9 ते 10 तास हा कार्यक्रम चालतो. मुजरा अर्थात सूर्यप्रार्थना आणि राष्ट्रगीताने खडी गंमतीचा कार्यक्रम संपतो.
दिवाळीनंतर पूर्व विदर्भात धानाची (भात) कापणी झालेली असते. मग ही मोकळी शेतं फड लावण्यासाठी वापरली जातात. थंडीचा काळ असल्याने लोक त्यांची पांघरूणं घेऊन कार्यक्रम सुरू होण्याआधीच जागा अडवून बसतात. आजकाल हॉल किंवा चौकांमध्येसुद्धा हे कार्यक्रम होतात.
दुय्यम खडी गंमत हासुद्धा एक निखळ मनोरंजनाचा प्रकार असल्याचं लोककला अभ्यासक हरिश्चंद्र बोरकर सांगतात. यामध्ये पौराणिक काळातले सवाल-जवाब रात्रभर चालतात.
कोकण पट्ट्यातल्या शक्तितुरा किंवा पश्चिम महाराष्ट्रातल्या लावण्यांमध्ये जसे सवाल-जवाब असतात तसेच हेसुद्धा असतात. जुन्या मराठी सिनेमांमध्ये अनेकांनी ते पाहिलेदेखील असतील.
या एका कार्यक्रमाचे एका फडाला साधारण 25-30 हजार रुपये मिळतात, असं बोरकर सांगतात.
नाच्या म्हणून जगताना
नाच्या हा खडी गंमतचा अविभाज्य घटक. नाच्याशिवाय खडी गंमतचा कुठलाच कार्यक्रम शक्य नाही.
विदर्भातल्या या लोककलेची मागोवा घेता-घेता मी भंडारा जिल्ह्यातल्या सिल्ली या छोट्याशा खेड्यात पोहोचलो. तिथंच भरदुपारी माझी ओळख एका पार्टीशी झाली.
त्यांनी माझ्यासाठी एक लहानसा कार्यक्रम सादर केला. आणि नाचकाम संपल्यानंतर छबिलाल यांना भोवळ आली. पाणी, चहा वगैरे दिल्यानंतर त्यांना थोडं बरं वाटू लागलं, आणि त्यांनी माझ्याशी बोलायला सुरुवात केली.
60 वर्षीय छबिलाल यांचं 4 माणसांचं कुटुंब आहे. ते, त्यांची पत्नी, मुलगा अन् सून. हातात कुठलीही जमीन नाही, त्यामुळे एरव्ही ते नाचकाम नसताना मजुरी करतात... शेतमजुरी, मिस्त्रीकाम, सुतारकाम. त्यांची बायकोसुद्धा मजुरी करते. 10वी शिकलेला त्यांचा मुलगा मात्र नाट्यलेखन करत असल्याचं ते अभिमानानं सांगतात.
महिलेचं पात्र साकारता म्हणून कुणी वाईटसाईट बोलतं का, असं विचारल्यावर त्यांनी चांगलेच अनुभव सांगितले.
"माझं नवीनच लग्न झालं होतं, तेव्हा मी नुकतंच नाचकाम सुरू केलं होतं. तेव्हा मी खडी गंमतमध्ये नाचकाम करतो म्हणून माझ्या सासऱ्यानं त्यांच्या गावात माझा कार्यक्रम आयोजित केला होता. माझा जावई नाचतो, असं ते अभिमानानं सांगत होते."
पण आता मात्र नाचकाम सोडण्यासाठी घरून दबाव असल्याचं ते सागंतात. सरकारी पेन्शन मिळेल, या एकमेव आशेनं ते अजूनही हे काम धरून आहे. "नाहीतर कधीच हे सर्व फेकून दिलं असतं," असं साडी आणि अंगावरच्या दागिन्यांकडे इशारा करत त्यांनी सांगितलं.
वयामानानुसार आता छबिलाल यांच्या शरीरावर सुरकुत्या आल्या आहेत, पण म्हणून त्यांची अदाकारी, गायन किंवा नृत्यात कुठलाही फरक पडलेला नाही.
गेल्या 40 वर्षांमध्ये अनुभवलेला एक मुलभूत बदल म्हणजे, "आता कार्यक्रमाला येणाऱ्यांच्या गर्दीत 10 टक्के फरक पडला आहे. टीव्ही आणि नवीन माध्यमांमुळे लोक कार्यक्रमाकडे कमी फिरकतात."
छबिलाल यांच्यासारखे असे चांगले अनुभव सर्वांच्याच नशिबी येतात, असं नाही.
