उद्धव ठाकरेंचा रामदास कदम यांना टोला, 'रडण्याचे ढोंग करू नका' #5मोठ्या बातम्या

फोटो स्रोत, Twitter
विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा
1.रडण्याचे ढोंग करू नका- उद्धव ठाकरे
"शिवसेनेच्या विरोधात कारवाया करायच्या त्या तुम्ही केल्या. आता रडण्याचे ढोंगसोंग करू नका. शिवसैनिक तुम्हाला पुरते ओळखून आहे," असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
"आता त्या ईर्षेने आणि जिद्दीने मी उभा राहिलो आहे. ही इर्षा केवळ आणि केवळ तुमच्या भरवश्यावर आहे. तुम्ही सोबत असल्यास मला कशाचीही पर्वा नाही. समोर भाजपा असू दे की हे गद्दार नामर्द असू दे. मला त्यांची पर्वा नाही. ते काही काळ सत्ता उपभोगतील. पण जेव्हा भाजपाला कळेल हे काडीच्या कामाचे नाहीत, तेव्हा भाजपा त्यांना फेकून देईन," असे उद्धव ठाकरे म्हणाले. 'टीव्ही9 मराठी'ने ही बातमी दिली आहे.
"मागितले तर मी काहीही देईन. पण हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला, तर मात्र त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. आता त्यांनी निवडणुकीला सामोरे जावे आणि मते मिळवावी. पण ही हिंमत यांच्यात नाही. कारण हे खरे मर्दच नाहीत. दुसऱ्यांचा पक्ष चोरणे, दुसऱ्यांची चिन्हे चोरण्याचा प्रयत्न करणे, मात्र ते चोरले जाऊच शकत नाही. याला हिंमत लागते," असं ठाकरे म्हणाले.
2.गुगलवर औरंगाबाद सर्च केल्यास दाखवतंय संभाजीनगर, एमआयएम करणार तक्रार
औरंगाबादच्या नामांतरावरून राजकीय वाद सुरूच आहे. यात आता गुगलची भर पडली आहे. गुगल सर्च केल्यावर औरंगाबाद ऐवजी संभाजीनगर दिसतंय. आता या विरोधात एमआयएम आक्रमक झाली आहे. एमआयएमने कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.
महाविकास आघाडी सरकारने औरंगाबादचे संभाजीनगर या नामकरणाच्या प्रस्तावास मंजुरी दिली होती. त्यानंतर विरोधी पक्षांकडून राजकीय विरोध पाहायला मिळालं होतं. त्यानंतर आता नव्याने आलेल्या शिंदे- फडणवीस सरकारने महाविकास आघाडीने घेतलेल्या निर्णयाला स्थगिती देत औरंगाबाचे नामकरण छत्रपती संभाजीनगर असे करण्याचा प्रस्ताव मंजूर केला. 'महाराष्ट्र टाईम्स'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

किमान 12 मंत्री आवश्यक असताना औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामांतर करण्याचा निर्णय दोघांच्या मंत्रिमंडळाने घेतला आहे. तसेच तो पुढे केंद्र सरकारने मंजूर केल्यानंतर अधिकृत नामांतर होईल, असा कायदा आहे. मात्र गुगलने ज्या प्रकारे आधीच जाहीर केलंय, त्याविरोधात गुगलची पक्षाच्या वतीने कायदेशीर तक्रार करणार आहोत असं एमआयएमचे डॉ. गफफार कादरी यांनी सांगितलं.
3. नुपूर शर्मा यांना मारण्यासाठी आलेल्या युवकाला अटक
भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांना जीवे मारण्यासाठी घुसखोरी केलेल्या पाकिस्तानच्या युवकाला राजस्थानमध्ये अटक करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात १६ जुलै रोजी श्रीगंगानगर जिल्ह्यातील हिंदूमलकोट येथील सीमा चौकीपाशी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास त्याला पकडण्यात आलं. 'सकाळ'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, NUPURSHARMABJP
गस्तीवरील पथकाला त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्यामुळे त्याला तातडीने ताब्यात घेण्यात आले, अशी माहिती सीमा सुरक्षा दलाच्या एका अधिकाऱ्याने दिली. त्याच्याकडे 11 इंच लांबीचा सुरा, धार्मिक पुस्तके, कपडे, खाद्यपदार्थ, वाळू अशा वस्तू सापडल्या. आपले नाव रिझवान अश्रफ असे असून उत्तर पंजाबमधील मंडी बहाउद्दीन शहराचा रहिवासी असल्याचा दावा तो करतो.
