एकनाथ शिंदेंकडे 31 तारखेला राजीनामा सुपूर्द करणार - अब्दुल सत्तार #5मोठ्याबातम्या

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. मी 31 तारखेला राजीनामा देणार - अब्दुल सत्तार

आमच्या 50 जणांपैकी पहिला राजीनामा मी देणार आहे, असं वक्तव्य शिंदे गटातील आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलं आहे. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.

"मी अर्जुन खोतकर आणि हेमंत पाटील यांना भेटण्यासाठी दिल्लीत आलोय. त्यांना निर्णय घेण्यासाठी इतका उशीर का लागतोय, हे जाणून घेण्यासाठी मी दिल्लीत आलोय," असं सत्तार म्हणाले.

आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांनी राजीनामा द्यावा, असं आव्हान केलं आहे. याविषयी बोलताना सत्तार म्हणाले, "31 तारखेला माझ्याकडे महामेळावा आहे, मुख्यमंत्र्यांचा सत्कार आहे. त्यांचे आभार मानणार आहे.त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम सिल्लोड मतदारसंघात ठेवलेला आहे.

"माझं मन स्पष्ट झालं आहे. मुख्यमंत्र्यांनी राजीनाम्याची परवानगी दिली, तर मी राजीनामा देणार आहे."

येत्या 3 तारखेच्या आत मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असंही ते म्हणाले.

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे त्यांच्या दौऱ्यानिमित्त फिरत असताना, प्रत्येक सभेत बंडखोर आमदारांना आव्हान देत आहेत की, राजीनामा देऊन पुन्हा निवडून येऊन दाखवावं. आदित्य ठाकरेंच्या या आव्हानाला अब्दुल सत्तारांनी हे उत्तर दिलंय.

2. "शिंदे साब बढीया काम कर रहे है", पुण्यात कालीचरण महाराजांची स्तुतीसुमने

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी परिचित असलेल्या कालीचरण महाराजांनी आज राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं.

पुण्यातील शुक्रवार पेठेतील अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टकडून आयोजित म्हसोबा उत्सवाच्या दीप अमावस्येनिमित्त कार्यक्रमात कालीचरण महाराज उपस्थित होते. यावेळी त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

"राज्यातील हिंदुत्ववादी सरकारला आमचा पाठिंबा आहे. शिंदे साब बढीया काम कर रहे है. त्यांनी दोन शहरांचं नामांतर केलं.

"शिंदे सरकारने औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचं नाव धाराशिव करण्याचा निर्णय घेतला आहे," असं कालीचरण महाजार म्हणाले. सकाळनं ही बातमी दिलीय.

3. भाजपच्या युवा नेत्याची हत्या : दोन संशयितांना अटक

दक्षिण कन्नडमधील भाजपच्या युवा मोर्चा समितीचे सदस्य प्रवीण नेत्तर यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली. दोन संशयित पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संस्थेचे सदस्य आहेत. अशी माहिती पोलिसांनी दिली. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.

जिल्हा भाजप युवा मोर्चा समितीचे सदस्य प्रवीण नेत्तर यांची बेल्लारी येथील त्यांच्या दुकानासमोर मंगळवारी रात्री दुचाकीवरून आलेल्या तीन जणांनी धारदार शस्त्रांनी वार करून हत्या केली.

ते दुकान बंद करून घरी जात असताना त्यांची हत्या करण्यात आली. हत्येनंतर बुधवारी दक्षिण कन्नड जिल्ह्यात अनेक ठिकाणी तणाव निर्माण झाला. आंदोलकांनी दगडफेक केली आणि पोलिसांनी लाठीमार केल्याच्या घटना घडल्या.

या प्रकरणी बेल्लारी पोलिसांनी पथके तयार करून शोधमोहीम सुरू केली होती.

4. 'शिकलेल्या महिलाही नवऱ्यासाठी उपास-तापास करतात तेव्हा...'

अभिनेत्री रत्ना पाठक यांच्या एका वक्तव्यामुळे सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.

एका मुलाखतीत रत्ना पाठक यांना पतीच्या दीर्घ आयुष्यासाठीतुम्ही (करवा चौथ) उपवास करता का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर त्यांनी 'मी काय वेडी आहे का, असे उपवास करायला? असं उत्तर दिलं. महाराष्ट्र टाईम्सनं ही बातमी दिलीय.

त्या पुढे म्हणाल्या, मला आश्चर्य वाटतं की, "आज शिकलेल्या महिलाही पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपास-तपास करतात. आपल्या देशात विधवा महिलांच्या वाट्याला भयाण आयुष्य येतं. त्यामुळं या भीतीपोटी महिला असे उपवास करतात. 21व्या शतकातही आपण याबद्दल चर्चा करतो यापेक्षा मोठं दुर्दैव नाही."

5. ...तर मी एकनाथ शिंदेंचं टेबलवर उभं राहून स्वागत करेन - रामदास आठवले

शिंदे गटानं आमच्या पक्षात विलीन व्हायचा निर्णय घेतल्यास स्वागत करु, असं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलंय.

"मुख्यमंत्री माझ्या पक्षात येत असतील तर मला आनंद होईल. शिवसैनिक माझ्या पक्षात आले तर टेबलवर उभं राहून मी त्यांचं स्वागत करेन. पण शिंदे गटाला शिवसेना म्हणून मान्यता मिळेल. खरी शिवसेना शिंदेंची आहे, बरी शिवसेना ठाकरेंची आहे", असं रामदास आठवले म्हणाले.

तसेच राज्याच्या मंत्रिमंडळात आरपीआयला एक मंत्रीपद देण्यात येईल, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे, अशी माहितीदेखील त्यांनी दिली.

न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दिली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)