You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'उद्धव ठाकरे पुढे जाऊन देशाचं नेतृत्व करतील, या भीतीनं फोडाफोडी' - सचिन अहिर #5मोठ्याबातम्या
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :
1) 'उद्धव ठाकरे पुढे जाऊन देशाचं नेतृत्त्व करतील, या भीतीनं फोडाफोडी'
"शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन महाराष्ट्राचं यशस्वी नेतृत्व करत होते. ते जर असेच यशस्वी झाले तर उद्या देशाचं नेतृत्व देखील करतील, ही काहींच्या मनात भीती असल्याने फोडफोडीचं षड्यंत्र केलं गेलं," असा आरोप शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांनी केला. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.
पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. तिथं सचिन अहिर बोलत होते.
अहिर पुढे म्हणाले की, "कोण कोणाला चिठ्ठ्या देतंय, माईक ओढून घेतंय, हे सर्व जनता बघतेय. जनता याला उत्तर देईल. कारण जनतेला हे आवडलं नाहीय."
"आगामी निवडणुकीतून जनता उत्तर देईल, तेव्हा हेच आमदार-खासदार परततील, पण शिवसेनेचे दरवाजे त्यांच्यासाठी बंद असतील," असंही सचिन अहिर म्हणाले.
2) उद्धव ठाकरे क्षीण होत जातील, खरी शिवसेना शिंदेंचीच - रामदास आठवले
"ज्यांच्याकडे बहुमत आहे, त्यांचीच शिवसेना. त्यामुळे खरी शिवसेना शिंदेंचीच आहे," असं मत रिपब्लिकन पार्टी इंडियाचे प्रमुख आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले.
तसंच, येत्या काळात आणखी तीन खासदार शिंदे गटात येणार असल्याचा दावाही आठवलेंनी केला. लोकमतनं ही बातमी दिलीय.
रामदास आठवले पुढे म्हमाले, "उद्धव ठाकरे आता उभारी घेतील, असं वाटत नाही. मोदींसोबत शिंदे असणार आहेत. त्यामुळे येत्या काळात संख्या आणखी वाढेल. ठाकरे नसले तरी शिंदे आहेत. म्हणजे खरी शिवसेनासोबत आहे."
"शिंदेंच्याच जास्तीत जास्त जागा येतील आणि उद्धव ठाकरे क्षीण क्षीण होत जातील," असाही दावा आठवलेंनी केला.
3) अडीच वर्षे सरकारनं सूड उगवला, आता जनता मोकळा श्वास घेतेय - फडणवीस
"सत्ता परिवर्तन करणे ही 12 कोटी जनतेची इच्छा होती. महाराष्ट्रात परिवर्तन झालं पाहिजे, असं त्यांना वाटाचयं. आता आपण मोकळा श्वास घेतोय. गेली अडीच वर्षे ही संघर्षात गेली. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा राज्य सरकारनं केवळ सूड उगवला," असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिलीय.
फडणवीस म्हणाले, "या जनतेला सरकार म्हणजे कोण आहे, हेच लक्षात येत नव्हतं. गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्राची अधोगती झाली. त्यामुळं आपण सत्तेकरिता परिवर्तन केलं नाही. राज्याला विकासाच्या गतीकडं नेण्यासाठी हे परिवर्तन करावं लागलं."
"एकीकडं भ्रष्टाचार करायचा, दुसरीकडं सूड उगवायला, असा एककलमी कार्यक्रम ठाकरे सरकारनं सुरू केला होता," असंही फडणवीस म्हणाले.
4) निवडणूक आयोगाच्या आदेशाविरोधात शिवसेना सुप्रीम कोर्टात
शिवसेना पक्षातली आपापलं बहुमत सिद्ध करा, अशा सूचना निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंना दिल्यात. निवडणूक आयोगाच्या या आदेशाविरोधात शिवसेना सुप्रीम कोर्टाचे दार ठोठावणार आहे.
एबीपी माझानं ही बातमी दिलीय.
निवडणूक आयोगानं दिलेल्या नोटीशीवर कोर्टानं स्थगिती देण्याची विनंती करणार असून अनेक बाबी अद्याप कोर्टात प्रलंबित असल्याची याचिका शिवसेनेने केली आहे.
निवडणूक आयोगाच्या नोटिशीविरोधात आज (सोमवारी) शिवसेनेचे वकील ही गोष्ट सुप्रीम कोर्टात मेन्शन करणार आहेत.
5) आयकर विभागनं केला अभिनेता अक्षय कुमारचा सन्मान, कारण...
अक्षय कुमार पुन्हा एकदा भारतातील सर्वाधिक कर भरणारा अभिनेता ठरला आहे. स्वत: आयकर विभागानं याबाबतची माहिती दिलीय.
आयकर विभागनं अक्षय कुमारला एक प्रमाणपत्र देऊन सन्मानित सुद्धा केलंय. एनडीटीव्हीनं ही बातमी दिलीय.
अक्षय कार सध्या टिनू देसाई या त्याच्या सिनेमाच्या चित्रिकरणासाठी लंडनमध्ये आहे. पिंकविलाच्या वृत्तानुसार, आयकर विभागानं या सिनेमाच्या सेटवर जाऊन आयकर विभागानं अक्षय कुमारला सन्मानाचं प्रमाणपत्र दिलं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)