प्रेषित महंमद पैगंबर यांच्याबद्दल अनुद्गार काढणाऱ्या भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा यांना न्यायालयाच्या पुढील सुनावणीपर्यंत कोणत्याही राज्याच्या पोलिसांनी अटक करू नये, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले. यामुळे शर्मा यांना दिलासा मिळाला आहे. या प्रकरणी 10 ऑगस्टला पुढील सुनावणी होणार आहे. न्या. सूर्यकांत आणि न्या. जे बी. पारडीवाला यांच्या पीठासमोर सुनावणी झाली.
4.अमृता फडणवीसांच्या नव्या गाण्याला 2 मिलिअन व्ह्यूज
अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं चर्चेत आहे. अमृता फडणवीस यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे आपल्या नव्या गाण्याची घोषणा केली होती. आज हे गाणं सारेगम या युट्यूब चॅनलवर प्रदर्शित झालं आहे. 'वो तेरे प्यार का गम' असं या गाण्याचं नाव आहे. 'माय लव्ह' या हिंदी चित्रपटातील हे गाणं आहे. अमृता यांनी पुन्हा एकदा आपल्या आवाजामध्ये हे गाणं गायलं आहे. 'वो तेरे प्यार का गम' हे जुन्या गाण्याचंच रिक्रिएटेड वर्जन आहे. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, TWITTER
'वो तेरे प्यार का गम' या गाण्याच्या रिक्रिएट वर्जनचे बोल अमृता फडणवीस यांचे आहेत. तसेच या गाण्याच्या व्हिडीओमध्ये त्या स्वतः हे गाणं गाताना दिसत आहेत. अमृता यांनी या गाण्याच्या व्हिडीओमध्ये काळ्या रंगाचा वेस्टर्न ड्रेस परिधान केला असल्याचं दिसत आहे. हे नवं गाणं ऐकता काहींनी त्यांच्या आवाजाचं कौतुक केलं आहे.
या गाण्याला 5 तासांमध्येच 10 लाखांपेक्षा अधिक व्ह्युज मिळाले आहेत. 'माय लव्ह' या चित्रपटामधील हे गाणं याआधी आनंद बक्षी यांनी लिहिलं होतं. तर सुप्रसिद्ध गायक मुकेश यांनी ते गायलं होतं. आता अमृता यांनी पुन्हा या गाण्याच्या आठवणींना आपल्या आवाजाच्या माध्यमातून उजाळा दिला आहे.
5. आयपीएलआधी मिनी आयपीएल
आयपीएलप्रमाणेच दक्षिण आफ्रिकेनेही टी-20 लीग लॉन्च केली आहे. या स्पर्धेला मिनी आयपीएल म्हटलं जात आहे कारण या लीगमध्ये खेळणाऱ्या 6 टीमना आयपीएल फ्रॅन्चायजींच्या मालकांनीच विकत घेतलं आहे. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली कॅपिटल्स, सनरायजर्स हैदराबाद, लखनऊ सुपर जाएंट्स आणि राजस्थान रॉयल्स यांनी दक्षिण आफ्रिकेच्या टी-20 लीगमध्ये मालकी हक्क मिळवला आहे. या स्पर्धेचं आयोजन पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात होणार आहे. 'लोकमत न्यूज18'ने ही बातमी दिली आहे.
क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार आयपीएलच्या वेगवेगळ्या फ्रॅन्चायजींनी पुढच्या वर्षाच्या सुरूवातीला होणाऱ्या क्रिकेट साऊथ आफ्रिकेच्या टी-20 लीगमध्ये 6 टीम विकत घेतल्या आहेत. लिलाव प्रक्रियेत मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स, सनरायजर्स हैदराबाद, लखनऊ सुपर जाएंट्स आणि राजस्थान रॉयल्स या टीमच्या मालकांनी भाग घेतला होता. आयोजकांनी अजूनपर्यंत टीम विकत घेणाऱ्यांची अधिकृत घोषणा केलेली नाही.
मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्सनी टीम विकत घेण्यासाठी जवळपास 250 कोटी रुपयांची बोली लावली. आयपीएल मॉडेलनुसार प्रत्येक टीमला 10 वर्षांसाठी फ्रॅन्चायजी फीच्या 10 टक्के द्यावे लागणार आहेत.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








