'पुरामध्ये घर गेलं आता पोरांना कसं जगवू?', विदर्भातल्या पुरात शेकडो संसार उद्ध्वस्त

पूर
फोटो कॅप्शन, सोनू मोरे

पाऊस इतका बेफाम पडला की नद्या पात्र सोडून वाहत होत्या... वाटेत जे आलं ते तुडवून. घरातल्या वस्तू, भांडीकुंडी, कपडे, धान्य, मुलं पुस्तकं आणि चूल सगळं अस्ताव्यस्त झालं. माणसंही विखुरली. म्हातारी-कोतारी उंच भागाच्या आडोशाला राहिली तर लहानगी पोरं आई-बापाच्या खांद्यावर. पाणी जातच नाही म्हटल्यावर घर मागे टाकून छातीभर पाण्यातून ही माणसं काट्याकुट्यातून बाहेर पडली.

वर्ध्यातल्या नदीजवळ वसलेल्या गरीबांच्या वस्त्या आज मदतीसाठी आ वासून उभ्या राहिल्यात. त्या रात्री लोकांनी काय अनुभवलं ते सांगणाऱ्या कहाण्यांचा ग्राऊंड रिपोर्ट.

"आमच्या घराची परिस्थिती अतिशय वाईट होती. सामान काढता येत नव्हतं. पुराचं पाणी खूप होतं. त्यात कोणतंही सामान वाचलं नाही. आम्हाला निघायलाही जागा नव्हती. मदतीला कुणी नव्हतं. आम्हीच स्वतःचा जीव वाचवला"

पुराच्या पाण्याने घराचं नुकसान झालेल्या सोनू मोरे सांगत होत्या.

मोरे यांच्या घरातलं सगळं सामान वाहून गेलंय. अन्नधान्यही. संसार उघड्यावर आलाय.

आता सोनू मोरे घरातल्या पडलेल्या भिंतीना सारवून उघड्यावरचा संसार सावरताहेत.

वर्धा पूर

सोनू मोरे यांचे पती गजानन मोरे त्यादिवशी घरातच होते.

ते सांगतात "आमच्या घरात अर्धा माणूस पाणी होतं. थोडंथोडं पाणी घरात शिरलं. मग अचानक पाणी गुडघ्यापर्यंत आलं. बाहेर पडायला रस्ता नव्हता. मागून रस्ता तयार करून माझी मुलगी माझी पत्नी कसंतरी बाहेर पडलो. पण या परिस्थितीत आमच्यासाठी कुणीच मदतीला धावून आलेलं नाही. वॉर्ड मेंबर नाही, तहसीलदार नाही, गंभीर परिस्थिती होती. इकडली खूप घरं बुडाली होती. शासन मदत करेल याची वाट पहातोय. कपडेही नाहीत" खचलेल्या मनाने गजानन सांगत होते.

वेण्णा नदीला आलेल्या पुरामुळे हिंगणघाट शहरातील गाडगे नगर या परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले. अनेक कुटुंबाचं अतोनात नुकसान झालं. या भागातल्या 15 ते 20 घरांना पुराचा फटका बसलाय.

मोरे यांच्या घराशेजारी राहणाऱ्या कोल्हे कुटुंबाची अशीच अवस्था आहे. पुराचं पाणी घरात शिरलं आणि होत्याचं नव्हतं झालं.

"रात्रभर पाणी सुरू होतं. लाईटही नव्हती. पूर येईल असं वाटत नव्हतं. पण हळूहळू पाणी वाढत गेलं. मग पलंग दोराने बांधून छताला टांगला त्यात सामान जेमतेम वाचलं. पण फ्रीज फुटला, कुलर खराब झाला, घरातील साहित्य, अन्नधान्य ओलं झालं" सपना कोल्हे यांनी अनुभवलेल्या घटनेचा थरार सांगत होत्या.