नाच्याला तरुणांनी घेरलं तेव्हा...
दीपक दहीकर उर्फ बंटी वयाच्या 14व्या वर्षांपासून खडी गमतीमध्ये नाच्याची भूमिका साकारत आहेत. अनाथ असलेले दीपक यांना फडातल्या अनेकांनीच आधार दिल्याचं ते सांगतात.
फक्त 10वीपर्यंत शिक्षण घेतलेल्या दीपक यांनी सादर केलेल्या अदाकारीवर अनेक जण असे भूलतात की दीपक हे पुरुष असल्याचाही त्यांना विसर पडतो. एकदा तर पोलिसांनीच त्यांचा कार्यक्रम रोखला होता, हे म्हणत की एका अल्पवयीन मुलीला तुम्ही फडात कसं काय नाचवता? ती मुलगी म्हणजे दीपकच!
दीपक यांची ओळख बंटी म्हणून जास्त आहे. ते आणि त्यांच्या बरोबरचा आणखी एका नाच्या, ज्याला लोक बबली म्हणून ओळखतात, त्यांची बंटी-बबलीची जोडी नागपूरच्या पंचक्रोशीत एकेकाळी फार प्रसिद्ध होती.
24 वर्षांच्या दीपक यांना आजवर स्त्रीचं पात्र रंगवताना तसे अनेक बरेवाईट अनुभव आले आहेत.
"चांगले वाईट सर्व अनुभव येतात. लोक नावंसुद्धा ठेवतात. वेशभूषेत असल्यानंतर काही लोक वेगळ्या नजरेनं पाहतात. पण आपण त्याकडे लक्ष द्यायचं नाही. काही ठिकाणी लोक खूप त्रास देतात. कुणी साडी खेचतं, कुणी चिमटा घेतं. कुणी हाताला, पायाला, कमरेला हात लावतं. काही लोक नंबर मागतात. त्यांचा नंबर देतात. असे खूपकाही प्रकार घडले आहेत."
एकदा तर कहरच झाला. दीपक सांगतात...
"सावनेरमध्ये एकदा एका कार्यक्रमानंतर काही तरुणांनी मला घेरलं होतं. मग आम्हाला पोलिसांना फोन करावा लागला होता. मग पोलीस आले, आम्ही त्यांच्या गाडीत बसलो. त्यानंतरसुद्धा तरुणांनी गाडीच्या काचा ठोकल्या. यांना आम्ही उचलणारचं असं ते म्हणत होते. मी खूप घाबरलो होते. मग मी पोलीस स्टेशनला जाऊन संपूर्ण मेकअप काढला आणि कपडे बदलले. त्यानंतर मात्र त्या मुलांनी आम्हाला ओळखलंसुद्धा नाही. मग आम्ही घरी जाऊ शकलो."
पण झालं गेलं ते सगळं मागे सोडून मी माझं काम करत असतो, असं दीपक सांगतात. अनेकदा काम आवडलं की लोक पैसे उधळतात, बक्षीस देतात. पण, अनेकदा कुहेतूनेसुद्धा लोक पैसे देत असल्याचं दीपक सांगतात.
लोकांचं एवढं मनोरंजन करणाऱ्या, त्यांना हसवणाऱ्या दीपक यांनी मला असेच किस्से सांगताना त्यांच्या मनातल्या काही गोष्टी बोलून दाखवल्या...
"कलाकारी करूनही आयुष्यात एकाकी पडलोय. आईवडील नाहीच, नातेवाईकांचा कुणाचाच पाठिंबा नाही. स्वतःच्या हिमतीवर इथपर्यंत आलोय. एकट्या माणसाच्या मागे खूप काही टेन्शन असतं. पण मनाची समजूत काढावी लागते. दुःख मनात साठवून चारचौघात बसतो आणि मित्रमंडळींबरोबर खूश राहतो."
57 वर्षांचे व्यंकट गजभिये हेसुद्धा नाच्याचं पात्र रंगवतात. त्यांच्या अदाकारीचे अनेक चाहते आहेत. त्यांचं मोठं नाव आहे, पण त्यामागे मोठा त्यागसुद्धा आहे.
12वीपर्यंत शिकलेले व्यंकट यांचं मोठं कुटुंब आहे. पण त्यांना कुटुंबाकडून पाठिंब्याऐवजी तिरस्कारच सहन करावा लागतोय. शिक्षण सुटलं तेव्हापासून वयाच्या 57व्या वर्षापर्यंत ते त्यांच्या कुटुंबापासून दूर राहत आहे.
