You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'माझ्या घराच्या आजूबाजूलाच माझ्या नवऱ्याची दोन बिऱ्हाडं होती, त्याने 11 जणींशी लग्न केलं'
- Author, सुरेखा अब्बूरी
- Role, बीबीसी प्रतिनिधी
"मी स्वतः कमावलेले पैसे तर त्याला दिलेच होते पण नातेवाईकांकडून उधार घेऊन पण त्याला पैसे दिले होते. आता तो ते पैसे परत करेन असं म्हणतोय. पण पैश्यासोबत मी माझं सर्वस्वही त्याला दिलं होतं. त्याचं काय?"
वैदेही यांची (विनंतीनुसार नाव बदलले आहे) हे रडगाणं आहे, तिच्या नवऱ्यावर अदपा शिवशंकर बाबू याच्यावर ती विश्वासघात केल्याचा आरोप करत आहे. अदपा शिवशंकर बाबूवर आतापर्यंत आठ महिलांशी लग्न केल्याचा आरोप आहे.
वैदेही त्या आठ महिलांपैकी एक आहे.
वैदेही सांगते, "जेव्हा मला समजलं की माझ्या नवऱ्याने अनेक महिलांशी लग्न केलं आहे तेव्हापासून मी त्याला शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करत आहे."
शिवशंकरने फसवणूक करत त्यांच्याशी लग्न केल्याचा खुलासा दोन महिलांनी केला. 13 जुलै रोजी हैदराबादच्या प्रेस क्लबमध्ये पत्रकार परिषद घेत या महिलांनी आपल्यासोबत घडलेली हकीकत सांगितली.
वैदेही सांगते, "कोंडापूरमध्ये माझ्या फ्लॅटपासून फक्त दोन आळींपलीकडे एका बाजूला एक कुटुंब राहतं आणि 200 मीटर अंतरावर अजून एक कुटुंब राहतं. ही दोन्ही कुटुंबं त्याचीच आहेत."
यांनतर अजून काही महिलाही समोर आल्या आहेत, त्यांचीही शिवशंकर बाबूंकडून अशीच फसवणूक झाल्याचे त्या महिला सांगत आहेत
पत्रकार परिषदेत एका महिलेने सांगितले की, "त्याने आतापर्यंत 11 महिलांशी लग्न केले आहे. आम्ही त्यापैकी 8 लग्नाची माहिती एकत्र केली आहे."
वैदेही म्हणते, "शिवशंकरने लग्नानंतर एका महिन्याच्या आत आणखी दोन महिलांशी लग्न केले. हे कळल्यावर आम्ही त्याला पैशांबद्दल विचारलं. तेव्हा त्याने नवीन बायकोला पोलिस चौकीत घेऊन जाऊन सांगायचा की तो त्यांचे पैसे परत करेल. गेल्या काही काळापासून हा त्याचा व्यवसाय बनला आहे. आता हे सर्व थांबायला पाहिजे."
शिवशंकर यांनी त्यांच्यावरील हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
अदपा शिवशंकर बाबूंवर काय आरोप आहे?
अदपा शिवशंकर बाबू आंध्रप्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील मंगलगिरी भागातील बेथापुडी येथील रहिवासी आहेत. ते खासगी क्षेत्रात काम करतात.
वैदेही सांगते, "त्याने 2018 मध्ये मंगलगिरीमधील एका महिलेशी लग्न केले. त्यानंतर तो हैदराबादला गेला. त्यावेळी त्याने घटस्फोटित महिलांवर लक्ष ठेवलं होतं. तो लग्नाच्या वेबसाईटवर घटस्फोटित महिलांना शोध घ्यायचा, त्यांचा मोबाईल नंबर घेऊन त्यांच्याशी बोलायचा. त्यानंतर तो त्या महिलांच्या घरच्यांशीही बोलायचा.
"शिवशंकरला त्याच्या कुटुंबाविषयी विचारले असता, तो सांगायचा की त्याचे आई-वडील आता जिवंत नाहीत आणि तो स्वत: घटस्फोटित आहे. त्याला एक मुलगी आहे असंही तो सांगायचा आणि काही काळानंतर एका मुलीशी तो भेटही घालून द्यायचा."
"त्यानंतर तो कोणालातरी काका-काकूंची भूमिका करायला सांगायचा आणि त्या महिलेशी तो लग्न करायचा. लग्नानंतर तो अतिशय हुशारीने तिच्याकडून पैसे उकळायचा. लग्नाच्या एक-दीड महिन्यानंतर तो त्या महिलेवर नोकरी सोडण्यासाठी दबाव टाकायचा. दरम्यानच्या काळात आधी लग्न केलेली स्त्री जर त्याच्यावर संशय घेऊ लागली तर तो तिला तिच्याकडून घेतलेले पैसे परत करेल, असं सांगायचा. त्याची नवीन बायको तिचे पैसे परत करेल, असं वचन तो द्यायचा."