वर्धा पूर

सपना यांचे पती उत्तम यांनी पुरातून अनेकांना बाहेर काढलं. जीव मुठीत घेऊन त्यांनीही घरातील सदस्यांचा जीव वाचवला.

"आम्ही आमच्या परिसरातील अनेकाचा जीव वाचवला. पाण्यातून मुलांनाही बाहेर काढलं. कुणाजवळ काहीच राहिलेलं नाही. आता खाण्याचीही सोय नाही. आमच्याकडे अन्न, पिण्याचं स्वच्छ पाणी काहीच राहिलेलं नाही" उत्तम सांगत होते.

गाडगे नगरातील चित्र विदारक आहे. सर्वत्र चिखल आणि घाण पसरली आहे. सर्वांच्या चेहऱ्यावर वेदना आहेत.

स्थानिक लोक हात पकडून उघड्यावर आलेला संसार दाखवत होते. 'आमचीही परिस्थिती बघा साहेब' असं म्हणत, वसंतराव बावने आणि त्यांची सून दुर्गा बावने आमचा हात पडकून त्यांच्या घरात घेऊन गेले.

साहेब आम्हालाही मदतीची गरज आहे. आमची परिस्थिती वाईट आहे, असं म्हणत त्यांनी ओसाड पडलेलं घर दाखवलं.

दुर्गा म्हणाल्या "ज्यावेळी पाणी नव्हतं त्यावेळी घरातून निघा असं म्हणत होते. पणं घरात पाणी शिरलं तेव्हा आम्हाला वाचवायला कुणीच नाही आलं. अनेक नेते रोडवरून तिकडून निघून जातात. माझी लहान लहान मुलं आहेत आम्ही कुठे जायचं. मुलांची पुस्तक वाहून गेली. त्यांच्या शिक्षणाचं काय, नवऱ्याला काम मिळत नाही. मी सुद्धा शेतात मजुरीच्या कामावर जात होती. त्याचंही काही राहिले नाही. आता लेकरांना घेऊन जगायचं कसं" हतबल होऊन दुर्गा सांगत होत्या.

रोजच्या मजुरीवर पोट भरणारी ही माणसं आहेत.

हिंगणघाट तालुक्यात 17 जुलैच्या संध्याकाळी सहा वाजल्यापासून पावसाला सुरूवात झाली. त्यानंतर 20 तास संततधार पाऊस बरसला.

पूर

हिंगणघाट शहरातील काही सखल भाग जलमय झाले. गाडगे नगर, महाकाली नगर, विठोबा नगर, ओमकार नगर, भोईपुरा या भागातील 500 च्या जवळपास घरांमध्ये पाणी शिरलं. संसार उघड्यावर पडले. पाणी इतकं होत की विठ्ठल वार्ड आणि मातोश्री नर्सरीतून 150 नागरिकांना रेस्क्यू पथकाने सुरक्षित स्थळी पोहचवण्यात आले होते.

याहून अधिक भयावह दृश्यं हिंगणघाट तालुक्यातील ग्रामीण भागातलं होतं.

आजनसरा, अलमडोह, कानोली, कात्री, हिवरा, सावंगी हेटी या गावांमध्ये हाहाकार माजला होता.

अलमडोह आणि कानोली गावाला पुराचा वेढा होता. अलमडोह या गावातल्या 30 तर कानोली गावातल्या 400 लोकांना रेस्क्यू करण्यात आलं होतं.

यासाठी NDRF आणि SDRF चे चार बचाव पथकं सज्ज होते.

आजनसरा या गावालाही पुराचा फटका बसला होता.

SDRF च्या पथकाने पुरात अडकलेल्या 10 जणांना सुरक्षित स्थळी पोहोचवलं होत. त्यात शेतकरी अरुण खरवडे यांचाही समावेश होता.