त्यांचा खड्या गमतीतला प्रवासही तितकाच रंजक होता...
"हॉस्टेलमध्ये राहत असताना शाळेच्या नाटकांमध्ये मी मुलीची भूमिका करायचो. तिथून मग एकदा मी खडी गंमतमध्ये काम करायला गेलो. त्यांना माझं काम आवडलं. मग मला त्याचा छंद लागला. पण वडिलांना मात्र हे आवडलं नाही. त्यांनी मला मारलं. माझे केस कापले. ते तिरस्कार करायचे. मग मी कसं तरी 12वीचं शिक्षण पूर्ण केलं, आणि पूर्णवेळ खडी गंमत करण सुरू केलं."
व्यंकट आज 57 वर्षांचे आहेत, पण आजही ते कुटुंकबीयांच्या तिरस्काराचेच धनी आहेत. त्यांचे मोठे भाऊ कुणी प्रोफेसर आहे, कुटुंबातलं कुणी उच्चशिक्षित आहे तर कुणी मोठ्या हुद्द्यावर कामाला आहे. त्यामुळे व्यंकट यांचं काम त्यांना पटत नाही.
चांगल्या अदाकारीचे वाईट परिणाम व्यंकट यांच्याही वाट्याला आलेच. सुरुवातीच्या काळात त्यांचीसुद्धा पुरुष छेड काढायचे.
"18-19 वर्षांचा असताना मी लोकांच्या भीतीने रात्रभर कार्यक्रम सुरू असताना लघवीलासुद्धा जात नव्हतो. लोक कधीकधी फार वाईट नजरेनं पाहायचे. कुणी चिमटा घ्यायचं, मस्करी करायचे.
"एकदा खडकीला कार्यक्रम करताना मी रात्री उशीरा लघवीला बाहेर पडलो तेव्हा काही लोकांनी मला उचललं होतं, पण मी वेळीच आरडाओरडा केल्यानंतर वाचलो."
पण आता लोक त्रास देत नाही, आता आदराने वागवतात, असं ते आवर्जून सांगतात.
उतारवयाकडे झुकलेले व्यंकट आता त्यांच्या एका शाहीर मित्रासोबत भाड्याच्या घरात राहतात. वय वाढलंय पण माझा कामाचा उत्साह अजिबात कमी झाला नाही, ते सांगतात.
या लेखासाठी तुमचे स्त्रीवेशातले फोटो काढायचे आहेत, अशी मी मागणी केली तेव्हा ते लगेचच तयारीला लागले. आणि आधी मी ज्यांच्याशी चर्चा केली तेच व्यंकट अवघ्या अर्ध्या तासात एका स्त्रीरूपात अवतरले. एका घरंदाज स्त्रीसारखं नऊवार पातळ नेसून ते जेव्हा समोर आले तेव्हा एका क्षणासाठी मलासुद्धा माझ्यासमोर कुणी कुलीन स्त्री उभी असल्याचा भास झाला.
मी त्यांची स्तुती केल्याशिवाय राहिलो नाहीच, अर्थात. त्यांनी जरा लाजून ती स्वीकारली आणि नंतर पदर वगैरे नाचवून दाखवला. हे नाही तर काय? असा प्रश्न विचारला असता, ते भावूक होतात.
12वीनंतर डी.एड.ला नंबर लागला होता, तेव्हा ॲडमिशन घेतली असती तर आज आयुष्य काहीतरी औरच असतं, अशी खंत व्यंकट व्यक्त करतात. काही काळ स्तब्ध होतात, आणि लगेच पुढच्याच क्षणाला सर्व विसरून ते दुसऱ्या विषयांना हात घालतात.
खडी गंमतचा इतिहास
खरंतर खड्या गमतीचा इतिहास हा महानुभव पंथाच्या स्थापनेएवढाच जुना असल्याचं लोककला अभ्यासक हरिश्चंद्र बोरकर सांगतात. खडी गंमतची निर्मिती डफगाण या कलाप्रकारातून झाली आहे. 12व्या शतकात डफगाणचा उदय झाल्याचे पुरावे इतिहासात सापडतात.
'लीळाचरित्रा'मध्ये श्रीचक्रधरस्वामींसमोर रवळो कुंभार या शाहिराने डफगाण सादर केल्याचा उल्लेख आहे. तिथूनच पुढे डफगाण-डपरणा गंमत आणि खडी गंमत असा खडी गंमतचा प्रवास आहे.
