मार्गारेट अल्वा : महिला आरक्षणाच्या विधेयकापासून ते उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवारापर्यंत

फोटो स्रोत, Getty Images
- Author, इम्रान कुरैशी
- Role, बीबीसी हिंदीसाठी
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या मार्गारेट अल्वा यांना विरोधी पक्षांनी उपराष्ट्रपतिपदासाठीची उमेदवारी जाहीर केली आहे.
अल्वा यांना महिलांच्या प्रश्नांवर केलेल्या कामामुळे ओखळलं जातं. 1986 साली निवडणूक संस्थांमध्ये महिलांच्या आरक्षणासाठी पुढाकार घेण्यात त्यांचा मोठा वाटा होता.
अल्वा 1986 मध्ये काँग्रेसच्या राजीव गांधी सरकारमध्ये महिला आणि बालविकास मंत्री होत्या. त्याचवेळी त्यांनी ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंत सर्व निवडणूक संस्थांमध्ये महिलांसाठी 33 % आरक्षणाचा कायदा आणण्यासाठी पुढाकार घेतला होता.
अल्वा महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर सातत्याने काम करत होत्या. त्यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे आणि इतर महिला खासदारांच्या सहकार्यामुळे महिला आरक्षणाशी संबंधित विधेयक राज्यसभेत 2010 साली मंजूर झालं. मात्र त्यानंतरच्या दोन लोकसभेत हे विधेयक तसंच रखडलं.
त्यावेळी अल्वा यांनी म्हटलं होतं की, "राजीव गांधींशी चर्चा केल्यानंतर जेव्हा मी महिला आरक्षणाचं विधेयक मंत्रिमंडळात घेऊन आले, तेव्हा माझेच काही सहकारी त्याची खिल्ली उडवत होते. हे पाहून मला खूप वाईट वाटलं."
उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षाच्या उमेदवार म्हणून नाव घोषित केल्यानंतर मार्गारेट अल्वा यांनी विरोधी पक्षातील नेत्यांचे आभार मानले आहेत.

फोटो स्रोत, Ani
मार्गारेट अल्वा यांनी ट्वीट करत लिहिलं की, "भारताच्या उपराष्ट्रपतिपदासाठी संयुक्त विरोधी पक्षाची उमेदवार म्हणून निवड होणे हा विशेषाधिकार आणि सन्मान आहे. मी अत्यंत नम्रतेने ही उमेदवारी स्वीकारते."
"माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल मी विरोधी पक्षांच्या नेत्यांचे आभार मानते. जय हिंद!" असंही त्यांनी पुढे लिहिलं.
वयाच्या 42 व्या वर्षी मंत्री
अल्वा या चारवेळा राज्यसभेच्या खासदार राहिल्या आहेत. 1974 ते 1992 दरम्यान त्या चार वेळा वरिष्ठ सभागृहाच्या सदस्य होत्या.
1991 मध्ये त्यांना पी.व्ही. नरसिंह राव सरकारमध्ये कर्मचारी आणि प्रशिक्षण मंत्री (स्वतंत्र प्रभार) हे पद मिळालं. त्या 1999 मध्ये पहिल्यांदा कर्नाटकातील कनारा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आल्या होत्या.
इंदिरा गांधींच्या राजवटीत अल्वा पहिल्यांदा प्रसिद्धीच्या झोतात आल्या. त्या काळात त्यांनी काँग्रेस पक्षात अनेक पदं भूषवली.

फोटो स्रोत, Getty Images
त्या वायोलेट अल्वा आणि जोकिम अल्वा यांची सून आहेत. हे दोघेही खासदार होते. मार्गारेट अल्वा वयाच्या 42 व्या वर्षी मंत्री झाल्या होत्या. त्याकाळी हे एक मोठं यश होतं.
कर्नाटक विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते बी.के. हरिप्रसाद यांनी बीबीसीला सांगितलं, "मार्गारेट अल्वा यांचं वक्तृत्व अत्यंत प्रभावी आहे. त्यांना संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजाची चांगली जाण आहे. त्या उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधी पक्षाच्या सर्वांत योग्य उमेदवार आहेत. विरोधी पक्षाचे उमेदवार म्हणून या पदासाठी त्यांचा अर्ज योग्य आहे."
कर्नाटकचे माजी मंत्री आर. व्ही. देशपांडे म्हणाले की, "अल्वा यांना प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्या संसदीय कामकाज राज्यमंत्रीही राहिल्या आहेत. त्यामुळे त्यांना संसदीय कार्यपद्धतीचा खूप अनुभव आहे. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेच्या सभापतीपदाची जबाबदारी निभावण्याची पात्रता त्यांच्यात आहे."
सोनियांशी मतभेद झाल्याने दिला राजीनामा
मार्गारेट अल्वा या एकेकाळी गांधी कुटुंबाच्या जवळच्या मानल्या जात होत्या. पण एक वेळ अशी आली जेव्हा त्यांनी सोनिया गांधींशी मतभेद झाल्यानंतर राजीनामा दिला.
कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या तिकीट वाटपामध्ये विश्वासात न घेतल्याचा आरोप करत त्यांनी काँग्रेस पक्षातून राजीनामा दिला होता. चर्चा अशी होती की त्यावेळी त्यांना त्यांच्या काही नातेवाईकांसाठी तिकिटं हवी होती जी देण्यास त्यांना नकार देण्यात आला होता.
पण कालांतराने त्यांनी काँग्रेस नेतृत्वाशी पुन्हा तुळवून घेतलं आणि यूपीए-2च्या शेवटच्या काळात त्यांची राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
विलासराव विरुद्ध मार्गारेट अल्वा
मार्गारेट अल्वा काही काळ महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रभारी देखील होत्या. त्यावेळी विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते आणि प्रभा राव काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष होत्या.
प्रभा राव आणि मार्गारेट अल्वा जोडीबरोबर विलासराव देशमुखांच्या सतत उडणाऱ्या खटक्याच्या बातम्यांची त्यावेळी सतत चर्चा असायची.