वैदेही सांगते की, "नवीन बायकोला पैशांची अडचण असल्याचं सांगून तो तिच्याकडून पैसे घ्यायचा. त्यातील काही पैसे त्याच्यावर संशय घेणाऱ्या बायकोला द्यायचा. पण जेव्हा नवीन पत्नी पैसे मागू लागली की तेव्हा तो आणखी एका नवीन महिलेशी मैत्री करायचा आणि नंतर तिच्याशी लग्न करायचा. अशा प्रकारे त्याने आतापर्यंत 11 महिलांशी लग्न केले आहे."
आतापर्यंत 8 महिलांची माहिती एकत्र करण्यात यश आल्याचे ती सांगते.
काही स्त्रिया भीतीमुळे पुढे येत नाहीत की त्यांचा अगोदर घटस्फोट झाला आहे आणि आता हे प्रकरण समोर आलं तर त्यांची बदनामी होईल, असं त्यांचे म्हणणे आहे.
वर्शिनी (विनंतीनुसार नाव बदलले आहे) ही देखील शिवशंकरशी विवाहित महिलांपैकी एक आहे.
वर्शिनीने बीबीसीशी बोलताना सांगितले की, "शिवशंकरने नोव्हेंबर 2021 मध्ये माझ्याशी लग्न केले. 2022 च्या फेब्रुवारीमध्ये त्याने वैदेहीशी लग्न केले. आम्ही एप्रिल 2022 मध्ये लग्नाची नोंदणीही केली होती. त्याच महिन्यात त्याने अजून एका महिलेशी लग्न केले. आता ती महिला गरोदर आहे. आम्ही तिला सांगितले. पण ती शिवशंकरसोबत निघून गेली."
वर्शिनी रडत रडत सांगते, "आमच्यासारख्या स्त्रिया ज्या घटस्फोटानंतर नवीन आयुष्य सुरू करू इच्छितात, शिवशंकर त्यांची फसवणूक करत आहे. आपल्याला माहीत आहेच की आम्हाला एक चांगली नोकरी करणारा नवरा हवा आहे आणि आमच्या आई-वडिलांना वाटते की त्यांच्या मुलीचे भविष्य चांगले व्हावे. आमच्या पालकांना वाटते की आम्ही त्याच्यासोबत सुरक्षित आहे, हेच त्यांच्यासाठी पुरेसे आहे. त्याने त्यांच्या याच इच्छेचा फायदा घेतला आहे."
या महिला त्याच्यावर विश्वास कसा ठेवतात?
त्या महिला सांगतात की, "तो जेव्हा या महिलांना भेटतो तेव्हा तो सांगतो की तो दर महिन्याला लाखो रुपयांची कमाई करतो."
"त्यानंतर सुरुवातीच्या ओळखीनंतर बोलणं लग्नाच्या दिशेनं जायचं, तेव्हा तो बनावट पे-स्लिप आणि ओळखपत्र तयार करायचा. अशा प्रकारे तो केवळ त्या महिलेलाच नाही तर तिच्या कुटुंबालाही त्याच्या बाजूने बळवत असे."
शिवशंकरने त्यांच्याशी फसवणूक केली असे या महिलांचे म्हणणे आहे.
वैदेही सांगते की, "लग्नानंतर महिन्याभरातच तो ती महिला काम करत असल्याचे त्याला आवडत नाही, असे सांगून नोकरी सोडण्यासाठी दबाव टाकत असे. त्याला भीती होती की, जर ती महिला काम करत राहिली तर त्याचं बाहेरील आयुष्यातील सत्य समोर येईल.
"त्यांनतर तो एक गोष्ट तयार करायचा की त्याला परदेशात जाण्याची संधी मिळाली आहे. त्याची कंपनी लवकरच त्याला परदेशात पाठवत आहे. तो तिला खात्री करून द्यायचा की परदेशात सगळे आनंदाने राहतील. त्यानंतर तो सांगायचा की त्याचा पासपोर्ट हरवला आहे, त्यामुळे त्यांचा अमेरिका दौरा लांबणीवर पडला आहे.
"त्याचवेळी तो विश्वासात घेऊन सांगायचा की कंपनीने पैसे देणे बंद केले आहे आणि आता सर्व कागदपत्रे परत मिळवण्यासाठी लाखो रुपये खर्च करावे लागतील. अशा प्रकारे तो त्या महिलेकडूनच पैसे घ्यायचाच तर सोबत ती तिच्या नातेवाईकांकडून उसने पैसे घेऊन त्याला द्यायची. अशा प्रकारे त्याने प्रत्येक महिलेकडून 25-30 लाख रुपये घेतले आहेत."
महिलांना संशय कसा आला?
वर्शिनीशी लग्न केल्यानंतर शिवशंकरने तिला सांगितले की, त्यांची कंपनी त्याला प्रोजेक्टसाठी अमेरिकेला पाठवत आहे.
अमेरिकेला जाताना तो वर्शिनीला सोबत घेऊन जाईल असे सांगून त्याने त्यांच्या लग्नाची नोंदणी करून घेतली. सोबत तिच्या बहिणीलाही अमेरिकेत नोकरी मिळवून देईल, असे आश्वासन दिले. हे सांगत त्याने व्हिसा प्रक्रियेसाठी पैशांची गरज असल्याचे सांगितले. त्यानंतर तिच्याकडून आणि तिच्या घरच्याकडून पैसे उसने घेतले. काही दिवसांनी त्यांने सांगितले की त्यांचा अमेरिकेला जाण्याचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे.
