रामदास कदम - ‘आदित्यचं वय काय, तू आमदारांना काय बोलतो आहेस? थोडं भान ठेवा’

फोटो स्रोत, Getty Images
"मी प्रचंड अस्वस्थ आहे. मला झोप येत नाही. वेदना होतात, त्रास होतो. जेवण जात नाही. हा दिवस कधी येईल असं वाटलं नव्हतं. आमच्यावर अशी वेळ येईल असं वाटलं नव्हतं. माझ्या मुलाला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न झाला. आम्ही तुमचं काही वाईट केलं नाही. आम्ही काही चूक केली नाही", असं रामदास कदम म्हणाले. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत बोलताना कदम यांना अश्रू अनावर झाले.
रामदास कदम यांनी त्यांचा शिवसेना नेते पदाचा राजीनामा दिल्याचं सांगितलं आहे. तर शिवेसेनेनं त्यांची नेतेपदावरून हकालपट्टी केल्याचं म्हटलंय.
अशा स्थितीत रामदास कदम यांनी एबीपी माझाला मुलाखत देऊन त्यांच्या भावनांना वाट करून दिली आहे. यावेळी रामदास कदम यांनी थेट उद्धव ठाकरेंवर टीका करणं टाळलंय. पण, त्याचवेळी त्यांनी आदित्य ठाकरे आणि अनिल परब यांच्यावर मात्र नाव घेऊन टीका केलीय. त्यांच्यावर आरोप केले आहेत.
शिवाय त्यांच्या टीकेच मोठा रोख हा शरद पावर आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर असल्याचंसुद्धा दिसून आलंय.
शिंदे गट विरुद्ध शिवसेना संघर्ष शिगेला पोहोचला आहे. शिवसेना संपवण्याचं काम पवार काका-पुतण्यांनी केलं, असं रामदास कदम यांनी म्हटलं आहे.
रामदास कदम यांनी सांगितलं आहे की, "छगन भुजबळ फुटले तेव्हा मी संघर्ष केला. नारायण राणे फुटले तेव्ही मी संघर्ष केला. राज ठाकरे फुटले तेव्हा मी संघर्ष केला. हकालपट्टी करताना आमच्या संघर्षाची आठवण ठेवा. उद्धव साहेब तुम्ही हकालपट्टी केली नाही मी राजीनामा दिला. मी माझ्या मनातून तुम्हांला काढलंय. 52 वर्षं काम करणाऱ्या एका शिवसैनिकावरती राजीनामा देण्याची वेळ का येते याचं आपण आत्मपरिक्षण केलं पाहिजे".
शरद पवारांवर शिवसेना फोडण्याचा आरोप करत त्यांचे आपण उद्धव ठाकरेंना पुरावे दिल्याचा दावासुद्धा कदम यांनी केलाय.
ते म्हणाले, "एकनाथ शिंदे आणि 51 आमदारांनी शिवसेना वाचवली आहे. अजित पवार सकाळी सात वाजता मंत्रालयात जाऊन बसतात. राष्ट्रवादीचे 100 आमदार निवडून आणण्याचं टार्गेट त्यांनी ठेवलं आहे. शिवसेनेचे जिथे जिथे आमदार आहेत आणि जिथे राष्ट्रवादीचे माजी आमदार आहेत. त्याला ताकद देऊन शिवसेनेचा आमदार कसा संपवायचा हे कटकारस्थान शरद पवार आणि अजित पवारांनी केलं होतं. त्यात ते जवळपास यशस्वी झाले", असं कदम म्हणाले.
"मी सर्व्हे केला, मी माहिती घेतली. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांनी बंड केलं नसतं तर पुढच्या निवडणुकीत शिवसेनेचे 10 आमदारही निवडून आले नसते. जबाबदारीने सांगतोय. उद्धवसाहेबांची प्रकृती ठीक नव्हती, मान्य. कोरोना होता, तेही मान्य. पण शरद पवार कोकणात पक्ष कसा फोडतात हे मी पाठवलं होतं.
मुख्यमंत्री तुम्ही, शासकीय फंड मात्र राष्ट्रवादीच्या माध्यमातून दिला जात होता. हे तुम्हाला कागदपत्रांसह दाखवलं होतं. आमदारही तेच सांगत होते, दाखवत होते. तुम्ही शरद पवारांना सोडलं नाही. पक्ष संपला तरी चालेल अशी तुमची भूमिका होती. आमदार गेले तरी चालतील, खासदार गेले तरी चालतील अशी भूमिका तुम्ही घेतलीत."
