हिंदू साधूच्या वेशात भिक मागणाऱ्यांना जबर मारहाणीचा व्हीडिओ व्हायरल, काय आहे प्रकरण?

मारहाण

फोटो स्रोत, SEETU TIWARI/BBC

    • Author, सीटू तिवारी
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

बिहारच्या वैशाली जिल्ह्यातील हाजीपूरमधील एक व्हीडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हीडिओत एक व्यक्ती सहा जणांना एकत्रित खाली बसवून आळीपाळीने एका दणकट दंडुक्याने मारहाण करत असल्याचं दिसून येतं.

ज्यांना मारहाण होत आहे, ते सगळे मुस्लीम आहेत. पण तरीही त्यांनी एखाद्या हिंदू साधूप्रमाणे पोशाख धारण केला होता. त्यांच्याकडे एक बसहा बैलसुद्धा आहे. या बैलाला शृंगार करून भटकंती करत हे सगळे जण भिक मागत होते.

याविषयी बोलताना वैशालीचे पोलीस अधीक्षक मनिष म्हणाले, "हे सगळे जण उत्तर प्रदेशच्या बहराईचचे आहेत. त्यांची ओळख पटवून त्यांना सोडून देण्यात आलं आहे. या व्यक्तींना मारहाण करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे."

तर बहराईचचे वरीष्ठ पोलीस अधीक्षक केशव कुमार चौधरी याविषयी म्हणाले, "हे सगळे जण जोगी, मंगता आहेत. भिक मागूत ते उदरनिर्वाह चालवतात. त्यांचा कोणताही गुन्हेगारी इतिहास नाही."

काय आहे प्रकरण?

हे प्रकरण 25 जुलै सकाळचं आहे. हाजीपूरच्या कदम घाट येथे नारायण महादेव मंदिराचे पुजारी बिंदू महाराज यांनी बजरंग दल संघटनेला माहिती दिली. मंदिरात काही संशयास्पद व्यक्ती राहत आहेत, असं त्यांनी दलाचे वैशाली अध्यक्ष आर्यन सिंह यांना सांगितलं.

आर्यन सिंह यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "पुजारींनी सांगितलं की हे सगळे रात्री हॉटेलांमध्ये जाऊन मांसाहार करतात. प्रसाद फेकून देतात. तसंच आरतीमध्येही सहभागी होत नाहीत. त्यामुळे आमच्या संशयाला बळ मिळालं. 24 जुलैच्या रात्री आम्ही या लोकांना भेटण्यासाठी कदम घाटावर गेलो. पण तिथे ते सापडले नाहीत."

केशव कुमार चौधरी,वरीष्ठ पोलीस अधीक्षक, बहराइीच.

फोटो स्रोत, SEETU TIWARI/BBC

फोटो कॅप्शन, केशव कुमार चौधरी,वरीष्ठ पोलीस अधीक्षक, बहराइीच.

ते पुढे सांगतात, "यानंतर आम्ही 25 जुलैच्या सकाळी पुन्हा तिथे गेलो. त्यांच्याकडे चाकू आणि पक्कड होतं. त्यांचे आधार कार्ड बनावट होते. तसंच ते मोबाईलवरून बांग्लादेशमध्ये संवाद साधायचे. पण पोलिसांनी त्यांची योग्य ती चौकशी केल्याशिवाय त्यांना सोडून दिलं."

व्हायरल व्हीडिओत आर्यन सिंह हेच आहेत. ते करीम अहमद, हसन, सय्यद अली, हलीम अहमद, महबूब लुंबा यांना मारताना त्यात आपण पाहू शकतो.

याच व्हीडिओच्या आधारावर वैशाली पोलिसांनी आर्यन सिंह यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

'हा तर आमचा कौटुंबिक व्यवसाय'

साधूचा वेश घेऊन भिक मागणाऱ्या लोकांची माहिती घेण्यात आली. त्यांच्याकडे आढळून आलेल्या आधार कार्डवरून ते उत्तर प्रदेशच्या बहराईचचे असल्याचं स्पष्ट झालं.

