लसीकरण झाल्यानंतर CAA कायद्याची अंमलबजावणी करणार- अमित शाह #5मोठ्याबातम्या

आज सकाळी विविध वेबसाईट आणि वर्तमानपत्रात प्रकाशित झालेल्या बातम्यांचा आढावा.

1.लसीकरण झाल्यानंतर CAA आणणार- अमित शाह.

लसीकरणाची मोहीम झाल्यानंतर नागरी सुधारणा कायदा अंमलात आणणार असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्पष्ट केलं. पश्चिम बंगालमधील भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी काल (2 ऑगस्ट) शाह यांची भेट घेतली आणि या कायद्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याची विनंती केली. तेव्हा अमित शाह यांनी ही बाब स्पष्ट केली.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार नागरी सुधारणा कायदा हा मुस्लिम नागरिकांच्या विरोधात असल्याचा आरोप केला जातो. मात्र पश्चिम बंगालसारख्या राज्यात हा कायदा फार महत्त्वाचा आहे कारण पश्चिम बंगालमध्ये बांग्लादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातून अनेक लोक येत असतात.

नागरी सुधारणा कायद्यानुसार 31 डिसेंबर 2014 नंतर पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधून आलेल्या लोकांना भारताचं नागरिकत्व मिळणार नाही. संसदेने हा कायदा 2019 मध्ये मंजूर केला होता आणि त्याला देशभरातून मोठा विरोध झाला होता.

2. उदय सामंत यांनी सांगितला त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा थरार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर मंगळवारी (2 ऑगस्ट) शिवसैनिकांनी हल्ला केला. पुण्याच्या कात्रज चौकात मोठा गोंधळ झाला.

या गोंधळानंतर उदय सामंत कोथरूड पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. सामंतांच्या गाडीवर झालेल्या या हल्ल्यात त्यांच्या गाडीच्या मागची काच पूर्णपणे फुटली आहे.

न्यूज 18 लोकमतने ही बातमी दिली आहे.

"माझी गाडी सिग्नलला थांबली होती. सिग्नलमुळे मी कुठेही घाई न करता थांबलो होतो. माझ्या बाजूला दोन गाड्या येऊन थांबल्या. त्या गाड्यांमधून दोन पांढरे शर्ट घातलेले युवक उतरले. एकाच्या हातात बेस बॉलची स्टिक होती, तर दुसऱ्याच्या हातात दगड बांधलेला होता. ते मला शिव्या घालत होते. दुसऱ्या बाजूला 50 ते 60 लोकांचा मॉब होता", असं उदय सामंत यांनी सांगितलं.

"मी डाव्या बाजूला बघितलं, जेव्हा सुरक्षा अधिकाऱ्यांनी माझं संरक्षण करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी दुसरे दोन पांढरे शर्ट घातलेले युवक होते त्यांच्या हातात सळई होते. ज्याने हा प्रकार केला होता ते काही लोकांना शूटिंग करायला सांगत होते. त्यांनी शिवीगाळ करुन गाडीवर चढून मारण्याचा प्रयत्न केला", अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.

3.मंत्री दोन पण निर्णय 750, शिंदे-फडणवीस सरकारचं एक महिन्याचं प्रगतीपुस्तक

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेऊन एक महिना उलटला असली तरी अद्याप मंत्रीमंडळाचा विस्तार होऊ शकलेला नाही. असे असले तरी शिंदे आणि फडणवीस यांनी निर्णयांचा धडाका लावला असून गेल्या महिनाभरात त्यांनी जवळपास साडेसातशे शासन निर्णय काढले आहेत. त्यात सार्वजनिक विभागाच्या 91 तर, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागासंबंधी 83 निर्णयांचा समावेश आहे.

मंत्रीमंडळ विस्तार होत नसल्याने विरोधकांकडून टीका होत असली तरी मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यभर दौरे सुरू केले आहेत. तर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठका आणि भेटीगाठींवर भर दिला आहे. हे सर्व सुरू असताना शिंदे सरकारने निर्णयांचा मात्र मोठ्या प्रमाणात धडाका लावला आहे. या शासन निर्णयात आरोग्य विभागाच्या सर्वाधिक 91 तर, पाणीपुरवठा विभागासंबंधी 81 निर्णयांचा समावेश आहे. 12 जुलै रोजी सर्वाधिक, 70 शासन निर्णय प्रसारित झाले असून त्यात पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या 36 निर्णयांचा समावेश आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागासंबंधी 91, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागासंबंधी 83, सामान्य प्रशासन विभागासंबंधी 63 शासननिर्णय घेण्यात आले. तर, शालेय शिक्षण व क्रीडा विभागासंबंधी 50, महसुली व वन विभागासंबंधी 44, जलसंपदा विभागासंबंधी 41, कृषी विभागासंबंधी 35 निर्णय घेण्यात आले.

महाराष्ट्र टाइम्स ने ही बातमी दिली आहे.

4. गणेशोत्सवात शेवटचे पाच दिवस स्पीकर वाजवण्यास 12 पर्यंत परवानगी

"न्यायालयाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून यंदाचा गणेशोत्सव उत्साहात, धूमधडाक्यात साजरा करू. गणेशोत्सव मंडळांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही, गणेशोत्सवाच्या अखेरच्या पाच दिवसात रात्री बारा वाजेपर्यंत स्पिकर वाजविण्याची परवानगी असेल," असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी (2 ऑगस्ट) रात्री उशीरा स्पष्ट केले.

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तालयात मंगळवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील गणेशोत्सव मंडळांची बैठक झाली.

शिंदे म्हणाले, "पुण्यातील गणेशोत्सव मंडळांना ऐतिहासिक वारसा आहे. राज्यभरातून अनेकजण गणेशोत्सव पाहायला पुण्यात येतात. यंदाच्या गणेशोत्सवाबाबत मंडळांच्या काही मागण्या होत्या, त्याविषयी मंडळाच्या पदाधिकारी यांच्यासोबत बैठक पार पडली. यंदा मंडळाना कोणतीही अडचण येणार नाही, जिल्हाधिकारी यामध्ये लक्ष घालतील. न्यायालयाच्या नियमांचे पालन करून विसर्जन मिरवणूका काढू. कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नाही, याची योग्य खबरदारी घेतली जाईल."

सकाळने ही बातमी दिली आहे.

या बैठकीला पुण्यातले महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते.

5. 40 आमदार हा महाराष्ट्राचा चेहरा असू शकत नाही

आदित्य ठाकरे सध्या राज्यव्यापी दौऱ्यावर आहेत. काल ते पुण्यात होते. 40 आमदार हे राज्याचा चेहरा असू शकत नाही अशी टीका त्यांनी शिंदे गटावर केली. शिंदे गटाने बंडाची दिलेली कारणं अतिशय तकलादू असल्याचं ते म्हणाले.

द हिंदूने ही बातमी दिली आहे.

शिव संवाद यात्रेअंतर्गत त्यांनी काल कोल्हापूर, सातारा, सांगली येथे शिवसैनिकांशी संवाद साधला. शिंदे- फडणवीस सरकार बेकायदा असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांनी आमदार खासदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा लोकांमधून निवडून यावं असं आम्ही त्यांना आवाहन देत असल्याचं ते म्हणाले.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)