डफ हे खडी गंमतचं मुख्य वाद्य आहे. खडी गंमतची कालानुरूप अनेक रूपं बदलत गेली, पण ही कला जिवंत राहिली, असं बोरकर सांगतात.
पण खडी गंमतला खडा तमाशा हे नाव का पडलं? बोरकर याचा गंमतीशीर इतिहास सांगतात: औरंगजेबाच्या मुघल सैन्यानं महाराष्ट्रात तळ ठोकल्यानंतर त्यांच्या मनोरंजनासाठी बुलडाण्यातल्या काही कलाकारांना खडी गंमत सादर करण्यासाठी पाचारण करण्यात आलं होतं. त्यावेळी या सादरीकरणावर खूश होऊन 'वाह! क्या तमाशा है' असे उद्गार बादशाहनं काढले होते.
तेव्हापासून मग सैन्यानेसुद्धा तमाशा शब्द वापरायला सुरुवात केली. तेव्हापासून महाराष्ट्रात ढोलकी, तुणतुणं, शाहीर आणि नाच्यानं सादर केलेल्या कलेला तमाशा हे नाव पडलं. गाणाऱ्या व्यक्तीला शाहीर हे नावसुद्धा मुघलांनीच दिल्याचं सांगितलं जातं.
लेखक नामदेव व्हटकर यांनी 1958 मध्ये लिहिलेल्या 'मराठीची लोककला तमाशा' या पुस्तकातसुद्धा वरील घटनेचा उल्लेख आहे. औरंगजेबाच्या फौजेच्या मनोरंजनासाठी स्थानिक कलावंतांनी सादर केलेल्या कलेला तमाशा नाव पडल्याचं व्हटकरांनी नमूद केलं आहे.
श्लील-अश्लील
खडी गंमतमधले संवाद, भाषा आणि सादरीकरण बरेचदा अश्लीलतेकडे झुकणारे असतात, असा एक आरोप सतत होतो. पण त्यामागे काही कारणं आणि इतिहास असल्याचं अभ्यासक सांगतात.
मुघल सैन्यासाठी जेव्हा खड्या गंमतीचा किंवा तमाशाचा कार्यक्रम सादर केला जाऊ लागला तेव्हा त्यात अनेक बदल करण्यात आले. पारंपरिक कार्यक्रम हा पौराणिक कथा, भक्ती, हिंदू धर्म आणि संतांची शिकवण देणारा असायचा.
पण मुघल सैन्यासमोर फक्त तेवढाच कार्यक्रम करून चालणारं नव्हतं. शिवाय उत्तरेतून आलेल्या या लोकांना नायकिणींनी सादर केलेल्या कलेची सवय होती. आणि त्या काळात महाराष्ट्रात अशा प्रकारच्या कला पथकांमध्ये महिलांचा वावर नसायचा. (पुरुष महिलांच्या भूमिका साकारायचे पण ते फक्त गरजेपुरती). परिणामी तमाशातल्या नाच्याला त्याकाळात मोठं महत्त्व प्राप्त झालं.
मग खास मुघल सैन्याच्या मनोरंजनासाठी श्रृंगार रसाची गाणी रचण्यात आली. मग फक्त पुरुषांनी पुरुषांसाठी, तेही सैनिकांसाठी सादर केलेल्या श्रृंगाररसात जिभा थोड्या सैल सुटल्या. सादर करणारेही पुरुष आणि पाहणारेही पुरुषच, मग त्यात द्विअर्थी शब्द भरभरून टाकण्यात आले.
पुढे नंतरच्या काळातसुद्धा ही कला बऱ्याच अंशी पुरुषांनी पुरुषांसाठीच सादर केलेला कार्यक्रम अशीच राहिली. त्यामुळे त्यात 'डबल मीनिंग'चे संवाद आणि संदर्भ तसेच राहिले.
पूर्वी खडा तमाशा किंवा खडी गंमत कुलीन स्त्रियांनी पाहाणं तेव्हा चांगलं लक्षण मानलं जात नव्हतं. अगदी 19व्या शतकापर्यंत अनेकदा उच्चभ्रू मुलांचे पालक त्यांना अशा मनोरंजनापासून दूर ठेवत.
मधुकर वनकर जन्मापासून नागपूर शहरात राहतात. 65 वर्षांचे वनकर यांनी त्यांच्या आयुष्यात अनेकदा खडी गंमत पाहिल्याचं सांगतात.