त्यांच्यापैकी एक असलेल्या महबूब लुंबाने म्हटलं, "आम्ही बहराईचवरून आलो आहोत. नंदी बसहा बैल फिरवत आहोत. आम्ही धर्माने मुस्लीम आहो. पण हा आमचा कौटुंबिक व्यवसाय आहे. माझ्या आजोबांनी आणि नंतर वडिलांनीहीही हे काम केलं. पण इथे आम्हाला आधार कार्डची मागणी करण्यात आली.

"त्यानंतर हिंदू-मुस्लीम वाद निर्माण झाला आहे. आमचं ओळखपत्र पाहिल्यानंतर आम्हाला मारहाण करण्यात आली."

बैल

फोटो स्रोत, SEETU TIWARI/BBC

महबूब सांगतात, "आम्ही पिकअप व्हॅन घेऊन सदर बसहा बैलांना गोरखपूर, बस्ती, देवरिया, छपरा आणि सिवानमार्गे हाजीपूरला घेऊन आलो आहोत."

या प्रकरणावर राष्ट्रीय जनता दलाचे प्रवक्ते आणि पक्षाचे मुख्य सहायक निवडणूक पदाधिकारी चितरंजन गगन यांच्याशी बीबीसीने संवाद साधला.

चितरंजन गगन हे मूळचे वैशाली येथील भगवानपूर प्रखंडचे आहेत.

ते म्हणाले, "माझं वय 69 आहे. आम्ही लहानपणापासून अशाप्रकारचे लोक पाहत आलो आहोत. पावसाळ्याच्या युपीमधून ते येण्याचं प्रमाण लक्षणीयरित्या वाढतं. तसं तर हे लोक वर्षभर येत-जात राहतात. अशाच प्रकारे बसहा बैल घेऊन ते भिक मागतात. ही आमच्यासाठी काही असामान्य बाब नाही."

जोगी मुस्लीम

बहराईच येथील मधुबन गावचे सरपंच रईस खान म्हणतात, "या लोकांना जोगी मुस्लीम संबोधलं जातं. पिढ्यानपिढ्या त्यांचं भिक्षेवरील उदरनिर्वाह सुरू आहे. बहराईचमधील लक्ष्मणपूर, नानापारा, नवाबगंज, नरहनगोडा, बाबागंज आणि नरीपुरा या गावांमध्ये जोगी मुस्लीम लोकसंख्या मोठ्या संख्येने आहे."

पोलीस

फोटो स्रोत, SEETU TIWARI/BBC

बहराईचचे स्थानिक पत्रकार अझिम मिर्झा म्हणतात, "बहराईचमध्ये दोन जाती प्रामुख्याने आहेत. पहिली म्हणजे लालबेगी आणि दुसऱ्या जातीला महाऊत/मंगता किंवा महंत असं म्हणतात.

"या दोन्ही जातींना स्वातंत्र्य असतं की ते हिंदू किंवा मुस्लीम या दोन्हीपैकी कोणत्याही एका धर्माचं अनुसरण करू शकतात. आपल्या मर्जीने ते प्रथा-परंपरा, राहणीमान यांची निवड करू शकतात."

याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणून त्यांनी चार वेळचे आमदार शब्बीर वाल्मिकी यांचा उल्लेख केला. शब्बीर वाल्मिकी यांचं नाव तर मुस्लीम होतं. पण त्यांच्या मुलाचं नाव संजय वाल्मिकी होतं.

'मसावत की जंग' आणि 'दलित मुसलमान' या पुस्तकांचे लेखक आणि माजी खासदार अली अन्वर यांनी बीबीसीला त्यांच्याविषयी अधिक माहिती दिली.

ते म्हणतात, "हिंदूंमध्ये असा समाज कदाचित नाही. हिंदू धर्मीयांमध्ये भिक मागणारा हा गोसावी किंवा गिरी असतो. तर आमच्या इथे तो साईं किंवा फकीर आहे. नट समाजात तर हिंदू-मुस्लीम रोटीबेटीचा व्यवहार केला जातो. आर्थिक, राजकीय आणि शैक्षणिक पातळीवर वंचित राहिलेला हा समाज आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)