You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
लग्नाचं असं कॉन्ट्रॅक्ट ज्यात आहे पिझ्झा खाण्याबद्दलची खास अट
पती-पत्नींमध्ये लग्नाचं कॉन्ट्रॅक्ट होणं ही काही साधीसुधी गोष्ट नसते. पण एक भारतीय जोडपं त्यांच्या लग्नात 'कॉन्ट्रॅक्ट' करून सगळीकडे चर्चेचा विषय ठरले आहेत. कॉन्ट्रॅक्टवर सह्या करतानाचा त्यांचा हा व्हीडिओ सगळीकडे व्हायरल होतोय.
हे कॉन्ट्रॅक्ट म्हणजे लग्न झालेल्या या नव्या जोडप्याने काय करावं आणि काय करू नये याची मजेशीर लिस्ट आहे. ही लिस्ट त्यांच्या मित्रमंडळींनी तयार करून दिली आहे. ही कायदेशीररित्या बंधनकारक नाही.
या दाम्पत्याचा व्हीडिओ लग्नाच्या एका दिवसानंतर म्हणजे 22 जूनला इन्स्टाग्रामवर अपलोड करण्यात आला. वधू आणि वर या कॉन्ट्रॅक्टवर सह्या करत असलेला हा 16 सेकंदांचा व्हिडिओ तब्बल 4 कोटी 50 लाख वेळा पाहण्यात आला.
आता मागेही असे मजेदार व्हीडिओ तयार झाले असतील. पण हा व्हीडिओ व्हायरल होण्यामागे कारण होत 'दर महिन्याला एक पिझ्झा' या कॉन्ट्रॅक्टच्या टॉपवर जी अट होती त्याकडेच लोकांचं जास्त लक्ष गेलं आणि व्हीडिओ व्हायरल झाला.
ही अट होती 24 वर्षांची नववधू शांती प्रसाद हिच्यासाठी. शांती 'पिझ्झा फ्रीक' असल्याचं तिचे मित्र म्हणतात. शांतीने तिचा प्रियकर मिंटू राय याच्याशी गुवाहाटी येथे पारंपारिक पद्धतीने लग्नगाठ बांधली. हे दोघेही आसामचे रहिवासी आहेत.
मिंटू आणि शांतीची ओळख पाच वर्षांपूर्वी झाली होती. हे दोघेही एकाच कॉमर्स क्लासमध्ये शिकायला होते. आणि त्यांची ओळख झाली ती व्हॉट्सअॅप ग्रुपमुळे. एकदा शांती काही कारणाने कॉलेजला येऊ शकली नव्हती. तिने जेव्हा ग्रुपवर मदत मागितली तेव्हा मिंटू वेळ न दवडता तिच्या मदतीसाठी धावला.
इथूनच त्यांची ओळख वाढली. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि 2018 च्या फेब्रुवारी महिन्यात हे दोघं डेटवर गेले.
इलेक्ट्रिकल वस्तूंचं दुकान चालवणारा मिंटू सांगतो, "आम्ही आमचं शेवटचं लेक्चर बंक मारून जवळच्या पिझ्झा आउटलेटवर गेलो. शांतीला पिझ्झा आवडतो आणि ती कायम पिझ्झा या विषयावरचं बोलायची म्हणून मी तिला पिझ्झा खायला घेऊन गेलो."
यावर शांती म्हणते, "मला पिझ्झा खूप आवडतो. जेव्हा आम्ही डेटवर जायचो तेव्हा मी त्याला पिझ्झा खायला जाऊ असं म्हणायचे."
पण थोड्याच दिवसांत मिंटू पिझ्झा प्रकरणाला वैतागला. त्याला 'पिझ्झा तर आवडतो पण रोज खाण्याएवढा नाही,' अशी त्याची तक्रार सुरू झाली.
शांती सांगते, "तो विचारायचा अजून किती पिझ्झा खाणार? दुसरं काहीतरी खाऊ."
हे जोडपं सांगत की, त्या दोघांमध्ये जेवणावरून कधीही भांडण होत नाही.
"किमान आतापर्यंत तरी झालेलं नाही," असं मिंटू सांगतो.
पण शांती म्हणते, "तो मित्रांकडे नेहमी तक्रार करायचा. तो म्हणायचा की, प्रत्येक वेळी त्याला पिझ्झा खावा लागतो आणि त्याची चिडचिड होते. यावर पिझ्झा आणि मिंटू हा विषय आमच्या सर्व मित्रमंडळीमध्ये विनोदाचा विषय बनला होता."