"लहानपणी आमचे बाबा खडी गंमत पाहू द्यायचे नाहीत. पण नंतर पुढे माझ्या मामानेच एक फड सुरू केला होता. तेव्हा मात्र मामाबरोबरच खडी गंमत पाहता आली," असं मधुकर वनकर सांगतात.
एक तर रात्री उशिरा चालणारे हे प्रयोग, त्यातही 'अशा प्रकारच्या संदर्भांमुळे' पालक त्यांच्या मुलामुलींना खडी गंमत पाहायला पाठवत नव्हते, असं ते सागंतात.
मात्र खडी गंमतमध्ये काहीही अश्लील नाही, असं हरिश्चंद्र बोरकर यांना वाटतं. ते सांगतात, "ज्याला प्रचलित समाज ज्याला अश्लील म्हणतो त्याला खेड्याकडे अश्लील मानत नाहीत. लहान लहान गोष्टीत शिव्या देणं हे सहज आहे. श्लील-अश्लीलची व्याख्या अतिशय कठीण आहे. त्यातली सीमारेषा कुठे असते, हेच कळत नाही आपल्याला. तुम्ही ज्याला अश्लील म्हणता ते श्लील आहे आणि त्या ठिकाणी आलेले संवाद हे उत्स्फूर्त आलेले असतात ते कुणी सांगितलेले नसतात. ती त्यांची स्वतःची भाषा असते."
श्लील-अश्लीलतेकडून जेव्हा हा मुद्दा पुरुषी वर्चस्वाकडे किंवा पितृसत्ताक पद्धती मजबूत करण्याकडे येतो, तेव्हा मात्र "स्वतः महिलेने यामध्ये काम केलं असतं तर कार्यक्रम वेगळा असता. तसंच समोर प्रत्यक्ष महिला असती तर पुरुषांनीसुद्धा तसे संवाद केले नसते. दोन्ही पुरुषच एकमेकांशी संवाद करत असल्यामुळे त्यांना ते एकमेकांना लाज वाटेल, असे वाटत नाहीत," असं बोरकरांना वाटतं.
बरेचदा सादरकर्त्यांची भाषा ही प्रत्यक्ष प्रेक्षकांची भाषा असते आणि त्यामुळेसुद्धा ती बघ्यांना जवळची वाटते. इथं प्रचलित भाषेत केलेलं सादरीकरण लोकांच्या पचनी पडणार नाही, असा दावासुद्धा बोरकर करतात.
महत्त्वाचं म्हणजे आता या कार्यक्रमांमधली अश्लीलता कमालीची कमी झाल्याचं बोरकर सांगतात. "आता 70ते 80 टक्के अश्लीलता कमी झाली आहे. राज्य सरकारच्या वतीनं घेण्यात आलेल्या प्रशिक्षण शिबिरांनंतर बराच बदल झाला आहे. नाहीतर पूर्वी खडे तमाशे एवढे अश्लील असायचे की आमचे वडील आम्हाला ते कधीच पाहू देत नव्हते. पण तरी आजही असे काही फड आहेत ज्यांच्या सादरीकरणात अश्लीलता आहे," हे बोरकर मान्य करतात.
पण या मनोरंजनातून पुरुषप्रधान संस्कृतीचा पुरस्कार होतो का?
खडी गंमतमध्ये वापरली जाणारी भाषा, त्यामधील संवाद हे बऱ्याच अंशी पुरुषप्रधान व्यवस्थेचे वाहक वाटतात. महिलांच्या वागण्याबोलण्यावर टीकाटिपण्णी करणारे असतात. मनोरंजनातून पुरुषप्रधान संस्कृतीचा पुरस्कार केल्याचा आरोपसुद्धा खडी गंमतवर होतो.
स्थानिक पत्रकार आणि कवी सुनीता झाडे यांनासुद्धा तसंच वाटतं.
"खडी गंमत किंवा खडा तमाशा बघायला गेले असता एक लक्षात येते की प्रेक्षकांमध्ये पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांचा सहभाग असतो. कधीतरी अधिक असतो. समोर लहान मुलंमुलीही बसलेली असतात. संहितेत नवराबायकोतील सर्व स्तरातील संवाद सुरू असतो. आणि तो अगदीच पितृसत्ताक असतो, म्हणजे घरच्या बाईला दाबून ठेवणे म्हणजे पुरुषार्थ या अर्थाचा असतो. यातले बहुतांश संवाद स्त्रियांची बेअब्रू करणारे असतात."