"बाळासाहेबांनी अख्खं आयुष्य काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसशी संघर्ष केला. त्यांनी हिंदूहृदयसम्राट पदवी मिळवली. बाळासाहेबांनी उद्धव यांना काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर जाऊ दिलं असतं का? शरद पवार शिवसेना तोडण्यात यशस्वी झाले," अशी टीका कदम यांनी केली.
"बाळासाहेब असताना शरद पवारांना जे जमलं नाही ते त्यांनी ते उद्धजींना साथीला घेऊन केलं. हकालपट्टी करण्यापेक्षा भविष्यात आपण एकत्र कसे येऊ याचा विचार करा. गेलेल्या आमदारांना-खासदारांना कसं आणता येईल याचा विचार करा. आमदारांना बैल, रेडे, कुत्रे अशी भाषा वापरण्यात आली. महिला आमदारांना वेश्या म्हटलं गेलं.
कदम यांनी उद्धव ठाकरे यांचा आदरार्थी उल्लेख केला, पण आदित्य ठाकरे यांच्यावर मात्र आगपाखड केलीय.
"आदित्यचं वय काय, तू आमदारांना काय बोलतो आहेस? थोडं भान ठेवा. मी उद्धव ठाकरेंशी बोललो. राष्ट्रवादीबरोबर घरोबा करू नका असं सांगितलं होतं. हे सांगून मी बाहेर पडलो होतो. तेव्हापासून मी मातोश्रीवर गेलो नाही. पावणेतीन वर्षं मी तिकडे गेलो नाही. तुम्ही मीडियात एक शब्द बोलायचा नाही असं त्यांनी सांगितलं. मागच्या तीन वर्षात तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन केला. मला मीडियात बोलण्यावर बंदी का घालण्यात आली याचं उत्तर मिळालेलं नाही", असंही कदम बोलले.
"मी मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंवर ठीका करणार नाही. शरद पवारांना जे हवं आहे ते मी करणार नाही. उद्धवजींच्या आजूबाजूला जी मंडळी बसली आहेत त्यांना हाकलून द्यायला हवं. आणखी शिवसेना थोडीबहुत बाकी आहे, ती संपायची वाट पाहू नका."
रामदास कदम कूपमंडूक वृत्तीचे- अरविंद सावंत
रामदास कदम यांच्या आरोपांना शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी लगेचच प्रत्युत्तर दिलंय.
"रामदास कदमांनी स्वत: आत्मपरीक्षण करावं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून रामदास कदम यांनी अवाक्षर काढलं नाही. त्यांनी अडीच वर्षात मातोश्रीवर पाऊस ठेवलं नाही. शिवसेना नेता म्हणून तुमची काही जबाबदारी आहे. तुम्ही फिरकला नाहीत, अभिनंदन देखील केलं नाहीत. इतक्या कूपमंडूक वृत्तीची माणसं आहेत," असं प्रत्युत्तर शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलंय.

फोटो स्रोत, SHIVSENA
"पक्ष अडचणीत आहे. शिवसेनेने तुम्हाला काय दिलं नाही? त्यांनीच सांगावं. तुम्ही विधानसभेत पडलात. खेडच्या जनतेने तुम्हाला निवडलं नाही. तुम्ही उद्धव ठाकरेंना आग्रह केलात की तुमचं पुनर्वसन करा. त्यादरम्यानची वर्तमानपत्रं काढा. त्यांचं आणि राष्ट्रवादीचं साटंलोटं बघा. मुंबई महापालिकेतून विधान परिषदेवर जी मंडळी जातात त्यामध्ये त्यांना स्थान देण्यात आलं. शिवसैनिकाला बाजूला करून त्यांना स्थान देण्यात आलं," अशी आठवणसुद्धा सावंत यांनी यावेळी करून दिलीय.
"कल्याण डोंबिवलीत त्यांनी जाहीरपणे सांगितलं होतं की माझं यांच्याबरोबर जमणार नाही. मला त्रास देत आहेत असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं होतं. तेव्हा भाजप वाईट, आता राष्ट्रवादी वाईट. तुमचं कोणाबरोबर जमतं ते सांगा. 2019मध्ये का सांगितलं नाही की बसू विरोधी पक्षात", असा सवाल यावेळी सावंत यांनी एकनाथ शिंदे यांना विचारला आहे.
नगरसेवक होतात, आमदार झालात, मंत्री झालात, विरोधी पक्षनेते होतात. ज्यांनी हे दिलं त्यांना सोडून जाता. तुमच्या मुलासाठी शिवसैनिक राबले, असंही सावंत कदम यांना म्हणाले आहेत.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