या दोघांचा कॉमन मित्र असलेला आणि लग्नाच्या कॉन्ट्रॅक्टमागे ज्याचं डोकं होतं तो राघव ठाकूर सांगतो की, "शांतीला पिझ्झापेक्षा जास्त मिंटूच आवडतो. पण मला वाटतं की तिला मोकळा वेळ मिळाला किंवा झोपेतसुद्धा ती पिझ्झाचा विचार करत असेल."
राघव बीबीसीशी बोलताना सांगतो की, "आम्ही कॉलेजमध्ये 2017 पासून एकत्र आहोत. आम्ही सर्वांनी एकमेकांसोबत बराच वेळ घालवलाय, त्यामुळे आमचं नातंही तसं घट्ट आहे. आम्ही त्या दोघांचं प्रेम फुलताना पाहिलंय. त्यामुळे त्यांच्या लक्षात राहील असं काहीतरी भन्नाट करण्याची आमची इच्छा होती."
तो पुढे सांगतो, "म्हणून आम्ही मित्रांनी यावर विचार करायचं ठरवलं. या दोघांना एकत्र ठेवतील असे आठ मुद्दे आम्ही शोधून काढले. शांती पिझ्झा फ्रीक असल्याने आम्ही तो मुद्दा सर्वात वर ठेवायचं ठरवलं."
लग्नाच्या आधी फक्त एक आठवडा आम्हाला ही आयडिया सुचली होती. या कॉन्ट्रॅक्टमध्ये इतर अटींचा ही समावेश होता. जसं की मिंटूने रविवारी नाश्ता बनवला पाहिजे, त्याने दर 15 दिवसांनी तिला शॉपिंगला घेऊन गेलं पाहिजे, तो फक्त त्याच्या पत्नीसोबतचं रात्रीच्या पार्ट्यांमध्ये जाऊ शकतो. शांतीसाठी ही काही अटी होत्या. यात तिने पिझ्झा खाण्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे, शांतीने रोज जिमला गेलं पाहिजे आणि दररोज साडी नेसली पाहिजे.
"कारण मिंटू म्हणतो की ती साडीमध्ये खूप सुंदर दिसते," असं राघव म्हणाला
"आम्हाला कल्पना नव्हती की आमचे मित्र आमच्यासाठी असलं काहीतरी भन्नाट करतील. पण ते खरंच आम्हाला चांगलं ओळखतात," शांती सांगते.
मित्रमित्रांमध्ये सुरू असलेला हा एक विनोद मात्र सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला. फोटोग्राफी करणाऱ्या कंपनीने त्यांच्या इन्स्टा हँडलवर हा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तो व्हायरल झाला. त्याला लाखो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले.
शांती सांगते की, "आम्ही आमच्या लग्नाच्या गडबडीत होतो त्यामुळे तीन-चार दिवसांनंतरच आम्हाला व्हिडिओ व्हायरल झाल्याचं समजलं."
व्हिडिओला मिळालेल्या प्रतिसादाने ते दोघेही भारावून गेले आहेत.
मिंटू पुढे सांगतो की, "आम्ही कधीच विचार केला नव्हता की तो इतका व्हायरल होईल. म्हणजे हे खरोखरच खूप भारी सरप्राईज होतं. लोक जेव्हा मला या व्हिडिओबद्दल विचारतात तेव्हा मला आनंद होतो."
हे कॉन्ट्रॅक्ट त्यांनी फ्रेम करून घेतलं आहे जेणेकरून ते त्यांच्या भिंतीवर लावू शकतील. पण राघव म्हणतो की, शांती या अटींचे पालन करेल असं वाटत नाही.
"ती या गोष्टी गंमत म्हणून घेते. मागच्या काही वर्षांत तिचं 3-4 किलो वजन वाढलंय अशी तक्रार ती करत राहते. पण मला नाही वाटत की ती तिच्या पिझ्झा खाण्यावर नियंत्रण ठेऊ शकेल." तो हसत हसतचं म्हणाला.
राघव अगदी बरोबर सांगतोय असं शांती म्हणते. कारण "आमचं लग्न झाल्यापासून आम्ही दोनदा पिझ्झा खाल्लाय आणि लग्न होऊन फक्त दोनच आठवडे झालेत."
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)