प्रत्यक्ष कार्यक्रमात महिलांचा सहभाग नसणं, हे त्या मागचं मुख्य कारण असल्याचं लेखिका प्रतिमा इंगोले यांना वाटतं. त्या मूळच्या अमरावतीच्या आहेत. लहानपणी त्यांनी खडी गमतीचे अनेक कार्यक्रम पाहिल्याचं त्या सांगतात.
"पुरुष प्रधान संस्कृती रुजवणाऱ्या अनेक गोष्टी खडी गंमतमध्ये अनेक वर्षांपासून दिसून येतात. त्याचं मुख्य कारण हा कार्यक्रम पुरुषच पुरुषांसाठी करतात. त्यात महिलांचा सहभाग नसतो," असं प्रतिमा इंगोले यांना वाटतं.
पण ते पाहणाऱ्या अनेक महिलांना प्रत्यक्षात मात्र तसं वाटत नसतं, असंही निरीक्षण सुनीता नोंदवतात.
"महिलांच्या आसपासचे लोक तसंच वागत, बोलत असल्याने त्यांना त्यात काही वावगं वाटतं नाही. त्या त्यावर मनमोकळ्या हसून घेतात. त्यांना त्यातील विशिष्ट जागेतील अर्थाचा बोध करून दिला तर त्या म्हणतात, 'आम्हाला कळतंय सारं, पण काय करणार? आणि त्याविरोधात आवाज उठवून कुठे जाणार? घराबाहेर पडल्यावरही समोर दुसरा खडा तमाशा असतोच ना'."
महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये तो तमाशा सादर करणाऱ्या फडाचासुद्दा दोष नसतो. तेसुद्धा एकप्रकारच्या पुरुषप्रधान व्यवस्थेतच वाढलेले असतात. त्यांनाही वर्षानुवर्षं हेच शिकवलं जातंय.
"विशेष म्हणजे यात काम करणाऱ्या पुरुषांच्या वाट्यालाही बाईपणाचं दु:ख येतं. शाहीर सांगतात की लोक म्हणतात 'तुम्ही फक्त हसवा, जास्त शहाणपणा शिकवू नका'," असं मत सुनीता झाडे नोंदवतात.
...आणि प्रेक्षक रडतातसुद्धा
खडी गंमतमधल्या अश्लील संवादांची सर्वत्र फार चर्चा होते. त्यावर बरंच बोललं जातं. पण या लोककलेत भावनाप्रधान कथांनासुद्धा स्थान आहे.
गंभीर आणि लोकांना विचार करायला लावणारे विषयसुद्धा त्यात हाताळले जातात. व्यसनमुक्तीसाठी खडी गंमत कायमच प्रबोधन करत असल्याचं शाहिर माणिक देशमुख सांगतात.
71 वर्षांचे शाहीर माणिक देशमुख गेल्या 40 पेक्षा जास्त वर्षांपासून शाहिरी करत आहेत.
"लोकांना हसवण्याबरोबरच त्यांना अंतर्मुख करणं, हेसुद्धा आमचं काम आहे, हा वसा आम्ही लोकांच्या प्रबोधनासाठीच घेतला आहे," ते सांगतात.
देशमुख सादर करतात ती दारूच्या आहारी गेलेल्या सावकाराची कथा हामखास लोकांच्या डोळ्यात पाणी आणते. त्यांच्या या कथेमुळे आतापर्यंत चार गावं व्यसनमुक्त झाल्याचा दावासुद्धा ते करतात.
"खडी गंमतमध्ये अनेक राष्ट्रीय आणि गंभीर विषयसुद्धा हाताळले जातात, मुंबईत 26/11 ला झालेल्या हल्ल्याचा संपूर्ण पट खडी गंमतमध्ये नंतर दाखवण्यात आला होता. अनेक खड्या गंमती बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातले प्रसंगसुद्धा रंगवतात," अशी आठवण बोरकर करून देतात.
महिला शाहिरांचा सहभाग
गेल्या काही वर्षांमध्ये खडी गंमतमध्ये महिलांचा सहभागसुद्धा सुरू झाला आहे. पण तो फक्त शाहिरीपुरता मर्यादित आहे. पण महिला शाहीर आल्याचा खडी गंमतला फायदाच झाला, कारण त्यामुळे खडी गंमत जरा स्वच्छ झाली, असं बोरकर यांना वाटतं.
"भाषा सुधारली, शुद्ध मराठीमध्ये आता सादरीकण होतंय. संवादांमध्ये बदल झाला आहे. शिकलेली मंडळी आल्यामुळेसुद्धा बराच फरक झाला आहे," ते सांगतात.
