रामदास कदम : शाखाप्रमुख ते मंत्री, जाणून घ्या 9 मुद्द्यांमध्ये प्रवास

रामदास कदम

फोटो स्रोत, Getty Images

माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. तसं राजीनामापत्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे त्यांनी पाठवलंय.

राजीनामापत्रात रामदास कदमांनी लिहिलंय की, "बाळासाहेब ठाकरे यांनी माझी शिवसेना नेतेपदी नियुक्ती केली होती. मात्र, शिवसेनाप्रमुखांचं निधन झाल्यानं पदाला कुठलीही किंमत राहिली नाही, हे मला पाहायला मिळालं."

या राजीनामापत्रात रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर नाराजी व्यक्त केलीय. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापनेबाबतही त्यांनी नापसंती व्यक्त केलीय.

रामदास कदम

फोटो स्रोत, Ramdas Kadam

फोटो कॅप्शन, रामदास कदम

शिवसेनेत चार ते पाच दशकांपासून काम करणाऱ्या रामदास कदम यांच्या राजकीय कारकीर्दीचा घेतलेला आढावा :

1) रामदास कदम यांचा जन्म 27 जुलै 1953 रोजी झाला. ते निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळखले जातात.

2) रत्नागिरीमधील खेड मतदारसंघातून ते निवडून येत असले तरी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात मुंबईतील कांदिवली येथून झाली आहे. शिवसेनाप्रमुखांनी बजाव पुंगी, हटाव लुंगी आंदोलन सुरू केल्यावर रामदास कदम शिवसेनेच्या आंदोलनात सहभागी झाले.

3) कांदिवली गटप्रमुख, उपशाखाप्रमुख, शाखाप्रमुख, खेडचे आमदार अशी त्यांची राजकीय कारकीर्द वाढत गेली आणि शिवसेनेचे महत्त्वाचे नेते म्हणून त्यांना ओळख मिळाली.

रामदास कदम

फोटो स्रोत, Getty Images

4) 1990 साली ते खेड मतदारसंघात विजयी झाले. त्यानंतर 1995, 1999, 2004 अशा विधानसभा निवडणुका जिंकले.

5) 1995 साली युतीच्या सरकारमध्ये ते पहिल्यांदा अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री होते तसेच गृहराज्यमंत्री होते.

6) 2005 साली त्यांची विधानसभेतील विरोधीपक्षनेतेपदी निवड झाली. या काळात त्यांनी आघाडी सरकारवर विविध प्रश्नांच्या निमित्ताने टीकास्त्र सोडले होते. नारायण राणे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर झालेली पोकळी भरुन काढण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता.

7) 2009 साली रामदास कदम रत्नागिरीतील गुहागर मतदारसंघातून पराभूत झाले. राष्ट्रवादीचे भास्कर जाधव यांनी कदमांचा पराभव केला होता. त्यानंतर कदमांना शिवसेनेनं विधानपरिषदेत पाठवलं.

8) 2014 सालीही रामदास कदम पुन्हा विधानपरिषदेत गेले. मात्र, 2014 साली विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपनं एकत्र येत राज्यात सत्ता स्थापन केली. या सत्तेत रामदास कदम यांना पर्यावरण मंत्रिपद देण्यात आलं. पर्यावरण मंत्री असताना प्लास्टिक बंदीचा घेतलेला निर्णय विशेष गाजला.

9) 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मात्र रामदास कदम यांनी विधानसभा लढवण्यास नकार दिला. मात्र, मुलगा योगेश कदम याला दापोली मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आणि तिथं राष्ट्रवादीचे संजय कदम यांना पराभूत करून योगेश कदम विधानसभेत पोहोचले.

यापूर्वी अनिल परबांवर टीका

यापूर्वी रामदास कदम यांनी माजी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर जोरदार टीका केली होती.

अनिल परब यांच्याविरोधात आपली नाराजी 18 डिसेंबर 2021 रोजी रामदास कदमांनी व्यक्त केली होती.

अनिल परब यांच्यावर रामदास कदम यांनी काय आरोप केले होते?

  • मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जातंय. हे मला राजकीयदृष्ट्या आयुष्यातून उद्ध्वस्त करण्याचा कट आहे.
  • अनिल परब हे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आहे. गेली दोन वर्षे ते फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला येतात. बाकी संबंध जिल्हा वाऱ्यावर सोडलंय. जिल्ह्यात येत नाही, जिल्ह्यात पालक म्हणून कुठलं काम नाही.
  • अनिल परब यांच्याविरोधात बोलणं म्हणजे पक्षावर बोलणं नव्हे.
  • रामदास कदमना राजकारणातून संपवायचं, असा डाव शिवसेनेतल्या नेत्यांचाच आहे.
  • अनिल परबांना आव्हान आहे की, वांद्रेमधून विधानसभेला उभं राहून निवडून येऊन दाखवा. तुम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत असाल, पण त्याचा अर्थ असा नाही की, शिवसेनेच्या नेत्याला उद्ध्वस्त करायचं.
  • माझ्या मुलाला योगेश कदमला तिकीट देऊ नये म्हणून राष्ट्रवादीच्या संजय कदमला मातोश्रीवर घेऊन गेले होते. योगेश कदमला तिकीट दिल्यानं अनिल परब यांनी राग काढला. योगेश कदमविरोधात सूडाची भावना ठेवली.
  • मनसेचे नेते वैभव खेडेकर आणि संजय कदम यांना अनिल परब यांनी पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला. स्थानिक आमदारांना डावलण्याचं काम अनिल परब यांनी केलं.
  • मंत्रिपद मिळाल्यानंतर अनिल परब यांनी पक्षाशी गद्दारी केलीय.
  • शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब आहेत की अनिल परब आहेत हा आम्हाला प्रश्न पडलाय.
  • रामदास कदम, सुभाष देसाई आणि दिवाकर रावते यांना मंत्रिपद नको, आमचं वय झालं, नवीन लोकांना मंत्रिपदं दिली. पण मंत्रिपदं दिली त्यात पहिलं नाव सुभाष देसाई होतं. मला वाईट वाटलं. शेवटी पक्षप्रमुखांचा आदेश आम्हाला मान्य. पण मनातल्या वेदना सांगतोय.
  • अनिल परब म्हणतात निधी देणार नाही. तुझ्या बापाचा पैसा आहे का? जिल्हा नियोजनाचा पैसा आहे.
  • अनिल परबच्या बापाचा मतदारसंघ आहे का? तू पैसे दिलेस का? शिवसेनेचा गद्दार अनिल परब आहे. अनिल परब शिवसेनेचा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या घशात घालायला निघालाय.
  • अनिल परबच्या डोक्यात मस्ती गेलीय, हवा गेलीय.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)