ती रात्र अरूण यांनी शेतातच काढली होती. "रात्रभर आम्ही शेतात झोपलो होतो. धुवाधार पाणी सुरू होतं. मी आणि माझी पत्नी सोबतच होतो. मात्र जागेवरून हलता येत नव्हतं. म्हणजे इकडून त्या काठावर येता येत नव्हतं. पण बचाव पथकानं सकाळी आम्हाला बाहेर काढण्यात आलं. सुटकेचा श्वास घेतला. बोटीच्या साह्याने त्यांनी आम्हाला सुखरूप गावात आणले".

पुरामुळे अरुण यांची 9 एकर शेती खरडून निघाली. शेतात साठून ठेवलेलं सल्फेटही वाहून गेलं.

गेल्या 28 वर्षात असा महाभयंकर पूर गावकऱ्यांनी पाहिला नाही.

पूर

आजनसरा या गावातील भोजाजी महाराज देवस्थानचे ट्रस्टी सांगतात " सावंगी येथे वर्धा आणि यशोदा संगम आहे. तिथून वर्धा नदीचं पूर्ण पाणी भरल्यानंतर यशोदा नदीचं पाणी सोनेगाव शिवारातून या गावाला वेढा घालून येतो आणि पुढे जाऊन हिवरा नदीला मिळते. त्यामुळं गावात येणार नदीचं बॅकवॉटरचं नियोजन गरजेचे आहे. पाणी गावात येऊ नये म्हणून शासनाने उपाययोजना करायला हवी. कारण यशोदा नदीचं आणि गावालगत असणाऱ्या नाल्याचं खोलीकरण व्हावं" अशी आमची त्यांची शासनदरबारी मागणी आहे.

पण हिंगणघाट आणि ग्रामीण भागात पूर येण्याची दोन मुख्यं कारणं पुढे येताहेत. त्यात सर्वांत महत्त्वाचं कारण म्हणजे या भागात झालेली अतिवृष्टी आणि दुसरं म्हणजे लोअर वर्धा म्हणजेच बगाजी सागर धरणाचे 31 दरवाजे सोडल्याने नदी नाले फुगून गेले.

या दोन कारणांमुळे पूर परिस्थिती निर्माण झाल्याचं तहसीलदार सतीश मिसळ यांचं म्हणणं होतं.

ते सांगत होते- "20 तासांमध्ये जवळपास 250 मिलिमीटर पाऊस पडला. पाण्याचा प्रवाह नदीमध्ये होता त्यामुळं नाल्याच्या पाण्याचा समावेश त्यात झाला नाही. आजणसरा परिसरामध्ये वर्धा आणि यशोदा नदीचा संगम आहे. पण वर्धा नदीच्या पाण्याच्या प्रवाहाचा वेग अधिक असल्यामुळं यशोदा नदीचं पाणी त्यात समाविष्ट होत नाही. त्यामुळं निर्माण झालेल्या बॅक वॉटरमुळे गावं बाधित होतात, म्हणजेच त्या गावांना पूर येतो".

Flood

नदीकाठच्या गावांना आणि सखल भागात राहणाऱ्या वस्त्यांना सगळ्यांना पुराचा फटका बसला आहे.

पण कानोली गावची सर्वात मोठी हानी टळली. या गावाला सभोवताली पुराचा वेढा होता. जवळपास 400 लोक पुराच्या तडाख्यात सापडले होते.

या गावात घर म्हणून काहीच दिसतंच नव्हतं. सगळीकडे पाणीच पाणी होतं.

जर या गावात वेळीच मदत पोहचली नसती तर अनेक लोक वाहून गेले असते असं चित्र होतं. पण सुदैवाने मदत मिळाली आणि मोठी हानी टळली असं मिसळ यांनी सांगितलं.

हिंगणघाट तालुक्याला जवळपास 69,335 हेक्टरवर फटका बसलाय. यातील बहुतांश शेतजमीन खरडून निघाली आहे. झालेलं नुकसान कधीही न भरून निघणारं आहे. शासकीय आकडेवारीनुसार जवळपास 1303 घराचं नुकसान झालं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)