महाराष्ट्र शासनाचे नियमीत होणारे खडी गंमत महोत्सवसुद्धा नव्या-चांगल्या बदलांना निमंत्रण ठरले आहेत. त्यामुळेसुद्धा महिला शाहिरांना प्रोत्साहन मिळत असल्याचं बोरकर यांना वाटतं.
सुरमा बारसागडे या एक महिला शाहीर आहेत. 35 वर्षांच्या सुरमा यांनी गेल्या 4 वर्षांपासून शाहिरी सुरू केली आहे. पण महिलांसाठी हे क्षेत्र खूपच आव्हानात्मक असल्याचं सुरमा सांगतात. सुरमा त्याआधी 12 वर्षं दंडारीमध्ये काम करत होत्या.
"महिला शाहीर स्टेजवर असल्यावर डबल मीनिंगच्या संवादांचं किंवा अश्लील संवादाचं प्रमाण नगण्या असतं. शिवाय आमच्या पार्टीत अशी भाषाच आम्ही वापरतच नाही," असं सुरमा सांगतात.
पण मग सुरमा यांना कधी अश्लील टिपण्णींना तोंड द्यावं लागलं नाही, असं अजिबात नाही. सवालजवाबाच्या कार्यक्रमात समोर महिला आहे तरीसुद्धा तिला कमीपणा दाखवण्यासाठी अश्लील आणि शिवराळ भाषा वापरणारे काही शाहीर असल्याचं सुरमा सांगतात.
"तुम्ही ऐकू शकत नाही अशी त्यांची भाषा असते. पण मी अश्लील भाषेत शाहिरी करायची नाही, असं मला माझ्या गुरूंनी सांगितलं होतं. ते मी आजही पाळते. हे सर्व आपल्यावर अवलंबून असतं. हे माध्यम प्रबोधनाचं आहे.
"आपण लोकांना शिवीगाळ करण्यासाठी स्टेजवर जात नाही. मी दुसऱ्यांना शिव्या देत नाही आणि दुसऱ्यांच्या शिव्या ऐकूनसुद्धा घेत नाही. त्यांना योग्य उत्तर देण्यासाठी सतत अभ्यास करावा लागतो. सवालजवाबाची खूप तयारी करावी लागते," असं सुरमा सांगतात.
महिला शाहीर असल्यामुळे त्यांच्या कार्यक्रमांमध्ये बघ्यांच्या गर्दीत माहिलांची संख्या मोठी असते, असं निरीक्षण त्या नोंदवतात.
"आपण जर पातळी ठेवली तर महिला थांबतात. आपण पातळी सोडली तर मात्र महिला उठून जातात. काही-काही पुरुष शाहीर तर सुरुवातीलाच सांगतात की महिलांनी उठून जावं, ज्याचा मी स्वतः अनुभव घेतला आहे," सुरमा सांगतात.
मानधन किती मिळतं?
खडी गंमत सादर करणारे बहुतांश कलाकार हे पूर्णवेळ कलाकारी करत नसतात. सप्टेंबर ते मार्च दरम्यान ते कार्यक्रम करतात इतर वेळी मात्र ते मजुरी आणि इतर कामं करतात.
एका कार्यक्रमाचे एका पार्टीला साधारण 10 ते 15 हजार मिळतात. त्यात प्रत्येकाच्या वाट्याला पाचशे ते हजारच्या आसपास रुपये येतात.
आता काळ बदलतोय. त्यानुसार पूर्वी सारखे कार्यक्रम मिळत नसल्याचं कलाकार अज्ञान फागो सांगतात. ते गेल्या 30 वर्षांपासून खडी गंमतमध्ये चोंडकं म्हणजेच तुणतुणं वाजवण्याचं काम करतात.
आता काही ठिकाणी फक्त 3 तासांचेसुद्धा कार्यक्रम आयोजित होत असल्याचं ते सांगतात. "लोकांकडे आता फार वेळ नाही. त्यामुळे मग ते 3 तासांच्याच कार्यक्रमांची मागणी करतात. आजकाल कार्यक्रम रात्री 12 वाजताच संपतात," फागो सांगत होते.
संत तुकडोजी महाराजांचा प्रभाव
खडी गंमत या लोककलेवर संत तुकडोजी महाराज यांचा प्रभावसुद्धा दिसून येतो. खडी गंमतच्या फडांच्या नावांमध्ये 'राष्ट्रीय' हा शब्द हमखास असतो. तो उल्लेखच मुळात संत तुकडोजी महाराजांच्या सूचनेवरून आला आहे.