फोटो स्रोत, Ani
त्यावेळी नारायण राणे शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये दाखल झाले होते. त्यांच्या वाट्याला महसूल मंत्रिपद आलं होतं. पण त्यांना मुख्यमंत्रिपदाची आशा होती.
अशात मुख्यमंत्रिपदासाठी नारायण राणेंनी दिल्लीत वारी सुरू केल्या होत्या. त्यांना प्रभा राव आणि मार्गारेट अल्वांचा पाठिंबा असल्याच्या चर्चा त्यावेळी सतत रंगायच्या.
याबाबात अधिक माहिती देताना ज्येष्ठ पत्रकार दीपक भातुसे सांगतात,
"महाराष्ट्रात काँग्रेसच्या इतिहासात प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री यांच्यात नेहमीच वाद राहिला आहे. प्रदेशाध्यक्ष एकप्रकारे मुख्यमंत्र्यांवर अंकुश ठेवायचं काम करायचा, त्याच इतिहासाची पुनरावृत्ती प्रभा राव प्रदेशाध्यक्ष असतानाही दिसून आली. पण यावेळी प्रभारी मार्गारेट अल्वा यांचीही प्रभा राव यांना साथ मिळाली होती.
राव आणि अल्वा या दोन महिला नेत्यांनी विलासराव देशमुख यांची चांगलाच कोंडी केली होती. वारंवार बैठका घेऊन या दोन नेत्या विलासराव देशमुख यांना पक्षाकडून वेगवेगळ्या सूचना करून एक प्रकारे देशमुख यांच्यावर अंकुश ठेवत होत्या. त्यामुळे त्या काळात महाराष्ट्रात प्रभा राव आणि मार्गारेट अल्वा विरुद्ध विलासराव देशमुख हा वाद चांगलाच रंगला होता."
अनेकदा त्यामुळे विलासराव देशमुखांनी प्रभा राव आणि मार्गारेट अल्वांच्या बैठकांकडे पाठ फिरवल्याचंसुद्धा दिसून आलं होतं.
गुजरात, गोवा, राजस्थान आणि उत्तराखंडच्या राज्यपाल
अल्वा यांचा जन्म 1942 मध्ये मंगळूर येथे झाला. त्यांचे वडील भारतीय नागरी सेवेत होते.
त्यांचं लग्न अल्वा कुटुंबात झालं होतं. त्यांचे सासू आणि सासरे दोघेही खासदार होते. या घराण्यातच त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं.
अल्वा या गुजरात, गोवा, राजस्थान आणि उत्तराखंडच्या राज्यपालही राहिल्या आहेत.

फोटो स्रोत, facebook
उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत त्यांचा सामना एनडीएचे उमेदवार जगदीप धनकड यांच्याशी होणार आहे.
भाजप नेते धनकड हे सध्या पश्चिम बंगालचे राज्यपाल आहेत. शनिवारीच त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झालं आहे.
विरोधकांची एकजूट?
उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधी उमेदवार म्हणून अल्वा यांच्या नावाची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.
शरद पवार यांच्या घरी TMC, CPI(M), RJD, समाजवादी पार्टी आणि इतर पक्षांच्या बैठकीनंतर मार्गारेट अल्वा यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
बैठकीनंतर अल्वा यांच्या नावाची घोषणा करताना पवार म्हणाले, "आम्ही पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्या एका परिषदेत होत्या. आम्ही दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी राष्ट्रपतिपदासाठीचे विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना पाठिंबा जाहीर केला होता. ते लवकरच मार्गारेट अल्वा यांच्या नावालाही पाठिंबा देतील."
उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांना शिवसेनेनं पाठिंबा जाहीर केला आहे. शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीनंतर शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी ही माहिती दिली.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