पैसे परत न केल्याने सासरच्याकडून त्याला विचारणा सुरू झाली. अनेक कारणे सांगून तो पुढे ढकलत राहिला. जेव्हा त्याच्या वागण्यावर त्यांना संशय आला तेव्हा त्यांनी त्याची सखोल चौकशी केली. तेव्हा त्याने बेजबाबदारपणे उत्तर दिले की त्याला वाटतं असेल तर पोलिसात तक्रार करा.
यावर वर्शिनी आणि तिच्या पालकांनी मेडक जिल्ह्यातील रामचंद्रपुरम पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी त्याला पोलीस ठाण्यात बोलावले. तेव्हा तो वैदेहीसह तेथे पोहोचला आणि तिची पत्नी म्हणून ओळख करून दिली.
त्याने वैदेहीला खोटे बोलून लग्नासाठी राजी केलं आणि वैदेहीला सांगितले की वर्शिनीनेच आपला विश्वासघात केला आहे. वैदेहीला पोलिस स्टेशनमध्ये त्याच्या बाजूने उभे राहण्याची विनंती केली.
त्याने वैदेहीकडून वदवून घेतले कि वर्शिनीचे आणि तिच्या आई-वडिलांचे पैसे देण्याची जबाबदारी तिची आहे.
पण त्यानंतर वैदेहीलाही हळूहळू त्याच्यावर संशय येऊ लागला.
वैदेहीने सांगितले कि, "तो रोज म्हणत असे की त्याला रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करावे लागेल. त्यावेळी महिलेशी बोलताना तो म्हणत असे की ती त्याची क्लायंट आहे. तिच्यापासून लपवून तो दुसरा अजून एक फोन वापरत होता, जो तो गाडीमध्ये सोडून यायचा. एवढंच नाही तर मी त्याला बाथरूममध्येही गुपचूप बोलताना ऐकलं. मी त्याच्या हातातून फोन हिसकावून घेतला आणि त्या महिलेशी बोलले, तेव्हा ती म्हणाली की ती शिवशंकरची पत्नी आहे.
"हे समजल्यावर मला धक्काच बसला. त्यांनतर मी वर्शिनीशी बोलले. आम्ही दोघींनी अधिक चौकशी केली तेव्हा आम्हाला कळलं की तिथे आसपासच्या परिसरातच त्याची आणखी तीन कुटुंबं आहेत."
ती म्हणते, "आम्हाला कळले की तो 2018 पासून महिलांच्या आयुष्याशी खेळत आहे. यापूर्वीही अनेक महिलांनी त्याच्यावर गुन्हे दाखल केले आहेत."
शिवशंकरच्या विरुद्ध 2018 आणि 2019 मध्ये कुकटपल्ली आणि हैदराबाद येथे दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. तर आंध्र प्रदेशातील अनंतपुरम येथे लग्न करून नंतर महिलांची फसवणूक केल्याप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पीडित महिलांनी सांगितले की, त्याच्याविरुद्ध हैदराबादमधील केपीएचबी, आरसी पुरम, गाचीबावली, एसआर नगर पोलिस स्टेशन आणि अनंतपुरम पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शिवशंकरचे काय म्हणणे आहे?
या महिलांनी त्याच्यावर लग्न आणि फसवणूक केल्याचा आरोप केल्यानंतर त्याने एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. यामध्ये त्याने आपण फरार नसून आंध्र प्रदेशातील गुंटूर येथे असल्याचे सांगितले आहे.
त्याने व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, "त्याने 8-11 महिलांशी लग्न केले आहे हे खोटे आहे. माझ्या सासरच्या अनेक आणि आणखी एका व्यक्तीची इच्छा होती की मी एक कंपनी बनवावी आणि लोकांची फसवणूक करावी. त्यांच्या या निर्णयाशी सहमत नसल्यामुळे त्यांनी दोन महिलांना माझ्याविरुद्ध तक्रार करायला सांगितले. जर मी त्यांच्याशी लग्न केले असेल तर मी त्यांना ते सिद्ध करण्यास सांगतो.
"मी त्यांच्याकडून 60 लाख रुपये घेतले असतील तर मी त्यांना याचा पुरावा मागतो आहे. माझे एकदाच लग्न झाले आहे, पण आमच्यात मतभेद झाल्यामुळे आम्ही वेगळे राहत आहोत. आमचा अजून घटस्फोट झालेला नाही. आजच्या घडीला दुसऱ्या एका महिलेसोबत लिव्ह-इन रिलेशनशिप मध्ये राहत आहे."
पोलिसांचे काय म्हणणे आहे?
पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणाबद्दल मौन बाळगले आहे. ते फक्त चौकशी करत असल्याचे सांगत आहेत. शिवशंकरवर अनेक पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत, सोबत त्या महिलांची माहिती एकत्र करण्याचे काम सुरू असल्याचे पोलिस सांगतात.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)