या संदर्भातली माहिती देताना हरिश्चंद्र बोरकर सांगतात, "संत तुकडोजी महाराजांना एकदा तुमसरच्या खडा तमाशा महोत्सवाचं आमंत्रण आलं होतं. त्याला जाऊ नये, असं त्यांच्या अनुयायांनी त्यांना सांगितलं. संतकार्य आणि तमाशा वेगळा आहे, असा युक्तिवाद अनेकांनी केला. पण तरीही महाराज त्या कार्यक्रमाला गेले."
"तिथं त्यांनी भाषण करताना म्हटलं, तुम्ही 9 कलावंत असाल तर मी दहावा कलावंत आहे. मला तुमच्यातलाच एक समजा. मी तुमच्या बरोबर नाचू शकतो. तुमच्याबरोबर काम करू शकतो. पण फक्त म्हणणं एकच आहे ते म्हणजे याचं स्वरूप फक्त मनोरंजानत्मक नको. यामध्ये राष्ट्रीय भावना आली पाहिजे. लोकांचं प्रबोधन झालं पाहिजे. असं म्हणत या कार्यक्रमाला आता तुम्ही राष्ट्रीय खडी गंमत म्हणा, असं तुकडोजी महाराजांनी सुचवलं. तिथून मग प्रत्येक फडात राष्ट्रीय भावना निर्माण झाली," असं बोरकर सांगतात.
युट्यूबवरील खडी गंमत
प्रसार माध्यमांच्या बदलत्या स्वरूपांचा प्रभाव सर्वच क्षेत्रांमध्ये दिसून येतोय. खडी गंमत तरी त्याला अपवाद कशी असेल?
नागपूरच्या कन्हान-कांद्री गावात राहणारे नंदकिशोर वंजारी यांनी त्याची ताकद ओळखली आणि फक्त खडी गंमतसाठी 'Sim Sim Eye' नावाचं युट्यूब चॅनल सुरू केलं. सध्या त्यांच्या चॅनेलचे 48 हजार सब्स्क्राइबर आहेत. त्यांच्या काही व्हीडिओंना लाखो व्ह्यूज आहेत.
एमबीएची पदवी घेतलेले नंदकिशोर केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या CCRT मधून खडी गंमत लोककला या विषयावर पीएचडी करत आहे. तीन वर्षांपूर्वी यांच्या डोक्यात हे चॅनेल सुरू करण्याची आयडिया आली.
"बदलत्या काळात कला जिवंत राहावी आणि तिचा जास्तीत जास्त प्रसार व्हावा, यासाठी मी हे चॅनल सुरू केलं. खडी गंमत करणारे काही शाहीर आम्हाला संपर्क करतात आणि मग आम्ही त्यानुसार आमचा सेटअप लावून संपूर्ण कार्यक्रम शूट करतो. त्यानंतर त्यातला महत्त्वाचा भाग यूट्यूबवर टाकतो," नंदकिशोर सांगतात.
या चॅनेलच्या माध्यमातून त्यांना महिन्याला साधारण 10 हजार रुपयांच्या आसपास कमाई होते. पण "पैसे कमवणं हा चॅनेलचा हेतू नाही, तर जास्तीत जास्त लोकांना ही कला कळावी यासाठी मी हे करत आहे,"असं त्यांचं म्हणणं आहे.
प्रत्येक लोककलेचे चांगले वाईट आयाम असतातच. खडी गंमत या प्रकारातही ते आहेत. भाषेचा अडसर असल्याने ती संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचली नाही. (कारण खडी गंमतच सादरीकरण बऱ्याचअंशी वैदर्भीय भाषेत होतं.)
तरीही ही कला आजही जिवंत आहे. ही कला सादर करणाऱ्या कलाकारांचं या कलेवर प्रेम आहे आणि ते असलं की कोणतीच कला लोप पावत नाही. कोणत्याही कलेची तीच 'खरी गंमत' आहे.
संदर्भ
- महाराष्ट्राच्या प्रयोगात्मक लोककला - परंपरा आणि नवता (1850-2016) - प्रा. डॉ. प्रकाश खांडगे
- तमाशा - नामदेव व्हटकर, महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली
- खडीगंमत - तमाशा रंजनप्रधान प्रयोगात्म लोकनाट्य - प्रा. डॉ. मनोज उजैनकर
- लुप्तप्राय लोकाविष्कार - डॉ. हरिश्चंद्र बोरकर
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)